पंतप्रधान कार्यालय

जागतिक जैव इंधन दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 10 AUG 2018 8:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  10 ऑगस्ट 2018

 

समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले  इथे उपस्थित स्त्री-पुरुष,

मित्रहो, ऑगस्टचा महिना पवित्रता आणि संकल्प यांचे वातावरण घेऊन येतो.क्रांती,देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा हा महिना.स्वातंत्र्य दिनाबरोबरच  या महिन्यात अनेक सण येतात  जे आपले सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समृध्द करतात.येणाऱ्या सर्व पर्वांकरिता आपणा सर्वाना अनेक शुभेच्छा.

आपल्या परंपरेत, आपल्या उत्सवात,आपल्या सणांमध्ये पर्यावरणाला फार महत्व आहे.आजचा हा कार्यक्रमही निसर्ग, पर्यावरण आणि आधुनिक परंपरांशी जोडला गेलेला आहे.आपणा सर्वाना जागतिक जैव इंधन दिनाच्या शुभेच्छा.

मित्रहो, सव्वाशे कोटी भारतीयांचे जीवन अधिक सुकर कसे करत येईल यासाठी सरकार अनेक पाऊले उचलत आहे,निरंतर प्रयत्न करत आहे, नव-नव्या योजना आखत आहे.गावांची अर्थव्यवस्था दृढ करणे,गावातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे,पेट्रोल डीझेल, गॅस यासाठी पर्याय निर्माण करणे,पर्यावरण सुरक्षित करणे याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. ही लक्ष्य साध्य करण्यासाठी,जैव इंधन महत्वाची भूमिका निभावणार आहे.पर्यावरण आणि आपली आर्थिक उन्नती यांचा ताळमेळ राखण्यासाठी, जैव इंधन मोठी मदत करण्याची क्षमता बाळगून आहे. 

मित्रहो,जैव इंधन केवळ विज्ञान नव्हे तर 21 व्या शतकातल्या भारताला आणि केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगातल्या मानव जातीला नवी  उर्जा देणारा मंत्र आहे.जैव इंधन म्हणजे पिकांच्या अवषेशातून निघालेले इंधन, कचऱ्यातून निघालेले इंधन.हे इंधन भारतातल्या गावापासून ते शहरांपर्यंत सर्वांच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहे,जीवन अधिक सुकर करणार आहे.आता जो लघु पट  दाखवण्यात आला त्यामधे  एका जुन्या म्हणीचा वापर केला होता,’आम के आम और गुठलीयो के दाम’. खूप जुनी म्हण आहे.त्या म्हणीचे हे एका प्रकारे आधुनिक रूप आहे.

जैव इंधनाचा जास्तीत जास्त वापर केल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, देशाच्या पैशाची बचत होईल आणि पर्यावरणासाठीही उपयुक्त ठरेल.स्वच्छता,आरोग्य आणि गाव,गरीब शेतकऱ्याच्या समृद्धीचा रस्ता यातून मजबूत करण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे.याशिवाय नागरी विकासाच्या आधुनिक मॉडेलशीही जैव इंधन जोडले गेले आहे.शहरात स्वच्छ  उर्जा  देण्याच्या प्रयत्नात वायू प्रदूषण कमी करण्यात, जैव इंधन मोलाची मदत करणार आहे. 

मित्रहो,इथे मोठ्या संख्येने आपले शेतकरी बांधव उपस्थित आहेत आणि विज्ञान भवनात शेतकरी येणे ही घटनाच स्वतः एक संदेश आहे.देशाच्या विविध भागात पावसाची स्थिती वेगवेगळी आहे.काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे.या बातम्या आपण सातत्याने पाहतो. समाधानकारक पावसाचा एक आनंद होतो तर कधी कमी- जास्त पावसामुळे चिंताही निर्माण होतात.

