पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानाच्या हस्ते पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेचे उद्‌घाटन

Posted On: 02 OCT 2018 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेचे उद्‌घाटन झाले. याच कार्यक्रमात आयोआरए नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील मंत्रिस्तरीय बैठकीचे आणि दुसऱ्या जागतिक री-इन्व्हेस्ट (नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार बैठक आणि प्रदर्शन) बैठकीचेही उद्‌घाटन झाले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गेली 150 ते 200 वर्षे मानव जात ऊर्जेसाठी जीवाश्म इंधनावर अवलंबून आहे. आज इंधन आणि ऊर्जेसाठी सौर, वायू आणि जल ही साधनेही असल्याचे निसर्ग आपल्याला सांगतो आहे. यातून शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा मानवाला मिळवता येईल असे ते म्हणाले. याच संदर्भात बोलतांना त्यांनी सांगितले की, भविष्यात जेव्हा लोक 21 व्या शतकातल्या मानवजातीच्या कल्याणाविषयी निर्माण झालेल्या संस्थांबद्दल चर्चा करतील तेव्हा आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेचा त्यात सर्वोच्च स्थानी उल्लेख केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हवामान बदलासंदर्भात न्याय भूमिका निश्चित करण्यासाठी हे सर्वात उत्तम व्यासपीठ आहे असे त्यांनी सांगितले. जगातला सर्वात मोठा ऊर्जा उत्पादक स्रोत म्हणून भविष्यात सौर सहकार्य ओपेकची जागा घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारतात अक्षय ऊर्जेचा वापर वाढला असून त्याचे दृश्य परिणाम आज देशभरात दिसत आहेत. भारत आपल्या कृती आराखड्यातून पॅरिस कराराचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने काम करत आहे असे ते म्हणाले. 2030 पर्यंत भारताच्या ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी 40 टक्के ऊर्जा पर्यावरणपूरक साधनातून निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भारत स्वत:चा गरीबीपासून शक्तीपर्यंत विकास करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

ऊर्जा निर्मितीसोबतच ऊर्जासाठाही महत्वाचा आहे असे सांगत त्यासाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय ऊर्जा साठा अभियानाची त्यांनी माहिती दिली. या अभियानांतर्गत ऊर्जेची मागणी तयार करणे, स्वदेशी उत्पादन, संशोधन आणि ऊर्जासाठा यावर सरकार भर देत आहे असे त्यांनी सांगितले.

सौर आणि पवन ऊर्जेशिवाय भारत बायोमास, बायोफ्यूएल म्हणजेच जैव इंधन आणि जैव ऊर्जेवरही काम करत आहे. भारतातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे स्वच्छ इंधनावर चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जैव कचऱ्याचे जैव इंधनात रुपांतर करुन भारत आव्हानाचे संधीत रुपांतर करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1548337) Visitor Counter : 110


Read this release in: English