पंतप्रधान कार्यालय

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन-आर्थिक समावेशातील नवा टप्पा

Posted On: 01 SEP 2018 7:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये उद्‌घाटन केले. तसेच देशभरात 3000 ठिकाणी बँकेच्या विविध शाखांचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतील.

त्यांनी यावेळी सरकारने या अगोदर लागू केलेल्या जनधन योजनेला उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की, भारतीय पोस्ट पेमेंट बँक या क्षेत्रातील पुढचे पाऊल आहे. आयपीपीबीच्या शाखा आज देशभरात 650 जिल्ह्यांमध्ये उघडण्यात आल्या.

पंतप्रधान म्हणाले की, पोस्टमन ही भारतीयांसाठी नेहमी आदराची व्यक्ती राहिली आहे आणि ग्रामीण नागरिकांचा त्याच्यावर दृढ विश्वास राहिलेला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतरही पोस्टमनवरील विश्वास कायम राहिलेला आहे. चालू असलेल्या संस्था आणि संरचनामध्ये काळानुसार बदल करणे हा या सरकारचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. देशात आज 1.5 लाख टपाल कार्यालये आणि तीन लाखांच्यावर ग्रामीण डाक सेवक आहेत. जे या देशातल्या नागरिकांशी जोडले गेलेले आहेत. या ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट फोन आणि डिजिटल साधने देऊन त्यांना वित्तीय सेवा पुरवणारे सहाय्यक बनवले जाईल.

आयपीपीबीचे फायदे सांगतांना ते पुढे म्हणाले की, यामुळे पैशांचे हस्तांतरण, सरकारी मदतीचे हस्तांतरण, देयके भरणे आणि गुंतवणूक तसेच विमा सेवा या सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पोस्टमन या सेवा लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवतील. आयपीपीबीमुळे डिजिटल व्यवहारही सोपे होतील आणि प्रधानमंत्री पिक विमा योजना यांसारख्या योजनांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 2014 पासून हे सरकार वित्तीय क्षेत्रात बेजबाबदार कर्ज वितरणामुळे उद्‌भवलेल्या विविध समस्यांचा आणि अडचणींचा कठोरपणे सामना करत आहे. या सर्व कर्जांचा पुनर्विचार करण्यात येत आहे आणि बँकिंग क्षेत्राला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तज्‍ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक यांसारख्या अवलंबल्या जात असलेल्या इतर पर्यायांचाही त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 13 लाख कोटी रुपयांची मुद्रा कर्जे गरीब आणि मध्यमवर्गीयांना वितरीत करण्यात आली आहेत. यातून स्वयंरोजगाराला चालना मिळेल. आशियाई स्पर्धेमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनानेही उल्लेखनीय वाढ पाहिली आहे. आज भारत केवळ सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाच नाही तर वेगाने गरीबी निर्मूलन करणारा देश बनला आहे.

3 लाख डाक सेवक देशाच्या कानाकोपऱ्यात वित्तीय सेवा पुरवणारे मुख्य तारक बनतील. डाक सेवकांच्या अडचणी दूर करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठीही विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यांच्या पगारात भरीव वाढ झालेली आहे. शेवटी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, पुढच्या काही महिन्यातच भारतीय पोस्ट पेमेंट बँक 1.5 लाख टपाल कार्यालयांपर्यंत पोहोचेल.

 

B.Gokhale/M.Chopade/P.Kor

 


(Release ID: 1544746) Visitor Counter : 304


Read this release in: English