पंतप्रधान कार्यालय

काठमांडूमध्ये पशुपतीनाथ धर्मशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 31 AUG 2018 11:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2018

 

नेपाळचे सन्माननीय पंतप्रधान ओली जी, संस्कृती आणि पर्यटन मंत्री रविंदर प्रसाद अधिकारी जी, पशुपती क्षेत्र विकास न्यासाचे सदस्य डॉ. प्रदीप ढकलजी आणि येथे उपस्थित असलेले इतर सन्माननीय पाहुणेमंडळी, दूरवरून आलेले शिवभक्तगण आणि नेपाळच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

बाबा विश्वनाथ काशीच्या भूमीचा एक पुत्र आज पशुपतीनाथाच्या प्रांगणामध्ये जमलेल्या या सर्व लोकांना आदरपूर्वक नमस्कार करत आहे. आदरणीय ओली जी यांनी सांगितलं की, नेपाळी भाषा आणि आमची गुजराती भाषा समजण्यास अगदी सोपी आहे.

भारत आणि नेपाळ यांची मैत्री दृढ आहे. कोणत्याही दुःखद समयी जर आपले स्वजन, जवळचे लोक, आप्तेष्ट आपल्याला भेटतात, बोलतात, त्यावेळी मनाला खूप बरं वाटतं, दिलासा मिळतो. ज्यावेळी अटलजी यांचे निधन झाले, त्यावेळी अशा दुःखद प्रसंगी अगदी काही क्षणातच ओली जी यांनी मला दूरध्वनी करून माझे सांत्वन केले. ही काही फक्त औपचारिकता पाळली गेलेली नव्हती. आपलेपणाच्या भावनेचे स्वाभाविक प्रकटीकरण होते. अटलजी यांच्याविषयी आदर आणि आपुलकीची भावना होती, यामुळेच नेपाळचे विदेश मंत्री अटलजींच्या अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित राहिले होते.

आता अटलजींच्या कवितांचा नेपाळी भाषेमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय नेपाळने घेतला आहे. कोणत्याही महापुरुषाची स्मृती त्याच्या संदेशाच्या माध्यमातून आपण कशी जतन करतो, त्या महापुरुषाने जे ज्ञान आपल्याला दिले आहे ते, ज्ञान आपण पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहोचवतो, आणि ते आपण जीवनामध्ये कसे, किती उतरवतो, हे महत्वाचे आहे, असं मला वाटतं.  अटलजींच्या कविता म्हणजे, त्यांचे चिंतन होते, त्यांच्याकडे जे ज्ञान होते, त्याला कवितेचे स्वरूप त्यांनी दिले होते. तत्कालिन परिस्थितीकडे पाहण्याचा अटलजींचा दृष्टिकोन वेगळा होता. अशा वेगळ्या कविता नेपाळच्या येणा-या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या कवितांचा अनुवाद नेपाळीमध्ये करून नेपाळ त्यांना सर्वात मोठी आणि चांगली श्रद्धांजली वाहणार आहे. अशी अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ती आदरणीय ओलीजी आणि नेपाळ सरकारचे तसेच नेपाळच्या नागरिकांचे मी अगदी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो.

आपल्यामध्ये अनेक दशकांपासून सांस्कृतिक संबंध आहेत. जगामध्ये कोणत्याही देशाबरोबर जर दीर्घकाळापासून संबंध प्रस्थापित झालेले असतील, तर त्या दोन्ही देशांमधील संबंध काळानुसार अधिकाधिक बळकट होत जातात, हे तर निश्चित आहेच. परंतु जोपर्यंत थेट लोकांचा लोकांशी संबंध येत नाही, असे ऋणानुबंध तयार होत नाही, मैत्रीमधून लोकांची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत देशांच्या संबंधांना बळकटी येत नाही. केवळ काठमांडू आणि नवी दिल्लीयेथे भेटून किंवा फक्त काठमांडू आणि नवी दिल्लीचे सरकार भेटून, या दोघांमध्ये आदान-प्रदान होवून गोष्टी पुढे जात नाहीत आणि संबंधातही दृढता येत नाही. जोपर्यंत प्रत्येक नेपाळी आणि प्रत्येक हिंदुस्तानी एकमेकांना भेटत नाही, एकमेंकांशी मैत्री करत नाही, तोपर्यंत अशी संयुक्त, एकत्रित ताकद बनू शकणार नाही. आज थेट लोकांना -लोकांशी भेटण्यासाठी, या कार्याला बळकटी आणण्यासाठी एक खूप चांगले  कार्य होत आहे. नेपाळ आणि भारत यांच्या प्रगाढ मैत्रीचे एक प्रतीक ठरत असलेल्या या धर्मशाळेचे आज इथं लोकार्पण होत आहे.

