अंतराळ विभाग

पंतप्रधानांच्या घोषणेनुसार 2022 साली इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर­­ अवकाशात पाठवणार-डॉ. जितेंद्र सिंह

10 हजार कोटी रुपयांचे अवकाश अभियान भारतीय अवकाश विज्ञानाला कलाटणी देणारे ठरेल-इस्रो अध्यक्ष

Posted On: 28 AUG 2018 5:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  28 ऑगस्ट 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात घोषणा केल्याप्रमाणे भारतीय अंतराळवीराला घेऊन पहिले अवकाश यान इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था येत्या 2022 पर्यंत अवकाशात पाठवेल, अशी माहिती अणुऊर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. नवी दिल्लीत आज डॉ. जितेंद्र सिंह आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी संयुक्त परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. दिलेल्या मुदतीत हे अभियान पूर्ण करण्याची क्षमता इस्रोमध्ये असून या 10 हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी अभियानामुळे भारताच्या आजवरच्या अवकाश प्रवासाला मोठी कलाटणी मिळेल, अशी अपेक्षा सिवन यांनी यावेळी व्यक्त केली. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी मानवयान अवकाशात पाठवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात गगनयान या भारताच्या पहिल्या मानवयुक्त अवकाश यान कार्यक्रमाची घोषणा केली होती. 2022 पर्यंत किंवा त्याआधी भारताचा सुपूत्र अथवा सुपुत्री भारतीय यानातून अंतराळात जाईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

या अभियानासाठी इस्रोने आपले तंत्रज्ञान अद्ययावत केले आहे. या आधुनिकीकरणामुळे हे अभियान केवळ चार वर्षात पूर्ण करणे शक्य होईल. जीएसएलव्ही एमके-3 या लाँच व्हेईकलमधून हे यान अवकाशात सोडले जाईल. या अभियानाआधी 2 मानवरहित यान अवकाशात सोडले जातील. या अभियानाअंतर्गत 3 अंतराळवीरांना 5 ते 7 दिवसांसाठी अवकाशात पाठवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या अभियानासाठी 10 हजार कोटींपेक्षा कमी खर्च अपेक्षित आहे.

हे यान आणि संपूर्ण अभियान देशी तंत्रज्ञान वापरून केले जाईल, असेही जितेंद्र सिंग यांनी सांगितले. याआधी भारतीय अंतराळवीर परदेशातल्या अभियानातून अवकाशात गेले होते. या अभियानामुळे कृषी, रेल्वे, मनुष्यबळ विकास, रस्ते, वाहतूक व्यवस्था अशा विविध क्षेत्रात अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मदत होईल. डॉ. सिवन यांनी यावेळी गगनयान अभियानाची सविस्तर माहिती दिली.

इस्रोचे आणखी एक महत्त्वाकांक्षी अभियान म्हणजे चांद्रयान-2 जानेवारी 2019 मध्ये अवकाशात पाठवले जाईल, असेही सिवन यांनी सांगितले. याशिवाय मार्च 2019 पर्यंत इस्रो 19 अभियान पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 


(Release ID: 1544162) Visitor Counter : 142


Read this release in: English