पंतप्रधान कार्यालय
रवांडा येथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2018 11:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2018
नमस्ते, कसे आहात?
आताच आपले उच्चायुक्त म्हणाले की पंतप्रधानांनी तुमच्यासाठी वेळ काढला आहे. खरे हे आहे की तुम्ही लोकांनी माझ्यासाठी वेळ काढला कारण ही काही जागं राहायची वेळ नाही. कारण ही वेळ तुमची जेवल्यानंतर झोपण्याच्या तयारीची आहे. मात्र तुम्ही लोक माझ्यासाठी जागे आहात, आणि एवढ्या रात्री उशिरा इथे आला आहात आणि एवढेच नाही तर शेजारच्या देशांतून देखील आलेले आहात. म्हणूनच तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी मी तुमचा खूप-खूप आभारी आहे.
जेव्हा आपण स्टेडिअममध्ये क्रिकेटचा सामना पाहत असतो, तेव्हा बॉल कुठे गेला हे आपल्याला माहित नसते, मात्र दूर घरात बसून जेव्हा आपण टीव्हीवर सामना पाहत असतो, तेव्हा आपल्याला सर्व गोष्टी माहित असतात, बॉल कुठे आहे, गोलंदाज कुठे आहे, फलंदाज कुठे उभा आहे, त्याचा पाय कुठे आहे, सगळे माहित असते.
म्हणूनच भारतात राहणाऱ्या लोकांपेक्षा भारताबाहेर राहणाऱ्या लोकांना अधिक माहिती असते की भारतात आम्ही काय काय कामे करतो. त्यांना प्रत्येक बारीक गोष्ट माहित असते. आणि हे स्वाभाविक आहे की जगात कुठेही भारतीय राहत असो, भारतातून येणारी प्रत्येक सुवार्ता त्याला आनंद आणि नवा उत्साह देत असते.
गेल्या चार वर्षातील तुमचा अनुभव कसा आहे? त्यात काही सुधारणा आहे कि पूर्वीसारखाच आहे? भारताच्या पासपोर्टबद्दल आदर वाढला आहे असे तुम्हाला वाटते का? जगात जेव्हा कुठल्याही विमानतळावर तुम्ही उतरता,तिथल्या इमिग्रेशन काउंटरवर जाता आणि जेव्हा तुम्ही म्हणता 'मी भारतीय आहे' , तेव्हा लगेच ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर भिडवत आनंद व्यक्त करते कि नाही? यापूर्वी जेव्हा तुम्ही हस्तांदोलन करायचात तेव्हा त्यांच्यासाठी ते 'ओके ' होते, मात्र आता हस्तांदोलन करता, तेव्हा ते हात सोडत नाहीत. बदल झाला आहे कि नाही? हा बदल यामुळे झाला कारण देश बदलला आहे आणि देश वेगाने प्रगती करत आहे.
हे मोदींमुळे नाही तर सव्वाशे कोटी भारतीयांमुळे शक्य झाले आहे. जर एखाद्या खेळाडूने जगात कुठेही सुवर्णपदक जिंकले असेल तर त्यासाठी मोदींनी घाम गाळलेला नाही. मात्र हे शक्य झाले कारण सरकार स्थापन केल्यानंतर मोदींनी निवड प्रक्रिया इतकी पारदर्शक केली की योग्य व्यक्तीला योग्य संधी मिळते आणि त्यामुळे तो सुवर्णपदक जिंकू शकतो.
पारदर्शक पद्धतीने जर लोकांना त्यांच्या हक्काचे मिळाले तर ते कमाल करून दाखवतात. आणि सरकारचे हेच तर काम आहे. आणि आमचा मंत्र आहे- ' सबका साथ -सबका विकास' आणि हा 'सबका साथ सबका विकास' मंत्र खूप शक्तिशाली आहे. आणि या मंत्रानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला वाटते की देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याची वेळ आली आहे आणि देशाला पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे.
