पंतप्रधान कार्यालय

आयआयटी मुंबईच्या 56व्या दीक्षांत समारंभाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 11 AUG 2018 2:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,11  ऑगस्ट 2018

 

आज 11 ऑगस्ट आहे. 110 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी खुदीराम बोस यांनी मातृभूमीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला होता. त्या महान वीर क्रांतीकारीला मी नमन करतो. देशाच्यावतीने बोस यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रांनो,

स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी प्राण दिले, आपलं सर्वकाही समर्पित केलं, ते अमर झाले. सर्वांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत. आपल्याला जरी अशाप्रकारे स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करण्याचे सौभाग्य मिळाले नाही, तरी आपण या स्वातंत्र्यातच राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी काही वेगळे करून आयुष्याचा नवा, चांगला आनंद घेवू शकतो. आज मी आपल्या समोर, आपल्यामध्ये, आपल्या चेह-यांवर जो उत्साह पाहत आहे, जो आत्मविश्वास पाहत आहे, तो अगदी आश्वस्त करणारा आहे. तुमचा विश्वास पाहून एक निश्चित आहे की, आपण योग्य मार्गावरून, योग्य दिशेने पुढे जात आहोत.

 

मित्रांनो,

आयआयटी बॉम्बे ही स्वतंत्र भारतामधल्या निवडक संस्थांमधली वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाला नवीन दिशा  देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. गेल्या 60 वर्षांपासून सातत्याने आपण या अभियानामध्ये कार्यरत आहात. 100 विद्यार्थ्‍यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 10 हजारपर्यंत पोहोचला आहे. या काळामध्ये आपण जगातल्या निवडक सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. यंदा या संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या डायमंड ज्युबलीपेक्षाही जास्त महत्वाचे आहे ते म्हणजे, आज माझ्या समोर बसलेले हे हिरे आहेत. ज्यांना आज दीक्षांत समारंभात पदवी  प्राप्त होत आहे असे आणि ज्यांनी इथून पदवी घेवून बाहेर कार्य केले ते  हिरे महत्वाचे आहेत. पदवी घेवून ही मंडळी संपूर्ण जगभरामध्ये भारताचे नाव उजळत आहेत. सर्वात प्रथम मी आज या पदवीधरांचे, पदवी घेण्यासाठी इथं शिक्षण घेतलेल्या देशविदेशातल्या विद्यार्थ्‍यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज इथे डॉक्टर रोमेश वाधवानी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’या उपाधीने गौरवण्यात आले आहे. डॉक्टर वाधवानी यांचेही मी खूप-खूप अभिनंदन करतो. रमेश जी यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने जनसामान्यांना कशा प्रकारे जोडता येईल, सामान्यांच्या गरजा तंत्रज्ञानाच्या मदतीने कशा पद्धतीने पूर्ण करता येतील, यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले आहे. वाधवानी प्रतिष्ठानच्यावतीने त्यांनी देशामध्ये युवावर्गासाठी रोजगार निर्माण, कौशल्य विकसन, नवसंकल्पना आणि नवउद्योगाची उभारणी यासाठी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. एक संस्था म्हणून आपल्यासाठीही ही एक अभिमान वाटावा, त्यावर गर्व करावा, अशी गोष्ट आहे. या संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर वाधवानी यांच्यासारखे अनेक विद्यार्थी-विद्यार्थ्‍यांनी आज देशाच्या विकासकार्यामध्ये सक्रिय योगदान देत आहेत. गेली सहा दशके सातत्याने, अखंडपणाने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजे आयआयटी मुंबई, देशातल्या निवडक उच्च, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था बनली आहे.शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुंबई आयआयटीने एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. दर्जेदार संस्था म्हणून आपलं विशिष्ट स्थान मिळवले आहे.  आता आपल्याला एक माहिती सांगण्यात आली की, आयआयटी मुंबईसाठी एक हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. हा निधी आगामी काळामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उपयोगी पडू शकणार आहे. यासाठीही आपल्या पूर्ण टीमचे मी खूप- खूप अभिनंदन करतो.

