पंतप्रधान कार्यालय

छत्तीसगड येथील झारासुगुडा विमानतळ आणि इतर विकासप्रकल्पांच्या राष्ट्रार्पण समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 22 SEP 2018 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  22 सप्टेंबर 2018

 

ओदिशाचे राज्यपाल प्राध्यापक श्री गणेशीलाल जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री नवीन बाबू, केंद्रातील माझे सहकारी जुएल ओराम, धर्मेंद्र प्रधान आणि इथे उपस्थित सगळे मान्यवर,

मी आज तालचेरवरुन इथे आलो आहे. दीर्घकाळापासून बंद पडलेल्या खतांच्या कारखान्याची पुनर्निमिती करण्याचा शुभारंभ आज तिथे केला गेला. त्यासाठी सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. एका दृष्टीने हा कारखाना त्या भागातील आर्थिक विकासाचे केंद्र बनणार आहे.

त्याचप्रमाणे, आज मला आधुनिक भारतातील आधुनिक ओदिशामध्ये, ज्यात आधुनिक पायाभूत सुविधा आहेत, अशा सुविधांपैकीच एक, म्हणजे वीर सुरेंद्र साई विमानतळाचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळाली आहे. वीर सुरेंद्र साई यांचे नाव ऐकल्याबरोबर, ओदिशाचे शौर्य,ओदिशाचा त्याग, ओदिशाचे समर्पण या सगळ्याची गाथा आपल्या डोळ्यांसमोर येते, आपण त्याकडे स्वाभाविकपणे आकर्षित होतो.

आज इथे मला एकाचवेळी इतर अनेक योजनांचा शुभारंभ करण्याचीही संधी मिळाली आहे. हे विमानतळ एकाप्रकारे ओदिशातील दुसरे मोठे विमानतळ ठरणार आहे. आता इतकी वर्षे हे का झाले नाही, याचे उत्तर तुम्हालाच शोधायचे आहे. कदाचित असंही असेल की,  हे विमानतळ माझी प्रतीक्षा करत असेल.

मी गुजरातचा आहे, आमच्याकडे एक भाग जिल्हा आहे, कच्छ! तो जिल्हा म्हणजे वाळवंटच आहे, त्यापलिकडे पाकिस्तान आहे. त्या एका जिल्ह्यात पाच विमानतळे आहेत, एकाच जिल्ह्यात! आणि आज इतक्या वर्षानंतर ओदिशात दुसरे विमानतळ तयार होते आहे.

 आता सुरेशजी सांगत होते की, देशात कशाप्रकारे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रगती होते आहे. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यत जेवढी एकूण विमाने आहेत, त्यांची संख्या साधारण साडेचारशे इतकी आहे. म्हणजे, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ही संख्या आहे. आणि या एका वर्षात, नवी साडे नऊशे विमाने भारतात येणार आहेत, त्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. कोणी कल्पना करु शकेल काय की आपण कुठून कुठे पोहोचलो आहोत, किती जलद वेगाने प्रगती करतो आहोत.

वीर सुरेंद्र विमानतळ एका दृष्टीने एक त्रिवेणी संगमच आहे. जे, भुवनेश्वर, रांची आणि रायपूर या तिन्ही शहरांना जोडणाऱ्या मध्यवर्ती ठिकाणी विकसित झाले आहे. तुम्ही कल्पना करु शकता की या विमानतळामुळे विकासाच्या किती संधी निर्माण होणार आहेत, किती आकांक्षांना पंख फुटणार आहेत. या विमानतळावरुन आपण विकासाची नवी भरारी घेणार आहोत.

झारसुगुडा, संबलपुर आणि छत्‍तीसगडच्या जवळपासच्या भागात उद्योगजगतातील ज्या कंपन्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत. जेव्हा त्यांना प्रवासात, दळणवळणात अडचणी येत नाहीत, तेव्हा ते व्यवसायाच्या दृष्टीने थोडा धोका पत्करण्यासाठी अनुकूल विचार करतात, व्यवसाय पुढे नेतात.आमचा मंत्र आहे-सबका साथ-सबका विकास, याचा अर्थच असा की, विकासात प्रादेशिक समतोल जपला गेला पाहिजे. पश्चिम भारताचा विकास होत राहील, मात्र पूर्वेकडील राज्यांचा नाही, अशी विषम परिस्थिती भारतासाठी संकट निर्माण करु शकेल. आणि म्हणूनच पूर्वेकडील राज्यांचा विकास करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग आहे ओदिशाचा विकास.त्यासोबतच, पूर्वेकडचे भाग, मग ते पूर्वेकडील उत्तर प्रदेश असो, ओदिशा असो, पश्चिम बंगाल असो, आसाम असो, ईशान्य भारत असो, या सगळ्या क्षेत्रांचा विकास देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

जे आज मी येथे एका विमानतळाचे उद्‌घाटन करतो आहे. दोन दिवसांनी, म्हणजे परवा मी सिक्कीम इथल्या विमानतळाचे उद्‌घाटन करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता किती वेगाने ही कामे सुरु आहेत. आज मला एका कोळसा खाणीचे लोकार्पण करण्याचीही संधी मिळाली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज आयुष्याच्या सर्व व्यवहारांच्या केंद्रस्थानी ऊर्जा आहे.आणि याबाबतीत ओदिशा भाग्यवान आहे. त्यांच्याकडे या काळ्या हिऱ्याचा खजिना आहे.मात्र तो आतच दडून राहिला तर नुसताच भार आहे आणि बाहेर निघाला तर प्रकाशमान ऊर्जा! आणि म्हणूनच, त्याला बाहेर काढण्याचे काम, त्यातून ऊर्जा निर्माण करण्याचे काम , त्यात विकासाच्या संधी शोधण्याचे काम, या सगळ्याची आज सुरुवात होत आहे. आणि या कोळशाचा जिथे पुरवठा होईल, अशा औष्णिक केंद्राचीही आज सुरुवात होत आहे.

आज देशात रेल्वे वाहतुकीचे आणि हवाई वाहतुकीचेही महत्व वाढले आहे. आणि या बदलत्या युगात, दळणवळण अत्यंत महत्वाचे, विकासाचे एक अनिवार्य साधन बनले आहे. मग ते महामार्ग असोत, किंवा रेल्वे किंवा जलमार्ग किंवा हवाई मार्ग, सगळ्या प्रकारची वाहतूक, संपर्क अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक आहे. 

  आज पहिल्यांदाच, रेल्वेचे आदिवासी क्षेत्रात पोचणे आणि तिथे दळणवळण सुरु होणे अतिशय महत्वाचे पाऊल आहे.मला विश्वास आहे की येत्या काळात ओदिशातील कानाकोपऱ्यात ही दळणवळण यंत्रणा पोहोचेल आणि ओदिशाच्या विकासाची दारे खुली होतील. आज इथे तुम्हा सर्व नागरिकांना वीर सुरेंद्र साई विमानतळ अर्पण करताना मला अत्यंत अभिमान आणि आनंद होत आहे.

खूप खूप धन्यवाद!

 

B.Gokhale/S.Patil /P.Malandkar

 



(Release ID: 1547174) Visitor Counter : 76


Read this release in: English