पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (29 जुलै 2018)

Posted On: 29 JUL 2018 12:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2018

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याच्या बातम्या येत आहेत. काही काही ठिकाणी, जरा जास्तच आणि सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे चिंता करण्यासारख्या बातम्याही येत आहेत. तर काही भागातले नागरिक अजूनही वरूणराजाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. भारत विशाल आहे आणि त्यामध्ये विविधताही आहे, मात्र या देशात कधी कधी वरूणराजाही आपली पसंती-नापसंतीचे रूप दाखवत असतो. परंतु आपण यामध्ये वरूणराजाला-पावसाला दोष देऊन काय उपयोग? मानवानेच तर निसर्गाकडून संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे, काही काही वेळेस हाच निसर्ग आमच्यावर चांगलाच रूसून बसतो. अशावेळी आपल्यावर सर्वात महत्वाची जबाबदारी येते, ती म्हणजे आपण सर्वांनी निसर्गप्रेमी, निसर्गाचे रक्षक, निसर्गाचे संवर्धक बनले पाहिजे. असे आपण निसर्गस्नेही बनलो तर निसर्गदत्त गोष्टींचा समतोल आपोआपच साधला जाणार आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच एका नैसर्गिक संकटाच्या घटनेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. या घटनेनं संवेदनशील मानवी मनाचा पुरता ठाव घेतला होता. आपण सर्वांनीच ही घटना दूरचित्रवाणीवर पाहिली असेल. थायलंडमधल्या किशोरवयीन फुटबॉल खेळाडूंचा 12 जणांचा संघ आणि त्यांचे प्रशिक्षक फिरण्यासाठी म्हणून एका गुहेमध्ये गेले होते. वास्तविक, त्या गुहेमध्ये जाऊन- फिरून परत येण्यासाठी साधारणपणे काही तासांचा अवधी लागतो. परंतु त्यादिवशी या फुटबॉलपटुंच्या संघाच्या नशिबानं काही वेगळाच खेळ मांडला होता. ही मुलं गुहेमध्ये खूप आत आत गेली. आणि अचानक आलेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळं गुहेच्या प्रवेशव्दारापाशी पाणी जमा झालं, या मुलांचा बाहेर येण्याचा रस्ता बंद झाला. आता बाहेरच येता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर, या मुलांनी गुहेमधल्या एका थोड्याशा उंचावर आश्रय घेतला. बरं त्यांना काही असं एक-दोन दिवस नाही तर तब्बल 18 दिवस आत थांबावं लागलं. अगदी किशोरवयात या मुलांना किती भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं. समोर प्रत्यक्ष मृत्यू दिसत असताना, कशा मानसिक अवस्थेमध्ये त्यांचा क्षण, क्षण गेला असणार, याची आता आपण कल्पना करू शकतो. एकीकडे ही मुलं संकटाशी दोन हात करीत झुंज देत होते आणि दुसरीकडे संपूर्ण विश्वामधली मानवता अगदी एकजूट होऊन ईश्वरदत्त मानवीय गुणांचं प्रकटीकरण करीत होती. अवघ्या जगातले लोक या मुलांना सुखरूप बाहेर येता यावं, यासाठी प्रार्थना करीत होते. आता मुलं कशी आहेत, कुठं आहेत, त्यांची अवस्था काय आहे, काय करताहेत, याची सर्व मार्गानं प्रत्येकजण चौकशी करीत होते. त्यांना कसं बाहेर काढता येईल, याचाच विचार सगळे करीत होते. समजा त्यांना, तातडीनं, वेळेवर मदत नाही मिळाली, मदतकार्यात थोडा जरी विलंब झाला तर या मौसमी पावसाच्या काळात त्यांना किमान काही महिने तरी बाहेर काढणं केवळ अशक्य झालं असतं. सुदैवानं चांगली बातमी आली आणि सगळ्या जगानं जणू सुटकेचा निश्वास सोडला. मुलांना गुहेतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला.

