वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार:या टप्प्यात 10 रेल्वेस्थानके असणार

Posted On: 01 AUG 2018 1:32PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्र, गोवा कर्नाटक या राज्यांना जोडणाऱ्या कोकण रेल्वेमार्गावरील कोल्हापूर-वैभववाडी या 103 किलोमीटर अंतराच्या नवीन मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य, उद्योग तसेच मुलकी विमान वाहतूक मंत्री श्री. सुरशे प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे काल झालेल्या एका बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक त्याचप्रमाणे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेवेळी मंत्रीमहोदयांनी या बाबीवर भर दिला की कोल्हापूर-वैभववाडी हा नवीन रेल्वेमार्ग केवळ या कोकण विभागासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठीच 

गेम चेंजर ची भूमिका बजावेल. हा मार्ग महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रालाही जोडणार आहे. त्यामुळे कोकणातील बंदरांच्या विकासाला वेग येईल. त्याचप्रमाणे सागरी मार्गाने होणाऱ्या दूरवरच्या भागातील मालाच्या वाहतुकीसही चालना मिळेल.

कोकण किनारपट्टी महाराष्ट्र देशाच्या उर्वरीत भागाशी रेल्वेमार्गाद्वारे जोडली गेल्याने भविष्यकाळात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी चालना मिळणार आहे असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीत कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी मंत्रीमहोदयांना सांगितले की कोल्हापूर-वैभववाडी या नव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यावर कोकणातील मोठ्या प्रमाणावरील ग्रामीण भाग रेल्वेला जोडला जाणार आहे. या मार्गावर 10 स्थानके असतील. त्यापैकी पहिल्या स्थानकाचे काम आगामी पाच महिन्यांत पूर्ण होणार असून जानेवारी 2019 मध्ये या स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने यापूर्वीच मान्यता मंजुरी दिली आहे. या मार्गाच्या कामासाठी येणाऱ्या खर्चापैकी भारतीय रेल्वे 50 टक्के तर महाराष्ट्र सरकार उर्वरीत 50 टक्के वाटा उचलणार आहे.

*****

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1540977) अभ्यागत कक्ष : 284
Read this releasein: English