पंतप्रधान कार्यालय

वाराणसी येथे विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 18 SEP 2018 8:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2018

 

मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या काशीच्या माझ्या तरुण मित्रांनो, काशीतील तुम्हा सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार.

हमरे काशी के लोगन हमें एतना प्यार देलन सच में मन हृदय गदगद होई जाला। आप लोगन के बेटा हई, समय निकाल बार-बार काशी आवे का मन करेला।

बंधू आणि भगिनींनो, हर- हर महादेव .

माझ्यासाठी ही सौभाग्यपूर्ण गोष्ट आहे की देशासाठी समर्पित आणखी एका वर्षाची सुरुवात मी बाबा विश्वनाथ आणि गंगा मातेच्या शुभार्शिवादाने करत आहे. तुम्हा सर्वांचे हे प्रेम, हे आशिर्वाद मला क्षणोक्षणी प्रेरित करतात आणि सर्व देशबांधवांच्या सेवेचा संकल्प अधिक बळकट करतात.

मित्रांनो, हाच सेवाभाव पुढे नेण्यासाठी आज इथे साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण झाले आहे किंवा पायाभरणी झाली आहे.

विकासाची ही कामे बनारसच नव्हे तर आसपासच्या गावांशी देखील निगडित आहेत. यामध्ये वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजांशी निगडित प्रकल्प तर आहेतच, शिवाय शेतकरी, विणकर आणि शिल्पकारांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांचा देखील समावेश आहे.

एवढेच नाही, बनारस हिंदू विद्यापीठाला 21व्या शतकातील महत्वपूर्ण ज्ञान केंद्र बनवण्यासाठी देखील अनेक प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी मी बनारसच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो.

मित्रांनो , मी जेव्हा जेव्हा इथे येतो, तेव्हा एक गोष्ट आवर्जून सांगतो की आम्ही काशीमध्ये जे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत, ते करताना काशीची परंपरा राखत त्याच्या प्राचीनतेचे जतन करत आहोत. प्राचीन काळापासून या शहराची जी ओळख राहिली आहे ती कायम राखतानाच आधुनिक व्यवस्थांचा समावेश केला जात आहे.

चार-सव्वा चार वर्षांपूर्वी जेव्हा काशीवासीयांनी परिवर्तनाचा हा संकल्प केला होता, तेव्हा आणि आजच्या परिस्थितीत स्पष्ट फरक दिसत आहे. दिसत आहे ना? फरक आढळतो कि नाही? बदल दिसत आहे? धरतीवर परिवर्तन दिसत आहे? धन्यवाद !.

कारण तुम्ही तर त्या व्यवस्थेचे साक्षीदार आहात जेव्हा आपल्या काशीला भोळ्या शंकराच्या भरवशावर सोडून देण्यात आले होते. आज मला खूप आनंद होत आहे की बाबा विश्वनाथ यांच्या आशिर्वादामुळे आम्ही वाराणसीला विकासाची नवी दिशा देण्यात यशस्वी झालो आहोत.

अनेक वर्षांपूर्वी असेही दिवस होते जेव्हा काशीची उद्धवस्त होत असलेली व्यवस्था पाहून इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मन उदास व्हायचे. विजेच्या तारांच्या जाळ्याप्रमाणे हे शहर देखील आपल्या अव्यवस्थांमध्ये अडकले होते. आणि म्हणूनच मी ठरवले की काशीच्या चौफेर अव्यवस्थेला चौफेर विकासामध्ये बदलायचे.

आज काशीमध्ये प्रत्येक दिशेला परिवर्तन होत आहे. मला आठवतंय खासदार बनण्यापूर्वी जेव्हा मी इथे यायचो तेव्हा शहरभर लटकणाऱ्या विजेच्या तारा पाहून नेहमी मनात विचार यायचा की कधी बनारसला यातून मुक्ती मिळेल? आज पहा, शहरातील मोठ्या भागातून लटकणाऱ्या तारा गायब झाल्या आहेत. अन्य ठिकाणीही या तारा जमिनीखालून घालण्याचे काम वेगाने सुरु आहे.

