पंतप्रधान कार्यालय

नेपाळमधल्या काठमांडू येथे ‘बिमस्टेक’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 30 AUG 2018 8:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2018

 

सन्माननीय महोदय,

पंतप्रधान ओली जी,

बिमस्टेकसदस्य देशांमधून आलेले माझे सहकारी नेते, सर्वात प्रथम या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या यजमानपदाबद्दल आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी नेपाळ सरकारचे आणि पंतप्रधान ओली जी यांचे अगदी ह़ृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. वास्तविक माझ्यासाठी ही पहिलीच बिमस्टेक शिखर परिषद आहे. परंतु 2016 मध्ये मला गोव्यामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेबरोबर बिमस्टेक रिट्रीटचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. गोवा इथं आपण कृती कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार आमच्या सर्व समुहांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.

यामध्ये पुढील गोष्टींचा सहभाग आहे:

पहिल्या वार्षिक बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन कवायतीचे आयोजन.

राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची दोनवेळा भेट घेण्यात आली.

बिमस्टेक व्यापार सुविधा-सोयी कराराविषयी चर्चा प्रगतिपथावर आहे.

बिमस्टेक ग्रिड इंटर-कनेक्शनया विषयावर सामंजस्य करार.

या सर्व कामांसाठी सर्व देशांच्या प्रतिनिधीमंडळांचे मी अभिनंदन करतो.

सन्माननीय महोदय,

आपण सगळे देश अनेक दशकांपासून विशिष्ट सभ्यता, इतिहास, कला, भाषा त्याचबरोबर आपल्या संस्कृतीच्या अतूट धाग्यामुळे अगदी चांगले घट्टपणे बांधले गेलेले आहोत. या भौगोलिक क्षेत्रामध्ये एका बाजूला महान हिमालय पर्वताची शृंखला आहे. तर दुसऱ्‍या बाजूला हिंद आणि प्रशांत महासागरांच्या मधल्या बाजूला बंगालची खाडी आहे. बंगालच्या खाडीचे हे क्षेत्र आपल्या सर्वांसाठी विकास, सुरक्षा आणि प्रगती यांचा विचार करता विशेष महत्वाचे आहे. आणि म्हणूनच भारताने ‘‘नेबरहुड फर्स्‍ट ’’ आणि ‘‘अॅक्ट ईस्ट’’ अशा दोन्ही धोरणांना खूप महत्व दिले आहे, याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. या दोन्ही धोरणांचा संगम या बंगालच्या खाडी क्षेत्रामुळे होत आहे.

 

महोदय,

आपण सर्व विकसनशील देश आहोत. आपआपल्या देशांमध्ये शांती, समुद्धी आणि आनंदी वातावरण निर्माण करण्याच्या कामाला आपण सर्वाधिक प्राधान्य देत आहोत. परंतु आजच्या या इंटर कनेक्टेडविश्वामध्ये हे काम कोणीही एकटा देश करू शकणार नाही. आपल्याला सर्वांना एकमेकांच्या साथीने, सहकार्याने, एकमेकांना आधार देत पुढे वाटचाल करायची आहे. एकमेकांच्या प्रयत्नांना पूरक कार्य आपणच करायचे आहे. यामध्ये मला असं वाटतं की, सर्वात मोठी संधी संपर्क यंत्रणेची आहे. यामध्ये व्यापारासाठी संपर्क यंत्रणा, आर्थिक संपर्क व्यवस्था, वाहतूक संपर्क यंत्रणा, ‘डिजिटल कनेक्टिविटीआणि त्याचबरोबर लोकांमध्ये म्हणजेच, माणसांशी थेट माणसांचा संपर्क, अशा सर्व प्रकारच्या संपर्क व्यवस्थेवर आपल्याला कार्य केले पाहिजे. बिमस्टेकमध्ये सागरी जहाजांसंदर्भात आणि मोटार वाहन यांच्या संदर्भात सामंजस्य अधिक सुदृढ करण्यासाठी आपण नजिकच्या भविष्यात कार्य करणार आहोत, त्यासाठीच्या परिषदेचे यजमानपद आम्ही भूषवू शकतो. आमच्या उद्योजकांबरोबर संपर्क यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी भारत बिमस्टेक स्टार्ट अप कॉनक्लेव्हचे यजमानपद भूषवण्यास तयार आहे. आपल्यापैकी बहुतांश देश हे कृषीप्रधान आहेत. त्याचबरोबर हवामान बदलाच्या आव्हानाचे संकट आपल्या सर्व देशांसमोर आहे. या संदर्भामध्ये कृषी संशोधन, शिक्षण, आणि विकास कार्यक्रमांबाबत भारत सहकार्य करण्यास सिद्ध आहे. यासाठी भारत हवामान आणि स्मार्ट शेती पद्धत अर्थात क्लायमेट स्मार्ट फार्मिंग सिस्टिमया विषयावर एक आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करणार आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रामध्ये भारत आपल्या नॅशनल नाॅलेज नेटवर्कचा श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि नेपाळमध्ये विस्तार करण्यासाठी पहिल्यापासूनच कटिबद्ध आहे. आता यामध्ये म्यानमार आणि थायलंड या देशांमध्येही हा विस्तार करण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भारतात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत असलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सर्व बिमस्टेक देश सहभागी होतील अशी मी आशा करतो. या काँग्रेसमध्ये बिमस्टेक मंत्रिस्तरीय परिषदही आयोजित करण्यात येणार आहे. बिमस्टेक सदस्य देशांबरोबर संपर्क यंत्रणा अधिक मजबूत करण्यामागे भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्राच्या विकासासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन्स इन द नॉर्थ इस्टर्न रिजनहा महत्वाचा कार्यक्रम आहे. आम्ही या कार्यक्रमाचा बिमस्टेक सदस्य देशांसाठी विस्तार करण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत. या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रांमध्ये ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, कृषी, आणि कपॅसिटी बिल्डिंग यांना प्रोत्साहन दिले जावू शकते. त्याचबरोबर भारताच्या नॉर्थ इस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये बिमस्टेक सदस्य देशांचे संशोधक, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यासाठी आम्ही चोवीस शिष्यवृत्तीही देणार आहोत.

