पंतप्रधान कार्यालय

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे १०व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 26 JUL 2018 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2018

 

महामहीम अध्यक्ष सिरिल रामफोसा ,

अध्यक्ष टर्नर ,

अध्यक्ष पुतिन ,

अध्यक्ष शी जिनपिंग ,

आज जग अनेक प्रकारच्या बदलांना सामोरे जात आहे.

नवीन  औद्योगिक तंत्रज्ञान आणि डिजिटल इंटरफेस ज्या नव्या  जगाची निर्मिती करत आहे, ती एक संधी देखील आहे आणि एक आव्हान देखील आहे.

नवीन प्रणाली आणि उत्पादनांमुळे आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.

विकास आणि प्रगतीच्या केंद्रस्थानी नेहमीच लोक आणि मानवी मूल्ये सर्वात महत्वपूर्ण आहेत. म्हणून तंत्रज्ञान विश्वात चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या त्या परिणामांबाबतही आपण गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे ज्यांचा आपल्यासारख्या देशांच्या जनता आणि अर्थव्यवस्थेवर दूरगामी प्रभाव पडेल.

संपूर्ण जग समान पातळीवर असेल. अधिक निकटचा संपर्क हा इंडस्ट्री 4.0 चा एक स्वागतार्ह परिणाम असेल, जे याचा लाभ उठवतील ते अधिक प्रगती करू शकतील. अनेक वंचित घटक तंत्रज्ञान आणि विकासाच्या अनेक अवस्थांच्या पलिकडे मोठी झेप घेऊ शकतील.

मात्र वाढती असमानता आणि वेगवान परिवर्तनाचा समाजावर आणि मानवी मूल्यांवर काय प्रभाव असेल हे सांगणे कठीण आहे.

चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भांडवलापेक्षा अधिक महत्व प्रतिभेचे असेल. उच्च कौशल्य मात्र अंशकालीन काम हा  रोजगाराचा नवीन चेहरा असेल.

औद्योगिक उत्पादन, रचना आणि निर्मितीत मौलिक बदल घडतील. डिजिटल मंच, स्वयंचलन आणि माहितीचा प्रवाह यामुळे भौगोलिक अंतराचे महत्व कमी होईल. डिजिटल मंच, ई-व्यापार आणि बाजारपेठा जेव्हा अशा तंत्रज्ञानाशी जोडल्या जातील तेव्हा एक नवीन प्रकारचा उद्योग आणि व्यापार समोर येतील.

ज्याप्रकारे आणि जितक्या वेगाने, जेवढी संपत्ती , संसाधने आणि विचारांवर नियंत्रण आणू शकतात किंवा नियंत्रण गमावू शकतात ते मानवी इतिहासात यापूर्वी कधी शक्य नव्हते. याचा परिणाम काय होईल हे आपल्याला माहित नाही मात्र हे स्पष्ट आहे की जो काही होईल तो खोल आणि गंभीर असेल.

अशात मला वाटते, की ब्रिक्स चौकटीतील आपली चर्चा आपल्याला चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी तयार करण्यात मदत करेल.

आपण या गोष्टीवर चर्चा करायला हवी की आगामी काळात आपण स्वतःला किती चांगल्या प्रकारे तयार करू शकतो.

एक महत्वपूर्ण प्रश्न रोजगाराचा प्रकार आणि संधींचा असेल. आपल्या अंदाजानुसार पारंपरिक निर्मिती आपल्या युवकांसाठी रोजगाराचे एक प्रमुख माध्यम कायम राहील. दुसरीकडे, आपल्या कामगारांनी त्यांच्या कौशल्यात बदल घडवून आणणे हे देखील खूप गरजेचे असेल.

म्हणूनच, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी आपला दृष्टिकोन आणि धोरणे यात वेगाने बदल करावा लागेल.

शालेय आणि  महाविद्यालयीन अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार करावा लागेल ज्याद्वारे आपले युवक भविष्यासाठी तयार होतील. आपल्याला खूप सजग राहावे लागेल जेणेकरून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे वेगवान बदल किमान त्याच गतीने अभ्यासक्रमात स्थान मिळवू शकतील.

भारतात याच उद्देशाने राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. याचा उद्देश आपल्या युवकांना संबंधित तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य प्रदान करणे हा आहे.

किफायतशीर आणि दर्जेदार, तांत्रिक, व्यावसायिक आणि उच्च शिक्षण, महिला, पुरुष आणि समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात मिळेल हे सुनिश्चित करण्यावर आमच्या सरकारचा भर आहे.

महामहीम ,

नवीन संधींचा योग्य वापर एकीकडे रोजगार मागणाऱ्यांना रोजगार पुरवणारा बनवू शकतो तर दुसरीकडे बेरोजगारांसाठी सामाजिक सुरक्षेची सशक्त व्यवस्था बंधनकारक असेल.

सामाजिक सुरक्षा लाभांच्या पोर्टेबिलिटीमुळे डिजिटल युगात कुशल कामगारांची वहनीयता सुनिश्चित होईल.

महामहीम ,

उत्तम सेवा , उत्पादनाचा दर्जा वाढवणे आणि कामगारांच्या योग्य व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान संशोधन मदत करू शकते.

याबाबत भारतातील आमचा अनुभव खूप सकारात्मक आहे. कामगार कायद्यांचे पालन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा आणि अनेक सरकारी योजनांच्या लाभाचे लाभार्थींना थेट हस्तांतरण तंत्रज्ञानाद्वारे उत्तम सेवेचे उदाहरण आहे.

आजच्या काळात तंत्रज्ञान सर्वात मोठा अडथळा बनला आहे. इंडस्ट्री 4.0  च्या परिणामांची कल्पना करणे देखील कठीण आहे.

अशा प्रकारच्या अडथळ्यांमुळे जागतिकीकरण आणि स्थलांतराचे  उत्तम बहुराष्ट्रीय समन्वय आणि सहकार्याच्या माध्यमातून व्यवस्थापन करावे लागेल.

विशेषतः असंघटित क्षेत्रात कुशल, अर्ध-कुशल आणि अकुशल अशा सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे अधिक महत्वपूर्ण ठरेल.

सायबर सुरक्षेची आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी एकजूट होऊन काम करण्याचे महत्व आपण चांगल्या प्रकारे जाणतो. इंडस्ट्री 4.0 अशी आव्हाने आणि गरजा आणखी वाढवेल.

भारत चौथ्या औद्योगिक क्रांती विषयावर ब्रिक्स देशांच्या साथीने काम करू इच्छितो. या बाबतीत आपल्याला सर्वोत्तम पद्धती आणि धोरणे यांचे आदान प्रदान करायला हवे.

आजकाल होणारे आणि भविष्यात होणाऱ्या तंत्रज्ञान बदलांचे  ब्रिक्स देश आणि संपूर्ण जगासाठीचे महत्व लक्षात घेऊन मी एक सूचना करू इच्छितो की आपल्या मंत्र्यांनी या विषयावर अधिक विस्तृत विचार-विनिमय करावा. आणि आवश्यकतेनुसार तज्ञांची मदतही घ्यावी.

तुम्हा सर्वांचे आभार.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1540536) Visitor Counter : 103


Read this release in: English