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या ज्यावेळी मी काठमांडूला येतो, त्यावेळी  इथल्या लोकांचा स्नेह आणि आपलेपणा अगदी हृदयापासून अनुभवत असतो. विशेष म्हणजे नेपाळी लोकांची ही आत्मियता केवळ माझ्या एकट्यासाठी आहे, असं नाही, तर संपूर्ण  भारताविषयी सर्व नेपाळवासियांच्या नजरेमध्ये असे प्रेम, असा स्नेह आहे. जवळपास चार वर्षांपूर्वी  मला श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी पशुपतीनाथजी यांच्या चरणी येवून पूजा करण्याची संधी मिळाली होती. काही महिन्यांपूर्वीच मी आलो होतो, त्यावेळी पशुपतीनाथ, मुक्तीनाथ आणि जानकी धाम या तीनही मोठ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले. या भक्तिभावाने मी भारून गेलो होतो. आज पुन्हा एकदा पशुपतीनाथांनी दर्शन दिले आहे. आज थेट त्यांच्या दर्शनाची संधी मिळाली आहे. ही केवळ माझी भावना आहे असं नाही तर भारत आणि दुनियेतल्या कोट्यवधी आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार करणा-या, धार्मिक परंपरांचा स्वीकार करणा-या सर्वांची आहे.  प्रभुच्या भक्तीमध्ये लीन होणा-या शिवभक्तांची एक इच्छा असते की, आयुष्यात कमीत कमी एकदा तरी पशुपतीनाथांचे  दर्शन करावे. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये शिव भक्ती आणि शिव भक्तांचे संबंध इतके मजबूत आहेत की, त्यावर कोणत्याच गोष्टींचा परिणाम आत्तापर्यंत कधीच झालेला नाही. पशुपतीनाथ दूर आहे, म्हणून शिवभक्तांची भक्ती कमी झालेली नाही. दीर्धकाळ लोटला तरी हे शिवभक्तांचा हा भक्तीचा ऋणानुबंध अधिकाधिक बळकट होत आहे, त्याला लांबच्या अंतराचे बंधन वाटत नाही. इथं येण्यासाठी असलेला कठिण रस्ताही या संबंधामध्ये अडसर ठरलेला नाही. काठमांडू आणि कन्याकुमारी यांच्यामध्ये हजारों किलोमीटरचे अंतर आहे. तरीही जवळपास गेल्या दीड हजार वर्षांपूर्वीपासून तामिळनाडूमध्ये पशुपतीनाथाची गाथा गायली जात होती.

शैव कुरूवर यांच्या थेवरम्मध्ये  भगवान पशुपतीनाथ यांना खूप महत्वाचे स्थान आहे. बाबा पशुपतीनाथ यांना सुदूर दक्षिण भारतामध्ये आपल्या असंख्य भक्तांनी महत्वाचे स्थान दिले आहे. अनेक पिढ्यांपिढ्या शेकडो वर्षांपासून गणेश आणि कार्तिकेय यांच्याप्रमाणेच पशुपतीनाथाला या मंदिरामध्ये महत्वाचे स्थान आहे. आणि म्हणूनच आज माझे परममित्र प्रधानमंत्री ओलीजी यांच्याबरोबर नेपाळ- भारत मैत्री पशुपती धर्मशाळा संपूर्ण विश्वभरातल्या यात्रेकरूंसाठी, पर्यटकांसाठी, शिवभक्तांसाठी समर्पित करताना मला अमर्याद आनंद होत आहे. संपूर्ण दुनियेतून इथं येणा-या श्रद्धाळूंच्या सुविधेसाठी सव्वाशे कोटी भारतीयांच्यावतीने पशुपतीनाथजी यांच्या चरणी ही एक छोटीशी भेट देण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे.

