पंतप्रधान कार्यालय

एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 02 SEP 2018 8:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2018

 

काही लोक व्यंकय्या नायडू यांना कोणत्या कामासाठी शुभेच्छा देत आहेत, मी शुभेच्छा देत आहे ज्या सवयी त्यांना होत्या त्यातून त्यांनी बाहेर पडून नवे काम केल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देत आहे कारण व्यंकय्याजींना जेव्हा मी सभागृहात काम करताना पाहतो तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना किती खटाटोप करावा लागतो, स्वतःला थांबवण्यासाठी त्यांना किती प्रयत्न करावे लागतात आणि त्यात यशस्वी होणे, ही बाब, मला असे वाटते की तुम्ही खूप मोठे काम केले आहे. सभागृह जर सुरळीत चालत असेल तर आसनावर कोण बसले आहे त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. त्यांच्यात कोणती क्षमता आहे, कोणते वैशिष्ट्य आहे, हे जास्त कोणाच्या लक्षात येत नाही आणि सदस्यांचे सामर्थ्य काय आहे, सदस्यांचे विचार काय आहेत, ते आघाडीवर असतात. पण जेव्हा सभागृह चालत नाही तेव्हा अध्यक्षपदावर जी व्यक्ती असते तिच्यावरच लक्ष केंद्रित होते. ते कशा प्रकारे शिस्त निर्माण करत आहेत, कशा प्रकारे सर्वांना थांबवत आहेत आणि म्हणूनच गेल्या वर्षी देशाला देखील व्यंकय्याजींना जवळून पाहण्याचे भाग्य लाभले आहे. जर सभागृहाचे कामकाज ठीकठाक चालले असते तर कदाचित ते पाहण्याचे भाग्य लाभले नसते. व्यंकय्याजींबरोबर अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. मला आम्ही अशा एका राजकीय संस्कृतीमध्ये वाढलो आहोत की, जेव्हा मी राष्ट्रीय चिटणीस असायचो तेव्हा हे आंध्र प्रदेशाचे सरचिटणीस असायचे आणि जेव्हा हे राष्ट्रीय अध्यक्ष बनले तेव्हा मी त्यांच्या मदतीला एक सरचिटणीस म्हणून काम करत होतो. म्हणजेच एक प्रकारे एका टीममध्ये कसे काम केले जाते, दायित्व कोणाचेही असो, जबाबदा-या कधीही कमी होत नाहीत. पदभारापेक्षा जास्त महत्त्व कार्यभाराचे आहे आणि तोच घेऊन व्यंकय्याजी वाटचाल करत राहिले.

आताच सांगण्यात आले की व्यंकय्याजींनी एका वर्षात सर्व राज्यांचा दौरा केला, एक राहून गेले पण ते यासाठी नाही की त्याचा कार्यक्रम आखण्यात आला नव्हता. तर त्याठिकाणी हेलिकॉप्टर जाऊ शकले नव्हते, हवामानाने त्रास दिला होता, नाहीतर त्यांचा तो दौरा देखील झाला असता. आम्ही सभागृहात काम करत असायचो, कधी बैठका घेऊन निघायचो तेव्हा विचार यायचा जरा त्यांची भेट घेऊया, चर्चा करूया, तेव्हा कळायचे की ते कधीच निघाले, केरळला पोहोचले, तामिळनाडूला पोहोचले, आंध्रला पोहोचले, म्हणजेच सातत्याने जे दायित्व मिळाले त्यासाठी, ते उत्तरदायित्त्व निभावण्यासाठी स्वतःला योग्य बनवणे, त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम करणे आणि त्या जबाबदारीनुसार स्वतःला घडवणे आणि हा त्याचाच परिणाम आहे, त्यांना यश मिळत राहिले आणि त्या क्षेत्रांना देखील ते यशस्वी करत राहिले. 50 वर्षांचे सार्वजनिक कार्य कमी म्हणता येणार नाही, 10 वर्षांचे सार्वजनिक जीवन ते ही विद्यार्थी या नात्याने, ते देखील कार्यकर्ते म्हणून आणि 40 वर्षे प्रत्यक्ष राजकीय जीवन आणि 50 वर्षांच्या या दीर्घ कार्यकाळात स्वतः देखील खूप शिकले आणि सहका-यांना देखील शिकवले. आम्ही लोक त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहोत. कधी कधी कोणा कोणाबरोबर इतके जवळ राहून काम करतात, इतके जवळ राहून काम करतात की त्यांना ओळखणे अवघड होऊन जाते, समजणे अवघड होऊन जाते. जर तुम्ही कोणापासून 10 फूट अंतरावर उभे आहात तर लक्षात येते पण तुम्ही जर कोणाला जवळ घेऊन बसला असाल तर लक्षात येणार नाही म्हणजे आम्ही इतक्या जवळ आहोत की त्याचा अंदाज करणे अवघड आहे. पण जेव्हा सर्वांना हे कळते की आपल्या सहका-यामध्ये हे सामर्थ्य आहे, हे गुण आहेत तेव्हा इतका अभिमान वाटतो, इतका आनंद होतो की आपल्याला अशा एका महान व्यक्तिमत्वासोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. ही आपल्या स्वतःसाठीच एक मोठ्या अभिमानाची बाब आहे.

