पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीत प्रमुख विकासप्रकल्पांचे उद्‌घाटन

Posted On: 18 SEP 2018 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  18 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठात एका जनसभेत अनेक महत्वपूर्ण विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन तसेच पायाभरणी केली.

ज्या प्रकल्पांचे उद्‌घाटन करण्यात आले त्यामध्ये पुरानी काशीसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना आणि बनारस हिंदू विद्यापीठात अटल इनक्युबेशन सेंटर यांचा समावेश आहे. ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यात बनारस हिंदू विद्यापीठात प्रादेशिक नेत्र विज्ञान केंद्राचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च 550 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, वाराणसीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच शहराचा समृद्ध वारसा जतन करण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत. शहराची प्राचीन ओळख कायम ठेवत आधुनिकीकरण केले जात आहे असे ते म्हणाले. काशीच्या जनतेच्या गेल्या चार वर्षातील संकल्पामुळे जो बदल घडून आला तो आता दृश्य स्वरुपात दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांनी वीज, रस्ते आणि अन्य पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांचा उल्लेख करताना सांगितले की, या प्रकल्पांनी लक्षणीय प्रगती केली असून वाराणसी आणि आसपासच्या परिसरातील लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणली आहे. जेंव्हा नागरिक वाराणसी कॅन्टोनमेंट स्टेशनची छायाचित्रं ऑनलाईन पोस्ट करतात तेंव्हा ते पाहून आपल्याला अतिशय आनंद होतो असे ते म्हणाले. वाहतूक क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाचे काम केले जात आहे असे ते म्हणाले. शहराची स्वच्छता आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला. पर्यटन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न एक निरंतर प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी सारनाथ येथे केल्या जाणाऱ्या कामाचा उल्लेख केला.

रस्ते, वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा वाराणसीच्या आसपासच्या ग्रामीण भागात पुरवल्या जात आहेत असे पंतप्रधान म्हणाले. काशी आता एक आरोग्य केंद्र म्हणून उदयाला येत आहे असे ते म्हणाले. आज उद्‌घाटन करण्यात आलेल्या अटल इनक्युबेशन सेंटरचा उल्लेख करतांना ते म्हणाले की, स्टार्ट अप्सने याच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. वाराणसी हे देशातील निवडक शहरांपैकी एक आहे जिथे पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवला जातो.

शहराच्या परिवर्तनाचा समान संकल्प पूर्ण करण्यासाठी वाराणसीच्या जनतेने स्वत:ला समर्पित करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.  

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 



(Release ID: 1546651) Visitor Counter : 59


Read this release in: English