पंतप्रधान कार्यालय

2 ऑक्‍टोबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पहिल्या बैठकीच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधांनानी केलेले भाषण

Posted On: 02 OCT 2018 11:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2018

 

संयुक्‍त राष्ट्राचे सरचिटणीस महामहीम अँटोनियो गुटेरस , आंतराष्ट्रीय सौर आघाडी बैठक आणि हिंदी महासागर तटीय क्षेत्र सहकार्य संघटना, या देशांतून आलेले सर्व मंत्रीगण, मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, उद्योग जगतातील मित्र, सन्माननीय अतिथीगण, विशेषतः युवा विद्यार्थी मित्र, महिला आणि पुरुषगण...

आज सकाळी स्वच्छतेशी संबंधित एका महत्वपूर्ण कार्यक्रमात महामहीम अँटोनियो गुटेरस यांच्याबरोबर सहभागी होण्याची संधी मला मिळाली. आजपासूनच  महात्‍मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे आयोजन देशात आणि जगभरात सुरु होत आहे. हरित भविष्यासाठी होत असलेल्या या मंथनाचा प्रारंभ करण्यासाठी आजच्या दिवसासारखा योग्य दिवस आणखी कुठला असू शकत नाही.

आंतराष्ट्रीय सौर आघाडी (ISA), आणि मला वाटते की तो आईसा असा लोकप्रिय शब्द होईल , म्हणजेच आईसा बैठक असा होईल.  जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक आणि परिषद आणि पुनर्गुंतवणूक बैठक असेल किंवा हिंदी महासागर तटीय क्षेत्र सहकार्य संघटनेची ऊर्जा बैठक असेल, तिन्ही बैठकींचे बृहद उद्दिष्ट एकच आहे- हरित भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जेचा पर्याय तयार करणे.

मित्रांनो, गेल्या 150-200 वर्षांमध्ये मानवजाति आपल्या ऊर्जाविषयक गरजांसाठी धरतीच्या भूगर्भात दडलेल्या संसाधनांवर अधिक अवलंबून राहिली आहे. आपल्या निर्सगाने याचा कसा विरोध केला आहे आणि आजही करत आहे, हे आपण सर्वजण पाहत आहोत. निसर्ग आपल्याला सातत्याने संदेश देत आहे की जमिनीवरील ऊर्जा मग ती सूर्याची असो, वायुतील असो  किंवा पाण्यातील असो, हाच  उत्तम आणि सुरक्षित भविष्यावरील उपाय आहे.

मला आनंद होत आहे की, आज आपण सगळे निसर्गाकडून मिळत असलेल्या या संदेशावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.  मित्रानो, मला आठवतंय, तीन वर्षांपूर्वी पुनर्गुंतवणुकीवरील पहिल्या बैठकीत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मेगावॅट पासून गिगावॅट पर्यंतचा भारताच्या प्रवासाचा संकल्प आपल्या देशवासियांसमोर मांडला होता. तेव्हा मी हे स्पष्ट केले होते की  सौर आणि हरित ऊर्जेचा लाभ तेव्हाच मिळू शकेल जेव्हा ती स्वस्त आणि सुलभ होईल. आणि यासाठी मी सौर संसाधनांनी समृद्ध देशांचा एक सामायिक मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील मांडला होता. मला आनंद होत आहे की आपल्याला अतिशय कमी वेळेत या योजना पुढे नेण्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. 

मित्रांनो , आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जगासाठी आशेचा एक मोठा किरण बनून समोर आली आहे. तीन वर्षात ही संघटना एक करार आधारित आंतर-सरकारी संघटना बनली आहे. सव्वाशे कोटी भारतीयांना या गोष्टीचा आनंद देखील आहे की आयएसएचे मुख्यालय भारतातच आहे. यामुळे आयएसएप्रति आपुलकी आणखी वाढते.

मला वाटते भविष्यात जेव्हा 21व्या शतकात स्‍थापित मानव कल्‍याणच्या मोठ्या संघटनांची चर्चा होईल तेव्हा आयएसएचे नाव सर्वात वर असेल. आयएसएच्या रूपात आपण सर्वानी हवामान न्याय सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक खूप मोठे व्यासपीठ निर्माण केले आहे. भावी पिढयांना मानवतेशी संबंधित खूप मोठी भेट आपण सर्वानी मिळून दिली आहे.

