पंतप्रधान कार्यालय
रांची, झारखंड येथे आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या शुभारंभाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
23 SEP 2018 8:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2018
झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुरमु जी, राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री रघुवर दास, केंद्रातील माझे सहकारी जगत प्रसाद नड्डा जी, सुदर्शन भगत जी, जयंत सिन्हा जी, नीती आयोगाचे सदस्य डॉ. वी.के.पॉल, राज्यमंत्री रामचंद्र चंद्रमुंशी, संसदेतील माझे सहकारी रामटहल चौधरी जी, आमदार रामकुमार पाहण जी आणि येथे उपस्थित सगळे मान्यवर आणि विशाल संख्येने उपस्थित असलेले झारखंडचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!
मित्रानों,
आज आपण ज्या विशेष प्रसंगाचे साक्षीदार बनत आहोत. हा प्रसंग भविष्यात मानवतेची केलेली सेवा म्हणून सगळ्यांच्या स्मरणात राहील. आज मी येथे केवळ झारखंडच्या विकासाला चालना देण्यासाठी नाही तर संपूर्ण भारतात आपल्या ऋषी-मुनींनी जे स्वप्न पहिले होते, जे स्वप्न प्रत्येक कुटुंबाचे असते. ते स्वप्न आहे-‘सर्वे भवन्तु सुखिन:, सर्वे सन्तु निरामय:’ हे स्वप्न आपल्या ऋषी-मुनींनी पाहिले होते. आपल्या या कित्येक वर्षांपासूनच्या जुन्या संकल्पाला आपल्याला या शतकात पूर्ण करायचे आहे आणि त्याचीच आज एक बहुमूल्य सुरुवात होत आहे.
समाजाच्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला, गरिबातल्या गरिबाला उपचार मिळावेत, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. हे स्वप्न साकार व्हावे यासाठी आज या बिरसा मुंडा भूमीवर महत्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.
आज संपूर्ण देशाचे लक्ष रांचीकडे आहे. देशातल्या 400 हुन अधिक जिल्ह्यांमध्ये असाच मोठा कार्यक्रम सुरु आहे आणि तिथून ते लोकं रांचीचा हा भव्य कार्यक्रम पाहत आहेत. यानंतर ते देखील तिथे या कार्यक्रमाला पुढे नेणार आहेत.
आज मला येथे दोन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आपल्या मुख्यमंत्र्यांनी मघाशी सांगितलं की, स्वातंत्र्याच्या 70 वर्षात 3 वैद्यकीय महाविद्यालये, 350 विद्यार्थी आणि चार वर्षात आठ वैद्यकीय महाविद्यालये, 1200 विद्यार्थी. काम कसे होते, किती व्यापक स्वरूपात होते, किती जलद गतीने होते याचे याहून मोठे उदाहरण शोधण्यासाठी अजून कुठे जाण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.
बंधू आणि भगिनींनो, आज आयुष्मान भारत संकल्पाबरोबरच प्रधानमंत्री जन- आरोग्य योजनेचाही प्रारंभ होत आहे. या योजनेला प्रत्येकजण आपापल्या कल्पनेनुसार नाव देत आहे. कोणी याला मोदी केयर म्हणत आहे, कोणी याला गरिबांसाठीची योजना म्हणत आहे. वेगवेगळ्या नावांनी लोक संबोधित करत आहेत. पण माझ्यासाठी मात्र आपल्या देशातील वंचित लोकांची सेवा करण्याचा हा एक बहुमोल क्षण आहे. गरिबांच्या सेवेपेक्षा अजून कोणता मोठा कार्यक्रम असू शकत नाही, मोहीम असू शकत नाही, योजना असू शकत नाही असे मला वाटते.
देशातल्या 50 कोटींहून अधिक बंधू आणि भगिनींना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच देणारी ही देशातली सर्वात मोठी योजना आहे. सरकारच्या पैशावर चालणारी ही इतकी व्यापक योजना इतर कोणत्याही देशात, जगभरात राबवली जात नाही.
