पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, प. बंगाल व त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांगलादेशाच्या तीन प्रकल्पांचे लोकार्पण

Posted On: 10 SEP 2018 8:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज संयुक्तरित्या बांगलादेशातल्या तीन प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज दिल्लीहून तर बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ढाका येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

प्रकल्पांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या भेरमारा (बांगलादेश), बहरामपूर (भारत) आंतरजोडणीतून बांगलादेशला भारताकडून 500 मेगावॅटचा अतिरिक्त ऊर्जा पुरवठा, अखौरा-आगरतळा रेल्वे जोडणी, बांगलादेश रेल्वेच्या कुलौरा-शाहबाझपूर क्षेत्राचे पुनर्वसन यांचा समावेश आहे.

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अलिकडच्या काळात पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत अनेकदा झालेल्या भेटींना उजाळा दिला. काठमांडूतील बिमस्टेक परिषद, शांतीनिकेतन आणि लंडनमधल्या राष्ट्रकुल परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

शेजारी राष्ट्रांमधल्या नेत्यांचे संबंध शेजाऱ्यांसारखे असले पाहिजेत, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. शिष्टाचारांचा बाऊ न करता बोलणे, वारंवार भेटणे झाले पाहिजे. बांगलादेशच्या पंतप्रधानांसोबत अलिकडच्या काळात झालेल्या भेटी, शेजारी राष्ट्रांमधील निकटता दर्शवतात, असे पंतप्रधान म्हणाले.

1965 पूर्वी असलेली संपर्क साधने पुन्हा बहाल करण्याचा पंतप्रधान हसीना यांच्या दृष्टीकोनाविषयी मोदी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात यादृष्टीने प्रगती होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. आपल्या ऊर्जाजोडणीत आपण वाढ केली आहे. रेल्वेसंपर्क वाढवण्यासाठी दोन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. 2015 मधल्‍या बांगलादेश दौऱ्यात बांगलादेशाला 500 मेगावॅट अतिरिक्त वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याबद्दलची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. हे काम पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधील पारेषण वाहिनीद्वारे केले जाईल. या कामात सहकार्य दिल्याबद्दल पंतप्रधानांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे भारताकडून बांगलादेशला 1.16 गिगावॅट वीजपुरवठा केला जात आहे. मेगावॅट ते गिगावॅट हा प्रवास दोन्ही देशांमधल्या संबंधांच्या सुवर्ण युगाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

अखौरा-आगरतळा रेल्वेमार्ग, दोन्ही देशांमधील सरहद्दपार दळणवळणाचे आणखी एक माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामातील सहकार्यासाठी त्यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांचे आभार मानले.

बांगलादेशचे रुपांतर वर्ष 2021 पर्यंत मध्यम उत्पन्न असलेला देश आणि 2041 पर्यंत विकसित देशात करण्याबाबतचा पंतप्रधान शेख हसीना यांच्या उद्दिष्टाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. दोन्ही देशांमधील निकटचे संबंध आणि परस्परांच्या नागरिकांमधील दुवे यामुळे दोन्ही देशांमधील विकास आणि समृद्धी नव्या उंचीवर पोहोचतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

 

B.Gokhale/S.Kakde/P.Kor

 



(Release ID: 1545621) Visitor Counter : 98


Read this release in: English