या संपूर्ण घटनाक्रमाकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं जावं, असा विचार माझ्या मनामध्ये आला. मुलांना सोडवण्याचे कार्य कशा पद्धतीनं केलं गेलं. प्रत्येक स्तरावर, पातळीवर जबाबदारीचं सगळ्यांनी जे भान दाखवलं, ते पाहिलं की आश्चर्य वाटतं. यामध्ये सगळ्यांनी, म्हणजे मग त्यामध्ये सरकार असेल, या मुलांचे पालक, माता-पिता असतील, त्यांचे नातेवाईक असतील, प्रसार माध्यमे असतील, देशाचे नागरिक असतील, प्रत्येकाने अतिशय शांतपणे आणि धैर्याने या परिस्थितीला तोंड दिले. हे एक नवलच म्हणावं लागेल. सगळेच्या-सगळेजण एक समूह बनून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी झटत होते. विशेष म्हणजे प्रत्येकाचा अतिशय संयमी व्यवहार पाहिल्यानंतर मला वाटतं की, हा एक शिकण्यासारखा, समजून-जाणून घेण्यासारखा गुण आहे. ज्यांची मुलं आत अडकली होती, त्यांच्या माता-पित्यांना दुःख होत नव्हतं असं नाही किंवा आईला दुःखातिरेकाने अश्रूधारा लागल्या नाहीत असंही नाही. परंतु धैर्य, संयम ठेवून संपूर्ण समाजाने केलेला शांतचित्त व्यवहार, ही एक अतिशय महत्वाची, आपण सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. या मदतकार्याच्या संपूर्ण मोहिमेमध्ये थायलंडच्या नौसेनेच्या एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले. संपूर्ण पाण्याने आणि अंधाराने भरलेल्या, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गुहेत अडकलेल्यांसाठी मोठ्या धाडसाने, धैर्याने मदतकार्य करण्याची बहादुरी या जवानांनी दाखवली, हे संपूर्ण विश्वानं पाहिलं आणि त्याचं नवलही केलं. इतक्या कठीण प्रसंगामध्ये त्यांनी आशा सोडली नव्हती, हेही यामध्ये विशेष आहे. या घटनेने दाखवून दिलं की, मानवता ज्यावेळी एकजूट होते, त्यावेळी अशा अद्भुत गोष्टी घडतात. मात्र त्यासाठी फक्त आपण शांत आणि स्थिर मनानं काम करण्याची आणि ज्यासाठी आपण काम करत आहोत, त्या लक्ष्यावर ध्यान केंद्रीत करण्याची गरज असते.

काही दिवसांपूर्वी आपल्या देशातले प्रिय कवी नीरज जी आपल्याला कायमचं सोडून गेले. नीरज जी यांचं एक वैशिष्ट्य होतं. आशा, विश्वास, दृढसंकल्प, याबरोबरच स्वतःवर त्यांचा खूप विश्वास होता. सर्व हिंदुस्तानींनाही नीरज जी यांची प्रत्येक गोष्ट खूप प्रेरणादायी  आणि ताकद देणारी ठरू शकते. त्यांनी लिहिले आहे की-

अँधियार ढलकर ही रहेगा,

आँधियाँ चाहे उठाओ,

बिजलियाँ चाहे गिराओ,

जल गया है दीप, तो अँधियार ढलकर ही रहेगा !

नीरज जी यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

प्रधानमंत्री जी नमस्कार, माझं नाव सत्यम आहे. मी याचवर्षी दिल्ली विद्यापीठामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलाय.  आमच्या शाळेच्या बोर्ड परीक्षेच्यावेळी आम्ही परीक्षेचा तणाव कसा झेलायचा आणि शिक्षण याविषयी आपण चर्चा केली होती. आता माझ्यासारख्या विद्यार्थ्‍यांना आपण काय संदेश देणार आहात?