आपल्याला येथे बसून या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येची कल्पना येऊ शकत नाही. संपूर्ण युरोपीय महासंघ, 27-28 देश, संपूर्ण युरोपीय महासंघ यांची जितकी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकांना भारतात आयुष्मान भारत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
संपूर्ण अमेरिकेची लोकसंख्या, संपूर्ण कॅनडाची लोकसंख्या, संपूर्ण मॅक्सिकोची लोकसंख्या या तिन्ही देशांची मिळून एकत्रित लोकसंख्या जेवढी आहे त्यापेक्षाही आपल्या देशातील अधिक लोकांच्या आयुष्याची काळजी आयुष्मान भारत योजना घेणार आहे.
आणि म्हणूनच आपले आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा सांगत होते की, आरोग्य विश्वातले जगातले जे मान्यताप्राप्त मासिक आहे ते देखील सांगत आहे की, भारताने एक गेम चेंजर, एका खूप मोठ्या महत्वाकांक्षी योजनेला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
आणि मला पूर्ण विश्वास आहे की, येत्या काळात देशात वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे लोक, आरोग्य संबंधीच्या विविध योजनांविषयी विचार करणारे लोक, आरोग्य आणि अर्थशास्त्र या विषयावर चर्चा करणारे लोक, आरोग्य आणि आधुनिक स्रोतांविषयी चर्चा करणारे लोक तसेच आरोग्य आणि सामान्य व्यक्तीच्या जीवन बदलाचे समाज जीवनावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करणारे लोक, ते सामाजिक शास्त्रज्ञ असोत, विज्ञान विषयातले वैज्ञानिक असोत, अर्थशास्त्राचे लोक असोत, जगातल्या कोणालाही या आयुष्मान भारत योजनेचा अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल आणि याच्या आधारावर देशासाठी कोणते मॉडेल बनवता येईल याचा कधी ना कधी विचार करुन योजना तयार कराव्या लागतील.
या योजनेला मूर्त स्वरुप देण्याचे काम ज्या चमूने केले आहे, माझ्या सहकाऱ्यांनी जे काम केले आहे ते काही छोटे काम नाही. जवळपास सहा महिन्यात देशातली एवढी मोठी योजना, ज्याची केवळ कल्पना न करता ती प्रत्यक्षात आणण्याचा चमत्कार करुन दाखवला आहे आणि तोही केवळ सहा महिन्यांच्या प्रवासात! कधी तरी जे लोक सुशासनाची चर्चा करत होते असतील ना, त्यांनी एक चमू तयार करुन, एका दूरदृष्टीने, दिलेल्या वेळेत पूर्ण करत आणि 50 कोटी लोकांना घेऊन, 13 हजार रुग्णालयांना या योजनेशी जोडून जवळपास सहा महिन्यात एवढी मोठी योजना आपल्या देशात राबवणे हा खूप मोठा चमत्कार आहे.
आणि म्हणूनच आज सव्वा कोटी देशवासियांसमोर मी माझ्या संपूर्ण चमूचे मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की, ही चमू आता अजून जोमाने आणि मनापासून काम करेल कारण अजूनपर्यंत मी त्यांच्या पाठीशी होतो पण आता 50 कोटी गरीब जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत आणि जर 50 कोटी गरीब जनतेचे आशीर्वाद या चमूबरोबर असतील, गावात काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्या हे काम पूर्ण करायला लागल्या, ही योजना यशस्वी करुन राहतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
मित्रहो, गरिबांना चांगल्या आरोग्यासाठी सुरक्षेचे हे जे कवच प्राप्त होत आहे, ते समर्पित करताना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही योजना फार चांगली आहे, प्रत्येकासाठी आहे. मात्र कोणी रुग्णालयाचे उद्घाटन करायला जात असेल तर आपले रुग्णालय रुग्णांनी सदैव भरलेले राहो, असे म्हणणे योग्य आहे का? असे कोणीही म्हणणार नाही. मी रुग्णालयाचे उद्घाटन करायला गेलो तरीही आपले रुग्णालय नेहमी रिकामे राहो असेच म्हणेन.
आज आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ करताना मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन की माझ्या देशातील कोणत्याही गरिबावर किंवा त्याच्या कुटुंबावर असे कोणतेही संकट येऊ नये, ज्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ येईल. कोणाच्याही आयुष्यात अशी वाईट अवस्था येऊ नये. आणि उत्तम आरोग्यासाठी सुद्धा आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यातूनही कोणाच्या आरोग्यावर संकट आले तर आयुष्मान भारत योजना आपल्या सेवेसाठी हजर आहे.
