पंतप्रधान कार्यालय

'स्वच्छता ही सेवा' चळवळीच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 15 SEP 2018 12:21PM by PIB Mumbai

 

देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या चळवळीशी जोडल्या गेलेल्या आपणा सर्व स्वच्छाग्रहींचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजचा 15 सप्टेंबर हा दिवस खरोखरच ऐतिहासिक आहे. आजची सकाळ, एक नवी प्रतिज्ञा, एक नवा उत्साह, एक नवे स्वप्न घेऊन आली आहे, म्हणून आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आपण, मी, सव्वाशे कोटी देशवासी, 'स्‍वच्‍छता ही सेवा' या संकल्पाचा पुन्हा एकदा पुनरूच्चार करणार आहोत.  आजपासून 2 ऑक्टोबर अर्थात आदरणीय महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत देशभरात आपण सर्व नव्या जोमाने, नव्या उर्जेसह आपला देश स्वच्छ करण्यासाठी  श्रमदान करू, आपले योगदान देऊ.

दिवाळीच्या दिवसात आपण पाहिले आहे, घर कितीही स्वच्छ असो,  दिवाळी येताच संपूर्ण घर प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता करू लागते. त्याचप्रमाणे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याच्या स्वच्छतेची ही सवय, प्रत्येक महिन्यात, प्रत्येक वर्षी कायम ठेवावी लागेल.

चार वर्षांपूर्वीच सुरू झालेले हे अभियान, स्वच्छतेचे आंदोलन आज एका महत्वपूर्ण टप्प्यावर आले आहे. आम्हाला अभिमानाने सांगावेसे वाटते की देशातील प्रत्येक भाग, संप्रदाय, प्रत्येक जात, प्रत्येक वयाचे माझे सहकारी हे महाअभियान पुढे घेऊन जात आहेत. गाव असो, गल्ली असो, कोपरा असो, कोणतेही शहर असो, सर्वच या अभियानात सहभागी झाले आहेत. त्यापासून कोणीही अलिप्त नाही.

2014  साली भारतात स्‍वच्‍छतेची व्याप्ती केवळ 40 टक्के होती. आज आपणा सर्वांचा संकल्प आणि प्रयत्नांमुळे हे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. मागच्या 60-65 वर्षांमध्ये वाढू न शकलेली स्वच्छतेची व्याप्ती गेल्या चार वर्षांत लक्षणीय वाढेल, असा विचारही कोणी केला नसेल. अवघ्या चार वर्षात भारतात सुमारे नऊ कोटी शौचालयांचे निर्माण होईल, असा विचारही कोणी केला नसेल. अवघ्या चार वर्षांमध्ये सुमारे साडेचार लाख गावे उघड्यावरील शौचमुक्त होतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. अवघ्या चार वर्षांमध्ये 450 पेक्षा जास्त जिल्हे उघड्यावर शौचमुक्त होतील, असा विचारही कोणी केला नसेल. अवघ्या चार वर्षांमध्ये 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश उघड्यावरील शौचमुक्त होतील, असा विचारही कोणी केला नसेल.

ही भारताच्या भारतवासीयांची, आपणा सर्व स्वच्छाग्रहींची ताकत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर केवळ सरकार कधीही बदल घडवून आणू शकणार नाही. गोष्ट आरोग्याची असो वा संपत्तीची असो, स्वच्छतेमुळे लोकांच्या आयुष्यात फार मोठ्या सुधारणा घडून येत आहेत.


जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अंदाजानुसार 3 लाख लोकांचे आयुष्य वाचवण्याच्या कामी स्वच्छतेची भूमिका महत्त्वाची असेल, तसेच एका अभ्यासानुसार, स्वच्छतेमुळे डायरियाच्या प्रकरणांमध्ये 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट होऊ शकेल.

मात्र बंधू आणि भगिनींनो, केवळ शौचालये निर्माण करून भारत स्वच्छ होईल, असे नाही. प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे, कचरा पेट्यांची सुविधा देणे, कचऱ्याच्या विल्हेवाटीची सोय करणे, या सर्व व्यवस्था केवळ एक माध्यम आहे. स्वच्छता ही एक सवय आहे, जी अंगी बाणवावी लागेल. हा स्वभावात परिवर्तन घडवून आणण्याचा यज्ञ आहे, ज्यात देशातील प्रत्येक नागरिक आपल्या प्रमाणेच सक्रिय योगदान देत आहे.


स्वच्छ भारत मिशनशी जोडल्या गेलेल्या आपणा सर्वांचे अनुभव ऐकावे, आपल्याकडून काही शिकावे आणि नंतर आपण सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान करावे, असा माझा प्रयास आहे. आज आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची संधी मिळेल, त्या ठिकाणी जे प्रयत्न होत आहेत, त्यांची थेट माहिती मिळण्याची संधी मिळेल.

मी आज पुन्हा एकदा देशवासीयांना सांगू इच्छितो की देशभरातील स्वच्छाग्रहींचा संकल्प आणि समर्पण आपण पाहिले, ऐकले, समजून घेतले, अनुभवले. किती अभूतपूर्व सहकार्य आहे. देशातील अनेक मान्यवरांनी सुमारे दोन तास अशाप्रकारे या कार्यात सक्रिय सहभागी होणे, त्यांचे अनुभव ऐकणे, यावरून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वच्छतेप्रति सव्वाशे कोटी देशवासीयांनी हे आंदोलन कशाप्रकारे हाती घेतले आहे, हे यावरून दिसून येते. संपूर्ण जग हे पाहत आहे.

भविष्यात जेव्हा या जनचळवळीबाबत लिहिले जाईल, वाचले जाईल, तेव्हा आपणा सर्व स्वच्छाग्रहींची नावे सुवर्णाक्षरात लिहीली जातील. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीदांप्रति आदर आणि सन्मानाची भावना असते, आपले सर्वांचे योगदानही त्याच आदर आणि सन्मानासह, आदरणीय महात्मा गांधीजींच्या सच्चा वारसांच्या रूपात स्मरले जाईल, असा विश्वास मला वाटतो.

कारण आपण देशाचे नवनिर्माण करून गरीब आणि दुर्बलांचे आयुष्य वाचवणारे आणि आपल्या देशाला जगात पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणारे सेनानी आहात. सव्वाशे कोटींची शक्ती असीम आहे, अनंत आहे. आमचा उत्साह भरात आहे, आमच्या मनात दृढ विश्वास आहे आणि सिद्धीसाठी आम्ही संकल्प केला आहे. आपण सर्व श्रमदानासाठी सज्ज आणि तत्पर आहात. आपणा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा. आता मी आपणा सर्वांचा निरोप घेतो, कारण मला सुद्धा आपणा सर्वांसोबत श्रमदानाच्या कामी हातभार लावायचा आहे.

मी पुन्हा एकदा आपल्या प्रेरणेसाठी, आपण दाखवीत असलेल्या पुरुषार्थासाठी आपले मनापासून अभिनंदन करतो. सर्व महापुरुषांना प्रणाम करीत माझे बोलणे थांबवतो. अनेकानेक आभार.

Shilpa Pophale/Madhuri Pange



(Release ID: 1546258) Visitor Counter : 121


Read this release in: Bengali , English , Assamese