 

संपूर्ण राष्ट्राला ‘आयआयटी’चा आणि कोणीही आयआयटी पदवीधर जे काही प्राप्त करू शकतो, त्याचा अभिमान वाटत असतो. आयआयटी सुरू झाल्यानंतर, त्यामधून प्रेरणा घेवून विविध प्रकारची आणि अनेक ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालये देशभरामध्ये सुरू झाली. या सगळ्या महाविद्यालयांचे जणू प्रेरणास्थान आयआयटी होते-आहे आणि यामुळे आज तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मनुष्यबळाचा विचार केला तर संपूर्ण जगाच्या तुलनेमध्ये भारताकडे ही संपदा सर्वात जास्त आहे.‘आयआयटी’मुळे भारताचा एक वेगळा ब्रँड जगभरामध्ये लोकप्रिय झाला आहे. यामागे आयआयटीचे गेल्या अनेक वर्षांचे परिश्रम आहेत. आयआयटी पदवीधर अमेरिकेमध्ये जाऊन सर्वोत्कृष्टता त्या देशाला देतात. वास्तविक विद्यापीठाचे सर्वात जुने विद्यार्थी म्हणून आणि नंतर तंत्रज्ञानातील तज्ञ म्हणून, उद्योजक म्हणून, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी म्हणून ते उत्कृष्ट कार्य करतात. भारतातही आय. टी. म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रचंड प्रमाणावर विस्तार करण्यामध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्‍यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. आय.टी. क्षेत्राची मजबूत पायाभरणी केवळ एकेका विटेने झाली नाही तर आयआयटींवाल्यांनी प्रत्येक वेळी क्लिकद्वारे ती केली आहे, असे मी म्हणतो. प्रारंभीच्या काळात आय.टी. क्षेत्रामध्ये भारतीय बुद्धिवंतांचा भरणा आहे आणि त्याचबरोबर त्यांची मेहनत आहे, असं इतर देशात, प्रामुख्याने अमेरिकेमध्ये म्हटलं, मानलं जायचं. परंतु आता भारतच प्रमुख  ‘आय.टी डेस्टिनेशन’ बनला आहे.

आज भारतामधल्या काही उत्कृष्ट स्टार्ट -अपस्ची नावे घेतली तर त्यामध्ये  आयआयटीच्या विद्यार्थ्‍यांनी सुरू केलेले उद्योग आघाडीवर आहेत. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, या स्टार्ट-अपमुळे देशापुढील समस्या सोडवण्याचे कार्य उत्तमप्रकारे केले जात आहे. जे कोणी सध्या स्टार्ट-अप सुरू करण्याविषयी विचार किंवा काही त्यादृष्टीने नियोजन करीत असेल, तर एक लक्षात ठेवा. उद्या निर्माण होणारे मोठे ‘कॉर्पोरेट’ उद्याचा मोठा उद्योजक हा कालच्या ‘स्टार्ट-अप’मध्ये लपलेला आहे. आज नवसंकल्पना डोक्यात घेवून लहान प्रमाणावर सुरू होणारे ‘स्टार्ट-अप’ उद्याचा मोठा उद्योग असणार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण अतिशय बुद्धिमान मुलांना सुचलेली नवीन कल्पना आणि त्याच्या जोडीला असणारे त्यांचे कठोर परिश्रमच त्यांना मोठे उद्योजक बनवणार आहे. म्हणूनच कोणत्याही संकटांना सामोरं जा, हार मानू नका, तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे.