मित्रांनो, मला नेहमी असे वाटत आले आहे की जगाच्या ऊर्जा विषयक गरजा पूर्ण करण्यात ओपेक आज जी भूमिका पार पाडत आहे तीच भूमिका आगामी काळात आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आईसा) ची असणार आहे. जी भूमिका आज तेलांच्या विहिरींची आहे, तीच भूमिका भविष्यात सूर्याच्या किरणांची असणार आहे. आज आईसाचा हा उपक्रम जिथवर पोहचला आहे, यातील सक्रिय योगदानासाठी मी संयुक्त राष्ट्रांचे विशेष आभार मानतो. 

पॅरिसमध्ये झालेल्या आयएसएच्या उदघाटन कार्यक्रमात तत्कालीन सरचिटणीस महामहीम बान की मून यांची उपस्थिती आणि आजच्या कार्यक्रमात महामहीम अँटोनियो गुटेरस यांचा सहभाग यावरून सिद्ध होते की संयुक्त राष्ट्र या व्यासपीठाला किती महत्व देते. मी याप्रसंगी फ्रान्सचे अध्यक्ष, त्यांचे सरकार यांचेही त्यांनी दिलेल्या सहकार्य आणि समर्थनाबद्दल हृदयपूर्वक आभार मानतो.

मित्रानो, आयएसएच्या या पहिल्या बैठकीत 40 देशांचे प्रतिनिधि सहभागी झाले आहेत. मात्र आता आपल्याला त्या दिशेने पुढे जायचे आहे जेव्हा सौर ऊर्जेचा हा पर्याय केवळ कर्कवृत्त आणि विषुववृत्ताच्या आसपास वसलेल्या सव्वाशे देशांपर्यंत मर्यदित राहू नये तर संपूर्ण जगाला याचा लाभ मिळेल. सौर ऊर्जेबाबत सार्वत्रिक सहकार्याच्या भावनेअंतर्गत भारत आयएसएच्या बैठकीत सर्व सदस्य देशांना सदस्यत्वाचा प्रस्ताव मांडणार आहे. 

मित्रांनो, भारत हिंदी महासागर तटीय क्षेत्र सहकार्य संघटनेचा महत्वपूर्ण सदस्य या नात्याने या संघटनेला खूप महत्व देतो. आपली ऊर्जाविषयक आव्हाने एकसारखीच आहेत. म्हणूनच आपली ऊर्जा सुरक्षा लक्षात घेऊन नवीकरणीय उर्जेवर आपण एकत्रितपणे भर द्यायचा आहे..

मी यापूर्वीच सागर म्हणजे क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास ही भावना मांडली आहे. मला विश्वास आहे की या बैठकीमुळे सहकार्याची नवी दारे खुली होतील.

मित्रांनो , नवीकरणीय ऊर्जेच्या वाढत्या वापराचा भारतात परिणाम दिसू लागला आहे. पॅरिस हवामान बदल कराराची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेच्या वापराबाबत कृती योजनेवर आम्ही काम सुरु केले आहे. आम्ही ठरवले आहे की वर्ष 2030 पर्यंत आमची  40 टक्के विजेची क्षमता बिगर-जीवाष्म इंधन आधारित संसाधनांपासून निर्माण झाली असेल.याच उद्दिष्टांतर्गत गेल्या चार वर्षात भारताने नवीकरणीय ऊर्जेची आपली क्षमता 72 गिगावॅट म्हणजेच दुप्पट केली आहे. यातही सौर ऊर्जेच्या  क्षमतेत  9 पट वाढ झाली आहे. आज आम्ही जेवढे वीजेचे उत्पादन करतो त्यातील 20% हिस्‍सा नॉन हायड्रो नवीकरणीय ऊर्जेचा आहे. एवढेच नाही, सुमारे 50 गिगावॅटची  क्षमता लवकरच यात समाविष्ट होणार आहे. हे स्पष्ट संकेत आहेत की वर्ष  2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादनाचे उद्दिष्ट जे आपण ठरवले आहे, त्या मार्गावर आम्ही यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहोत आणि आम्ही ते करून दाखवू.