व्यंकय्याजी शिस्तीचे मोठे भोक्ते आहेत आणि आपल्या देशाची स्थिती अशी आहे की शिस्तीला लोकशाहीविरोधी म्हणणे अगदी सहज सोपे झाले आहे, कोणी थोडा जरी शिस्तीचा आग्रह धरला तर तो मेलाच, हुकूमशहा आहे आणि न जाणो सर्व शब्दकोष उघडून टाकतील. पण व्यंकय्याजी ज्या शिस्तीचा आग्रह धरतात, त्या शिस्तीचे पालन स्वतःसुद्धा करतात. व्यंकय्याजींबरोबर दौरा करताना खूपच सावध राहावे लागते, एक तर ते घड्याळ वापरत नाहीत, लेखणी नसते, त्यांच्याकडे पेन नसतो आणि पैसे नसतात. कधी तुम्ही त्यांच्या सोबत गेलात तर लक्षात ठेवा हे सर्व तुमच्याकडे असले पाहिजे. आता गंमत अशी आहे की कधीही घड्याळ वापरत नाहीत, पण कार्यक्रमात वेळेवर पोहोचण्यासाठी ते इतके शिस्तीचे आहेत की ही बाब खरच कौतुकाला पात्र आहे. अगदी वेळेवर कार्यक्रमाला जायचे आणि जर कार्यक्रम वेळेवर पूर्ण झाला नाही तर बघा व्यासपीठावर ते कसे अस्वस्थ झालेले असतात की तुम्हाला वाटेल चला आता लवकर आटपा बाबांनो, म्हणजेच शिस्त त्यांच्या स्वभावात आहे आणि त्यामुळेच जी जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे ती पार पाडण्यासाठी एका दृष्टीकोनाने काम करायचे, त्यासाठी एक आराखडा तयार करायचा, कृती योजना तयार करायची, धोरण तयार करायचे आणि त्यासाठी साधनसंपत्ती जमा करून योग्य व्यक्तींची निवड करून ती यशस्वी करायची, हाच त्यांचा एक समग्र दृष्टीकोन असतो.

जेव्हा ते पहिल्यांदा मंत्री बनले तेव्हा अटलजींच्या मनात त्यांना कोणते तरी विशेष खाते द्यायची इच्छा होती. त्यांचे इंग्रजी चांगले होते, ते दक्षिणचे प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे अटलजींच्या मनात  आले की त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे. हे त्यांच्या कानावर पडले तेव्हा मी सरचिटणीस होतो, ते म्हणाले की, बाबांनो मला कशासाठी  यामध्ये अडकवता आहात, मी विचारले की काय झाले, तर म्हणाले की हे माझे काम नाही. मग मी म्हणालो की तुम्ही काय करणार आहात? ते म्हणाले की मी तर अटलजींना जाऊन सांगेन. मी म्हणालो, नक्की सांगा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी अटलजींना जाऊन सांगितले की मला अशी मोठ-मोठी खाती देऊ नका, मला ग्रामीण विकास द्या, मला त्यामध्ये माझे आयुष्य खर्ची घालायचे आहे. म्हणजेच खूप चांगली, जास्त गाजावाजा असलेली ज्यांना एक प्रकारचे महत्त्व असते, त्यातून बाहेर पडून मला ग्रामीण विकास पाहिजे. ते मुळातच स्वभावाने शेतकरी आहेत, वृत्ती आणि प्रवृत्तीने शेतकरी आहेत, शेतक-यांसाठी काही करणे, शेतक-यांसाठी काही बनणे हे त्यांच्या मनात इतके रुजलेले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अशाच प्रकारे व्यतित केले आहे आणि त्यामुळेच तर ते ग्रामीण विकासात इतकी रुची दाखवत आहेत. जसे अरुणजींनी सांगितले की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सर्वात प्रभावी कार्यक्रम आहे जो सर्व सरकारांनी चालवला आहे आणि सर्व खासदारांच्या डोक्यातही सर्वात पहिल्यांदा कोणती मागणी असेल तर ती आपल्या भागात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना पाहिजे ही. त्या सर्वांना त्याचीच तरतूद हवी असते. एक काळ असा होता की रेल्वे पाहिजे, रेल्वेचा थांबा पाहिजे. त्यातून बाहेर पडून आता प्रधानमंत्री ग्राम सडक पाहिजे ही मागणी वाढण्याचे कारण म्हणजे हे देखील खासदारांच्या मनात, त्यांच्या डोक्यात भरण्याच्या यशाचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते श्रीयुत व्यंकय्या नायडू यांना द्यावे लागेल. ज्या प्रकारे पाणी, ग्रामीण जीवनात पाणी, पेयजल याविषयी त्यांचे अतिशय वचनबद्धतेने केलेले काम आहे, त्यासाठी ते आपला वेळ, आपली शक्ती खर्च करत राहिले. आज देखील सभागृहात अशा विषयांची चर्चा जेव्हा टाळली जाते तेव्हा ते सर्वात जास्त अस्वस्थ होतात, त्यांना असे वाटते की एक वेळ परकीय देशांशी संबंधांच्या धोरणाबाबत एखादा दिवस चर्चा नाही झाली तर ते पाहता येईल. पण जेव्हा गावांचा विषय येतो, शेतक-यांचा विषय येतो, तेव्हा सभागृहात चर्चा तरी करा की काय होत आहे? म्हणजेच त्यांच्या मध्ये जी अस्वस्थता निर्माण होते, ती देशातील सामान्य माणसाच्या हितासाठी, त्यांची जी आकांक्षा आहे, त्यासाठी आहे.