आज विद्युतीकरणाशी निगडित ज्या पाच मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले, त्यात पुराणी काशीला लटकणाऱ्या विजेच्या तारांपासून मुक्त करण्याच्या कामाचाही समावेश आहे. या सर्व प्रकल्पातून वाराणसी शहराव्यतिरिक्त आसपासच्या अनेक गावांना पुरेशी वीज पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बळ मिळणार आहे. याशिवाय आज आणखी एका विद्युत उपकेंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे. जेव्हा हे तयार होईल तेव्हा आसपासच्या खूप मोठ्या क्षेत्राला कमी व्होल्टेजच्या समस्येतून दिलासा मिळेल.

मित्रांनो, वाराणसीला पूर्व भारताचे प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्याचे भरपूर प्रयत्न होत आहेत आणि म्हणूनच वाराणसीला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची जोडण्याला सरकारचे प्राधान्य आहे. 21 व्या शतकाच्या गरजेनुसार वाहतूक व्यवस्था असावी, वैद्यकीय सुविधा असाव्यात, शैक्षणिक सुविधा असाव्यात यासाठी सर्वांचा विकास केला जावा.

आज काशी एलईडीच्या दिव्याने झगमगत आहे. शहरातील रस्त्यांच्या पलीकडे रात्रीही गंगामातेचा प्रवाह दिसतो. एलईडी दिव्यांमुळे प्रकाशमय तर झाले आहेच तर तुम्हा लोकांच्या विजेच्या बिलातही खूप बचत झाली आहे. वाराणसी नगरपालिकेने एलईडी दिवे लावल्यानंतर कोट्यावधी रुपयांची बचत केली आहे.

मित्रांनो, चार वर्षांपूर्वी जे काशीला आले होते त्यांनी जर आज काशी पाहिली तर त्यांना नवीन रस्त्यांचा विस्तार होत असल्याचा दिसून येत आहे. अनेक वर्ष बनारसमध्ये रिंग रोडची चर्चा होत होती मात्र त्याचे काम फाईलमध्ये अडकले होते. 2014 मध्ये सरकार बनल्यानंतर काशीमध्ये रिंग रोडची फाईल पुन्हा बाहेर काढली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील या आधीच्या सरकारने या प्रकल्पांना गती येऊ दिली नाही. त्यांना चिंता वाटत होती की, जर हे काम झाले तर मोदींचा जयजयकार होईल आणि म्हणूनच ही फाईल दाबून ठेवण्यात आली होती.

मात्र, जेंव्हा तुम्ही सर्वांनी योगीजींचे सरकार बनवले, सरकार बनल्यानंतर आता हे काम खूप वेगाने पूर्ण केले जात आहे. हरहुआ ते गाजीपूरपर्यंत चार पदरी रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हरहुआपासून राजा तालाब आणि चंदोलीपर्यंत एक नवीन सर्किट तयार करण्यावर वेगाने काम सुरु आहे. या मार्गावर गंगा नदीवर एक पूल देखील बांधण्यात येणार आहे ज्यामुळे बनारसमध्ये येणारे मोठ्या ट्रकची संख्या कमी होईल.

मित्रांनो, काशी रिंग रोडच्या बांधकामामुळे केवळ काशीलाच नाही तर आसपासच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार आहे. बिहार, नेपाळ, झारखंड, मध्य प्रदेश या ठिकाणी जाण्यासाठी इथून जाणाऱ्या रस्त्याचे खूप महत्व आहे. हेच कारण आहे की, वाराणसी शहराच्या आतील आणि वाराणसीला दुसऱ्या राज्यांना जोडणारे रस्ते रुंद केले जात आहेत,त्यांचा विस्तार केला जात आहे. वाराणसी हनमना म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्र.7, वाराणसी-सुलतानपूर मार्ग, वाराणसी-गोरखपूर क्षेत्र, वाराणसी-हंडिया रस्ते जोडणीवरही हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