तसं पाहिलं तर जुलै आणि ऑगस्ट हे महिने शेतकरी बंधू आणि सर्व नवयुवकांसाठी खूप महत्वाचे असतात. कारण याच काळामध्ये महाविद्यालयांच्या प्रवेशाची गडबड असते. सत्यमसारखे लाखो युवक शालेय जीवनातून बाहेर पडून महाविद्यालयामध्ये प्रवेश करत असतात. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने परीक्षा, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका यांच्यामध्ये व्यतीत होतात तर एप्रिल आणि मे हे दोन महिने सुट्टीतल्या मौज मस्तीमध्ये निघून जातात. त्याच्या जोडीला परीक्षांचे निकाल, जीवनाच्या भविष्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी म्हणजेच करिअर निवडीसाठी हा काळ महत्वाचा असतो. जुलै महिना युवकांच्या दृष्टीने वेगळाच असतो. युवावर्ग आयुष्यातल्या एका नव्या मार्गावर पाऊल टाकत असतो. अशावेळी आपला फोकस प्रश्नावरून दूर होऊन ‘कट-ऑफ’ वर येतो. विद्यार्थ्‍याचे लक्ष घरामधून आता वसतिगृहाकडे लागते. विद्यार्थी आपल्या पालकांच्या छत्र - छायेतून बाहेर पडून प्राध्यापकांच्या छत्राखाली आलेले असतात. माझे युवामित्र महाविद्यालयीन जीवनाच्या प्रारंभाविषयी अतिशय उत्साही असतील, आनंदी असतील, याची मला अगदी खात्री आहे. पहिल्यांदाच आपलं घर सोडून बाहेर रहायला जायचं, आपलं गाव सोडून दुसरीकडे जायचं, एका सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून स्वतःलाच आपला सारथी व्हावं लागणार आहे. कितीतरी युवक आपल्या जीवनाला एक वेगळी, नवी दिशा देण्यासाठी पहिल्यांदाच आपलं घर सोडून असं बाहेर पडणारे असतात. एव्हाना काही युवकांचं नवीन महाविद्यालय सुरूही झालं असेल. काहीजण महाविद्यालयामध्ये जाण्याची तयारी करीत असतील. आपल्या सर्वांना मी इतकंच सांगू इच्छितो की, शांतचित्त रहा आणि या जीवनाचा आनंद घ्या. आपल्या अंतर्मनाचा असा आवाज असतो, त्याचं ऐकून भरपूर आनंद तुम्ही घ्या. अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय तर आपलं पानही हलणार नाही. अभ्यास तर करावाच लागणार आहे. परंतु शिकतानाच नवनवीन गोष्टी शोधून काढण्याची नैसर्गिक उत्सुकता तुमच्यामध्ये कायम राहिली पाहिजे. जुन्या मित्रांचं एक विशेष मोल आहे. बालपणीच्या मित्रांचा हा ठेवा अमूल्य आहे. त्याचबरोबर नवे मित्र निवडणे, मैत्री करणे आणि ती कायम टिकवणे या सगळ्या  गोष्टींसाठी एकप्रकारचा समुजतदारपणा आपल्याकडे असला पाहिजे. काहीतरी नवीन जरूर शिका. नवनवीन कौशल्ये विकसित करून घ्या. नव्या भाषा शिका. जे युवक आपल्या घरापासून दूर, बाहेर अन्य शहरांमध्ये शिकायला जाणार आहेत, त्यांनी त्या नव्या ठिकाणची वेगवेगळी स्थळे शोधावीत. त्यांच्याविषयी माहिती घ्यावी. तिथल्या लोकांविषयी माहिती घ्यावी, तिथली भाषा, संस्कृती जाणून घ्यावी. त्या परिसरातल्या पर्यटन स्थळांना भेटी देऊन, त्यांची माहिती घ्यावी.

आयुष्यातल्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ करत असलेल्या सर्व नवयुवकांना माझ्या शुभेच्छा आहेत. आत्ता ज्यावेळी महाविद्यालयांच्या जीवनाविषयी चर्चा सुरू होती, त्यावेळी मी बातम्या पहात होतो. मध्यप्रदेशातल्या एका अतिशय गरीब कुटुंबामधला आशाराम चौधरी नावाच्या एका विद्यार्थ्‍याने  जीवनात अनेक संकटांशी सामना करीत कसे शैक्षणिक यश मिळवले, याची बातमी मी पाहत होतो. आशाराम जोधपूरच्या ‘एम्स’साठी असलेली एमबीबीएसची प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्याचे वडील कचरा वेचून आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करतात. या यशाबद्दल मी आशारामचे अभिनंदन करतो. गरीब कुटुंबांमधले असे कितीतरी गुणवंत विद्यार्थी आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी खूप काही करून दाखवलं आहे. या विद्यार्थ्‍यांचं  यश आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. मग तो दिल्लीचा प्रिन्स कुमार असो, त्याचे वडील ‘डीटीसी’मध्ये बसचालक आहेत, किंवा मग कोलकाताचा अभय गुप्ता असो. या विद्यार्थ्‍याने  पदपथावर असलेल्या दिव्याखालच्या प्रकाशामध्ये आपला अभ्यास केला. अहमदाबादची कन्या आफरीन शेख़ आहे, तिचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. नागपूरची कन्या खुशी असेल, तिचेही वडील शाळेच्या बसचे चालक आहेत किंवा मग हरियाणाचा कार्तिक असेल, त्याचे वडील चौकीदारीचे काम करतात, झारखंडच्या रमेश साहूचे वडील विटभट्टीवर श्रमिक आहेत. स्वतः रमेशही जत्रा-मेळाव्‍यांमध्ये खेळणी विकण्याचं काम करत होता. तसंच गुडगावची  दिव्यांग कन्या अनुष्का पांडा, ही जन्मतःच ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी’नावाच्या एका अनुवंशिक आजाराने त्रस्त आहे.  या सर्वांनी आपल्या दृढसंकल्पाने आणि चिकाटीने येत असलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करून संपूर्ण जगाने पहात रहावं, अशी कामगिरी केली आहे. आपण  सभोवती नजर टाकली तर आपल्याला अशी अनेक उदाहरणे दिसून येतील.

