पंतप्रधान कार्यालय

आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंतप्रधानांकडून वाढ जाहीर

Posted On: 11 SEP 2018 3:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात महत्त्वपूर्ण वाढ केली. लाखो आशा, अंगणवाडी आणि एएनएम कार्यकर्त्यांशी आज पंतप्रधानांनी व्हिडिओ ब्रिजने संवाद साधला. ही वाढ पुढील महिन्यापासून लागू होईल.

केंद्र सरकारकडून आशा कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या नित्य प्रोत्साहनात दुप्पट वाढ पंतप्रधानांनी जाहीर केली. याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि मदतनीसांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या मानधनातही महत्वपूर्ण वाढ पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. आतापर्यंत ज्यांना 3 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 4 हजार 500 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना 2 हजार 200 रुपये मिळत होते. त्यांना 3 हजार 500 मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही 1500 रुपयांवरुन 2,250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (आयसीडीएस-सीएस) यासारखी तंत्रसाधने वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केले. कामगिरीवर आधारित 250 रुपये ते 500 रुपये ते असेल.

देशभरातल्या आशा, अंगणवाडी आणि एएनएम कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. एकत्रपणे काम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे, नावीन्यपूर्ण साधने आणि तंत्रज्ञान वापरण्याचे, आरोग्य व पोषण सेवा सुधारण्याचे आणि कुपोषण कमी करण्यासाठीच्या पोषण अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

 

B.Gokhale/S.Kakde/P.Kor



(Release ID: 1545634) Visitor Counter : 77


Read this release in: English