बंधू आणि भगिनींनो, बनारसमध्येही हजारो कोटी रुपयांचे अनेक रस्ते प्रकल्प सुरु आहेत. महमूरगंज इथून मंडूआडीहकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांना पूर्वी किती त्रास व्हायचा,शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना किती प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागायचा हे देखील तुम्ही आठवण्याची गरज नाही. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मंडूआडीह उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे तसेच गंगा नदीवर बांधण्यात येणारा सामनेगाट पूल पूर्ण झाल्यानंतर रामनगरला येणे-जाणे अधिक सुलभ झाले आहे. शहरातील अंधुरा पूल जितका जूना होता, तेवढीच जुनी त्याच्या रुंदीकरणाची मागणी होती. गेली अनेक दशकं अंधुरा पुलाच्या रुंदीकरणाचे काम प्रलंबित होते. हे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय बोजूविड-सिंदौरा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम, शिवपूर-फुलवरिया मार्ग चौपदरी करण्याचे काम, राजा तालाब पोलीस ठाण्यापासून जखिनी पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम असे, शहरातील विविध भागात आज वेगाने काम सुरु आहे. आस्था आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पंचकोसी मार्गाच्या विकासाचे काम देखील जलद गतीने सुरु आहे.

भावतपूल ते कचहरी मार्गापर्यंत तयार होत असलेल्या रस्त्यावर सुमारे 750 कोटी रुपये खर्च केला जात आहे. पूर्वी हा रस्ता किती अरुंद होता हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी तासनतास लागायचे. वाहतुक कोंडीमुळे अनेकदा विमान, रेल्वेगाडी सुटायची. जेंव्हा हा मार्ग पूर्णपणे तयार होईल तेंव्हा या सर्व समस्यांपासून नक्कीच मुक्ती मिळेल.

मित्रांनो, वाराणसीत होत असलेल्या विकासाचे साक्षीदार इथल्या विमानतळावर येणारे लोक देखील बनत आहेत. विमानातून बनारसला येणारे लोक आणि पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चार वर्षांपूर्वी बावतपूर विमानतळावर 8 लाख लोक ये-जा करायचे, आता हा आकडा 21 लाखांवर पोहोचला आहे.

स्मार्ट बनारसमध्ये स्मार्ट परिवर्तन व्हावे यासाठी वाहतुकीच्या प्रत्येक व्यवस्थेला आधुनिक बनवण्याचे काम सुरु आहे. वाहतूक व्यवस्थेच्या एकत्मिकरणाचे काम सुरु आहे. जेणेकरुन एका वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही. इथे तयार होणारे एकात्मिक कमांड आणि कंट्रोल केंद्र संपूर्ण शहराच्या प्रशासन आणि सार्वजनिक सुविधांवर नियंत्रण ठेवणार आहे.

बनारस आणि बनारसमध्ये वेगाने बनत असलेल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर हे शहर वाहतूक आणि लॉजिस्टिकचे मोठे केंद्र म्हणून उदयाला येईल. यामुळे रस्ते, रेल्वे आणि जलवाहतूक या तिघींचा संपर्क वाढेल. ज्यामुळे इथल्या व्यापार आणि उद्योगाला मोठा लाभ होणार आहे.

मित्रांनो , काशीला येणाऱ्या- जाणाऱ्यांचा वेळ वाचावा यासाठी गंगा नदीवर फेरी सेवा चालवण्याची योजना विचाराधीन आहे. वाराणसी ते हल्दिया पर्यंत राष्ट्रीय जलमार्ग क्र -१ चे काम देखील सुरु आहे. सीएनजीद्वारे गाड्या चालवण्याच्या दिशेने जलद गतीने काम सुरु आहे.

बंधू आणि भगिनींनो,समाज माध्यमांवर जेव्हा लोकांना आनंदाने वाराणसी कॅन्ट स्थानकाची छायाचित्रे पोस्ट करताना पाहतो तेव्हा माझा आनंद द्विगुणित होतो. होमंडूआडीह कॅन्ट स्थानक असेल किंवा शहर स्थानक असेल, सर्वच ठिकाणी विकास कामांना गती देण्यात आली आहे. त्यांच्या आधुनिकीकरणाचे काम केले जात आहे. रेल्वेने काशीला येणाऱ्यांना आता स्थानकावरच नवीन काशीचे चित्र दृष्टीस पडते.