देशाच्या कोणत्याही भागात, अगदी कानाकोपऱ्‍यात घडलेली एखादी चांगली घटना, माझ्या मनाला ऊर्जा देत असते. प्रेरणा देत असते. आणि ही घटना जर अशा नवयुवकांशी संबंधित असेल तर अशावेळी  नीरज जी यांच्या एका गोष्टीचं मला स्मरण होतं. माझ्या मते, आपल्या जीवनाचं ध्येय हेच तर असतं. नीरज जी म्हणतात -

गीत आकाश को धरती का सुनाना है मुझे,

हर अँधेरे को उजाले में बुलाना है मुझे,

फूल की गंध से तलवार को सर करना है,

और गा-गा के पहाड़ों को जगाना है मुझे !

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी माझी नजर एका बातमीवर पडली, त्यामध्ये लिहिले होते, ‘‘ दोन युवकांनी मोदी यांचं स्वप्न साकार केलं!’’ बातमी पूर्ण वाचल्यावर समजलं की, आज आमचे युवक तंत्रज्ञानाचा उपयोग स्मार्ट आणि सर्जनशीलतेनं कसा करतात आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न कसा करतात, याची ती बातमी होती. घटना अशी होती की, अमेरिकेतल्या सॅन जोस शहराला ‘तंत्रज्ञानाचं केंद्रस्थान’ मानलं जातं. एकदा मी तिथल्या भारतीय युवकांशी चर्चा करत होतो. त्यावेळी मी त्यांना आवाहन केलं की, तुम्ही आपल्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा, हुशारीचा आपल्या भारतासाठी कसा वापर करू शकता, यावर विचार करा आणि मुद्दाम थोडा वेळ काढून काहीतरी नवीन करा. ‘ब्रेन- ड्रेन’च्या समस्येला ‘ब्रेन-गेन’चे उत्तर मिळू शकेल, यासाठी मी हे आवाहन केलं होतं. रायबरेलीचे दोन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक, योगेश साहू जी आणि रजनीश वाजपेयी जी यांनी माझं हे आवाहन स्वीकारून एक अभिनव कल्‍पना प्रत्यक्षात आणली. आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करून योगेश जी आणि रजनीश जी यांनी मिळून एक ‘स्मार्टगांव अॅप’ तयार केलं आहे. हे अॅप केवळ गावातल्या लोकांना संपूर्ण जगाशी जोडतेय असं नाही तर या अॅपच्या माध्यमातून कोणतीही माहिती आणि सूचना आपल्या मोबाईलवरच मिळू शकते. रायबरेलीमधल्या तौधकपूर गावचे रहिवासी, ग्राम प्रमुख-सरपंच, जिल्हा दंडाधिकारी, मुख्य जिल्हा अधिकारी, या सर्वांनी या अॅपचा उपयोग करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. हे नवं अॅप एक प्रकारे गावामध्ये डिजिटल क्रांती आणण्याचं  काम करत आहे. गावामध्ये जे जे विकास कार्य केलं  जातं , त्याची माहिती या अॅपच्या माध्यमातून नोंदवली जाते. कामाविषयी माहिती घेणं , कामावर लक्ष ठेवणं  ही कामं  आता अॅपमुळं  अगदी सोपी, सुकर झाली आहेत.

या अॅपमध्ये गावातल्या सर्वांच्या दूरध्वनी क्रमांकाची माहिती आहे, बातम्यांचा विभाग आहे, होत असलेल्या, होणाऱ्‍या कार्यक्रमांची सूची आहे, आरोग्य केंद्र आणि माहिती केंद्राचा तपशील यामध्ये आहे. विशेष म्हणजे हे अॅप शेतकरी बंधूंसाठीही खूप लाभदायक आहे. शेतकरी वर्गासाठी त्यांच्या उत्पादनाला नेमके किती बाजारमूल्य कधी मिळणार आहे, याची नेमकी माहिती अॅपच्या माध्यमातून मिळते, म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्‍यांसाठी हे अॅप ‘बाजारपेठे’सारखं  काम करत आहे.