मुंबईसारख्या शहरामध्ये, आणि  आयआयटीच्या या शैक्षणिक परिसरामध्ये वास्तव्य करण्याचे भाग्य, संधी तुम्हाला मिळाली. एका बाजूला सुंदर तलाव आणि एकीकडे हिरवागार डोंगर, इतक्या छान निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही शिकलात, हे तुमचे भाग्यच आहे. या परिसरात काही वेळा तर मगरी आणि बिबट्यांचेही दर्शन तुम्हाला झाले असण्याची शक्यता आहे. सध्या ऑगस्ट महिना असला तरी माझी खात्री आहे, आज सर्वांचा ‘मूड इंडिगो’ असणार आहे.  गेली चार वर्षे तुम्ही इथं शिकण्याचा अगदी वेगळाच अनुभव तुम्ही घेतला असणार, अशी माझी खात्री आहे.

आता मागे वळून पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी आठवतील महाविद्यालयातले कार्यक्रम,‘फेस्टिवल्स’, हॉस्टेलचं जीवन, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी-शिक्षक संघटना, आत्तापर्यंत तरी मी अभ्यासाचा उल्लेखही केला नाही ना? एकमात्र नक्की सांगतो, तुम्हाला इथं आपल्या शिक्षण व्यवस्था, प्रणालीमध्ये जे काही आहे, त्यापैकी सर्वोत्तम असं सर्वकाही मिळालं आहे. इथले विद्यार्थी म्हणजे, भारतामधल्‍या  विविधेतेचे प्रतिनिधीच आहेत, असं मानावं लागेल. सगळेजण वेगवेगळ्या राज्यांतून आलेले, वेगवेगळी भाषा बोलणारे, इतकंच नाही तर प्रत्येकाची पार्श्‍वभूमीही वेगवेगळी आहे. तुम्ही सगळेजण इथं  केवळ ज्ञान मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी एकत्र आले आहात.

मित्रांनो,

 नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने या देशाचे नवनिर्माण करण्यासाठी ज्या संस्था आघाडीवर आहेत, त्यापैकी एक महत्वाची संस्था म्हणजे आयआयटी मुंबई आहे. आगामी दोन दशकांमध्ये या जगाचा विकास कसा आणि किती होणार आहे, हे नवसंकल्पना आणि नवीन तंत्रज्ञान निश्चित करणार आहे. अशावेळी आपल्या या आयआयटी सारख्या संस्थेची भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरते. मग यामध्ये 5जी ब्रॉडबँड असेल किंवा मग एखादे यंत्र तयार करण्याचे तंत्रज्ञान असेल. आगामी काळामध्ये ‘स्मार्ट उत्पादने’ आणि ‘स्मार्ट शहरे’ बनवण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्वपूर्ण असल्याचे सिद्ध होणार आहे.

आता थोड्या अवधीनंतर ज्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे, ती इमारतही अशीच महत्वपूर्ण ठरणार आहे. या नवीन इमारतीमध्ये ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग त्याचबरोबर पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र या विभागांचे कार्य नव्या इमारतीमध्ये होणार आहे. आज केवळ देशापुढेच नाही तर संपूर्ण जगापुढे ऊर्जा आणि पर्यावरण हे दोन्ही विषय मोठे आव्हान बनले आहेत. आगामी काळामध्ये या दोन्ही महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये इथं खूप चांगल्या प्रकारचे मौलिक संशोधन होण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती होवू शकेल, असा माझा विश्वास आहे.

याच इमारतीमध्ये एक सौर प्रयोगशाळा स्थापन करण्यात येत आहे, अशी माहिती मला आज देण्यात आली. या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्‍यांना सौर ऊर्जेविषयी अधिकाधिक संशोधन करण्यासाठी सुविधा उपलब्ध होवू शकणार आहेत. सौर ऊर्जेबरोबरच जैवइंधनही आगामी काळामध्ये स्वच्छ ऊर्जा मिळवण्यासाठी एक चांगला स्त्रोत सिद्ध होवू शकणार आहे. कालच मी दिल्लीमध्ये जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सांगितले की, जैवइंधन तंत्रज्ञानाविषयी अभियांत्रिकी क्षेत्रातल्या लहानांपासून ते मोठ्या संस्थांमध्येही अभ्यासक्रम समाविष्ट केला पाहिजे, याविषयी भरपूर संशोधन झाले पाहिजे. 