मित्रानो, आज भारत गरीबीकडून सत्तेकडे या नव्या आत्मविश्वासासह विकासाची गती वाढवत आहे. या नव्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी आम्ही त्याची निवड केली आहे जो हजारो वर्षांपासून आपल्या शक्तीचा स्रोत राहिला आहे, ऊर्जेचा भांडार आहे. हे भांडार आहे सूर्याचे ज्याची आपण भारतीय सूर्यदेव म्हणून पूजा करतो.

मित्रांनो , सूर्य आपल्यासाठी प्रकाशाची देवता आहे, ऊर्जेची देवता आहे. आपल्याकडे असे मानले जाते की सूर्य संपूर्ण सृष्टीचा गतिदाता आहे.  ओम सूर्याय नम: च्या मंत्राने आणि  सूर्याच्या पहिल्या किरणाला अर्ध्‍य देऊन  दिवसाची सुरुवात करण्याची आपल्याकडे समाजजीवनात परंपरा आहे. वेदांपासून योगापर्यंत सूर्य आपल्या चिंतन, उपासना, आं‍तरिक ऊर्जेचा स्रोत राहिला आहे. आता या आं‍तरिक उर्जेला आधुनिक विज्ञानाच्या शक्तीसह बाह्य उर्जेवरील तोडगा म्हणून बदलण्यासाठी कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत.

मित्रांनो, सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारत अतिशय जलद गतीने काम करत आहे. गेल्या चार वर्षात सौर ऊर्जा खूप स्वस्त झाली आहे, ज्यामुळे अनेक गरीबाना विजेशी जोडण्याचे आमचे उद्दिष्ट वेगाने शक्य झाले आहे. घरा-घरात वीज पोहचवण्याच्या आमच्या उद्दिष्टात पॅनल टू पॉवर आणि मेक इन इंडिया अतिशय महत्वाचे टप्पे आहेत. मला आनंद आहे की गेल्या चार वर्षात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत जगाचा सर्वात पसंतीचे केंद्र बनून आज उदयाला आला आहे. सुमारे  42 अब्जची गुंतवणूक या दरम्यान झाली आहे.

मित्रांनो , सौर ऊर्जा क्षेत्रात होत असलेले हे बदल केवळ परदेशी गुंतवणूकच नव्हे तर आपल्या उद्योजकांसाठी देखील एक अभूतपूर्व संधी आहे.  देशातच सौर पॅनल उत्पादनाची एक मजबूत परिसंस्था तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीची ही सर्वात उपयुक्त वेळ आहे. येणाऱ्या चार वर्षात या क्षेत्रात सुमारे 70 ते 80 अब्ज डॉलरच्या व्यापाराची क्षमता मला दिसत आहे.

 मित्रांनो , वीज निर्मितीबरोबरच विजेची टंचाई देखील खूप महत्वाची आहे आणि यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा साठा अभियानावर काम केले जात आहे. या अभियानांतर्गत  मागणी निर्माण करणे, स्वदेशी उत्पादन, नाविन्यता आणि ऊर्जेचा साठ्याची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक धोरण सहायतेवर सरकार भर देत आहे.

KUSAM म्हणजे शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्‍थान महाअभियानाच्या माध्‍यमातून गावातील शेतातच सौर पॅनल लावणे आणि त्यांना ग्रीडशी जोडण्याची व्यवस्था केली जात आहे. येणाऱ्या चार वर्षात देशभरात सुमारे  28 लाख सौर पंप लावण्यात येणार आहेत. यातून सुमारे 10 गीगावॉट क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मित्रांनो, सौर आणि पवन ऊर्जेबरोबरच आम्ही B-3 म्हणजे बायोमास, बायोइंधन, बायोएनर्जी यावर वेगाने काम करत आहोत. भारतात वाहतूक व्यवस्था स्वच्छ इंधन आधारित बनवण्यासाठी गंभीर प्रयत्न केले जात आहेत. बायोगॅसपासून जैव इंधन तयार करून आम्ही या आव्हानाला संधीत बदलत आहोत. आम्ही गोबरधन ही एक खूप मोठी योजना यासाठी सादर केली आहे. कचऱ्यापासून ऊर्जा तयार करण्याबाबत गावागावात, शहरांमध्ये अनेक नवीन प्रयोग होत आहेत.