मित्रांनो, पशुपतीनाथ, मुक्तीनाथ आणि जानकी धाम ही तीर्थक्षेत्रे नेपाळच्या विविधतेला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून बळकटी देण्याचं कार्य करीत आहेत. त्‍याबरोबरच भारताशी असलेल्या नात्याचा धाग्यालाही जोडण्‍याचे कार्य करत आहे. काशी आणि काठमांडू यांना बाबा विश्वनाथ आणि पशुपतीनाथ यांनी जोडून ठेवलं आहे. मी तर सोमनाथाच्या भूमीमध्येच जन्मलो आहे. सोमनाथ ते विश्वनाथ, विश्वनाथ ते पशुपतीनाथ या प्रकारे माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचे नाते जनकपूर ते अयोध्या ते भगवान जगन्नाथ आणि मुक्तीनाथ मस्तंग यांना पुरीशी जोडले जात आहेत. सुंदर बागमत घाटांच्या मधोमधे विराजमान झालेले भगवान पशुपतीनाथ, एका बाजुला धौलागिरी आणि अन्नपूर्णा आणि दुस-या बाजुला सागरमाथा आणि कांचनगंगा आहे. हे स्थान सर्व जगातल्या शिवभक्तांना आणि पर्यटकांना एक सुंदर आणि अद्भूत अनुभव देत आहे. काठमांडूची ही पवित्र भूमी हिंदू आणि बोध आस्थेचे एकप्रकारे संगमस्थान आहे. या दोन्ही विचारधारा एकमेकांमध्ये समाविष्ट होणारे प्रवाह आहेत. या दोन्ही विचारांचा स्वीकार करणा-या लोकांचे एकप्रकारे इथं मिलन होत आहे. काठमांडूच्या गल्लीबोळांमध्ये आणि पायवाटेने जाताना प्रत्येक यात्रेकरू भक्तीमय विचारधारेचा अनुभव करू शकतो. प्रत्येकाला अनुभवातून आस्था,श्रद्धा जाणवत असते. भगवान पशुपतीनाथाच्या या तीर्थक्षेत्राभोवती अनेकविध आस्था केंद्रे आहेत. बुद्ध भिक्षू यांच्याविषयी आत्ताच प्रदीपजी चर्चा करीत होते. ‘ओम मणि पद्मे हम’ आणि शिव भक्तांच्या मुखातून येणारा ‘ओम नमः शिवाय’ हे जप कधी एकाकार होतात कोणाच्या लक्षातही येत नाही. ही परंपरासुद्धा नेपाळ आणि भारत यांच्यातल्या प्रगाढ नात्यामधल्या शृंखलेतली महत्वपूर्ण कडी आहे. नेपाळच्या लुम्बिनीने संपूर्ण जगाला गौतम दिले तर भारताच्या बोधगयेने बुद्ध दिला आहे. अतिवाद आणि दहशतवाद यांच्यासारख्या दुनियेतल्‍या अनेक समस्या सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेला मार्ग आज प्रेरणास्त्रोत आहे.