मित्रांनो,

आयआयटी देशामध्ये आणि संपूर्ण दुनियेमध्ये ‘इंडियन इंस्टिट्युट आॅफ टेक्नाॅलाॅजी’ या नावाने ओळखली जाते. परंतु आज माझ्यासाठी या संस्थेच्या नावाची व्याख्या थोडी बदलली आहे. ही संस्था म्हणजे काही फक्त अभियांत्रिकी विषयाचा अभ्यास शिकवणारी संस्था राहिलेली नाही. तर आयआयटी म्हणजे आज ‘ इंडियाज् इंस्ट्रूमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ झाली आहे. आपण ज्यावेळी अशी ट्रान्सफॉर्मेशनची म्हणजेच परिवर्तनाची चर्चा करतो, त्यावेळी ‘स्टार्ट अप’सारख्या क्रांतीने देश पुढे जात असतो. या क्रांतीचा खूप मोठा स्त्रोत म्हणजे आयआयटी आहे. आज संपूर्ण जगामध्ये  ‘आयआयटी’ला ‘युनिकॉर्न स्टार्ट अप्स’ची नर्सरी मानली जात आहे. म्हणजेच जे स्टार्ट अप आज भारतामध्ये सुरू होत आहेत, त्यांचे भविष्यात मूल्य एक अब्ज डॉलरपेक्षाही जास्त होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. ही भविष्यवाणी म्हणजे एकप्रकारे आपल्या तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रासाठी आरसाच आहे. त्यामध्ये संपूर्ण दुनियेचं भविष्य दिसून येत आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण दुनियेमध्ये जितकेही अब्ज डॉलर स्टार्ट अप्स आहेत, त्यापैकी असंख्य व्यवसाय आयआयटीमधून बाहेर पडलेल्या लोकांनी स्थापन केले आहेत. आज मी माझ्यासमोर भविष्यातले  असेच अनेक ‘युनिकॉर्न फौंउडर्स’ पाहतो आहे.

 

मित्रांनो,

भारताला आपली विकसित अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर नवीन संकल्पना आणि नवीन उद्योजकता यांच्या मदतीने देशाचा पाया भक्कम केला पाहिजे. देशाचा पाया अशा पद्धतीने मजबूत झाला तर भारताच्या आर्थिक विकास होणे शक्य आहे. विशेष म्हणजे, असा भक्कम पायावर आधारलेला विकास हा दीर्घकाळ टिकणारा, शाश्वत असणार आहे.

याच कारणासाठी आपण स्टार्ट अप इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन यासारखे अभियान सुरू केले आहेत. या मोहिमांचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. आज भारत स्टार्ट अपच्या क्षेत्रामध्ये दुनियेत दुस-या क्रमांकाची अर्थसत्ता आहे. आज  देशामध्ये दहा हजारांपेक्षा जास्त स्टार्ट अप विकसित होत आहेत. आणि त्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी व्यापक व्यवस्थाही करण्यात आली आहे.

 

मित्रांनो,

आज ‘नवकल्पेनेच्या निर्देशांका’च्या क्रमवारीमध्ये भारत सातत्याने आघाडीवर आहे. याचाच अर्थ असा आहे की, शिक्षणापासून ते पर्यावरणापर्यंत आमचा जो सर्वंकष, सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे, त्याचे चांगले परिणाम आता संपूर्ण जगासमोर येवू लागले आहेत. देशामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला जावा, यासाठी वातावरण निर्मिती करणे, संशोधनाला पूरक परिस्थिती निर्माण करणे यासाठी उच्च शिक्षणामध्ये पायाभूत गरजांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