विशेष करून माझ्या शेतकरी बंधू-भगिनीनो, देशाच्या जवळ जवळ सर्वच भागात  धानासह खरिपाच्या सर्व पिकांची पेरणी पूर्ण झाली असेल.आपल्याला हे माहित असेलच की सरकारने 14 खरीप पिकांची किमान आधारभूत किमतीत दीडपट वाढ केली आहे.कृषी क्षेत्राची गोष्ट येते तेव्हा साहजिकच स्वामीनाथन यांचे नाव समोर येते.मला आनंद आहे की दोन-तीन दिवसापूर्वी स्वामीनाथन यांनी एका लेखात, कृषी क्षेत्रात कसे बदल घडत आहेत,सरकार कसे अभियान राबवत आहे,सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्याच्या जीवनात कसे परिवर्तन घडत आहे हे विस्ताराने सांगितले आहे, त्यांचा या क्षेत्रात अधिकार आहे. भारत सरकारच्या,शेतकऱ्यांशी सबंधित योजना, धोरण, प्रयत्न विस्ताराने सांगून त्याची प्रशंसा केली आहे.    

 आपण पाहिले असेल आणि लघुपटातही पाहिले असेल,खरिपाच्या हंगामात जी पिके असतात त्याबरोबर ऊसासाठीही आम्ही किमान आधारभूत किंमत निश्चित केली असून  शेतकऱ्यांना खर्चाच्या वर सुमारे 80% लाभ मिळेल.या हंगामासाठी ऊसाचे किफायतशीर मूल्य 20 रुपयांनी वाढवून 275 रुपये प्रती क्विंटल करण्यात आले आहे.याशिवाय ऊसापासून  इथेनॉल बनवण्याचा सरकार प्रयत्न करत असून त्याचाही लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे.

मित्रहो,ऊसापासून इथेनॉल बनवण्याच्या योजनेवर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते त्या काळात कामाला प्रारंभ झाला होता.मात्र गेल्या एका दशकात नंतरच्या सरकारची जशी स्थिती होती तशीच स्थिती प्रत्येक योजनांची होत होती.2014 मधे केंद्रात भारतीय जनता पार्टी आणि रालोआचे  सरकार स्थापन झाले तेव्हा एक पथदर्शी आराखडा तयार करण्यात आला.इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सुरु करण्यात आला.आज देशात 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हा कार्यक्रम सुयोग्य रीतीने सुरु आहे.गेल्या चार वर्षात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्यात आले आणि येत्या चार वर्षात सुमारे 400 कोटी इथेनॉलचे उत्पादन करण्याच्या दिशेने आज देश वाटचाल करत आहे.

 इथेनॉल अभियानामुळे केवळ शेतकऱ्याचाच फायदा झाला असे नव्हे तर त्यामुळे गेल्या वर्षी 4 हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचतही झाली.येत्या चार वर्षात ही बचत 12 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे  सरकारचे उद्दिष्ट आहे.

इतकेच नव्हे येत्या चार वर्षात ऊसापासून इथेनॉल बनवण्यामुळेसुमारे 20 हजार कोटी रुपयांची अधिक भर पडण्याचा अंदाज आहे. या बचतीमुळे आणि ऊसासाठी मिळालेल्या  पर्यायामुळे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या संकटांचा सामना करावा लागतो त्यावर स्थायी तोडगा काढण्याच्या दृष्टीने मार्ग निघेल.इथेनॉल मुळे पैशाची बचत तर होत आहेच त्याशिवाय पेट्रोलच्या वापराने जो हानिकारक वायू निर्माण होतो तोही कमी होईल.    

मित्रहो,जैव इंधनाशी निगडीत लक्ष्य निश्चित केले जात आहे.केवळ एक सदिच्छा किंवा मोठ्या-मोठ्या केवळ गप्पा होत आहेत असे नव्हे तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी,धोरण आखले जात आहे,ठोस रणनीती आखली जात आहे.उत्तरदायित्व निश्चित केले जात आहे.जबाबदारी ठरवली जात आहे.नियमित देखरेख ठेवली जात आहे.उदिष्ट साध्य करण्यासाठी काल्बद्ध आयोजन  केले जात आहे.इथेनॉल समवेत सर्व जैव इंधनाची माध्यमे विकसित करण्यासाठी  सरकारने राष्ट्रीय धोरण आखले आहे.2022 पर्यंत 10 टक्के आणि 2030 पर्यंत दुप्पट म्हणजेच 20 टक्के इथेनॉल, पेट्रोल मधे मिसळण्याची क्षमता विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

