पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी संवाद साधला

Posted On: 04 SEP 2018 6:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2018

 

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर सुद्धा यावेळी उपस्थित होते.

देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या कामी हे विजेते घेत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. शिक्षणाप्रती त्यांचे समर्पण आणि या समर्पणालाच त्यांनी वाहून घेतलेले जीवन, याबद्दल पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. शिक्षक हा आयुष्यभर शिक्षकच असतो, असे ते म्हणाले.

पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी समुदायांमधील संवाद वाढवावा आणि त्यांना शालेय विकासाचा अविभाज्य घटक बनवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी या संवादादरम्यान केले. विशेषत: गरीब आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आंतरीक क्षमतेला या शिक्षकांनी खतपाणी घालावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी शिक्षकांनी काम केले पाहिजे, असे केल्याने विद्यार्थी आयुष्यभर शिक्षकांचे स्मरण करतील, असे पंतप्रधान म्हणाले. आपली शाळा आणि परिसरात डिजिटलदृष्ट्या शिक्षकांनी बदल घडवून आणावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या शाळेला शिक्षण आणि उत्कृष्टतेचे केंद्र बनविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रेरणादायी कथा, पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितल्या. पुरस्कारासाठी नामांकने मागवण्याची प्रक्रिया ऑनलाईन केल्याबद्दल तसेच देशभरातील शालेय शिक्षणामध्ये दर्जेदार बदल घडवून आणणाऱ्या डिजिटल इंडियांसारख्या योजनांबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. नव्या योजनेमध्ये स्वयं नामांकनाची सोय असून महत्त्वाच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठीच्या निवड प्रक्रियेचा त्यावर प्रभाव आहे. ही योजना पारदर्शक आणि योग्य असून उत्कृष्टता तसेच कामगिरीच्या आधारे निवड करण्याच्या दृष्टीने आदर्श अशी आहे.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor



(Release ID: 1544952) Visitor Counter : 119


Read this release in: English