जर दुर्दैवाने आपल्या आयुष्यात आजाराचे दृष्टचक्र आले तर आपणाला सुद्धा देशातील श्रीमंत व्यक्ती प्रमाणे आरोग्यविषयक सुविधा प्राप्त होऊ शकतात. आता माझ्या देशातील गरिबांना ही तशा सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. देशातील कोणत्याही श्रीमंत माणसाला उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा प्रत्येक गरिबालाही प्राप्त झाल्या पाहिजेत.
बंधू आणि भगिनींनो, ही योजना आजपासून लागू झाली आहे. मात्र ही फार मोठी योजना आहे, त्यामुळे ती प्रायोगिक तत्त्वावर राबवून पाहणे आवश्यक होते. तंत्रज्ञान काम करेल की नाही, आरोग्यमित्र आपले काम योग्य प्रकारे करू शकतील की नाही, रुग्णालये यापूर्वी जी कामे करत असत, त्यात आवश्यकतेनुसार केलेले बदल नीट होतील की नाही, हे पडताळून पाहण्यासाठी गेले काही दिवस देशातील विविध जिल्ह्यांमध्ये चाचण्या घेतल्या जात होत्या. देशाला खऱ्या अर्थाने आरोग्याचा अधिकार देण्याची ही मोहीम सर्वतोपरी यशस्वी होईल, आरोग्य सेवा क्षेत्राला अधिक सक्षम करेल, असा विश्वास मला वाटतो.
मित्रहो, आयुष्मान भारत योजना आणखी एका वैशिष्ट्याशी जोडली गेलेली आहे. 14 एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये बस्तरच्या जंगलांमध्ये मी या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला होता. वेलनेस सेंटरच्या कामाचा शुभारंभ केला होता. त्यादिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती.
आज योजनेच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण टप्प्याचा शुभारंभ होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती, 25 सप्टेंबर हा दिवस लक्षात घेत, त्यापूर्वी दोन दिवस आज, या योजनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. आज रविवार होता, माझ्यासाठीही सोयीची वेळ होती, त्यामुळे आम्ही दोन दिवस आधी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. मात्र आज आणखी एक दिनविशेष आहे. आपली ही धरती ज्या नावातून उर्जा घेते, ज्या नावाने तिला स्फुरण चढते, ज्यांच्या प्रत्येक शब्दात जागवण्याचे सामर्थ्य आहे, असे राष्ट्रकवि दिनकर यांची सुद्धा आज जयंती आहे.
आणि म्हणूनच या महापुरुषांच्या आशीर्वादाने समाजातील प्रत्येक प्रकारचा भेदभाव समाप्त करण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर गरिबांचा विचार केला, आपले आयुष्य गरिबांसाठी वेचले, गरिबांच्या सन्मानासाठी ज्यांनी निरंतर प्रयत्न केले, अशा महापुरुषांचे स्मरण करत, आज आम्ही देशाला ही योजना समर्पित करत आहोत.
देशातील उत्तम औषधोपचार ठराविक लोकांपुरतेच मर्यादित राहू नयेत, सर्वांना उत्तम उपचार मिळावेत, या भावनेसह आज ही योजना देशाला समर्पित केली जात आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशात जेव्हा आरोग्य क्षेत्राबद्दल चर्चा होते, तेव्हा म्हटले जाते की भारतात जर एखाद्याच्या उपचारावर शंभर रुपये खर्च होत असतील तर त्यापैकी साठ रुपयांपेक्षा जास्त खर्च त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला सोसावा लागतो. त्याने जी काही बचत केली असेल, ती सर्व आजारपणावर खर्च होते. कमाईचा बहुतांश भाग अशाच कारणांवर खर्च झाल्यामुळे प्रत्येक वर्षी लाखो लोक दारिद्र्यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतात, मात्र एखादे आजारपण त्यांना पुन्हा दारिद्र्यात ढकलते. हेच चित्र बदलण्याचा विडा आम्ही उचलला आहे.