आजच्या 21व्या शतकामध्ये नवसंकल्पना हा एक परवलीचा शब्द बनला आहे. कोणत्याही समाजाला नवसंकल्पनांपासून दूर राहून, आहे तिथेच राहणे, आता परवडणारे नाही. भारतासारखा देश अनेक नवसंकल्पना विकसित करण्यासाठी स्टार्ट अपस सुरू करत आहे. नवसंकल्पनांचा ध्यासच एकप्रकारे आपल्याला लागला आहे. आणि याच्या जोरावरच आपण भारत एक सर्वांना आकर्षून घेणारा देश बनवणार आहोत. नवकल्पनांचा जणू विस्फोट झाल्यानंतर कितीतरी नवनवीन गोष्टी घडू शकणार आहेत. अर्थात हे सगळं काही एकट्या सरकारच्या प्रयत्नांमुळे होवू शकत नाही. नवसंकल्पना प्रत्यक्षात आणण्याची कामगिरी तुमच्यासारखे नवयुवक खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. कोणतीही नवकल्पना काही सरकारी कार्यालयामध्ये उपजत नाही किंवा एखाद्या चकचकीत कार्यालयात निर्माण होत नाही. तर अशा नवीन कल्पनेचा जन्म तर तुमच्यासारख्या युवकांच्या डोक्यांतून, तुमच्या घोळक्या-घोळक्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून, तुम्हां युवकांच्या मनातून निर्माण होत असते.

अशा असंख्य नवकल्पनांचे तुम्हीच जनक असता, हे मला माहीत आहे, म्हणूनच मी आज तुम्हाला आणि तुमच्यासारख्या सर्व नवयुवकांना आवाहन करतो की, भारतामध्ये या नवीन संकल्पनांना जन्म द्या, मानवतेसाठी तुमच्या नवकल्पना वापरा.

हवामान बदलापासून ते कृषी उत्पादन वाढवण्यापर्यंत, स्वच्छ ऊर्जा पुरवण्यापासून ते जलसंधारणापर्यंत, कुपोषणाची समस्या संपवण्यापासून ते कचरा व्यवस्थापनापर्यंत आज आपल्याकडे अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांवर तुमच्याकडे असलेल्या सर्वोकृष्ट संकल्पनांनी परिणामकारी उपाय शोधून काढण्यासाठी तुम्ही पुढे या. या समस्यांवर भारतीय प्रयोगशाळांमधूनच आणि भारतीय विद्यार्थ्‍यांकडूनच चांगले उपाय शोधले जावू शकणार आहेत. यासाठी सरकारच्या बाजूने जे काही शक्य आहे, ते सर्व काही करण्याची आमची तयारी आहे. भारतामध्ये संशोधनाचे वातावरण तयार करण्याचे कामही आम्ही करीत आहोतच.

गेल्या चार वर्षांमध्ये सात नवीन आयआयटी, दोन आयआयएसईआर, सात नवीन आयआयएम, आणि 11 आयआयआयटी मंजूर करण्यात आले आहेत. शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिकाधिक चांगल्या निर्माण करण्यासाठी ‘आरआयएसई-राईज’ म्हणजेच ‘रिव्हायटलायझेशन ऑफ इन्‍फ्रास्ट्रक्चर अँड सिस्टिम इन एज्युकेशन’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, चार वर्षांमध्ये एक लाख कोटी रूपये जमा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. नवीन संस्था, नवीन पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. त्याहीपेक्षा जास्त गरज आहे ती इथे तयार होणारे कुशल मनुष्यबळ. सरकार या गोष्टीकडेही चांगले लक्ष देत आहे.

 

मित्रांनो,

देशभरामध्ये आज दरवर्षी जवळपास 7 लाख अभियंते तयार होतात. परंतु यापैकी काहीजण फक्त पदवी घेवून बाहेर पडतात. त्यांच्यामध्ये आवश्यक ते कौशल्य म्हणावे तसे विकसित होत नाही. आज इथं उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना, बुद्धिजीविंना माझा आग्रह आहे की, अभियांत्रिकीची गुणवत्ता कशा पद्धतीने सुधारली जावू शकेल, याचा त्यांनी विचार करावा, आणि यासाठी उपाय योजना करण्यासाठी सल्ला द्यावा. आपल्याला केवळ संख्यात्मक वृद्धी होवून चालणार नाही. तर गुणात्मक उच्च स्तर आपण गाठायचा आहे, हे निश्चित आणि कायमचे  आपण स्मरणात ठेवले पाहिजे. गुणात्मक दर्जा सुधारण्याची आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी सरकारही प्रयत्न करीत आहे.

