शिक्षण मंत्रालय
अर्जेंटिनामध्ये मेंडोझा येथे आयोजित जी-20 शिक्षणमंत्री आणि संयुक्त मंत्री बैठकीला मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांची उपस्थिती
Posted On:
07 SEP 2018 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2018
अर्जेंटिनामध्ये मेंडोझा येथे 5 आणि 6 सप्टेंबर 2018 रोजी जी-20 देशांच्या शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि संयुक्त मंत्रिस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ या बैठकांमध्ये सहभागी झाले होते. जी-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
जी-20 समुहातील देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक आयोजित केल्याबद्दल डॉ. सिंह यांनी अर्जेंटिनाचे आभार मानले आणि कौतुकही केले. कोणत्याही समाजाच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असते त्यामुळे जागतिक स्तरावर शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.
भारतातील शिक्षण व्यवस्था व्यापक असल्याचे सांगत भारतात 1.53 दशलक्ष शाळा, 864 विद्यापीठे असून त्यात 300 दशलक्ष विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, दर्जेदार शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतात शिक्षण व्यवस्थेचा आणखी विस्तार होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत नऊ देशांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत यशस्वीरित्या द्विपक्षीय चर्चा झाल्याची माहिती डॉ. सत्यपाल सिंह यांनी दिली. या दोन्ही बैठकांना सदस्य देशांच्या शिक्षण आणि श्रम तसेच रोजगार मंत्रालयांबरोबरच जागतिक बँक आणि युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहिले.
B.Gokhale/M.Pange/P.Kor
(Release ID: 1545358)
अभ्यागत कक्ष : 87