 

सन्माननीय महोदय,

या क्षेत्रातल्या लोकांमध्ये गेली अनेक शतकांपासून असलेल्या संबंधांमुळे हे नात्याचा पाया अगदी मजबूत झाला आहे. या ऋणानुबंधाच्या साखळीमध्ये एक विशेष कडी आहे ती म्हणजे बौद्ध धर्म आणि चिंतन, विचार.  ऑगस्ट 2020मध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे  यजमानपद भारत भूषवणार आहे. बिमस्टेक सदस्य देशांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी मी आपल्या सर्वांना निमंत्रित करतो. आपल्या युवा पिढीमध्ये चांगला संपर्क निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून युवक परिषद आणि बिमस्टेक बँड फेस्टिवलच्या आयोजनाचा प्रस्ताव भारत ठेवू इच्छितो. याबरोबरच आम्ही बिमस्टेक युवा जल क्रीडांचे आयोजनही आपण करू शकतो. बिमस्टेक देशांमधल्या युवा विद्यार्थ्यांसाठी नालंदा विद्यापीठामध्ये तीस शिष्यवृत्ती आणि जिपमर इंस्टिट्यूटमध्ये आधुनिक औषधांसाठी बारा संशोधन शिष्यवृत्तीही देण्यात येतील. त्याचबरोबर  भारताच्या आयटेक कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, नवनीकरणीय ऊर्जा, कृषी व्यापार, आणि डब्ल्यू.टी.ओ. यासारख्या विषयांमध्ये शंभर अल्प कालावधीचे प्रशिक्षण अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. बंगालच्या खाडीमधल्या क्षेत्रात कला, संस्कृती, सागरी कायदे आणि इतर विषयांच्या संशोधनासाठी आम्ही नालंदा विद्यापीठामध्ये एक सेंटर फॉर बे ऑफ बेंगाल स्टडीजची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये आपण सर्व देशांच्या  भाषांच्या माध्यमातून एकमेकांशी ज्याप्रमाणे जोडले गेलो आहोत, त्यांच्याविषयीही संशोधन करता येवू शकणार आहे. आपल्या सर्व देशांचा असा एक खूप मोठा, प्राचीन काळापासूनच इतिहास आहे. या इतिहासाशी संबंधित पर्यटन क्षेत्राचा आपण खूप चांगला लाभ घेवू शकतो. आपल्या देशातल्या ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकांचे जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही आपल्याला सहयोग करू शकतो.