बंधू आणि भगिनींनो, देश स्वतंत्र झाल्यापासून आपण गरिबी हटाव च्या घोषणा ऐकत आहोत. गरिबांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या आणि गरिबांच्या नावाचा जप करणाऱ्या लोकांनी जर तीस-चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी गरिबांच्या नावे राजकारण करण्याऐवजी गरिबांच्या सक्षमीकरणावर भर दिला असता तर आज भारताचे फार वेगळे चित्र पहायला मिळाले असते. त्यांनी गरिबांच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने विचार केला. त्या चुकीच्या विचाराची किंमत आज देश मोजत आहे. गरीब सतत काहीतरी मागत राहतो, गरिबाला काहीतरी मोफत दिले पाहिजे, हा त्यांचा विचार अगदी चुकीचा होता. गरीब व्यक्ती स्वाभिमानी असते, त्यांच्या स्वाभिमानाचे मोल करता येणार नाही, हे सत्य आहे.
मी गरिबी अनुभवली आहे. दारिद्रयातच मी लहानाचा मोठा झालो. गरीबांमध्ये जी स्वाभिमानाची भावना असते, ती मी अनुभवली आहे. हा स्वाभिमान गरिबीशी दोन हात करण्याची ताकद देतो, गरीबी मध्ये जगण्याची ताकद देतो. मात्र कोणीही गरिबांच्या स्वाभिमानाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, गरिबांची स्वप्ने साकार करण्यासाठी, त्यांचा निर्धार जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत काही तुकडे फेकून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा खेळ सुरू राहिला.
आम्ही या आजाराचे नेमके निदान केले आहे, म्हणूनच देश दारिद्र्य मुक्तीच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन वर्षांमध्ये देशातील पाच कोटी कुटुंबे अति दारिद्रयातून बाहेर पडली आहेत.
बंधू आणि भगिनींनो, आम्ही गरिबांच्या सक्षमीकरणावर भर दिला, त्यामुळे हे शक्य होऊ शकले. म्हणूनच गरिबांना घर मिळाले तर त्यांचा जगण्याविषयीचा विचार बदलतो. जर गरीब मातेला स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मिळाली तर ती माता आत्मविश्वासाने इतरांच्या बरोबरीने उभी राहते.
जेव्हा गरिबांचे बँकेत खाते उघडते, तेव्हा त्याच्या मनात आत्मसन्मानाची भावना निर्माण होते. तो सुद्धा पैशांची बचत करण्याचा निर्धार करतो. जेव्हा गरिबांचे लसीकरण होते, पोषण मोहिमेचा लाभ मिळतो, तेव्हा गरीबसुद्धा सशक्तीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो.
आपण पाहिले असेल की नुकत्याच आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावणारे कोण होते? सुवर्णपदके पटकावणारे कोण होते? भारताच्या अभिमानात भर घालणारे कोण होते? त्यापैकी अधिकाधिक मुले-मुली लहान गावातील होती, गरिबांच्या घरातील होती, अभावाच्या परिस्थितीत त्यांनी आजवरचे आयुष्य काढले, मात्र त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी जगात भारताचे नाव उंचावले.
गरीबांमध्ये ही मोठी शक्ती असते, ती ओळखणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच आमच्या सर्व योजना, गरिबांचे सक्षमीकरण करणाऱ्या आहेत. देशात आणखी एक मोठा बदल घडून आला आहे. आजवर देशाची सर्व धोरणे फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणाच्या विचार करून आखली गेली होती.
कोणत्या जातीतून निवडणूक जिंकण्याची हमी मिळेल, कोणत्या समुदायाच्या लोकांना लाभ मिळेल, कोणत्या समुदायाच्या लोकांची मते मिळू शकतील, कोणत्या भागाचा लाभ मिळेल, कोणत्या भागातून निवडणूक जिंकण्याच्या शक्यता वाढतील, हेच पाहिले गेले. प्रादेशिक विकास असो, सामाजिक बदल असो किंवा सांप्रदायिक तणावामधून बाहेर पडण्याची आवश्यकता असो, यापूर्वीच्या सरकारांनी फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणाचा विचार करत समाजाची ताकत वाढवण्या ऐवजी राजकीय पक्षांची ताकत वाढवण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर केला आणि सरकारी खजिन्याची वारेमाप लूट केली.
