दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेचे येत्या 1 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 30 AUG 2018 7:36PM by PIB Mumbai

मुंबई, 30 ऑगस्ट 2018

 

आर्थिक समावेशकतेचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट लक्षात घेऊन भारतीय टपाल विभागाच्या वतीने देशभरात इंडिया पोस्ट पेमेंट्स् बँकेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या 1 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या देशभरातील 650 शाखा आणि 3250 सेवा केंद्रांचे राष्ट्रीय स्तरावर उद्‌घाटन करण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सुविधा पोहचवण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँक सुरु करण्यात येणार आहे.

 

 

महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा समावेश असलेल्या महाराष्ट्र सर्कलमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात आयपीपीबीच्या 42 शाखांचे उद्‌घाटन यावेळी केले जाणार आहे. मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते अंधेरी आयपीपीबी शाखेचे राजभवन येथून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गिरगाव शाखेचे मुंबई जीपीओ येथून उद्‌घाटन केले जाणार आहे. भारतीय टपाल विभागाच्या वतीने मुंबईत जीपीओ येथे इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेच्या उद्‌घाटनसंदर्भातील माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच.सी. अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

आत्तापर्यंत बँकेशी न जोडल्या गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक निर्माण करणे हे या बँकेचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.

 

बचत खाते, चालू खाते, पैसे पाठवणे आणि हस्तांतरित करणे, सरकारद्वारा अनुदानित योजनांद्वारा मिळणारे लाभ, सर्व प्रकारची देयके आणि उपयोगिता देयके, उद्यम आणि व्यापारी देयके अशा अनेक प्रकारच्या सेवा आणि उत्पादनांची विस्तृत श्रेणी इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेद्वारे उपलब्ध होणार आहे.  या सर्व सेवा आणि उत्पादने बँकेच्या उत्तम दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या विविध माध्यमाद्वारे (काऊंटर सेवा, मायक्रो एटीएम, मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन, एस.एम.एस आणि आय.व्ही.आर) प्रदान केल्या जातील.

याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेने कर्ज देण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि विमा उतरविण्यासाठी विविध आर्थिक संस्थांबरोबर भागीदारी केली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेच्या सहाय्याने बँकिंग आणि देयके भरणे सोपे होईल. आधार कार्ड आणि पॅनकार्डचा उपयोग करुन अगदी काही मिनिटातच कोणत्याही कागदपत्रांशिवाय हे खाते उघडले जाऊ शकेल आणि ग्राहकांना क्यु आर कार्ड आणि बायोमेट्रीक प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे असे अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. पोस्टमन हा इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेच्या नेटवर्कचा सर्वत्र पोहोचू शकणारा दूत आहे. टपाल खाते हे विश्वासार्हतेकरीता प्रसिद्ध आहे. या खात्याबरोबर भागीदारी करुन इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँक देखील विश्वासार्ह व्यवहार करुन एक वेगळी ओळख निर्माण करेल.

 

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, शहरामध्ये स्थलांतरित व्यक्ती, शेतकरी, शासनाच्या योजनांचे लाभार्थी, ग्रामीण कार्यकर्ते, किराणामाल दुकानदार आणि लघुउद्योजक तसेच 10 वर्षाखालील मुलंही बँकेचे ग्राहक असतील.

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेमधून मिळणाऱ्या घरपोच सेवेमुळे ग्राहकांना आता बँकेच्या व्यवहारांसाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही.

भारतीय टपाल विभागाच्या विस्तृत जाळ्याचा उपयोग करुन देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग व्यवस्था पोहोचविण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँक ही डिजिटल बँक म्हणून उभारली गेली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँक ही कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल स्वीकृती यंत्रणा तयार करण्यावर देखील लक्ष केंद्रित करेल, असे अग्रवाल यावेळी म्हणाले.

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेने भारतीय टपाल खात्याबरोबर एकीकृत मॉडेल तयार केले आहे ज्या अंतर्गत पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक खातेधारक इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँक द्वारा अकाउंट लिंक करुन इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेच्या अतिरिक्त सेवांचा लाभ घेऊ शकतील.

टपाल विभागाच्या सर्व खातेदारांना इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँक विविध बँकिंग सेवा प्रदान करेल आणि त्याबदल्यात एखाद्या दिवशी खातेदारांची एक लाखाच्या वर शिल्लक उरत असेल तर एक लाखावरील रक्कम पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज खात्यामध्ये पाठवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

31 डिसेंबर 2018 पर्यंत देशामध्ये सर्व 1.55 लाख सेवा केंद्रांचा समावेश करण्यात येणार आहे.

 

 

S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1544582) Visitor Counter : 136


Read this release in: English