यापूर्वी लोकांना माहित नव्हते का की शौचालये आवश्यक आहेत? यासाठी मोदी सत्तेत येण्याची गरज होती का? घरात शौचालय असावे यासाठी अमुक व्यक्ती पंतप्रधान बनण्याची लोक प्रतीक्षा करत होते का? मात्र, हे असेच असते, हे असेच चालते आणि कुणालाही त्याची पर्वा नसते. इतक्या कमी कालावधीत भारतात आठ कोटी शौचालये बांधण्यात आली आणि लाखो गावे हागणदारीमुक्त झाली.
एकदा का आम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली कि आमची काम करायची शैली अशीच असते. नाहीतरी भारतात समस्यांची कमतरता नाही. समस्या आहेत आणि त्या बऱ्याच काळापासून आहेत. मात्र आपण केवळ समस्या मोजत राहणार की जेवढा वेळ उपलब्ध आहे त्या वेळेत या समस्यापासून देशाला मुक्त करणार. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली, तरी देशातील १८ हजार गावे अजूनही १८ व्या शतकातच राहत आहेत. या गावांमध्ये वीज नव्हती. आम्ही ठरवले की आम्ही एक हजार दिवसात वीज पोहचवू आणि आणि आम्ही ते केले. आता देखील देशात ४ कोटी घरे अशी आहेत जिथे वीज नाही. आम्ही यावर विचार केला आहे, एक मुदत निश्चित केली आहे आणि आम्ही वर्षभरात त्यांना वीजपुरवठा करू. त्यामुळे आम्हाला ते करावे लागेल आणि ते करेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
समस्या सोडवल्यामुळे विश्वास निर्माण होतो. प्रत्येकाला वाटते की हे होऊ शकते, हे आपण करू शकतो. जेव्हा एखादा भारतीय नागरिक जगात कुठेही हे ऐकतो की भारताने एकाच वेळी १०० उपग्रह प्रक्षेपित केले तेव्हा त्याला किती अभिमान वाटतो. एकाच वेळी १०० उपग्रह. आज भारत अशा प्रकारची कामगिरी करत आहे,.
भारताने आपले सामर्थ्य दाखवले आहे. आज भारत इतकी प्रगती करत आहे की इथल्या नागरिकांपेक्षा मोबाइल्सची संख्या अधिक आहे. भारत आधुनिकीकरणाकडे जात आहे. जेव्हा आम्ही सरकार स्थापन केले तेव्हा आपण अर्थव्यवस्थेच्या आकारमानात जगात ९ व्या किंवा १० व्या स्थानावर होतो. आणि आज आपण सहाव्या स्थानावर पोहोचलो आहोत. आणि प्रथमच आपण फ्रान्सला मागे टाकून पुढे गेलो आहोत. आणि लवकरच आपण पाचव्या, चौथ्या आणि तिसऱ्या स्थानावर असू.
आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी कुठल्या देशाची अर्थव्यवस्था असेल तर त्या देशाचे नाव आहे भारत. देश जलद गतीने प्रगती करत आहे, विकासाची नवी शिखरे सर करत आहे.
तुम्हा लोकांना भारताला भेट द्यावीशी वाटते की नाही? दर दोन महिन्यांनी ! वाह! आता बघा, २०१९ मध्ये अनेक निमित्ते आहेत. मला समजले, मी जेव्हा म्हटले २०१९ मध्ये अनेक निमित्ते आहेत तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते. मात्र मला तर वेगळेच काही सांगायचे होते.
2019च्या जानेवारी महिन्यात, 22-23 जानेवारी रोजी काशी इथे आपला आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतीय दिवसाचा कार्यक्रम आहे. जगभरात जेवढे भारतीय आहेत, ते दोन वर्षांनी एकत्र जमतात, यावर्षी काशीत आहे. आणि तुम्हा लोकांना माहितच आहे मी काशीचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच मी तुम्हाला जर निमंत्रण दिले तर ते खास निमंत्रण बनते.
