पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाचे उद्‌घाटन

Posted On: 24 SEP 2018 2:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीममधल्या पाक्योंग या विमानतळाचे उद्‌घाटन केले. सिक्कीममधले हे पहिलेच विमानतळ असून देशातले 100 वे विमानतळ आहे.

आजचा दिवस सिक्कीमसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे पंतप्रधानांनी या कार्यक्रमात बोलतांना सांगितले. केवळ सिक्कीमच नाही तर भारतासाठीही हे विमानतळ महत्त्वाचे आहे. या विमानतळासोबतच भारताने विमानतळांचे शतक पूर्ण केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सिक्कीममधला युवा क्रिकेटपटू निलेश लमीचानयचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेत शतक ठोकणारा तो सिक्कीमचा पहिलाच क्रिकेटपटू आहे.

पाक्योंग विमानतळामुळे सिक्कीमशी उर्वरित देशाचा संपर्क वाढेल, असे सांगत या विमानतळाचा जास्तीत जास्त उपयोग सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी हे विमानतळ ‘उडान’ योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले.

संपूर्ण इशान्य भारताला पायाभूत सुविधा आणि भावनिकदृष्टयाही देशाशी जोडण्याचं काम जलद गतीने सुरू आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इशान्य भारतातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वत: वारंवार येथील राज्यांचा दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय बहुतांश केंद्रीय मंत्रीही या प्रदेशाला सतत भेट देत असतात. सरकारचे धोरण आणि कामाचे दृश्य परिणाम आज आपल्याला येथे दिसत आहेत, असे ते म्हणाले.

रेल्वे आणि हवाई वाहतुकीचे जाळे विस्तारले असून चांगले रस्ते आणि मोठ्या पुलांचेही बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातल्या 100 विमानतळांपैकी 35 विमानतळं गेल्या चार वर्षात कार्यान्वित करण्यात आल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

जैविक शेती क्षेत्रात सिक्कीमने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा त्यांनी गौरव केला. केंद्र सरकारने इशान्य भारतासाठी सेंद्रीय शेती मूल्य विकास अभियान सुरू केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1547050) Visitor Counter : 125


Read this release in: English