जैव इंधनामुळे ऊस  उत्पादक शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध होईलच त्याचा देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ होणार आहे. गहू,तांदूळ,मका,बटाटा,भाज्या आपण सर्व जाणताच की कधी हवामानामुळे तर कधी साठवणुकीची सोय नसल्या मुळे खराब होतात,सडतात आणि त्यांचे नुकसान होते.स्वाभाविकच शेतकरी त्या ठेवून काय करणार, तो,त्या फेकून देतो.मात्र आम्ही ठरवले आहे की त्याचाही वापर इथेनॉल बनवण्यासाठी केला जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी एक आणखी समस्या आहे,ती म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे पिकात काही वैगुण्य राहते.डाग पडणे,आकार लहान असणे अशी अनेक कारणे  असतात.यामुळे ती वस्तू विकल्या जात नाही.ग्राहकही ती वस्तू घेत नाही.  दुकानदारही या वस्तू घेत नाही.यामुळे हवामानाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान झेलावे लागते. इथेनॉल बनवण्याकरिता असे सारे धान्य,लहान असू दे,नुकसान झालेले धान्य असू दे,दाणा लहान असू दे,रंग काळा झालेला असू दे हे सर्व धान्य उपयोगाला येते.या सर्वात आपण योजना बद्ध धोरणानी पावले टाकू आणि पूर्णत्व प्राप्त करू तेव्हा शेतकऱ्याच्या पिकाचा एक दाणाही फुकट जाणार नाही.आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात किती बदल घडवण्याची ताकत येईल याची आपण कल्पना करू शकता.

मित्रहो,राष्ट्रीय धोरणात केवळ पिकाचे अवशेष नव्हे तर घरातला कचरा,शेतातला कचरा,शेण यापासून इंधन बनवण्यासाठीही एक राष्ट्रव्यापी योजना आखली जात आहे.येत्या काळात केळ्याची साले,जी प्रत्येक घरातल्या कचऱ्यात सहज आढळून येतात,त्याचाही इंधन तयार करण्यासाठी उपयोग केला जाणार आहे.

      

याशिवाय,गवत आणि बांबू पासूनही इथेनॉल बनवले जात आहे.उत्तर-पूर्व आणि दुसऱ्या आदिवासी भागात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हे महत्वाचे पाऊल ठरेल,ज्याचा बांबूची शेती करणाऱ्यांना फायदा होईल.

मित्रहो,पिकांचे उरलेले अवशेष ही शेतकऱ्यासाठी मोठी समस्या आहे. आकलन नसल्यामुळे,वेळेच्या अभावी काहीही म्हणा ही आपल्यासाठी मौल्यवान नैसर्गिक भेट आहे.मात्र अज्ञानातून आपण असा मौल्यवान ठेवा आपल्याच हातानी जाळून टाकतो.पंजाब,हरियाणा, इथले शेतकरी, यांचा हा नित्याचा कार्यक्रम असतो.ही  एक मोठी समस्या आहे.

मात्र माझ्या शेतकरी मित्रानो, मी हे वारंवार सांगत आलो आहे की हा ठेवा जाळल्यामुळे जमिनीच्या कसावर परिणाम होतो.त्याचबरोबर यावेळी निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतो.म्हणूनच यापासून इथेनॉल बनवण्याबाबत व्यापक काम सुरु आहे.म्हणजे हाही एक उत्पन्नाचा स्त्रोत ठरेल.यामुळे प्रदूषण रोखता येईल आणि शेतकऱ्यालाही  आणखी उत्पन्न मिळेल.

मित्रहो,बायोमासचे जैव इंधनात रुपांतर करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. देशभरात 10 हजार कोटी रुपये खर्चून 12 आधुनिक रिफायनरी उभारण्याची योजना आहे.एका रिफायनरीतून 1000-1500 लोकांना रोजगार मिळण्याची संधी आहे.रिफायनरी चालवण्यापासून ते पुरवठ्या पर्यंत सुमारे दीड लाख युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय शेणापासून इंधन बनवण्याचीही योजना प्रगतीपथावर आहे.

