पंतप्रधान कार्यालय

देशभरातल्या आशा, एएनएम आणि अंगणवाडी सेविकांशी व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद

Posted On: 11 SEP 2018 4:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2018

 

देशभरातल्या आशा, अंगणवाडी आणि एएनएम कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. एकत्रपणे काम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे, नावीन्यपूर्ण साधने आणि तंत्रज्ञान वापरण्याचे, आरोग्य व पोषण सेवा सुधारण्याचे आणि कुपोषण कमी करण्यासाठीच्या पोषण अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

सुदृढ आणि बळकट राष्ट्र उभारणीसाठी आरोग्यसेविका देत असलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. या महिन्यात साजऱ्या करण्यात येत असलेल्या ‘पोषण महिना’ याचा एक भाग म्हणून या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. पोषणाचा संदेश घराघरात पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. राजस्थानातल्या झुनझुनू येथून सुरू झालेल्या पोषण अभियानाचे उद्दिष्ट अपुरी वाढ, अशक्तपणा, कुपोषण आणि जन्माच्यावेळी कमी वजन या समस्यांवर मात करणे असून या मोहिमेत अधिकाधिक महिला आणि मुले सहभागी होणे आवश्यक असल्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पोषण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेसंदर्भातल्या विविध पैलूंवर सरकारने लक्ष केंद्रीत केले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. लसीकरणाने वेग घेतला असून त्याचा फायदा महिला आणि विशेषत: मुलांना होत आहे.

यावेळी देशभरातले आरोग्य कार्यकर्ते आणि लाभार्थ्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. ‘मिशन इंद्रधनुष’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि 3 लाखांहून अधिक गर्भवती व 85 कोटींहून अधिक मुलांना लसीकरणाचे कवच पुरवण्यासाठी आशा, एएनएम आणि अंगणवाडी सेविकांनी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

सुरक्षित मातृत्व अभियानाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या संवादादरम्यान केले.

‘नवजात बाळाची काळजी’ या उपक्रमाचा फायदा दरवर्षी देशातल्या 1.25 दशलक्ष मुलांना होतो. त्याचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. या उपक्रमाचे नामकरण आता चाईल्ड केअर असे करण्यात आले असून त्याअंतर्गत आशा कार्यकर्त्या, जन्माच्या पहिल्या 42 दिवसातील 6 भेटींऐवजी पहिल्या 15 महिन्यात 11 भेटी करतील.

आरोग्य आणि देशाचा विकास यांच्यातील संबंध पंतप्रधानांनी सांगितला. देशातील मुले अशक्त राहिली तर प्रगतीचा वेग मंदावेल. कुठल्‍याही बाळासाठी आयुष्याचे पहिले हजार दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळातील पोषणयुक्त आहार, आहाराविषयक सवयी, शरीर कसे होणार आहे, लेखनवाचनात कसे राहणार आहे आणि मानसिकदृष्ट्या ते किती बळकट राहणार आहे, ते ठरवत असतात. देशाचा नागरिक सुदृढ असेल तर कोणीही देशाची प्रगती थांबवू शकत नाही. त्यामुळे पहिल्या हजार दिवसांमध्ये देशाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी बळकट यंत्रणा विकसित करण्याकरिता प्रयत्न झाले पाहिजेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाच्या वापरामुळे 3 लाख निरागस जीव वाचू शकतात, याची दखल घेतली पाहिजे. स्वच्छतेप्रती नागरिकांच्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले.

आयुष्यमान भारताची पहिली लाभार्थी बेबी करिष्मा, जी आयुष्यमान बेबी म्हणूनही ओळखली जाते तिचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. या महिन्याच्या 23 तारखेला रांची येथून आयुष्यमान भारताच्या प्रारंभापासून लाभ होणार आहे, अशा 10 कोटींहून अधिक कुटुंबांसाठी ती आशेचे प्रतीक आहे.

केंद्र सरकारकडून आशा कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या नित्य प्रोत्साहनात दुप्पट वाढ पंतप्रधानांनी जाहीर केली. याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि मदतनीसांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या मानधनातही महत्वपूर्ण वाढ पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. आतापर्यंत ज्यांना 3 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 4 हजार 500 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना 2 हजार 200 रुपये मिळत होते. त्यांना 3 हजार 500 मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही 1500 रुपयांवरुन 2,250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

 

B.Gokhale/S.Kakde/P.Kor



(Release ID: 1545666) Visitor Counter : 90


Read this release in: English