पंतप्रधान कार्यालय

जोहान्सबर्ग इथे ब्रिक्स संपर्क संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 27 JUL 2018 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2018

 

महामहीम राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा,

ब्रिक्स मधले माझे सहकारी,

जगभरातून उपस्थित माझे आदरणीय मित्र,

ब्रिक्स मधली संपर्क संवाद प्रक्रिया मजबूत केल्याबद्दल मी सर्वप्रथम राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अभिनंदन करतो.

ब्रिक्स आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था यांच्यातला हा संवाद, विकासाबाबत महत्वाच्या मुद्यांवर विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. आफ्रिकी देशांची इथली उपस्थिती स्वाभाविक आणि प्रसन्न करणारी आहे. आफ्रिके बरोबर भारताचे संबंध ऐतिहासिक आणि  घनिष्ठ आहेत. आफ्रिकेमध्ये स्वातंत्र्य, विकास आणि शांतता यासाठी भारताच्या ऐतिहासिक प्रयत्नांच्या विस्ताराला माझ्या सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. गेल्या चार वर्षात उच्च स्तरीय अधिकारी आणि सरकारी स्तरावरचे 100 पेक्षा जास्त दौरे आणि चर्चेद्वारे आपले आर्थिक संबंध आणि विकास सहकार्य नव्या उंचीवर पोहोचले आहे. आज 40 पेक्षा जास्त आफ्रिकी देशात 11 अब्ज डॉलर पेक्षा अधिक पत पुरवठा सुरु आहे. दर वर्षी 8000 आफ्रिकी विद्यार्थ्यांना भारतात स्कॉलरशीप, 48 आफ्रिकी देशात टेली मेडिसिन साठी ई नेटवर्क, खाजगी क्षेत्रात 54 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीने आफ्रिकेच्या गरजेनुसार आफ्रिकेत क्षमता वृद्धी होत आहे. युगांडाच्या संसदेला संबोधित करताना मी भारत आणि आफ्रिका यांच्यातल्या भागीदारीच्या 10 सिद्धांताचे तपशीलवार वर्णन केले होते. हे 10 सिद्धांत म्हणजे आफ्रिकेच्या आवश्यकतेनुसार विकासासाठी सहकार्य, शांतता आणि सुरक्षेसाठी सहकार्य, आपले शेकडो वर्षापासुनचे प्राचीन संबंध अधिक दृढ करण्यासाठीची  मार्गदर्शक तत्वे आहेत. आफ्रिकी खंड  मुक्त व्यापार क्षेत्र या महत्वाच्या मुद्याबाबत मी सर्व आफ्रिकी देशांचे अभिनंदन करतो. आफ्रिकेमध्ये, क्षेत्रीय आर्थिक एकात्मतेसाठी सुरु असलेल्या विविध प्रयत्नांचेही मी स्वागत करतो.

महामहीम, मुक्त व्यापाराने गेल्या तीन दशकात लाखो लोकांना गरिबीतून मुक्त केले आहे. जागतिकीकरण आणि विकासाचे लाभ या लोकांपर्यंत पोहोचवणे हा या प्रक्रियेचा मुख्य भाग होता. 2008 मधल्या आर्थिक पेचप्रसंगानंतर जागतिकीकरणाच्या या मुलभूत पैलूवर संरक्षणवादाचे सावट होते. या प्रवृत्तीचा आणि विकास दर मंदावण्याचा मोठा प्रभाव आपल्यासारख्या अशा देशांवर पडला आहे जे वसाहत वादाच्या काळात, औद्योगिक प्रगतीच्या संधीचा लाभ उठवू शकले नाहीत.आज आपण पुन्हा एकदा ऐतिहासिक वळणावर आहोत. डिजिटल क्रांतीमुळे आपल्यासाठी नव्या संधी निर्माण होत आहेत आणि म्हणूनच आपण स्वयंचलन, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बिग डाटा एनलेटीक्स मुळे होणाऱ्या बदलासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.

यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा आणि कुशल कार्यबळ यात गुंतवणुकीची आवश्यकता राहील.याबरोबरच समावेशक जागतिक मूल्य साखळी,कामगार आणि सामाजिक सुरक्षा चौकट एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी हलवण्याची क्षमता आणि प्रभावी रेमिटन्स कॉरिडॉर  यानाही आमचे प्राधान्य आहे.   

महामहीम,

आपल्या भागीदार देशांच्या विकासासाठी भारत नेहमीच योगदान देत राहिला आहे.विकसनशील राष्ट्रांच्या सहकार्याअंतर्गत आपल्या  विकासाबाबतच्या  अनुभवांचे आदान-प्रदान करत इतर विकसनशील देशांमध्ये तंत्र विषयक सहकार्य, प्रशिक्षण आणि क्षमता विकास याद्वारे सहकार्य हा आमच्या परदेश धोरणाचा महत्वाचा भाग आहे. याचबरोबर भागीदार देशांच्या आवश्यकतेनुसार  आणि प्राधान्यानुसार, स्वतः  विकसनशील असूनही, पायाभूत सुविधा,उर्जा, कृषी, शिक्षण, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात, भारत आर्थिक पाठबळ पुरवत आहे.भारताच्या विकासाच्या वाटचालीत, विकसनशील राष्ट्रांचे तंत्रज्ञान, ज्ञान यांचे आदान-प्रदान सहकार्य यांची मुख्य भूमिका राहिली आहे. विकसनशील देशांना, आपल्या  विकास अनुभवात सहभागी करून घ्यायला भारताचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे आणि यापुढेही राहील. 

आपणा सर्वाना अनेक अनेक धन्यवाद.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 



(Release ID: 1540537) Visitor Counter : 72


Read this release in: English