आम्ही तो मार्ग कधीच मागे सोडला आहे. आपल्या देशाने परत कधीही त्या वाटेने जाऊ नये, असेच आमचे प्रामाणिक मत आहे. कारण 'सबका साथ सबका विकास' या मूलमंत्राचा अवलंब करत, सर्वांना सोबत घेऊन आम्ही विकासाची कास धरली आहे.
आयुष्मान योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळेल. त्यात धर्म, जाती, पंथ तसेच उच्च-नीच असा भेदभाव असणार नाही. कारण सर्वांना सोबत घेऊन जाताना ती व्यक्ती कोणत्याही साथी धर्म वा पंथाची असो, देशाच्या कोणत्याही इलाक्यात राहणारी असो, आस्तिक असो की नास्तिक असो, मंदिरात जाणारी असो, मशिदीत जाणारी असो, गुरुद्वा-यात जाणारी असो, चर्चमध्ये जाणारी असो. कोणत्याही भेदभावाला थारा दिला जाणार नाही. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून देणे, सुलभ व सुरक्षित आरोग्य सेवा मिळवून देणे हाच आमच्यासाठी सबका साथ सबका विकास असेल.
बंधुंनो, या योजनेच्या व्यापकतेबद्दल सांगायचे झाल्यास, असे म्हणणे वावगे ठरणार नाही की आरोग्य क्षेत्रातील सर्वात व्यापक अशी योजना आहे. कारण या योजनेमध्ये कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, मधुमेह अशां गंभीर व्याधींसह इतर 1300 पेक्षा जास्त आजारांवरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
केवळ सरकारीच नाही तर देशभरातल्या सर्व खासगी रुग्णालयातही अतिशय सुलभरित्या या योजनेसमाविष्ट करण्यात आलेल्या सर्व व्याधी व आजारांवरील उपचार करण्यात येतील. या योजनेमुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाखांचे आरोग्य विमा कवच मिळेल ज्याचा देशातील 50 कोटी लोकांना फायदा होईल. यात पाच लाखांच्या रकमेत सर्व चाचण्या, औषधे, रुग्णालयात दाखल होण्याचा तसेच त्या आधीचा आणि संपूर्ण इलाज होईपर्यंतचा खर्च यांचाही अंतर्भाव असेल. ही योजना आधीपासून असलेल्या आजारांनाही संरक्षण पुरवेल.
एवढंच नाही तर, देशभरातल्या प्रत्येक लाभार्थीस अतिशय सुलभरित्या व वेळेवारी या योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे सुनिश्चित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रत्येक गरजू व्यक्ती चांगली आरोग्य सेवा मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने निरंतर समीक्षा करण्यावर भर दिला जात आहे.
तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाला एक ई-कार्ड देण्यात येईल, ज्यामध्ये कार्डधारक व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती असेल. तसेच त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री व्यवहार करण्यासाठी खेटे घालण्याची आवश्यकता नसेल.
याशिवाय 14555 या दूरध्वनी क्रमांकावर या योजनेशी संबंधित सर्व सविस्तर माहिती, आपल्या सर्व शंकांची उत्तरे मिळू शकतील. या योजनेच्या व्यापकतेचाच एक भाग म्हणून देशभरात सर्व भागात जवळ पास 3 लाख सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आली असून या योजनेसंबंधी कोणतीही माहिती आपण आपल्या नजीकच्या सेवा केंद्रात जाऊन मिळवू शकता.
याव्यतिरिक्त, आशा व एएनएम परिचारिका आणि प्रत्येक रुग्णालयात आपल्या मदतीसाठी तत्पर असणारे प्रधानमंत्री आरोग्यमित्र असे आपल्या देशाला खऱ्या अर्थाने आयुष्मान बनवण्याच्या सेवेसाठी समर्पित असलेले दोन विशेष सहाय्यक आपणास या योजनेबाबत आवश्यक ते सर्व सहाय्य देण्यासाठी हजर असतील. यापैकी आरोग्यमित्र आपणास रुग्णालयात भर्ती होण्याच्या आधीपासून ते उपचारापश्चातचे या योजनेसंबंधीचे सर्व लाभ आपणास मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करतील.
