पंतप्रधान कार्यालय

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांचे शिक्षक समुदायाला पत्र

Posted On: 05 SEP 2018 8:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2018

 

शिक्षक दिनानिमित्त शिक्षक समुदायाला शुभेच्छा देत आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण करत शिक्षक हे प्रेरणा देण्याबरोबरच माहिती देतात, ज्ञान देतात आणि मार्गही दाखवतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी लाखो शिक्षकांना ई-मेल पाठवला आहे. बालकांच्या जीवनावर शिक्षकांचा विलक्षण प्रभाव राहतो, असे सांगत शिक्षकांनी रुजवलेली मूल्ये आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या सोबत राहतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

‘अध्यापन हा उदात्त पेशा असून तो व्यक्तीच्या चारित्र्याला, क्षमतेला आणि भविष्याला आकार देतो’ हे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे वचन, पंतप्रधानांनी नमूद केले.

शिक्षण, संशोधन आणि नाविन्यतेला सर्वोच्च प्राधान्य देणारा समाजच 21 व्या शतकाला आकार देईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘हे लक्षात घेता, शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते, हे वेगळे सांगायला नको,’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘आपण सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अवगत असाल आणि तंत्रज्ञानाशी संबंधित बदलांशी विद्यार्थ्यांनाही अवगत करत असाल, याची मला खात्री वाटते’ असे पंतप्रधानांनी शिक्षकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेखही पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. आपल्यासारख्या शिक्षकांच्या अविरत प्रयत्नांमुळेच शिक्षणाचा रोख खर्चावरुन परिणामांकडे वळू शकला आहे, शिक्षणावरुन आकलनाकडे वळू शकला आहे. अटल टिंकरींग लॅबमुळे कौशल्य विकासावर भर दिला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणीही युवक/युवती दर्जेदार शिक्षकाच्या आनंदापासून वंचित राहू नयेत यासाठी भारतभर अनेक विद्यापीठांची स्थापना केली जात आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

2 ऑक्टोबर रोजी आपण महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करणार असल्याचे सांगत बापूंचे विचार आणि उत्तम संकल्पना नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शिक्षक समुदायाने पुढाकार घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. स्वच्छ भारत मोहिमेला बळ देण्यात शिक्षकांच्या अनन्यसाधारण भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना 2022 सालापर्यंत नवभारताचे स्वप्न साकारण्याचा पुन्हा एकदा उललेख करत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांच्या इच्छा पूर्तीसाठी पुढची 4 वर्षे संपूर्ण समर्पित वृत्तीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी शिक्षक समुदायाला केले आहे.

‘आपल्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही मुद्याकडे लक्ष केंद्रीत करा, स्थानिक समुदायांना जागृत करा आणि आपल्या सभोवताली असणाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणा. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी ही उचित आदरांजली ठरेल आणि त्याद्वारे नव भारताचे स्वप्नही साकार होईल,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor



(Release ID: 1545118) Visitor Counter : 75


Read this release in: English