दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेच्या माध्यमातून टपाल कार्यालयांची विश्वासार्हता आणि दुर्गम भागात विस्तारलेले जाळे यातून जनतेपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवली जाईल-मनोज सिन्हा
Posted On:
29 AUG 2018 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2018
इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक देशाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडवणारी ठरेल, असे मत केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी व्यक्त केले. आयपीपीबीचे उद्घाटन 1 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होईल, असे ते म्हणाले. या योजनेची माहिती देण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून पोस्टमन देशाच्या कानाकोपऱ्यात टपाल सेवा पोहोचवत आहेत. सरकारचा हा विश्वसनीय प्रतिनिधी आता बँकिंग क्षेत्रापासून दूर असणाऱ्या लाखो गोरगरीब लोकांसाठी बँकर म्हणून वित्तीय सेवा देणार आहे. या सेवेमुळे देशभरात बँकेच्या शाखा दुपटीने वाढतील. सध्या 1.40 लाख असलेल्या बँक शाखांची संख्या 2.90 लाखांपर्यंत वाढेल. तसेच ग्रामीण बँकांची संख्याही 49 हजाराहून 1 लाख 75 हजारांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.
आयपीपीबी मार्फत सहज उपलब्ध असणारी, सर्वांना परवडणारी आणि विश्वासार्ह बँक जनतेसाठी उपलब्ध करून देत वित्तीय समावेशन साधले जाईल. आज देशभरात टपाल खात्याचे जाळे सर्वदूर पसरले आहे. देशात 3 लाखांहून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक कार्यरत आहेत. या मनुष्यबळामुळे बँकिंग सेवा सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनाच्या दिवशी आयपीपीबीच्या देशभरात 650 शाखा आणि 3,250 केंद्र उघडले जातील. यात बँकिंग सेवेसह बिले भरण्याची सुविधाही असेल, असेही सिन्हा म्हणाले.
N.Sapre/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1544368)
अभ्यागत कक्ष : 126