मागच्या अर्थसंकल्पात आपण पाहिले असेल, आम्ही गोबर धन योजना जाहीर केली.या योजने अंतर्गत संपूर्ण देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक बायो गॅस प्लान्ट तयार करण्यात येत आहे.आतापर्यंत 700 प्लान्ट तयार होत आहेत, याचा आणखी विस्तार केला जाईल.देशभरातले शेतकरी, स्वयं सहाय्यता गट याच्याशी जोडले जाणार आहेत.

मित्रहो, जनधन, वनधन आणि गोबर धन यासारख्या योजनातून गरीब,शेतकरी,आदिवासी यांच्या जीवनात  नव्या आर्थिक संधी,आर्थिक सामर्थ्य,व्यापक परिवर्तन सुनिश्चित होतआहे.केवळ पीकच नव्हे तर शेण,शेतातले पिकांचे अवशेष, घरातला केर-कचरा या प्रत्येक गोष्टीचा उपयोग व्हावा यासाठी या दिशेने काम होत आहे.

याशिवाय जंगलात उगवणाऱ्या झाडे,फळे यापासून मिळणारे उत्पन्न वेगळेच.आपण जंगलात जाणारे असाल तर पानगळीच्या काळात आपण पाहिले असेल,एक-एक, दोन-दोन फुटाचा पानांचा ढीग जमा झालेला असतो. हा ढीग आपल्या उत्पन्नाचे साधन ठरू शकतो.टाकाऊ तून संपत्ती हे अभियान आहेच,त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानालाही यातून गती मिळत आहे.कारण हा कचरा आणि टाकाऊ पदार्थ हे अस्वच्छतेचे मोठे कारण आहे. 

मित्रहो,या अभियानात आपले वैज्ञानिक बंधू आणि स्टार्ट अप च्या माध्यमातुन तंत्रज्ञान सुलभ करणाऱ्या युवकांचे महत्वपूर्ण योगदान आहे.आज या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचे आभार मानतो. जैव इंधनाशी सबंधित तंत्रज्ञान अधिक उत्त्तम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र अद्यापही या क्षेत्रात खूप काही करण्याचा संधी आहेत.धान्याव्यतिरिक्त अशा उत्पादनावर लक्ष देण्याची गरज आहे,ज्यातून अधिक गुणवत्तेचे आणि जास्त प्रमाणात जैव इंधन निर्माण होऊ शकेल.यासाठी स्टार्ट –अपशी संबंधित उद्योजक,तंत्रज्ञानाशी संबंधित लोक यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

आपली अभियांत्रिकी महाविद्यालये,आयटीआय पालीटेक्निक यांच्या अभ्यासक्रमात जैव इंधनाशी संबंधित प्राधान्य द्यायला हवे. याशिवाय देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जैव इंधनाविषयी जास्ती जास्त माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचवली गेली पाहिजे.देशभरात होणाऱ्या कृषी मेळ्यातही जैव इंधन ही मुख्य संकल्पना ठेवून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवता येऊ शकते.

मित्रहो,शहरांच्या सफाईतली  मोठी समस्या म्हणजे घन कचरा व्यवस्थापन,सांडपाणी,उद्योगातून निघणारे सांडपाणी,या सर्वातून उर्जा निर्मिती करण्यासाठी नवे आणि उत्तम तंत्रज्ञान आणण्याचा सरकारचा प्रयत्न  आहे.मी एका वर्तमानपत्रात वाचले होते.एका छोट्या शहरात नाल्याजवळ एक चहाची टपरी होती.चहा विकत होता, चहा करायची वेळ आली,त्याच्या मनात विचार आला, नाला असल्याने दुर्गंध येत होता.त्याने एक छोटे भांडे  उलटे करून त्याला छेद देऊन पाईप घातला आणि गटारातून जो गॅस येत होता त्याचा उपयोग करून चहा तयार करत होता.सोपे तंत्रज्ञान आहे.