वक्त्याच्या रुपात ज्यांनी त्यांना तेलुगु भाषा बोलताना ऐकले असेल तर तुम्ही त्यांच्या बोलण्याच्या गतीशी स्वतःला जुळवून घेऊच शकणार नाही. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही स्वतः एखाद्या उपनगरी गाडीत बसला आहात आणि ते अतिशय वेगवान सुपर फास्ट एक्स्प्रेस चालवत आहेत. इतके वेगाने बोलतात आणि त्यांचे विचार, त्यांचा प्रभाव कसा निर्माण होतो ते लगेच लक्षात येते आणि ते अगदी सहजपणे यमक जुळवतात हे सर्व सार्वजनिक भाषणात घडत नाही. आता ते आपल्या आजू बाजूला बसले तर त्या वेळी ते अशाच प्रकारे बोलतात. शब्दांना जुळणारे शब्द सहज सुचतात. आणि या सभागृहात याचा लाभ प्रत्येकाला मिळत आहे. त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या एका वर्षाचा हिशोब देशाला देण्याचा एका छोटासा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी या सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यामुळे हे लक्षात येते या पदाचा आणि या संस्थेचा उपयोग समाजाच्या हितासाठी कशा प्रकारे केला जाऊ शकतो, कशा प्रकारे त्यात नावीन्य आणले जाऊ शकते, कशा प्रकारे गती देता येते आणि ही संस्था स्वतः देखील देशाच्या इतर कामांच्या बरोबरीने कशा प्रकारे सहकार्य करून पुढे वाटचाल करत आहे याचा आढावा या पुस्तकामध्ये घेण्यात आला आहे. एका प्रकारे असे वाटते की हा उपराष्ट्रपतींच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा आहे. पण ज्यावेळी नीट पाहिले तर लक्षात येते की या फॅमिली अल्बममध्ये आम्ही देखील कुठे ना कुठे आहोत. कोणी खासदार दिसतात तर कोणते तरी कुलगुरू दिसतात, कोणते तरी मुख्यमंत्री दिसतात, कोणते राज्यपाल दिसतात तर त्यांच्या सोबत देखील, त्या राज्यासोबत देखील, लांब लांब असलेल्या प्रदेशातही कशा प्रकारे अतिशय दक्षतेने कामाच्या संदर्भात प्रयत्न करण्यात आले आहेत, याचे देखील दर्शन घडते. मी व्यंकय्याजींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जी त्यांच्या मनात इच्छा आहे की सभागृहाचे कामकाज खूप चांगल्या प्रकारे चालावे, सभागृहात अतिशय गांभीर्याने चर्चा व्हाव्यात, सभागृहात अशा प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख व्हावा ज्यांचा देशाला उपयोग असेल. त्यांचे हे जे स्वप्न आहे, मला ठाम विश्वास आहे की त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे स्वप्न देखील साकार होईल. व्यंकय्याजींना माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.

 

B.Gokhale/S.Patil/P.Kor



(Release ID: 1545401) Visitor Counter : 89


Read this release in: English