मित्रांनो, पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी नवीकरणीय उर्जेवर तर काम सुरु आहेच, विजेची बचत व्हावी हे देखील आमच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. उजाला योजनेअंतर्गत, देशातील घरे, गल्ल्या आणि रस्त्यांना एलईडी दिव्यांनी प्रकाशमान करण्याचे सर्वात मोठे अभियान आज भारताच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे. याअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 31 कोटी एलईडी दिवे वितरित करण्यात आले आहेत. हे 31 कोटी एलईडी दिवे हा खूप मोठा आकडा आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे  40 हजार दशलक्ष किलोवॅट तास विजेची बचत होत आहे. किती मोठी आहे कुणी कल्पना करू शकते. एवढेच नाही यामुळे देशवासीयांच्या विजेच्या बिलात दरवर्षी सुमारे 16 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. आणि मोठ्या प्रमाणात कार्बन डाईऑक्‍साडडचे उत्सर्जन आम्ही रोखले आहे. 

आणि मी पुन्हा सांगू इच्छितो , ही तर सुरुवात आहे. येणार काळ आणखी अनेक संधींनी भरलेला आहे. भावी पिढ्यांसाठी आपल्याला हवामान न्यायाशी संबंधित प्रत्येक संधीची शक्यता ताडून पाहायची आहे आणि यश मिळवायचे आहे.

मला खात्री आहे की पुढील तीन दिवसात या संधींबाबत विस्तृतपणे तुम्ही सर्व मान्यवर चर्चा करणार आहात आणि नवीकरणीय भविष्याला आणखी प्रकाशित, प्रसाधित करण्यात योगदान देणार आहात.

मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमची प्रत्येक सूचना, प्रत्येक नाविन्यपूर्ण संकल्पना आमच्यासाठी खूप महत्वाची असेल. आणि यासाठी आता उघडपणे मनुष्यबळ विकास असेल, तंत्रज्ञान सुधारणे असेल, जगातील नवनवीन देशातील छोट्या छोट्या लोकांनी केलेले प्रयोग असतील, या सर्व गोष्टी आम्ही एकदा समोर मांडू आणि मला खात्री आहे की आपण ही मोहीम पूर्ण करू शकतो. जगासमोर आर्थिक क्षेत्रातील जागतिकीकरणाची चर्चा झाली, तंत्रज्ञानाने जगाला खूप जवळ आणले आहे. आपणही एक जग, एक सूर्य, एक ग्रीडचे स्वप्न घेऊन मार्गक्रमण करूया.

जर ही मोहीम फत्ते केली, तुम्ही कल्पना करू शकता की जिथे सूर्योदय होतो, तिथून सुरुवात केली तर सूर्यास्तापर्यंत हे ग्रीड राहिले तर चोवीस तास सूर्यापासून वीज मिळू शकते. आज तर आपल्या देशात किती तास सूर्यप्रकाश आहे तेवढाच आपण विचार करतो, मात्र एक जग, एक सूर्य, एक ग्रीड हे स्वप्न उराशी बाळगून जर आपण चाललो कधीही, कुठेही जोवर सूर्यास्त होत नाही तोवर वीज मिळवणे अशक्य नसेल आणि सूर्य कुठे ना कुठे असतोच , कधी मावळत  नाही , मग विजेचा प्रवाह कसा बंद होईल.

नव्या पद्धतीने, नव्याने विचार करण्याची गरज आहे. आणि मला  विश्‍वास आहे की आयएसएच्या या  महत्‍वपूर्ण कार्यक्रम प्रसंगी आपण एका नव्या विश्वासाने, नव्या विचारांनी , नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पासह एका नव्या जगाची निर्मिती करण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी पुढे पाऊल टाकू.

पुन्हा एकदा भारतात आल्याबद्दल, इथे येऊन या महत्‍वपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल, जगाच्या उज्वल भविष्यात आपल्या सहभागासाठी तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो.

खूप-खूप धन्‍यवाद!

                           

B.Gokhale/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1548914) Visitor Counter : 143


Read this release in: English