वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
2035 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल-केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
अमेरिकन उद्योगांसाठी भारत विशेष आर्थिक क्षेत्र उभारू शकतो-वाणिज्य मंत्री
जागतिक व्यापार संघटनेत सुधारणांची गरज-वाणिज्य मंत्री
प्रविष्टि तिथि:
06 SEP 2018 5:40PM by PIB Mumbai
मुंबई, 6 सप्टेंबर 2018
आजचा भारत हा वेगाने विकसित होणारा भारत असून या बदलांमुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठे बदल घडून येत आहेत, असे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. मागच्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात 8.3 टक्के वाढ झाल्याचे नमूद करत यापुढे वाढ कायम राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या 7 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल, असे सांगत 2035 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल, असे ते म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने बहु क्षेत्रीय धोरण तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. यूएस-इंडिया बिझनेस काऊन्सिलतर्फे आज मुंबईत आयोजित ‘इंडिया आयडियाज समीट’ मध्ये ते बोलत होते.

भारत आणि अमेरिका यांच्यात उत्तम संबंध असून परस्पर विकासासाठी अमेरिकेबरोबरच्या भागीदाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संवाद प्रक्रिया निरंतर होत राहिल, असे ते म्हणाले. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अमेरिकन उद्योगांसाठी भारतात विशेष आर्थिक क्षेत्र उभारता येईल, असे प्रभू यांनी सांगितले. जागतिक व्यापार संघटनेत सुधारणा आवश्यक असल्याचे सांगत भारताचे देशांशी असलेले चांगले संबंध लक्षात घेता या सुधारणा आणण्यासाठी भारत मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो, असे प्रभू यांनी सांगितले. बहुउद्देशीय संस्था उभारण्यासाठी भारत, अमेरिका आणि इतर देशांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
उद्योग करण्यातील सुलभता वाढविण्यासाठी अनेक सुधारणा हाती घेतल्याची माहिती प्रभू यांनी दिली. लवकरच नवे औद्योगिक धोरण जाहीर केले जाणार असून त्यात उद्योगांच्या आधुनिकीकरणबरोबरच अर्थ व्यवस्थेला चालना देणाऱ्या नव्या उद्योगांवरही लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारा महत्त्वपूर्ण सेवा क्षेत्रे निर्धारित केल्याचे सांगत त्यांना पद्धतशीरपणे विकसित केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातील विकासाबद्दल बोलताना 2022 सालापर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा मानस त्यांनी बोलतून दाखवला. 2017-18 या वर्षात सर्वोच्च निर्यात वाढ नोंदवण्यात आल्याचे सांगत ती गेल्या 6 वर्षातील सर्वोच्च असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
आगामी काळात ‘मेक इन इंडिया’ उपक्रम आणखी यशस्वी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बदल आणि नाविन्यतेच्या दृष्टीने स्टार्ट अप्स या उत्तम प्रयोगशाळा आहेत. डीआयपीपीच्या माध्यमातून सुमारे 20,000 स्टार्ट अप्सची नोंदणी झाली असून देशभरातील स्टार्ट अप्सना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.
GeM च्या माध्यमातून येत्या 10 वर्षात 100 अब्ज डॉलर्स पर्यंतचे व्यवहार अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त विक्रेते आणि खरेदीदारांनी GeM च्या मंचावर यावे आणि रोखरहित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी कालच नॅशनल मिशन फॉर GeM हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय उत्पादन क्षेत्र आणि जागतिक पुरवठादार साखळी यांची सांगत घालत उत्पादन क्षेत्रातील भारताची क्षमता विकसित करण्यासाठी एकात्मिक धोरण विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
‘हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ दृष्टीपथात आहे. जगाच्या नकाशावर भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र वेगाने विकसित होत आहे’ असे सांगत हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या आराखड्याबाबत त्यांनी माहिती दिली.

याप्रसंगी मंत्रीमहोदयांनी महिला स्टार्ट अप्स विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यूएसआयबीसीच्या अध्यक्ष निशा बिस्वाल, मंडळ सदस्य कार्लोस गुटेरे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
S.Tupe/M.Pange/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1545183)
आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English