मित्रांनो, याशिवाय वाराणसीला अलाहाबाद आणि छपराशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. वाराणसी ते बलियापर्यंत विद्युतीकरणाचे काम देखील पूर्ण झाले आहे. वाराणसी-अलाहाबाद शहर क्षेत्राच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरु आहे.

पायाभूत सुविधांबरोबरच देशाच्या अन्य भागांशी रेल्वेद्वारे वाराणसीला जोडण्यामध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षात वाराणसीहून अनेक नवीन गाड्या सोडण्यात आल्या आहेत. वाराणसी ते नवी दिल्ली, वडोदरा, पाटना जाण्यासाठी वेगवेगळ्या महामना एक्स्प्रेस, वाराणसी-पाटणा जनशताब्दी एक्स्प्रेस यासारख्या आधुनिक सुविधा असलेल्या गाड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. हुबळी असेल, मैसूर असेल, गुवाहाटी असेल, देशाच्या अन्य शहरांशी वाराणसीचा रेल्वे संपर्क अधिक मजबूत झाला आहे.

मित्रांनो, आज काशीमध्ये येणे-जाणेच केवळ सुलभ झालेले नाही तर शहराचे सौंदर्य देखील उजळले आहे. आपल्या येथील घाट आता अस्वच्छतेने नव्हे तर प्रकाशाने अतिथींचे स्वागत करत आहे. गंगा मातेच्या पाण्यात आता नावेबरोबरच क्रुझचा प्रवास देखील शक्य झाला आहे. आपली मंदिरे, पूजा-स्थळांपर्यंत भाविकांना पोहचण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटन ते परिवर्तनाचे हे अभियान निरंतर सुरु आहे.

बंधू आणि भगिनींनो, गेल्या चार वर्षांपासून काशीचा वारसा आपला ठेवा जपण्याचा, त्याचे संवर्धन करण्याचे काम केले जात आहे. मैंदगीरसीत टाऊन हॉल ही ती जागा आहे जिथे गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीची जागृती केली होती. हेरिटेज भवनाचा गौरव पुनर्स्थापित करण्याचे काम केले आहे. ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात दिसू लागले आहे.

वाराणसीतील मोठ्या आणि मुख्य उद्यानांचा जीर्णोद्धार, विकास आणि सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. सारनाथ इथे पर्यटकांसाठीध्वनी आणि प्रकाश शोची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी बुद्ध थीम पार्क, सारंगनाथ तलाव, गुरुनाथ मंदिर, मार्कंडेय महादेव मंदिर यासारख्या आस्थेशी निगडित अनेक स्थळांचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.

भैरव कुंड, सांरगनाथ कुंड, लक्ष्‍मी कुंड आणि दुर्गा कुंडाची स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या चार वर्षात अन्य देशातील अनेक प्रमुख नेत्यांचे स्वागत काशीवासीयांनी केले आहे, अद्भुत स्वागत केले आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे , फ्रान्सचे अध्यक्ष मैक्रोन , जर्मनीचे अध्यक्ष फैंक वाल्‍टर यांनी काशीच्या आदरातिथ्याची संपूर्ण जगात प्रशंसा केली आहे, जिथे जिथे गेले त्याचा उल्लेख केला आहे. जपानने तर काशीसाठी परिषद केंद्राची भेट दिली आहे.

मित्रानो, बनारसच्या आदरातिथ्यावर पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जगाचे लक्ष असेल. जानेवारीत जगभरात वसलेल्या भारतीयांचा कुंभ इथे काशीमध्ये भरणार आहे. आणि यासाठी सरकार आपल्या पातळीवर काम करत आहे. मात्र तुमचे सहकार्य देखील आवश्यक आहे. प्रत्येक काशीवासियाने यासाठी पुढे यायला हवे. काशीतील गल्ली-बोळे,नाके, चौरस्ते या ठिकाणी बनारसचा रस, बनारसचे रंग, बनारसचा सांस्कृतिक वारसा दृष्टीस पडायला हवा. स्वच्छतेपासून आदरातिथ्य-सत्कार याचे असे उदाहरण आपण ठेवायला हवे की आपले प्रवासी बंधू-भगिनी आयुष्यभर स्मरणात ठेवतील . आणि माझी तर इच्छा आहे की प्रवासी भारतीय दिवसात जगभरातून जे लोक इथे येणार आहेत, त्यांनी असा अनुभव घ्यावा, असा अनुभव घ्यावा की ते कायमचे काशीच्या पर्यटनाचे सदिच्छादूत बनतील. ते जिथे जातील, तिथे त्यांनी काशीची प्रशंसा करावी.