 

सन्माननीय महोदय,

क्षेत्रीय एकात्मिकता तसेच आर्थिक प्रगती आणि समृद्धी यांच्यासाठी आपल्या संयुक्त प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी आपल्या क्षेत्रामध्ये शांतता आणि सुरक्षेचे वातावरण  असणे, सर्वात आवश्यक आहे.  हिमालय आणि बंगालच्या खाडीला जोडलेल्या आपल्या देशांना वारंवार नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. काहीवेळा महापुराचे संकट येते तर कधी चक्रीवादळाचा फटका बसतो, कधी भूकंपाचे संकट येते. या संदर्भामध्ये आपण एकमेकांच्या बरोबर असणे फार गरजेचे आहे. मानवतेच्या भूमिकेतून मदत देण्याची आणि आपत्ती काळात सर्वतोपरी मदतीसाठी आपल्यामध्ये सहकार्य आणि समन्वयाची अतिशय आवश्यकता आहे. आपल्या क्षेत्राची भौगोलिक स्थिती वैश्विक सामुद्रिक व्यापारी मार्गाशी जोडणारी आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वाची अर्थव्यवस्थेमध्येही नील अर्थव्यवस्थेला विशेष महत्व आहे. याबरोबरच आगामी भविष्यामध्ये डिजिटल युगात आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सायबर अर्थव्यवस्था अधिकाधिक महत्वपूर्ण ठरणार आहे. या नव्या अर्थव्यवस्थांचे महत्व भविष्यात खूप वाढणार आहे. त्यामुळेच आपल्या क्षेत्रीय सुरक्षा सहकार्यामध्ये या सर्व विषयांचा विचार करून सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने आपल्याला ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी पुढच्या महिन्यामध्ये भारतात आयोजित होत असलेल्या बिमस्टेक मल्टिनॅशनल मिलिटरी फील्ड ट्रेनिंग एक्सरसाईजआणि स्थल सेना प्रमुखांच्या परिषदेचे मी स्वागत करतो. भारत बिमस्टेक देशांची एक ट्राय सर्व्हिसेस ह्युमॅनिटरीयन असिस्टंट अँड डिझास्टर रिलीफ एक्सरसाईजचेसुध्दा  यजमानपद  भूषवणार आहे. दुसऱ्‍या वार्षिक बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन कवायतीच्या यजमानपदासाठीही भारत तयार आहे. आम्ही आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्यरत अधिकारी वर्गासाठी क्षमता निर्मितीसाठीही सहकार्य करण्यास सिद्ध आहोत. भारत नील क्रांतीसाठी सर्व बिमस्टेक देशांच्या युवकांचे एक हॅकथॉन आयोजित करणार आहे. यामध्ये नील क्रांती क्षेत्रातल्या संधी आणि सहयोग यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

 

सन्माननीय महोदय,

दहशतवाद आणि दहशतवादाचे जाळे यांच्याशी संबंधित असलेल्या ट्रान्स नॅशनलगुन्हे, अपराध त्याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी या सारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागला नाही, असा एकही देश आपल्यामध्ये नाही.सर्वच देशांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी बंदीसाठी, या प्रश्नावर उपाय योजण्यासाठी आम्ही बिमस्टेकच्या चौकटीमध्ये एका परिषदेचे आयोजन करण्यास तयार आहोत. ही समस्या आता केवळ कोणा एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. तसेच एका देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही समस्या नाही. या प्रश्नाचा सामना करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी आपल्याला एकजूट होण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी आपल्याला योग्य प्रकारे कायदे तसेच नियमांची चैकट तयार केली पाहिजे. या संदर्भामध्ये आपली कायदा तयार करणारी मंडळी, विशेष करून महिला संसद सदस्य एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे संपर्क प्रस्थापित करून मदत करू शकतील. यासाठी बिमस्टेक वूमन पार्लमेंटरियन फोरम स्थापन करण्यात यावा, असा माझा प्रस्ताव आहे.

 

सन्माननीय महोदय,

गेल्या दोन दशकांमध्ये बिमस्टेकने उल्लेखनीय प्रगती केली आहे. परंतु अजूनही आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपल्या आर्थिक एकात्मिकतेला अधिक सखोलता प्राप्त करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या लोकांना आपल्याविषयी अनेक आशा- आकांक्षा आहेत. आता हे चौथे संमेलन होत आहे. जनसामान्यांच्या अपेक्षा, आशा आणि अभिलाषा पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. या चौथ्या शिखर परिषदेतल्या घोषणापत्रामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा समावेश करण्यात  आला आहे. यामुळे बिमस्टेक संघटना आणि प्रक्रियेला चांगले बळ मिळू शकणार आहे. त्याचबरोबर बिमस्टेकच्या प्रक्रियेला ठोस स्वरूप आणि सबलता मिळून ही शिखर परिषद यशस्वी होवून एक मैलाचा दगड सिद्ध होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाबद्दल यजमान देश, नेपाळ सरकार, ओली जी, आणि सर्व सहभागीदार राष्ट्रांचे नेते, यांचे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. यापुढची वाटचाल करण्यासाठीही, भारत आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून कटिबद्ध आहे. 

धन्यवाद.

खूप-खूप धन्यवाद!!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1544729) Visitor Counter : 111


Read this release in: English