आपल्या सगळ्यांना ‘प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती’ योजना सुरू केली आहे, याविषयी माहिती असेलच. या योजनेअंतर्गत दरवर्षी देशभरातल्या अभियांत्रिकीमधल्या एक हजार बुद्धिमान विद्यार्थ्‍यांची निवड पी.एचडी.साठी करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्‍यांना आयआयटी आणि आयआयएससी यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आपण देशामध्येच राहून चांगल्या संस्थेमध्ये मार्गदर्शन घेवून, तिथल्या सुविधांचा लाभ घेवून संशोधन करण्याची संधी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळणार आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.

 

मित्रांनो,

आत्ता इथं जितके लोक बसले आहेत, त्यापैकी  एक शिक्षक तरी आहेत किंवा भविष्यात नेतृत्व करणारे तरी आहेत. आपण सर्वजण  आगामी काळामध्ये देशासाठी कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी निर्णय अधिकारी म्हणून कार्य करणार आहात. आपण नवीन तंत्रज्ञान, नवीन संकल्पना राबवण्यासाठी स्वतःला तयार करीत असणार. काय करायचे, कोणत्या पद्धतीने काम करायचे, याविषयी आपण काही विचार केला असणार काही गोष्टी निश्चित केल्या असणार.

 

मित्रांनो,

जुन्या पद्धती, कामाच्या सवयी सोडून देणे, किंवा त्या पूर्णपणे बदलणे इतके सोपे नसते. समाज आणि सरकारी व्यवस्था यांच्याबाबतीतही अशीच समस्या निर्माण होत असते. आपण कल्पना करा की, हजारों वर्षांपासून जी पद्धत सुरू आहे, जी सवय लागली गेली आहे, शेकडो वर्षांपासून ज्या पद्धतीने काम केले जात आहे, त्या बदलण्यासाठी कोणाचे तरी मन वळवणे, किती कठीण काम असते. परंतु ज्यावेळी आपले विचार आणि कर्म यांचा केंद्रबिंदू जर समर्पण आणि प्रेरणा देणारा असेल आणि नवीन आशा आकांक्षा पूर्ण करण्याची उर्मी असेल, तसा ध्यास आपल्याला लागला असेल तर, येत असलेल्या सर्व अडचणी, बाधा, समस्यां यांना पार करून आपण यश मिळवणार आहोत.

आज सरकार आपल्या सर्वांच्या, देशाच्या कोट्यवधी युवकांच्या आकांक्षा समोर ठेवून कार्यरत आहे. आपल्या सर्वांना माझं आग्रहाचं एकच सांगणं आहे की, आपल्या मनामध्ये अयशस्वीतेविषयी काही गोंधळ निर्माण झाला असेल तर, हा विचार अगदी काढून टाका. यश मिळेल की मिळणार नाही. ही गोष्ट करू की नको, असे मनाचा गोंधळ उडवणारे प्रश्न काढून टाका. आपल्या आकांक्षा काय आहेत, त्यावर तुम्ही लक्ष केंद्रीत करा. अतिशय मोठे ध्येय निश्चित करून त्याप्रमाणेच मोठे, व्यापक विचार करा. असा व्यापक विचारच, तुम्हाला प्रेरणा देणार आहे. विचारांचा मनातला गोंधळ म्हणजे आपल्याकडे असलेल्या बुद्धीला एका विशिष्ट सीमेमध्ये, मर्यादेमध्ये बांधून ठेवण्यासारखे आहे.

