गृह मंत्रालय

युवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 26 JUL 2018 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै  2018

 

तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनांचा वापर कामकाजात करता यावा यासाठी पोलिसांनी आयआयटी आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी संलग्न व्हावे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी दिल्लीत आयोजित, युवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी आमंत्रित केले जावे अशी सूचनाही त्यांनी केली.

सर्व संस्थांनी परस्पर समन्वय राखून प्रयत्न केले आणि आपआपल्या क्षेत्रातील समस्या, मुद्दे आणि यशोगाथांची देवाण-घेवाण केली तर आपण देशात कायदा आणि व्यवस्था सुरळीत राखणे, दहशतवाद यासह अनेक महत्वाच्या समस्या प्रभावीपणे सोडवू शकू असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाला लाभलेल्या विशाल समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीसांच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याप्रती सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देशभरातील 100 पेक्षा जास्त पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी, या परिषदेच्या समारोप समारंभाला उद्या संबोधित करतील.

 

 

S.Tupe/M.Pange/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1540303) Visitor Counter : 81


Read this release in: English