या गोष्टीकडे आपण जर अगदी काळजीपूर्वक विचार करून पाहिलं  तर आपल्या लक्षात येईल की, हे युवक अमेरिकेत वास्तव्य करतात. त्यांचं  आता तिथल्याप्रमाणे राहणीमान आहे आणि विचारही ते तसाच करतात. हे युवक काही वर्षांपूर्वी भारत सोडून परदेशी गेले आहेत. तरीही त्यांना आपल्या गावातल्या अगदी बारीक-सारीक गोष्टीही चांगल्या ठाऊक आहेत. आपल्या देशातल्या समस्या त्यांना माहीत आहेत आणि आपल्या गावाशी असलेलं भावनिक नातं, या युवकांचं आजही कायम आहे. म्हणूनच कदाचित आपल्या गावाला नेमकं काय हवं आहे, याची जाणीव त्यांना आहे आणि त्याला अनुसरून त्यांनी हे अॅप बनवलंय. आपलं गावं, आपली पाळंमुळं यांच्याशी असलेली त्यांची नाळ अद्याप तुटलेली नाही.  त्याचबरोबर आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करण्याची आंतरिक इच्छा प्रत्येक हिंदुस्तानींच्या मनामध्ये स्वाभाविकपणे असतेच परंतु कधी कधी वेळेअभावी तर कधी अतिदूरच्या अंतरामुळे, तर कधी परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे त्यावर अगदी पातळ पापुद्र्याप्रमाणे जणू राख बसलेली असते. मात्र एखाद्या लहानशा ठिणगीमुळेही मनातले भाव प्रगट होण्यास मदत मिळते. ठिणगीच्या हलक्याशा स्पर्शानेही सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सामोऱ्‍या  येतात आणि त्या भूतकाळातल्या दिवसांकडे जणू आपल्याला अगदी खेचून नेतात. असं काही आपल्याबाबतीत कधी ना कधी घडलं असेल काय, ते आपणही सर्वांनी आठवावं. कोणत्याही स्थितीमुळे, परिस्थितीमुळे किंवा लांबच्या अंतरामुळे आपणही कोणापासून तरी पूर्णपणे वेगळं झालो आहोत की, आपल्या नात्यांवर असाच हलकासा पापुद्रा निर्माण झाला आहे, याचा आपण जरूर विचार करावा.

‘‘आदरणीय प्रधानमंत्री जी नमस्कार, मी संतोष काकडे, महाराष्ट्रातल्या कोल्हापूर या गावातून बोलतोय. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे. दरवर्षी खूप उत्साहामध्ये आणि भक्तीभावाने वारी साजरी केली जाते. जवळपास 7 ते 8 लाख वारकरी यामध्ये सहभागी होत असतात. वारीसारख्या अतिशय आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची माहिती देशातल्या इतर जनतेलाही मिळावी, यासाठी आपण वारीविषयी जास्त माहिती द्यावी.’’

संतोष जी आपण फोन केलात, त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद!

अगदी खरंय तुमचं म्हणणं, पंढरपूरची वारी म्हणजे ही एक अद्भूत यात्रा आहे. मित्रांनो, यावर्षी आषाढी एकादशी 23 जुलै रोजी होती. या दिवशी पंढरपूरला खूप प्रचंड प्रमाणावर वारीचा उत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. पंढरपूर हे  महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातलं  एक पवित्र शहर आहे. आषाढी एकादशीच्या जवळपास 15-20 दिवस आधीच वारकरी म्हणजे तीर्थयात्री पालख्यांसमवेत पंढरपूरची यात्रा करण्यासाठी चालत निघतात. या यात्रेला ‘वारी’ असं म्हणतात आणि त्यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासारख्या महान संतांच्या पादुका पालखीमध्ये ठेऊन विठ्ठल नामाचा गजर करत, टाळ मृदुंग वाजवत पंढरपूरच्या दिशेने वारकरी पायी निघतात. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम आहे. विठ्ठल, ज्याला विठोबा अथवा पांडुरंग असेही म्हणतात, त्यांच्या दर्शनासाठी तिर्थयात्री पंढरपूरला पोहोचतात. विठ्ठल गरीब, वंचित, पीडित यांच्या हिताचं रक्षण करणारा देव आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये पांडुरंगाविषयी अपार श्रद्धा, भक्ती आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये जावं आणि तिथला महिमा, सौंदर्य यांचं वर्णन करावं. तिथं गेल्यानंतर मिळणारा आध्यात्मिक आनंद हा एक वेगळीच अनुभूती आहे. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की, तुम्हाला कधी संधी मिळालीच तर तुम्ही एकदा तरी जरूर पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम.... अशा अगणित संतांची शिकवण आजही महाराष्ट्रातल्या जन-सामान्यांना दिली जात आहे. ही शिकवण अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळं देत आहे. आणि हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्‍यात हीच संत परंपरा प्रेरणा देत आली आहे. मग त्यासाठी भारूडाचे माध्यम वापरले असेल अथवा अभंग असतील. या संतांच्या साहित्यामधून सद्‌भावना, प्रेम आणि बंधुभाव यांचा महत्वपूर्ण संदेश दिला गेला आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात समाजाला लढण्याची ताकद देण्याचा मंत्र या संतांनी दिला. समाज विघातक गोष्टी ज्या ज्यावेळी होत असत, त्या त्यावेळी समाजाला रोखण्याचे, समाजाला जाब विचारण्याचे इतकंच नाही तर समाजाला आरसा दाखवण्याचं काम या संतांनी केलं. आणि जुन्या कुप्रथांचे समाजातून कायमचं  उच्चाटन करण्याचं सत्कार्यही त्यांनी केलं. लोकांच्या मनावर करुणा, समानता आणि शूचितेचा संस्कार बिंबवला. आपली भारत भूमी बहुरत्ना वसुंधरा आहे. ज्याप्रमाणे आपल्‍या  संतांची एक महान परंपरा आहे, त्याचप्रमाणे सामर्थ्‍यवान माता-भारतीला समर्पित महापुरूषांनी या भूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिली आहे. आपलं अवघं जीवन मातृभूमीसाठी समर्पित करणारे महापुरूष या भूमीचे पूत्र आहेत. असेच एक महापुरूष म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. त्यांनी अनेक भारतीयांच्या मनावर आपल्या कार्याने अमिट ठसा उमटवला आहे. 23 जुलै रोजी टिळक यांची जयंती आणि दिनांक 1 ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी असते, यानिमित्त आपण त्यांचं  पुण्यस्मरण करूया. लोकमान्य टिळक म्हणजे साहस आणि आत्मविश्वास यांचा जणू सागर होते. ब्रिटिश शासनाला त्यांच्या चुकांचा आरसा दाखवण्याची शक्ती आणि बुद्धिमत्ता टिळक यांच्याकडेच होती. इंग्रज लोकमान्य टिळकांना अतिशय घाबरत होते. त्यांच्यावर 20 वर्षांमध्ये तीनवेळा राजद्रोहाचा खटला चालवून आरोप सिद्ध करण्याचा  इंग्रजांनी अटोकाट प्रयत्न केला. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. लोकमान्य टिळक आणि अहमदाबाद इथंल्या त्यांच्या पुतळ्याविषयी घडलेली एक रंजक घटना आज मी देशवासियांना सांगू इच्छितो.