मित्रांनो, भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये आस्था, अस्मिता आणि आपुलकी यांचा ऐतिहासिक सहयोग आहे. ही आमची अतूट शक्ती आहे. हा आमच्याजवळचा अमूल्य खजिना आहे. आत्ताच ओलीजी यांनी सांगितलं की, ‘‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’’ प्रत्येकाचे कल्याण व्हावे अशी कामना आमची आहे. केवळ आपले किंवा आपल्या लोकांनी सुखी व्‍हावे असे  नाही, तर सर्वजण सुखी व्हावेत- सर्वे भवन्तु सुखिनः! हीच या दोन्ही देशांची मूळ धारणा आहे. आणि यामुळेच मनात तयार होत असलेल्या आत्मविश्वासामुळेच या विश्वामध्ये आमचे स्थान सुनिश्चित होणार आहे. दोन्ही देशांचे भविष्य या भावनेने निश्चित होणार आहे. आज जे काही आम्ही मिळवू शकलो आहे, याची सार्थकता कधी होणार आहे, याचा विचार केल्यावर लक्षात येते की, समाजामध्ये जे लोक वंचित आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत सर्वांचा विकास झाल्यानंतर, आपल्या प्रयत्नांना सार्थकता प्राप्त होणार आहे. आज भारत आर्थिक विकासाची नवी उंची गाठत आहे. ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ या मार्गावरून जात असताना विकासाच्या आकाशामध्ये हा देश ध्रूव ता-याप्रमाणे आज चमकत आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राचा जप करीत आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. त्यामध्ये आमचे हे नेपाळी बंधू आणि भगिनी वर्गाचेही महत्वाचे स्थान आहे. ज्यावेळी आम्ही ‘सबका साथ, सबका विकास, असे म्हणतो, त्यावेळी ते केवळ आमच्या देशापुरते मर्यादित नसते. शेजारी देशांना गरजेच्यावेळी मदत करणे, त्यांच्या सुख-समृद्धीसाठी त्यांना बरोबर घेवून पुढे जाणे हा आमच्या परंपरेचा एक भाग आहे. बाबा पशुपतीनाथांच्या आशीर्वादामुळे दोन्ही देशांचा हे नातेसंबंध असेच चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहेत.

मित्रांनो, आज नेपाळमध्ये राजकीय स्थिरता आली आहे, हे पाहून प्रत्येक हिंदुस्तानीला आनंद वाटतो. याचाच परिणाम म्हणजे नेपाळ प्रगतीपथावरून अधिक वेगाने वाटचाल करू शकणार आहे. आज इथ उपस्थित असलेल्या नेपाळच्या प्रधानमंत्री महोदयांना, नेपाळच्या प्रत्येक नागरिकाला विश्वास देवू इच्छितो की, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी भारत एक विश्वासू मित्र म्हणून  सद्भावनेने निरंतर सहयोग देत राहील. भारत नेहमीच, सातत्याने आपल्या बरोबर राहील. बाबा पशुपतीनाथांचे आशीर्वाद या भूमीवर सदोदित रहावा आणि नेपाळ- भारत यांच्या मैत्रीवर  त्यांची कृपादृष्टी कायम रहावी, अशी माझी प्रार्थना आहे. आस्था, श्रद्धा , सभ्यता आणि संस्कृती यांची ही निर्विरोध गती भारत आणि नेपाळच्या कोट्यवधी जनतेचे जीवन समृद्ध करीत आहे. या भावनेबरोबरच भारत-नेपाळ मैत्री धर्मशाळा बांधण्यात आली आहे. ही धर्मशाळा म्हणजे केवळ इमारत नाही. इथं कोणी यात्रेकरू येणार आणि काही काळासाठी थांबणार देवदर्शन किंवा इतर जे काही  कार्य असेल ते आटोपून निघून जाणार, इतकंच या वास्तूमध्ये यात्रेकरूंच्या बाबतीत घडेल, असं मला वाटत नाही. कारण ही काही फक्त काही काळासाठी राहण्याची जागा नाही. तर इथं काही काळासाठी येणा-या प्रत्येक यात्रेकरूला, पर्यटकाला भारत-नेपाळ यांच्यातल्या मैत्रीचा भाव समजणार आहे. त्याच्या मनमंदिरामध्ये हे भाव सतत गुंजत राहतील, आपल्या घरी परतताना तो वाटसरूही भारत-नेपाळ यांच्यातल्या मैत्रीचा चिरंजीव भाव आपल्या मनामध्ये कायमचा ठेवून इथून जाणार आहे. ही वास्तू दोन देशातल्या मैत्रभावाची प्रतीक आहे. ही एक प्रकारची व्यवस्था असली तरी एक जीवनशक्ती देणारे प्रतीक आहे आणि त्यातूनच आपल्याला शक्ती मिळणार आहे.