बंधू आणि भगिनींनो, स्वच्छतेच्या बाबतीतही काशीने परिवर्तन पाहिले आहे. आज इथले घाट, रस्ते आणि गल्ल्यांमध्ये स्वच्छता कायमस्वरूपी दिसून येत आहे. केवळ साफसफाईच नव्हे तर कचऱ्याच्या विघटनाचे देखील ठोस उपाय करण्यात आले आहेत. कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खत बनवण्याचे काम देखील केले जात आहे. करसरा इथे कचऱ्यापासून खत बनवण्याचा खूप मोठा कारखाना उभारण्यात आला आहे. दररोज शेकडो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे काम सुरु आहे. करसरामध्येच कचरा आणि ऊर्जा कारखाना देखील उभारण्यात आला आहे. या कारखान्यातून वीजनिर्मितीचे काम केले जात आहे. याशिवाय भवनिया पोखरी, पहाड़िया मंडी आणि आईडीए परिसरात जैव-इंधन बनवण्याचे कारखाने उभारण्यात आले आहेत.

मित्रानो, गंगामातेच्या स्वच्छतेसाठी गंगोत्रीपासून गंगासागर पर्यंत एकाचवेळी प्रयत्न सुरु आहेत. केवळ स्वच्छताच नाही तर शहरांतून गंगा नदीत कचरा जाऊ नये यासाठी देखील व्यवस्था केली जात आहे. आणि यासाठी आतापर्यन्त सुमारे 21 हजार कोटीच्या 200 पेक्षा अधिक प्रकल्पाना मान्यता देण्यात आली आहे.

बनारस मध्येही 600 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प केवळ याच उद्देशाने सुरु करण्यात आले आहेत. बिनापूर आणि रामणा मेंसीवरेज ट्रिपल प्‍लांटची निर्मिती वेगाने सुरु आहे. सांडपाणी प्रकल्पा बरोबरच त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांवर देखील काम केले जात आहे. शहरात हजारो नवीन सांडपाणी चेम्बरच्या निर्माणाबरोबरच 150 हून अधिक सामुदायिक शौचालयांची निर्मितीही केली आहे. सांडपाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी काम सुरु आहे. हजारो घरांमध्ये पाण्याची जोडणी आणि पाण्याचे मीटर बसवण्याचे काम जलद गतीने पुढे जात आहे.

           मित्रांनो, वाराणसी शहरच नव्हे तर आसपासच्या गावांमध्येही रस्ते, वीज, पाणी यासारख्या सुविधा पोहचवण्यात आल्या आहेत. खासदार म्हणून जी गावे विशेष रूपाने विकसित करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे त्यातील नागेपुर गावासाठी आज पाण्याच्या मोठ्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. नागेपुर असेल, जयापुर असेल, ककरिया असेल किंवा डोमरी असेल सर्व गावांना पूर्णपणे रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधांशी जोडण्यात येत आहे. खेळण्यासाठी मैदान, स्वयंरोजगाराचे केंद्र, शेतीची उत्तम व्यवस्था आणि योग्य आरोग्यसेवा यांसारख्या अनेक व्यवस्था करण्यात येत आहेत.

मित्रानो, तुमच्या सक्रिय सहभागामुळे काशी आज पूर्व भारतातील एक आरोग्य केंद्र म्हणून उदयाला येत आहे. निरनिराळ्या क्षेत्रात निर्माण होणारी नवीन रुग्णालये आगामी काळात वाराणसीला संपूर्ण पूर्व भारताचे मोठे वैद्यकीय केंद्र बनवणार आहे. बीएचयू मध्ये उभारलेले आधुनिक ट्राऊमा केंद्र हजारो लोकांचे आयुष्य वाचवण्याचे काम करत आहे. बनारसमध्ये तयार होत असलेले नवीन कर्करोग रुग्णालय, सुपर-स्पेशालिटी रुग्णालय लोकांना उपचाराच्या आधुनिक सुविधा देण्यात मोठी भूमिका पार पाडणार आहेत.