ऑक्टोबर, 1916 मध्ये लोकमान्य टिळक जी अहमदाबादमध्ये आले होते. म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्या काळात अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी 40 हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यांच्या या भेटीमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांना टिळक यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. या भेटीत सरदार वल्लभ भाई पटेल, लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्वामुळे, विचारांमुळे अतिशय प्रभावित झाले होते. 1 ऑगस्ट, 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचा देहांत झाला, त्‍यानंतर पटेल यांनी निर्णय घेतला की, अहमदाबादमध्ये टिळक यांचं स्मारक बनवावं. त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल अहमदाबाद नगर पालिकेचे महापौर म्हणून निवडून आले होते. त्यांनी ताबडतोब लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी शहरातल्या व्हिक्टोरिया गार्डनचं स्थान निश्चित केलं. या स्थानाला ब्रिटनच्या महाराणीचं नाव होतं. त्यामुळं स्वाभाविकपणे ब्रिटिश नाराज झाले. जिल्हाधिकारीही टिळक यांचं स्मारक व्हिक्टोरिया गार्डनमध्ये करण्यासाठी सातत्यानं मनाई करू लागले. परंतु ते सरदार साहेब होते. ते नमणारे थोडेच होते. टिळकांच्या स्मारकासाठी निवडलेल्या जागेसाठी ते ठाम राहिले. सरदार पटेलांनी निक्षून सांगितलं, मला आपल्या पदाचा त्याग करावा लागेल, तरी हरकत नाही, परंतु काही झालं तरी लोकमान्य टिळकांचा पुतळा, स्मारक म्हणून इथं उभा करण्यात येणारच.

