पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 02 SEP 2018 11:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2018

 

आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

‘आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 चा समारोप होत असताना या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 2018 या वर्षी भारतीय खेळाडूंनी आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाने भारताच्या सन्मानात भर घातली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये आपण ज्या क्रीडा प्रकारांमध्ये आजवर उत्तम कामगिरी करत आलो आहोत, त्यात चांगली कामगिरी केलीच. पण यापूर्वी फारसे यश न मिळालेल्या क्रीडा प्रकारांमध्येही लक्षणीय कामगिरीची नोंद केली आहे. ही अतिशय सकारात्मक बाब असून भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा शुभ शकून आहे.

या स्पर्धकांचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, पालक, कुटुंबीय आणि मित्र मंडळींना मी अभिवादन करतो. या स्पर्धकांना सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल आपले आभार. या सर्व खेळाडूंना भविष्यात उत्तम कामगिरीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा.

आशियाई क्रीडा स्पर्धेत 2018 चे स्मरणीय आयोजन केल्याबद्दल राष्ट्रपती जोको विडोडो आणि इंडोनेशियाच्या जनतेचे अभिनंदन. या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले आणि खिलाडूवृत्तीचा वारंवार प्रत्यय येत राहिला’ असे पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्विटरवरून जारी केलेल्या संदेशांमध्ये म्हटले आहे.

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor

 



(Release ID: 1544852) Visitor Counter : 96


Read this release in: English