अलिकडेच बीएचयूने एम्सबरोबर एक जागतिक दर्जाची आरोग्य संस्था उभारण्यासाठी करार केला आहे. मित्रानो आज बीएचयूमध्ये प्रादेशिक नेत्रविज्ञान केंद्राचीही पायाभरणी करण्यात आली आहे. ५४ वर्षांपूर्वी लाल बहादूर शास्त्री यांनी इथे नेत्र विभागाचे उदघाटन केले होते. त्याचा प्रादेशिक केंद्र म्हणून विस्तार करण्याची संधी आज मला प्राप्त झाली आहे. जेव्हा ही सुविधा तयार होईल, तेव्हा पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, छत्त्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि नेपाळपर्यंतच्या कोट्यवधी लोकांना याचा लाभ मिळेल.

एवढेच नाही तर काशीवासीयांना आता डोळ्यांच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी मोठ-मोठ्या शहरांत जावे लागणार नाही. यामुळे मोतीबिंदूपासून डोळ्यांच्या अति-गंभीर आजारात होणाऱ्या उपचारांवरील खर्च देखील खूप कमी होईल. एवढेच नाही तर ही संस्था आता उच्च दर्जाचे डोळ्यांचे डॉक्टर देखील तयार करेल आणि संशोधनात गुणवत्ता सुनिश्चित करेल.

मित्रांनो, बनारसमध्ये नवीन रुग्णालयांची निर्मिती तर होतच आहे , आधी जी रुग्णालये होती त्यांचेही आधुनिकीकरण केले जात आहे. पांडेपूर येथे १५० कोटी रुपये खर्चून ईएसआय रुग्णालयाचे आधुनिकीकरण केले जात आहे. याशिवाय बनारसमध्ये आधीपासून कार्यरत रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. खासगी क्षेत्रालाही इथे रुग्णालय उघडण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याशिवाय, वॉर्ड आणि तालुका स्तरावर देखील अनेक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांची उभारणी केली जात आहे.

मित्रांनो, उत्तर प्रदेशात भाजपाच्या योगीजींचे सरकार स्थापन झाल्यापासून या सर्व कामांमध्ये अभूतपूर्व गती आली आहे. मी योगीजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आयुष्मान भारतमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन करतो. देशातील ५० कोटी गरीब बंधू-भगिनींना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुनिश्चित करणारी ही योजना प्रायोगिक तत्वावर उत्तर प्रदेशासह देशातील अनेक भागात सुरु आहे. २३ सप्टेंबरपासून ही योजना देशभरात लागू केली जाईल.

बंधू आणि भगिनींनो, आरोग्याबरोबरच शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर सरकारने भर दिला आहे. हे मालवीयजी यांचेच स्वप्न होते की एकाच परिसरात प्राचीन विद्यांसह आधुनिकतेचाही अभ्यास व्हावा. त्यांचे हेच स्वप्न म्हणजे आपल्या बीएचयूचा विस्तार करण्यासाठी आज अनेक केंद्रांचे लोकार्पण झाले आहे.

वेदाच्या ज्ञानापासून २१ व्या शतकातील विज्ञान आणि भविष्याच्या तंत्रज्ञानाचे समाधान देणारे आयाम आज इथे जोडण्यात आले आहेत. वेदांपासून वर्तमानापर्यंत जोडण्यात आले आहे. आज इथे एकीकडे वैदिक विज्ञान केंद्राची पायाभरणी झाली आहे तर दुसरीकडे अटल इन्क्युबेशन केंद्राचीही सुरुवात करण्यात आली आहे.