तर पहिली गोष्ट म्हणजे याचा लाभ घ्या. तुम्ही मोठ्या संख्येने प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात सहभागी व्हायला हवे. दुसरे, 14जानेवारी 2019 रोजी मकर संक्रांतीला प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु होत आहे. जगभरातील लोक कुंभमेळ्याला भेट देतात. त्यामुळे काशी इथे होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाला उपस्थित रहा आणि नंतर प्रयागराज मधील प्रयागला भेट द्या आणि नंतर 26 जानेवारीला दिल्लीला या. आणि त्याआधी आणखी एक कार्यक्रम आहे- गुजरातमधील अहमदाबाद येथे 20-21 जानेवारीला व्हायब्रन्ट गुजरात जागतिक गुंतवणूकदार परिषद आहे. याचाच अर्थ तुम्ही पूर्ण पॅकेज बनवून येऊ शकता. आधी गुजरातमध्ये व्हायब्रण्ट शिखर परिषद, तिथून बनारसला जा, बनारसहून प्रयागराज आणि प्रयागराजहून दिल्ली. आणि त्यानंतर देखील तुम्हाला राहायचे असेल तर मे महिन्यापर्यंत कृपया राहा. तुम्हाला व्यस्त ठेवण्यासाठी आम्ही नक्की काही तरी करू.
तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, मला आशीर्वाद दिलेत, तुमच्या शुभेच्छा दिल्यात. मी तुमचा खूप आभारी आहे.
जगभरात विखुरलेल्या भारतीय समुदायाला मला सांगायचे आहे की भारताला तुमचा अभिमान आहे. जगात जिथे जिथे भारतीय गेले आहेत, त्यांनी प्रतिष्ठा मिळवली आहे, त्यांनी आमचा गौरव वाढवला आहे. आणि आज मी थोड्या वेळापूर्वी राष्ट्र्पतींबरोबर बसलो होतो. विमानतळावरून मी थेट त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा राष्ट्रपतींनी तुमची इतकी प्रशंसा केली , इथल्या भारतीय समुदायाबद्दल त्यांना अभिमान वाटतो आणि जेव्हा मी हे ऐकत होतो, मला एवढा आनंद होत होता की प्रवासाचा पूर्ण थकवा निघून गेला.
आणि त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की इथे जे भारतीय राहत आहेत, ते त्यांच्या देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देत आहेत. ते आपली रोजी-रोटी कमवत आहेत, मात्र ते काही उपद्रव देत नाहीत. भारतीयांकडून कुठलाही त्रास नाही.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जो भारतीय समुदाय राहत आहे त्याचे वैशिष्ट्य हे आहे की ते इथल्या सामाजिक कार्यात काही ना काही मदत करत असतात. स्थानिक लोकांच्या भल्यासाठी काही ना काही करत असतात. बघा, तुम्ही या गुणांमुळेच इथल्या लोकांची मने जिंकली आहेत. ही गोष्टच इतकी महत्वपूर्ण आहे की ज्या देशात आपण आलो आहोत , त्या देशातील लोक आपल्या सेवाभावाने प्रभावित झाले आहेत, सेवा करण्याच्या आपल्या स्वभावाने प्रभावित झाले आहेत.
आणि जगभरातून ही वृत्ते येत आहेत कि हा समुदाय कायद्याचे पालन करणारा आहे, कुठल्याही प्रकारचा उपद्रव करणारा नाही आणि भारतीयांच्या या वृत्तीचा जगातील कुठल्याही देशात तिरस्कार केला जात नाही. भारतीय आवडतात. इतरांनाही भारतीय आवडतात. एकूणच, जगात कुठेही भारतीय असेल,तो राजदूतापेक्षा राष्ट्राचा दूत आहे.
आज, इथे पोहचल्यानंतर तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी ऐकल्याक्षणी माझा सगळा थकवा दूर पळाला. मला आनंद झाला. आणि आज तुम्हा सर्वाना भेटण्याची संधी मिळाली त्यामुळे छान वाटत आहे. तुम्ही सर्वजण इथे आलात, तुम्हा सर्वांचे मी खूप-खूप आभार मानतो.
खूप-खूप शुभेच्छा.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1543500)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English