ही व्यवस्था फक्त पर्यटकांसाठी, वाटसरूंसाठी, प्रवाशांसाठी फक्त एका रात्रभराच्या विश्रांतीचे स्थान आहे, इतकंच त्याचं महत्व नाही. तर या स्थानामुळे नेपाळच्या पर्यटन व्यवसायाला बळ मिळणार आहे. या धर्मशाळेच्या व्यवस्थेमुळे नेपाळमध्ये आगामी काळात प्रवाशांसाठी आणखी एक जागा निर्माण होण्याची संधी मिळाली आहे. सर्वसामान्य जनतेला, मध्यम उत्पन्न गटातला यात्रेकरूही या व्यवस्थेचा लाभ घेवू शकणार आहे. अशावेळी ही वास्तू केवळ एक इमारत रहात नाही, झोपण्याची किंवा उठण्या-बसण्याची जागा रहात नाही, तर नेपाळ पर्यटन क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या आर्थिक कारभाराच्या दृष्टीने एक नवीन ऊर्जा देणारी, नवीन ताकद देणारी, नवी शक्ती देणारी ही महत्वाची संस्था बनते. पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे की, त्यामध्ये कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता असते. आता ज्यावेळी अशी व्यवस्था सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाते, त्यावेळी पर्यटकांची येण्याची इच्छा वाढते. त्यांना अशा ठिकाणी थांबाव, मुक्काम करावा, अस वाटत. ज्यावेळी प्रवासी मुक्काम करतात, त्यावेळी काही ना काही खरेदी करतातच. आर्थिक व्‍यवहार होतातच.

नेपाळ-भारत मैत्री पशुपतीनाथ धर्मशाला, ही केवळ एक वास्तू-इमारतीच्या स्वरूपात उभी राहिलेली नाही. ही फक्त यात्रेकरूंची राहण्याची जागा  नाही. तर एक मैत्रीचा स्तंभ आहे, असा माझा विश्वास आहे. अशी ही अनोखी मैत्री आर्थिक व्यवस्थेला वेग देणारे, ऊर्जेचे केंद्र बनणार आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा मी आदरणीय प्रधानमंत्रीजी यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो. बिमस्टेकसारख्या खूप मोठ्या आणि महत्वपूर्ण शिखर परिषदेचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रमही अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडण्यात आला, यामुळे आज काठमांडूच्या या भूमीवरून संपूर्ण दुनियेला एक संदेश गेला आहे. जगातल्या 22 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणा-या बिमस्टेकची शिखर परिषद नेपाळच्या भूमीवर झाली आहे.

पशुपतीनाथ भगवानाच्या चरणांशी केलेला संकल्प सिद्धीस जाणार नाही, असं तर होवूच शकणार नाही. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की, ओलीजी यांच्या नेतृत्वाखाली काठमांडूच्या भूमीवर आणि हिमालयाच्या  कुशीतून निघालेले संकल्प या संपूर्ण भू-भागाला आणि या सर्व क्षेत्राला सुखाच्या आणि शांतीच्या दिशेने घेवून जाण्यासाठी एक खूप मोठी, निर्णायक भूमिका बजावणार आहे. हे महत्वपूर्ण कार्य आदरणीय ओलीजींनी चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे. त्यासाठीही त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. अभिनंदनाचे अधिकारी आहेत. मी त्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो. त्यांना खूप-खूप शुभेच्छा देतो. या एका कार्यक्रमासाठी त्यांनी आपला बहुमोल वेळ दिला आणि आमच्या बरोबरीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, हे माझे भाग्य मानतो. या नवीन व्यवस्थेमुळे हिंदुस्तानची जनताही खूप आनंदी होणार आहे. नेपाळच्या लोकांना तर या व्यवस्थेमुळे खूप लाभ होणार आहे. या धर्मशाळेमुळे एका नव्या आर्थिक व्यवस्थेला गती मिळण्याच्या संधी निर्माण  होतील, या एका भावनेबरोबर पुन्हा एकदा मी भगवान पशुपतीनाथांच्या चरणी आपले मस्तक झुकवून, वंदन करून आपल्या वाणीला विराम देतो.

खूप-खूप धन्यवाद!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1544942) Visitor Counter : 105


Read this release in: English