           तरुण मित्रानो, आपणा सर्वांना जितका आपल्या प्राचीन संस्कृती, सभ्यतेबाबत अभिमान आहे तेवढेच भविष्यातील तंत्रज्ञानाप्रती आपले आकर्षण आहे. ८० कोटीहून अधिक तरुणांच्या शक्तीने भरलेला हा देश वेगाने बदलत्या तंत्रज्ञानावर आपली छाप पाडत आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाबरोबरच भारताच्या पावलाशी पाऊल मिळवत बीएचयू मध्ये अटल इन्क्युबेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. बीएचयू मधील हे इन्क्युबेशन केंद्र आगामी काळात इथे स्टार्टअपसाठी नवीन ऊर्जा देण्याचे काम करेल.

मला माहिती देण्यात आली आहे की देशभरातुन सुमारे ८० स्टार्टअपचे अर्ज यात सहभागी होण्यासाठी आले आहेत आणि २० स्टार्टअप याआधीच सहभागी झाले आहेत. या केंद्रासाठी मी बनारसचे तरुण आणि विशेषतः जे अशा प्रकारचे साहस करू शकतात, विचार करतात त्यांचे मी अभिनंदन करतो.

मित्रांनो, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थांना वेग देण्याचे काम देखील गेल्या चार वर्षात अधिक गतिमान झाले आहे. राजा तालाब येथे बांधण्यात आलेल्या पेरिशेबल कार्गो केंद्राचे जुलैमध्येच लोकार्पण करण्यात आले. हे कार्गो सेंटर वाराणसी आणि आसपासच्या शेतकऱ्यांची पिके खराब होण्यापासून केवळ वाचवत नाही तर उत्पन्न वाढवण्यात आणि मूल्य वृद्धीत देखील मदत करत आहे. इथे  बटाटे, टोमॅटोसह अन्य फळे-भाज्यांच्या साठवणुकीची सुविधा आहेच शिवाय हे रेल्वे स्थानकाला लागून आहे. त्यामुळे फळे-भाज्या अन्य शहरांमध्ये पाठवणे सुलभ होते.

या कार्गो सेंटर व्यतिरिक्त आता आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याचाच अर्थ भविष्यात काशी धान्याच्या अव्वल जातींच्या साठवणुकीत प्रमुख भूमिका पार पाडणार आहे. वाराणसीतील शेतकरी बंधू--भगिनींना शेती व्यतिरिक्त अन्य व्यवसायांमधूनही उत्पन्न मिळावे, याचीही व्यवस्था केली जात आहे. शेतकरी बंधू-भगिनींना शेतीबरोबरच पशुपालन आणि मधमाशीपालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

थोडयावेळापूर्वी इथे मधमाशांनी भरलेले खोके इथे वाटण्यात आले. इथे केवळ फोटो देण्यात आला, मात्र शेतकऱ्यांना देण्यात आले. यामागे देखील हाच उद्देश आहे. मधमाशीमुळे केवळ आपले उत्पादन वाढण्यात मदत होत नाही तर मधाच्या रूपाने अतिरिक्त उत्पन्नाचा देखील हा स्रोत आहे. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की आज देशधान्याचे विक्रमी उत्पादन करण्याबरोबरच विक्रमी प्रमाणात मध तयार करत आहे. 

बंधू आणि भगिनींनो, बनारस ही पूर्व भारतातील विणकर शिल्पकार , मातीला सोने बनवणाऱ्या कलाकारांची भूमी आहे. वाराणसीतील हातमाग आणि हस्तशिल्प उद्योगाला तांत्रिक सहाय्य देण्यासाठी आणि कारागिरांना नवीन बाजारपेठेशी जोडण्यासाठी व्यापार सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय विणकरांना चांगल्या उत्पन्न सुविधेसाठी ९ ठिकाणी सामान्य सुविधा केंद्रे देखील उभारण्यात आली आहेत. आता विणकर बंधू-भगिनींना वाप मशीन दिले जात आहे. यामुळे विणकरांचे काम अधिक सोपे होईल.