 

मित्रांनो,

फक्त आकांक्षा असून काही भागत नाही. लक्ष्य खूप महत्वाचे आहे. आपल्यापैकी आज जे बाहेर जाणार आहेत, किंवा आगामी काही वर्षांमध्ये बाहेर जाणार आहेत. ते सर्वजण कोणत्या ना कोणत्या संस्थेशी निश्चितच जोडले जातील. तर कोणी नवीन संस्थेची उभारणी करण्यासाठी तिची पायाभरणी करतील. आपण कोणतेही कार्य करा, परंतु ते करताना आपण देशाची आवश्यकता, देशाची गरज, देशवासियांना हव्या असलेल्या गोष्टी, यांच्याविषयी अवश्य स्मरण ठेवाल. देशवासियांना काय हवे आहे, हे नक्कीच तुम्ही ध्यानात ठेवाल, अशी माझी आशा आहे. देशामध्ये असलेल्या अनेक समस्यांवर उपाय शोधून काढण्याची क्षमता तुमच्यामध्येच आहे. हे कार्य तुम्ही नक्की करणार, अशी माझी आशा आहे.

 

मित्रांनो,

सव्वाशे कोटी देशवासियांचे जीवन सुकर, सुलभ बनवण्यासाठी ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुनिश्चित करण्यासाठी आपण केलेले प्रत्येक प्रयत्न, आपण करीत असलेला प्रत्येक विचार यांच्याबरोबर सरकार उभे आहे. देशवासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार आपल्याबरोबरीने चालण्यास तयार आहे. त्यामुळेच मी ज्या ज्यावेळी आपल्यासारख्या विद्यार्थ्‍यांबरोबर, संशोधक बंधुंबरोबर, उद्योजकांबरोबर बोलतो, त्या त्यावेळी आयआयटीसारख्या सर्व संस्थांच्या परिसरामध्ये ‘सिटी बेस्ड क्लस्टर ऑफ सायन्स’ या विषयावर चर्चा जरूर करीत असतो. यामागे उद्देश असा आहे की, विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, स्टार्ट अप यांच्याशी संबंधित सर्व लोकांनी एकत्रित येवून एकाच ठिकाणी, एकमेकांच्या आवश्यकतांचा विचार करून कार्य करावे. ‘आर अँड डी’ म्हणजेच संशोधन आणि विकास यांची संधी मिळेल. आता मुंबईमध्ये ज्या परिसरामध्ये आपली ही संस्था आहे. त्याचेच उदाहरण घेवू या. मला आत्ताच सांगण्यात आलं की, इथं ग्रेटर मुंबईमध्ये जवळपास 800 महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्ये जवळपास साडे नऊ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज आपण इथं दीक्षांत समारंभासाठी एकत्र आलो आहोत. या संस्थेचे हीरक महोत्सवी वर्षही आहे. आता अशा वेळी आपण सर्वांनी एक संकल्प करावा, असे मला वाटते. आयआयटी मुंबई, ‘सिटी बेस्ड सेंटर ऑफ एक्सलन्स’चे केंद्र बनू शकते का?

 

मित्रांनो,

आपल्या सर्वांना माहीत आहेच की, सरकारने इंडियन इंस्टिट्युट  ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) साठी एक कायदा बनवून अधिक स्वायतत्ता दिली आहे.

‘आयआयएम’मध्ये शिक्षण घेवून बाहेर पडणा-या विद्यार्थ्‍यांनी, माजी विद्यार्थ्‍यांनी या संस्थेच्या कामामध्ये सक्रिय भूमिका पार पाडावी, असे सरकारला वाटते. इतकंच नाही तर आयआयएमच्या प्रशासकीय मंडळामध्येही त्यांना प्रतिनिधित्व दिले जात आहे.