मित्रांनो, आयुष्मान भारत ही योजना खऱ्या अर्थाने देशात सर्वव्यापी सुलभ आरोग्य व रुग्णोपचार सेवा प्रदान करण्याची भावना रुजवून ती उत्तरोत्तर दृढपणे वृद्धिंगत करण्याची प्रेरणा बनत आहे. या योजनेत सहभागी असलेल्या राज्यांमधील लोक इतर सहभागी राज्यांतही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आतापर्यंत या योजनेअंतर्गत, देशभरातील तेरा हजाराहून अधिक रुग्णालये या योजनेने जोडली गेली असून येणा-या काळात अजूनही काही रुग्णालये या योजनेचा भाग असतील. तसेच जी रूग्णालये उत्तमप्रकारे ही योजना चालवतील अशा विशेषतः ग्रामीण भागातील रूग्णालयांना सरकारकडून विशेष आर्थिक सहाय्यही दिले जाईल.
बंधु आणि भगिनींनो, आयुष्मान भारत योजनेतून आरोग्यसेवेत सर्वसामान्यजनांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याबरोबरच नागरिकांना आपल्या घराजवळच उपचाराची उत्तम सोय मिळेल, अशी सशक्त आरोग्य सेवा यंत्रणा विकसित केली जात आहे.
मित्रहो, आज या ठिकाणी 10 वेलनेस सेंटर्संचाही शुभारंभ करण्यात आला. ही केंद्रे आयुष्मान भारत योजनेचा एक मत्वपूर्ण व अविभाज्य भाग आहेत. या आरोग्य केंद्रांत लहान व किरकोळ आजारांवर उपचारांवरील औषधे उपलब्ध असतील तसेच अनेक आवश्यक आरोग्य चाचण्या निःशुल्क करता याव्यात, अशी समांतर व्यवस्था उभारली जात आहे. याद्वारे अनेक गंभीर आजाराच्या लक्षणांची वेळीच खात्री करून घेता येईल. झारखंड राज्यात अशी 40 तर संपूर्ण देशात दोन ते अडीच हजार वेलनेस सेंटर्स कार्यान्वित झालेले आहेत. येणा-या काळात देशभरात दिड लाखाहून अधिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
मित्रांनो, आपले सरकार देशात आरोग्यसेवा यंत्रणा सुधारण्यासाठी विभागून नाही तर सर्व स्तरांतून एकजूटीने प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय सेवेचा दर्जा सर्वतोपरी उंचावण्यासाठी केंद्र सरकारने समग्र दृष्टीकोन स्वीकारला आहे. शासनाचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक धोरण एकमेकांशी निगडित असून एकसूत्रतेने जोडलेले आहे. तसेच सरकारचा भर सर्वसामान्यांना ‘परवडणारी सेवा’ आणि ‘रोग प्रतिबंधक सेवा’ देण्यावर आहे. दैनंदिन जीवनात योगाभ्यासाचा समावेश करण्याची जनजागृती असो, स्वच्छ भारत कार्यक्रम असो, ग्रामीण भागांना हगवणमुक्त व खुल्या शौचलयांची सवय बदलण्याची चळवळ असो, आमच्या या सगळ्या उपक्रमांचा कल हा गंभीर आजारांची व्युत्पत्ती थांबवण्याकडे आहे. आपल्या नुकतेच वाचण्यात आले असेल की, स्वच्छ भारत अभियानामुळे तीन लक्ष बालकांचे आयुष्य वाचू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवजात शिशुंच्या व प्रसूती मातांचा मृत्युदर कमी होत असल्याच्या आकडेवारीतून आपला देश निरोगी भारत होण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकित असल्याचे लक्षात येते. बाल्यावस्थेपासूनच शरीराला पोषक असा आहार मिळावा यासाठी शासनाने राष्ट्रीय पोषण अभियानासारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. तसेच आरोग्यक्षेत्रात मनुष्यबळ वाढीसाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. आयुष्मान भारत योजनेमुळे येणाऱ्या तीन वर्षात देशभरात जवळजवळ अडीच हजार उत्तम दर्जाची आधुनिक रुग्णालय बनतील, असा अंदाज आहे. यातील बरीचशी रुग्णालये छोट्या व मध्यम शहरी भागात, तसेच तालुकास्तरावरील गावांमध्ये, लहान-मोठ्या वस्ती असलेल्या खेडेगावांच्या परिसरात तयार होतील. यामुळे या भागातील मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी एका नवीन व्यवसायक्षेत्राचे दालन खुले होऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