विणकरच नाही तर मातीची भांडी आणि मातीपासून कलाकृती बनवणाऱ्या बंधू-भगिनींना देखील तांत्रिक ताकद पुरवली जात आहे. आज इथे या कार्यक्रमात अनेक बंधू-भगिनींना इलेक्ट्रिक चार्जर देण्यात आले आहेत. याशिवाय माती मळण्याचे आणि सुकवण्याची आधुनिक यंत्रे त्यांना दिली जात आहेत. यामुळे इथे तुमचे परिश्रम वाचतील आणि कमी वेळेत चांगल्या दर्जाची भांडी किंवा सजावटीचे सामान बनवणे शक्य होईल.

मित्रानो, वाराणसीतील प्रत्येक वर्गाचे , प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. काशी आता देशातील त्या निवडक शहरांपैकी आहे जेथील घरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पोहचतो. यासाठी अलाहाबादपासून बनारस पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. आतापर्यन्त बनारसमधील आठ हजारांहून अधिक घरांपर्यंत पाईप गॅसची जोडणी पोचलेली आहे. आगामी काळात, ती ४० हजार घरापर्यंत पोहचवण्याचे काम सुरु आहे. याशिवाय उज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या ६० हजाराहून अधिक गॅस जोडण्यांमुळे बनारसच्या आसपासच्या गावातील महिलांचे जीवन सुलभ करण्याचे काम केले आहे.

मित्रांनो, 'सबका साथ-सबका विकास ' या मार्गावर चालत काशी एका नव्या उत्साहासह , नव्या जोमाने,आपले भविष्य घडवत आहे. हजारो कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरु आहे पायाभूत विकासाच्या ज्या प्रकल्पांवर काम सुरु आहे, त्यापैकी अनेक येत्या काही महिन्यात पूर्ण होण्याच्या स्थितीत आहेत. रिंग रोड, विमनातळ ते कचेरीपर्यंतचा रस्ता , तांदूळ संशोधन संस्था , बिनापूर -गोएथाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प , मल्टिनोडल टर्मिनल, जागतिक दर्जाचे कर्करोग रुग्णालय यासारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या शहराच्या विकासाला नवीन आयाम मिळेल.

मित्रांनो, हे सर्व प्रकल्प वाराणसीतील तरुणांना रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध करून देत आहेत. बनारसमध्ये होत असलेल्या विकासाने इथल्या उद्योजकांसाठी व्यापाराच्या नव्या संधींची कवाडे उघडली आहेत. चला, आपण पूर्ण समर्पणासह बनारसमध्ये होत असलेल्या परिवर्तनाचा हा संकल्प अधिक मजबूत करूया. नवीन काशी, नवीन भारताच्या निर्मितीत पुढे येऊन आपले योगदान द्या.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना नव्याने सुरु होत असलेल्या तमाम प्रकल्पांसाठी शुभेच्छा देतो. तुम्ही असेच तुमचा स्नेह आणि आशिर्वादातून प्रेरणा देत रहा. याच इच्छेसह आणि बंधू-भगिनींनो, तुम्ही भले मला पंतप्रधान पदाची जबाबदारी दिली असेल, मात्र मी एक खासदार म्हणून तुम्हाला माझ्या कामाचा हिशेब देण्यासाठी बांधील आहे. आणि आज मी तुम्हाला चार वर्षात एक खासदार म्हणून मी केलेल्या कामाची एक छोटीशी झलक दाखवली. आणि मला वाटते लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा सेवक म्हणून, तुम्ही माझे मालक आहात, तुम्ही माझे हाय कमांड आहात. आणि म्हणूनच पै-पैचा हिशेब देणे , क्षणा-क्षणाचा हिशेब देणे ही माझी जबाबदारी आहे.

आणि एक खासदार म्हणून आज मला आनंद होत आहे की तुमच्या समोर विकासाच्या या गोष्टी सादर करण्याचे सौभाग्य मला लाभले. मी पुन्हा एकदा तुमचा स्नेह, तुमचे आशिर्वाद, तुमचे असीम प्रेम यासाठी मनापासून खूप-खूप आभार व्यक्त करतो.

माझ्याबरोबर म्हणा-

भारत माता की  - जय

भारत माता की - जय

भारत माता की  - जय

खूप-खूप  धन्‍यवाद !

                                                                                     ******

B. Gokhale/ S.Kane/P.Kor



(Release ID: 1546911) Visitor Counter : 72


Read this release in: English