अखेरीस टिळकांचा पुतळा बनून तयार झाला आणि सरदार साहेबांनी दिनांक 28 फेब्रुवारी, 1929 रोजी, इतर कोणाकडून नाही तर, महात्मा गांधी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्‌घाटन करवून घेतलं. या उद्‌घाटन समारंभामध्ये पूज्य बापू आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘सरदार पटेल आल्यापासून अहमदाबाद नगर पालिकेला केवळ एक व्यक्ती मिळाली नाही तर एक हिंम्मत मिळाली आहे. त्यांच्या धाडसामुळेच आज टिळक यांच्या पुतळ्याचे-स्मारकाचे निर्माणकार्य होवू शकले आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आणखी एक सांगतो, हा पुतळाही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तसाच दुर्मिळ आहे. लोकमान्य टिळक एका खुर्चीवर बसले आहेत, टिळक यांच्या बरोबर खालच्या बाजूला ‘‘स्वराज हमारा जन्मसिद्ध अधिकार है’’ असं लिहिलं आहे. मी आपल्याला हे सगळं सांगतोय तो कालखंड इंग्रजांच्या सत्तेचा होता, हे इथं महत्वाचं आहे. लोकमान्य टिळक जी यांच्या प्रयत्नांमुळेच तर सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा सुरू झाली. सार्वजनिक गणेश उत्सव परंपरागत श्रद्धा आणि भक्तीबरोबरच समाज जागृतीचे, सामूहिक कार्याचं, लोकांमध्ये समरसता आणि समानतेचा भाव निर्माण करण्याचं एक प्रभावी माध्यम बनलं  होतं. तसं पाहिलं तर त्या विशिष्ट कालखंडामध्ये इंग्रजांविरूद्ध एकजूट होऊन लढण्याची आवश्यकता होती. आणि टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवांमुळे समाजातल्या जाती आणि संप्रदायांच्या भिंती तोडून सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं. काळाच्या ओघामध्ये या सर्व उत्सवांच्या आयोजनाची लोकप्रियता वाढत गेली यावरूनच लक्षात येतं की, आपल्या प्राचीन परंपरा आणि इतिहासांमधल्‍या  वीर नायकांबद्दल आजच्या युवा पिढीमध्येही खूप आकर्षण आहे. आज अनेक शहरांमध्ये तर जवळपास प्रत्येक गल्ली-बोळांमध्ये गणेश उत्सवांचे मंडप उभारलेले दिसून येतात. गल्लीतले सर्व परिवार मिळून गणपती उत्सवाचे आयोजन करतात. एक समूह, गट या रूपात सगळे मिळून काम करतात. इथंही  आपल्या युवकांना चांगली संधी मिळते, त्यांचे नेतृत्वगुण, उत्सव संयोजक, कार्यक्रम आयोजक, समन्वयक म्हणून त्यांच्यामधले गुण विकसित होऊ शकतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो ! गेल्या वेळेस तर मी आग्रह केला होताच आता लोकमान्य टिळक यांचं आपण स्मरण करत आहोत, त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आग्रहाने आपल्याला सांगतो की, आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात, आनंदात गणेश उत्सव साजरा करावा. अगदी मनापासून सगळे कार्यक्रम करावेत. परंतु सर्वांनी ‘इको-फ्रेंडली’ म्हणजेच पर्यावरण स्नेही गणेश उत्सव साजरा करावा, असाही माझा आग्रह असणार आहे. गणेशजींच्या मूर्तीपासून ते सजावटीच्या सामानापर्यंत सगळं काही पर्यावरण स्नेही असावे. आणि मला तर वाटतं की, प्रत्येक शहरामध्ये ‘पर्यावरण स्नेही- इको फ्रेंडली’ गणेश उत्सवाची एक वेगळीच स्पर्धा घेतली जावी. त्यामधल्या विजेत्यांना चांगली पारितोषिकं देण्यात यावीत. मला तर वाटतं की, ‘मायगव्ह’ आणि ‘नरेंद्र मोदी अॅप’ यांच्यावरही पर्यावरण स्नेही गणेश -उत्सवाविषयी अनेक गोष्टींचा व्यापक प्रचार करता येवू शकेल. आपली गोष्ट मी नक्कीच सर्व लोकांपर्यत पोहोचवेन. लोकमान्य टिळक यांनी देशवासियांमध्ये आत्मविश्वास जागृत करणारी घोषणा दिली होती. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’’. आज प्रत्येक भारतीयाला सुशासन आणि विकासकार्याचे चांगले परिणाम मिळण्याची आवश्यकता आहे. हीच गोष्ट नवभारताच्या निर्माणाचे कार्य करणार आहे. टिळक यांच्या जन्मानंतर 50वर्षांनी अगदी त्याच दिवशी म्हणजे दिनांक 23 जुलै रोजी भारत मातेच्या आणखी एका सुपुत्राचा जन्म झाला. त्या पुत्रानं आपल्या आयुष्याचं बलिदान या भूमीसाठी दिलं. देशवासियांना स्वातंत्र्यामध्ये मोकळा श्वास घेता यावा, यासाठी या सुपुत्रानं बलिदान दिलं. मी चंद्रशेखर आजाद यांच्याविषयी बोलतोय. या ओळी कानावर पडल्यानंतर देशभक्तीची प्रेरणा मिळणार नाही, असा भारतामध्ये एकही नवयुवक सापडणार नाही.

