वस्त्रोद्योग मंत्रालय

चौथ्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नाशिकमध्ये नागडे येथे विशेष कार्यक्रम

विणकरांसाठी मुंबईतील विणकर सेवा केंद्रातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 02 AUG 2018 3:49PM by PIB Mumbai

मुंबई, 2 ऑगस्ट 2018

 

नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात येत्या 7 ऑगस्ट रोजी नागडे येथे राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण, जलस्रोत आणि कमांड क्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

 

यावेळी विणकर सेवा केंद्रातर्फे विणकर समुदायासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची (गट स्तरावरील समूह, इंडिया हॅण्डलूम ब्रॅण्ड, हॅण्डलूम मार्क, मुद्रा योजना, विमा योजना, ई-कॉमर्स, ई-धागा, भौगोलिक निर्देशांक) माहिती देणे, विणकरांशी संवाद, स्थानिक यशोगाथांचे सादरीकरण, मुंबईतील विणकर सेवा केंद्रातर्फे विकसित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन, ब्लॉक प्रिंटीगचे प्रात्यक्षिक तसेच महाराष्ट्रात आणि देशभरात हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमात सहभागी कुशल विणकर आणि रचनाकारांशी बातचीत असे अनेक कार्यक्रम या दिवसभरात होणार आहेत.

 

 

संत कबीर पुरस्कार विजेते, येवल्याचे राष्ट्रीय विजेते तसेच वस्त्रोद्योग प्रधान सचिव या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभासाठी सर्व राष्ट्रीय विजेते,  संत कबीर पुरस्कार विजेते, गुणवत्ता प्रमाणपत्रधारक, अखिल भारतीय हातमाग मंडळाचे सदस्य तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रातील रचनाकार आणि राज्य संघटनांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

पार्श्वभूमी :-

सात ऑगस्ट 1905 रोजी भारतात स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती. देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोलकाता येथे टाऊन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत सात ऑगस्ट या दिवशी स्वदेशी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो.

 

 

सात ऑगस्ट 2015 रोजी चेन्नई येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पहिला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला होता.

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1541297) Visitor Counter : 138


Read this release in: English