पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

कॉम्प्रेस्ड जैव वायू इंधनाच्या पर्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोलियम मंत्र्यांच्या हस्ते “सतत” उपक्रमाचे उद्‌घाटन

Posted On: 01 OCT 2018 2:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2018

 

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत कॉम्प्रेस जैव वायू इंधनाला प्रोत्साहन देणाऱ्या तसेच एक पर्यायी हरित इंधन निर्मिती सुरु होण्यासाठीच्या सतत या उपक्रमाचे उद्‌घाटन केले. सतत म्हणजे परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसाठी शाश्वत पर्याय. सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजेच जैव इंधन प्रकल्प उभारावेत. या प्रकल्पातून तयार होणारे इंधन ऑटोमोटिव्हज् इंधन म्हणून वापरता येईल असे त्यांनी सांगितले.

सध्या देशात स्वच्छता पंधरवडा सुरु असून स्वच्छ इंधनाच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. जैव वायू इंधन हे तुलनेने स्वस्त आणि स्वच्छ इंधन आहे असे सांगत सरकार येत्या 5 वर्षात देशात पाच हजार वायू इंधन प्रकल्प उभारणार आहे असे त्यांनी सांगितले. शहरातील वायू वितरण व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार 75 हजार कोटी रुपेय खर्च करणार आहे असेही ते म्हणाले. शेतीतला कचरा, शेण आणि शहरातला घन कचरा यापासून बायोगॅस निर्मिती करता येते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळेल तसेच 75 हजार थेट रोजगार निर्माण होतील असेही त्यांनी सांगितले.

सध्या देशातल्या 42 लाख घरांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायू इंधन पुरवठा होतो असे सांगत लवकरच हा आकडा 2 कोटींपर्यंत पोहोचणार असल्याचे ते म्हणाले.

या सतत उपक्रमामुळे महापालिकेतील घन कचरा व्यवस्थापनाचाही प्रश्न सुटेल. त्याशिवाय मोठ्या शहरांमध्ये इंधनातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनातून होणारे वायू प्रदूषणही आटोक्यात येईल. या उपक्रमामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

 

 

 

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1548050) Visitor Counter : 205


Read this release in: English