मला असं वाटते की, आयआयटी सारख्या संस्थांनाही आपल्या माजी विद्यार्थ्‍यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल का, याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. यामुळे माजी विद्यार्थ्‍यांनाही आपल्या संस्थेसाठी काही तरी चांगले करण्याची संधी मिळणार आहे. माझ्या समोर बसलेला प्रत्येक विद्यार्थी भविष्यातला या संस्थेचा माजी विद्यार्थी असणार आहे. माजी विद्यार्थी या संस्थेला एका वेगळ्या, नवीन उंचीवर घेवून जावू शकतील, अशी माझी खात्री आहे, आपण सर्वजण माझ्या या म्हणण्याला नक्कीच दुजोरा द्याल. आयआयटी मुंबईचे जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त माजी विद्यार्थी आहेत, अशी माहिती मला देण्यात आली. या सर्वांच्या  ज्ञानाचा, अनुभवाचा खूप मोठा लाभ या संस्थेला नक्कीच मिळू शकतो.

 

मित्रांनो,

इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप परिश्रम घेतले आहेत. आपल्यापैकी अनेकजण अभावग्रस्त असतानाही, संघर्ष करून इथवर आले आहेत. आपल्यामध्ये अद्भूत म्हणावी अशी क्षमता आहे. त्याचेच चांगले परिणाम आपल्याला आता मिळत आहेत. इथं येण्यासाठी खूप कठोर मेहनत करणारे आहेत, परंतु त्या सर्वांनाच येता आले नाही. त्यांच्या परिश्रमाला यश आले नाही, असे लाखो युवक आहेत. अर्थात त्यांच्याकडे बुद्धिमत्ता कमी आहे, असं नाही. योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन यांचा अभाव यामुळे ते इथंपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अशा अनेक विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करून, त्यांना एक नवीन शक्ती, नवीन चेतना, नवीन प्रकाश आपण देवू शकता. आयआयटी मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या शाळांसाठी आपण आउटरिच कार्यक्रम तयार करू शकता. लहान लहान मुलांना या परिसरामध्ये आणून, त्यांना कार्याची माहिती देवून संशोधन कामासाठी प्रेरणा देण्याचे काम आपण करू शकता.  आपल्या देशामध्ये ‘अटल टिकरिंग लॅब’नावाची खूप मोठी आणि चांगली मोहीम सध्या राबवली जात आहे, हे आपल्याला माहीत असेलच. देशांमधल्या शाळांमध्ये हे अभियान सुरू आहे. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, थ्रीडी प्रिटिंग यासारख्या नवी तंत्रज्ञानाची माहिती शालेय विद्यार्थ्‍यांना दिली जाते. शाळांमध्ये याप्रकारे ‘आउटरिच’ कार्यक्रम राबवल्याने लहान मुलांच्या डोक्यात नवनवीन विचार येतात. हे विचार ऐकले की, काही वेळेस तर त्यातून मोठ्या माणसांनाही वेगळं  काही करण्याची प्रेरणा मिळते. अशा अभियानातून आपल्या सर्वांना अशीच नवीन प्रेेरणा मिळू शकते.

 

मित्रांनो,

आज आपल्याला जी पदवी मिळाली आहे, ती आपल्या समर्पणाचे, लक्ष्य प्राप्तीसाठी आपण केलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे. आयुष्यातला हा एक महत्वाचा टप्पा आहे, हे आपण स्मरणात ठेवा. खरे आव्हान तर बाहेर आपली वाट पाहत आहे. आजपर्यंत आपण जे काही मिळवले आहे आणि यापुढे जाऊन जे काही करणार आहोत, त्यामध्ये आपल्या, आपल्या कुटुंबियांच्या इतकेच नाही तर सव्वाशे कोटी देशवासियांच्या आशा आकांक्षांचा समावेश आहे. आपण जे काही करणार आहोत, त्यामध्ये देशाच्या नवीन पिढीचे भविष्यही सामावलेले आहे. नवीन पिढीचे भविष्य आपण बनवणार आहात आणि त्यामुळेच नवभारतही मजबूत होणार आहे.

कोट्यवधी आशा आकांक्षा पूर्ण करण्यात आपल्याला यश मिळावे, यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांमध्ये काही वेळ घालवण्याची सुसंधी मला आज मिळाली, याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो!

खूप-खूप धन्यवाद !! 

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1542852) Visitor Counter : 140


Read this release in: English