Posted On:
27 AUG 2018 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2018
2025 पर्यंत भारताची निर्यात दुपटीने वाढवण्याचा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने धोरण ठरवण्यासाठी केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी निर्यात उद्योगांशी संबंधित विविध घटकांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली.
जागतिक व्यापारातली अनिश्चितता, बँकांच्या धोरणांमुळे कर्ज मिळण्यात अडचणी, लॉजिस्टीक खर्चात झालेली वाढ, उत्पादनांचा दर्जा या सर्व मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. भारताची निर्यात वाढल्यास रोजगार निर्मिती होईल. परदेशी चलन देशात येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत भारताचे महत्त्वाचे स्थान निर्माण होईल. त्यामुळे निर्यात दुप्पट करण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासाठी एक समिती नेमण्यात आली असून केंद्रीय उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती निर्यात प्रोत्साहन परिषद आणि वाणिज्य मंत्रालयाच्या विविध विभागांच्या कामांवर देखरेख ठेवेल.
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी 12 निवडक क्षेत्रांच्या निर्यातीवर भर देण्याचा वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे. त्याशिवाय सेवा क्षेत्रासाठी विशेष धोरण बनवले जावे यावर प्रभू यांनी या बैठकीत भर दिला.
N.Sapre/R.Aghor/P.Kor