एवढेच नाही तर या प्रक्रियेमध्ये वैद्यकीय सेवांबरोबरच विमा, तांत्रिक कौशल्य, सेंटर्स, व्यवस्थापन, औषध उत्पादन , वैद्यकीय उपकरणांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये देशभरात रोजगाराच्या नवीन शक्यता उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात देशभरात पॅरामेडिकल स्टाफ पासून प्रशिक्षित डॉक्टरांपर्यंत सर्वच कुशल मानवी संसाधनांची मागणी वाढणार आहे. याबरोबरच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप उद्योगांमध्येही नवीन संधीही तयार होतील. येत्या काही वर्षातच लाखोंच्या संख्येने डॉक्टर्स, नर्स, रुग्णालय व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचारी वर्ग व ही संपूर्ण व्यवस्था चालवण्याच्यात संबंधित कामातून या क्षेत्राशी जोडले जाण्याची संधी युवक, तसेच गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठीही खुला असेल.
देशाच्या ग्रामीण तसेच लहान मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय व आरोग्य क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन यंत्रणा निरंतरपणे कार्यरत आहे. चार वर्षात देशात चौदा नवीन एम्स उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात कमीत कमी एक एम्स तयार करण्याचे काम सुरू आहे.
याबरोबरच देशात 42 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. सरकारचा प्रयत्न आहे की मधील तीन ते चार संसदीय मतदारसंघांमध्ये एक तरी वैद्यकीय महाविद्यालय असावे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून झारखंडमध्येही सहाशे कोटीपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी करण्यात आली. कोडरमा आणि चाईबासा येथे उभारण्यात येणाऱ्या या दोन वैद्यकीय महाविद्यालयांत जवळजवळ चारशे रुग्ण दाखल होऊ शकतील अशी व्यवस्था आहे.
बंधू आणि भगिनींनो, गेल्या चार वर्षात देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात पंचवीस हजार पदवी व पदव्युत्तर जागा वाढवण्यात आल्या आहेत. येत्या पाच वर्षांच्या दरम्यान देशात एक लक्ष डॉक्टर्स शिकून तयार व्हावेत अशी क्षमता विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. यामागे भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पायाभूत सुविधा व मानवी संसाधन या दोन प्रमुख घटकांचा विकास होईल याकडे लक्ष पुरवण्यात येत आहे.
बंधुंनो, पंडित दीनदयाल उपाध्यायजी म्हणायचे की, शिक्षणाबरोबरच आरोग्यासाठी होणारा खर्च हा खर्च नसून ती एक प्रकारची गुंतवणूक असते. उत्तम शिक्षण आणि कौशल्य यांचा अभाव असेल तर देशाचा विकास अशक्य असतो. त्याचबरोबर जर देशाचा नागरिक आजारी असेल तर सशक्त असे राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही.
मित्रांनो, मला खात्री आहे की या योजनेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांनी, आरोग्यमित्र, आशा व एएएम परिचारिका, प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक कर्मचारी, व सेवा प्रदाते यांच्या समर्पित कार्य भावनेमुळे शासन ही योजना यशस्वी करून जगभरात भारताची आरोग्यमय विकसित राष्ट्र म्हणून नवी ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी होईल, यात शंका नाही.
याच शुभेच्छांसह मी पंतप्रधान जन आरोग्य योजना रांचीच्या- भगवान बिरसा मुंडा यांच्या पावन क्षेत्रातून सव्वा कोटी देशवासियांच्या चरणी समर्पित करतो.
आपणा सर्वांचे शतशः आभार.
भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
मी म्हणेन आयुष्मान माझ्या नंतर तुम्ही म्हणा, ‘भारत’
आयुष्मान भारत
आयुष्मान भारत
आयुष्मान भारत
अनेक अनेक धन्यवाद !
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1547650)
Visitor Counter : 190