‘‘सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,

देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है’’

 

या ओळींनी अशफाक़ उल्लाह खान, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या अनेक नवयुवकांना त्यावेळी प्रेरित केलं होतं. चंद्रशेखर आझाद यांची बहादुरी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांच्याकडे असलेली धडाडी अनेक युवकांना प्रेरणादायी ठरली आहे. आझाद यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, परंतु ते कधीच विदेशी शासनापुढे झुकले नाहीत. चंद्रशेखर आझाद यांचं गाव मध्यप्रदेशातल्या अलीराजपूर हे आहे. मला या गावाला भेट देण्याची संधी मिळाली हे मी माझं  भाग्य मानतो. अलाहाबादच्या चंद्रशेखर आझाद पार्कमध्येही श्रद्धासुमन अर्पित करण्याची संधी मला मिळाली. विदेशींच्या गोळीने मरण्याची इच्छाही चंद्रशेखर आझाद या वीराची नव्हती, स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत लढत राहणार आणि बलिदान द्यावं लागलं तरी स्वातंत्र्य मिळवूनच बलिदान देणार, अशी या वीरानं जणू  प्रतिज्ञा केली होती. हे त्यांचे एक वैशिष्ट्य होतं. पुन्हा एकदा भारत मातेच्या या दोन्ही महान सुपुत्रांना - लोकमान्य टिळक जी आणि चंद्रशेखर आझादजी यांना मी श्रद्धापूर्वक नमन करतो.

अलिकडेच काही दिवसांपूर्वी फिनलँडमध्ये झालेल्या ज्युनियर अंडर -20 विश्व अॅथेलेटिक्स विजेतेपदाच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताची पराक्रमी कन्या आणि एका भूमीपुत्राची कन्या हिमा दास हिने सुवर्ण पदक जिंकून एक नवा इतिहास घडवला आहे.

देशाची आणखी एक कन्या एकता भयान हिने माझ्या पत्राला उत्तर म्हणून इंडोनेशियामधून मला ई-मेल पाठवला आहे. सध्या एकता तिथं एशियन क्रीडा स्पर्धेची तयारी करत आहे. आपल्या ई-मेल मध्ये एकतानं लिहिलं आहे की, कोणाही अॅथलीटच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा क्षण असतो, तो म्हणजे, ज्यावेळी तो खेळाडू हातामध्ये तिरंगा पकडतो तो क्षण. आणि मी हाती तिरंगा पकडला, त्याचा मला अभिमान वाटतो. मी करून दाखवलं, याचा अभिमान वाटतो.’’ एकता, आम्हा सर्वांनाही तुझा अभिमान वाटतो. आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल आम्हाला तुझ्याविषयी अभिमान वाटतो. ट्युनिशियामध्ये विश्व पॅरा अॅथलेटिक्स ग्रॅंड प्रिक्स 2018 मध्ये एकतानं सुवर्ण आणि कांस्य पदकं जिंकली आहेत. तिच्या या यशाचं विशेष कौतुक यासाठी आहे की, एकतानं आपल्यापुढं असलेल्या आव्हानांनाच यशाचं माध्यम बनवलं. एकता भयान या देशाच्या सुकन्येला 2003 मध्ये  रस्त्यावर झालेल्या एका अपघातामध्ये खूप जबरदस्त दुखापत झाली. अपघातानंतर तिच्या शरीराचा अर्धा भाग काम करेनासा झाला. तरीही ती हिंम्मत हरवून बसली नाही. तिनं स्वतःला इतकं मजबूत बनवलं आणि आज हे यश मिळवून दाखवलं. आणखी एक दिव्यांग योगेश कठुनिया जी यांनी बर्लिन पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये थाळीफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकून नवीन जागतिक विक्रम नोंदवला. त्यांच्याच बरोबर सुंदर सिंह गुर्जर यांनी ही भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. एकता भयान जी, योगेश कठुनिया जी आणि सुंदर सिंह जी यांनी दाखवलेल्या अतुल्य धाडसाचे आणि आव्हानांना सामोरं जाऊन जिंकण्याच्या निर्धाराचे मी खूप कौतुक करतो. आपल्या या निर्धाराला सलाम करतो. आपल्या सर्वांचे अभिनंदनही करतो. आपण अशीच पुढे वाटचाल करावी, खेळत रहा, विकसित होत रहा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्‍ट  महिन्यात अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर विविध उत्सवही या महिन्यात येतात. परंतु पावसाळी हवामानामुळं काही वेळेस घरामध्ये आजारपणाचा प्रवेशही होत असतो.  आपल्या सर्वांच्या उत्तम स्वास्थाची मी कामना करतो. देशभक्तीची प्रेरणा जागृत करत असलेल्या या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक युगांपासून चालत आलेल्या अनेक उत्सवांसाठी आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा ‘मन की बात’ मध्ये नक्की भेटूया. जरूर भेटूया!

खूप-खूप धन्यवाद!!

 

 

S.Tupe/AIR/D.Rane



(Release ID: 1540529) Visitor Counter : 860


Read this release in: English