पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 5 कोटी लाभार्थी

Posted On: 03 AUG 2018 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2018

 

प्रधानमंत्री उज्वला योजनेने 5 कोटी लाभार्थींचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. या योजनेच्या पाच कोटीव्या लाभार्थी श्रीमती तक्रादीरन यांना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संसद भवनात एलपीजी जोडणी प्रदान करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या उपक्रमाबद्दल सभापतींनी मंत्रालयाचे अधिकारी आणि तेल कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नांची प्रशंसा केली.

1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल आणि एचपीसीएलच्या देशभरातील जाळ्याच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. 28 महिन्यांच्या विक्रमी काळात या योजनेअंतर्गत 5 कोटी एलपीजी जोडण्या देण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेने घरांतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना हे एक प्रभावी माध्यम असल्याचे मान्य केले आहे.  या योजनेला मिळालेले यश लक्षात घेत या योजनेअंतर्गत 8 कोटी जोडण्या देण्याचे सुधारित लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या जोडण्या मिळालेल्या लाभार्थींमध्ये 47 टक्के लाभार्थी हे समाजाच्या दुर्बल घटकांपैकी आहेत.

 

 

M.Chopade/M.Pange/P.Malandkar

 



(Release ID: 1541587) Visitor Counter : 178


Read this release in: English