एकदा गुजरातमधे आमचा ताफा जात असताना पुढे पाहिले तेव्हा एका स्कूटरवर, ट्रेक्‍टरची ट्यूब,तीही भरलेली ट्यूब घेऊन चालला होता. स्कूटरवर कोणी एवढी मोठी ट्यूब घेऊन जात असेल तर पाठीमागच्या वाहनांना स्वाभाविकच भीती  वाटते ती धक्का लागण्याची.मलाही आश्चर्य वाटले अशी ट्यूब कशी घेऊन कोणी जात आहे,कोणतीही समंजस व्यक्ती ट्यूब रिकामी करून नेईल आणि त्या ठिकाणी पोहोचल्यावर हवा भरून घेईल.मी त्यांना थांबवायला सांगितले.

आम्ही गाडी थांबवली आणि विचारले हे काय करताय,पडलात तर लागेल,मृत्यु ओढवण्याची शक्यता आहे.  हे कुठे घेऊन चालला आहात, त्याने सांगितले त्याने एक छोटासा गॅस प्लान्ट तयार केला आहे. घरातला स्वयंपाकघरातला कचरा,गुरांचे शेण या ट्यूब मधे भरून शेतावर नेतो,त्यावर पाण्याचा पंप चालवतो.आपण कल्पना करा आपल्या देशातला शेतकरी. इतके सामर्थ्य आहे.आजही आपले शेतकरी,गावातले लोक नव-नवे प्रयोग करत असतात.

स्टार्ट अप शी निगडीत लोक आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावे,कधी-कधी मोठ-मोठ्या महाविद्यालयात जे शिक्षण मिळत नाही ते शेतात शेतकऱ्यांच्या विचारातून शिकायला मिळते.हे सर्व विचारात घेऊन आम्हा ला पुढे जायचे आहे.     

आज बी – 3 या योजनेवर व्यापक काम सुरु आहे. बी-3 म्हणजे बायोमास,बायो फ्युएल आणि बायो एनर्जी म्हणजे बायो मास, जैव इंधन आणि जैव उर्जेच्या दिशेने देश वाटचाल करत आहे.इथेनॉलच्या व्यतिरिक्त आज कचऱ्यापासून जैव सी एन जी तयार करण्याचे कामही वेगाने सुरु आहे. देशाच्या वाहतूक व्यवस्थेत सीएनजीच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे ज्यायोगे पेट्रोल आणि डिझेल प्रदूषण कमी होऊ शकेल. सध्या आपण सीएनजी परदेशातून आयात करतो.आता जैव-सीएनजी मुळे परदेशावरचे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी देशभरात पावणेदोनशे पेक्षा जास्त प्लान्ट उभारण्यात आले आहेत.शहरांप्रमाणे गावातही सीएनजी वर चालणाऱ्या गाड्या धावतील तो दिवस आता  दूर नाही.

मित्रहो,आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे सामान, रबरचे टायर यासारख्या वस्तूंचा उपयोग झाल्यानंतर या वस्तू समस्या ठरतात.यांचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी केला जात आहे.घरातून जमा होणाऱ्या कचऱ्याचाही रस्ते निर्मितीसाठी कसा उपयोग करता येईल याच्या शक्यता आजमावल्या जात आहेत. 

एका आफ्रिकन देशातल्या गरीब लोकांचे छोटेसे काम मी सोशल मिडीयावर पाहिले.गावातले प्लास्टिक जमा करून नदी किनारी नेऊन ते प्लास्टिक उष्णतेने वितळवले जाते.नदीवरच्या वाळूत त्याचे मिश्रण करून त्याचे ठोकळे बनवून ते मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि महिला सहाय्यता गट हे काम करत आहेत.कचराही साफ होत आहे आणि नवे उत्पादन करून बाजारात विकलेही जात आहे.

विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत वाटचाल करण्याचे सरकारचे  धोरण आहे.पर्यावरणाच्या संतुलनाबाबत बोलताना विजेची महत्वपूर्ण भूमिका आहे.वीज निर्मिती कशी होते आणि तिचा वापर कसा केला जातो याचा पर्यावरणावर थेट परिणाम होतो.

वीज निर्मितीची बाब येते तेव्हा आज कोळसा आणि  गॅस यासारख्या पारंपारिक साधनाबरोबरच सौर ऊर्जेसारख्या दुसऱ्या स्त्रोता पासूनही वीज निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मार्फत आम्ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सौर उर्जेचा प्रचार आणि प्रसार करत आहोत.  

आज शेतीसाठी सौर पंपांपासून ते उद्योग, कार्यालये यामध्ये सौर उर्जेचा वापर करण्यात मोठी प्रगती होत आहे. याशिवाय देशात घरे,कार्यालये आणि गल्ली मधे एलईडी बल्बचा वापर करण्यात येत असल्यामुळे विजेची बचत होत आहे.आता देशातली रेल्वे स्थानकेही एलईडी बल्बने झगमगत आहेत याचा मला आनंद आहे.सारे काम पूर्ण केले.आता लक्ष्य ठेवण्यात आले आहे की येत्या काळात देशातल्या रेल्वेची प्रत्येक इमारत, प्रत्येक र्क्‍वाटर्स मधे शंभर टक्के  एलईडी बल्ब लावण्याचे. एलईडी

बल्बना प्रोत्साहन देण्यात येत आहे,पर्यावरणाची चिंता,स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियानाशी जोडली गेली आहे.   

धूर मुक्त स्वयंपाकघर याचाच व्यापक भाग आहे.आज या मंचावरून मी देशातल्या त्या पाच कोटी गरीब कुटुंबाचे अभिनंदन करतो,त्या माता – भगिनींचे अभिनंदन करतो,ज्यांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे.  

हिंदुस्तान मधे इतके मोठे काम इतक्या कमी वेळात होऊ शकते ही आश्चर्याची बाब आहे.आपल्या देशात सव्वाशे कोटी जनसंख्या आहे आणि सुमारे 25-26 कोटी कुटुंबे आहेत.या 25-26 कोटी कुटुंबापैकी 5 कोटी कुटुंबा पर्यंत स्वयंपाकाचा गॅस इतक्या कमी वेळेत पोहोचवणे, वेगाने काम केले की कसा चांगला परिणाम दिसून येतो याचा आपण हिशेब लावू   शकता.

मित्रहो,आज दिवसभर शेतकरी,तंत्रज्ञ,सरकारी अधिकारीही असतील आणि आपण सर्व जैव इंधनावर चर्चा करणार आहात.त्याच्याशी संबंधित अडचणीवर  विचार-विमर्श करणार आहात.शेतकऱ्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीवर चर्चा करणार आहात.यातून सव्वाशे कोटी देशवासीयांच्या गरजा आणि शेती लाभकारी बनवण्यासाठी अनेक नवे मार्गनिर्माण होतील,अनेक सूचना येतील याचा मला विश्वास आहे.   

जैव इंधनामुळे होणारी क्रांती केवळ सरकारच्या प्रयत्नातून लोकांपर्यंत पोचणार नाही तर त्यासाठी विद्यार्थी,शिक्षक,वैज्ञानिक,उद्योगपती म्हणजेच एकप्रकारे जन भागीदारीतून जन आंदोलनाचे रूप आपल्याला द्यावे लागेल.

 इथे राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांना माझे आवाहन आहे की देशातल्या गावा-गावापर्यंत जैव इंधनाचे लाभ पोहोचवण्यासाठी आपापल्या स्तरावर आणखी प्रयत्न करा.जैव इंधनाच्या बाबतीत भारताने जो पुढाकार घेतला  आहे, आज जागतिक जैव इंधन दिन साजरा केला जात आहे त्या पार्श्व भूमीवर, भारत, जागतिक तापमानवाढीच्या चिंतेने  ग्रासलेल्या जगाला एक विश्वास देण्याचे सामर्थ्य बाळगून आहे.भारताच्या या पाऊलांची  संपूर्ण जगभरातून प्रशंसा होत आहे.

भारताची धोरणे,योजना यांच्याकडे संपूर्ण जग अभिमानाने पाहत आहे,आजचा हा प्रयत्न त्याला नवी उर्जा देईल,दिशा आणखी स्पष्ट करेल आणि गती वाढवेल,या विश्वासासह सफल योजनेसाठी आपणा सर्वाना मनःपूर्वक खूप-खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद. 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1542894) Visitor Counter : 572


Read this release in: English