पंतप्रधान कार्यालय

रवांडा दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य

Posted On: 23 JUL 2018 11:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  जुलै  2018

 

महामहिम राष्ट्रपती,

पॉल कगामे,

आदरणीय प्रतिनिधी,

प्रसारमाध्यम सदस्य,

भारताचे पंतप्रधान रवांडाला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझे मित्र, राष्ट्रपती कगामे यांच्या निमंत्रणानुसार मला या देशात येता आले, हे माझे सौभाग्य आहे.

राष्ट्रपतींच्या मैत्रीपूर्ण शब्दांबद्दल तसेच माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे उत्साहाने स्वागत आणि सन्मान केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती स्वत: आले. त्यांची ही कृती म्हणजे संपूर्ण भारताचा सन्मान आहे. उद्या सकाळी किगारी जेनोसाईड स्मृती स्थळावर मी आदरांजली अर्पण करणार आहे. 1994 सालच्या जेनोसाईडनंतर रवांडाने जी शांतता प्रक्रिया स्वीकारली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आणि अद्वितीय अशी आहे. राष्ट्रपती कगामे यांच्या कुशल नेतृत्वाखाली तसेच प्रभावी आणि सक्षम शासनामुळे रवांडा देश आज वेगाने आर्थिक प्रगती करत आहे.

मित्रहो,

भारत आणि रवांडामधिल संबंध काळाच्या कसोटीवर चोख ठरले आहेत. रवांडाच्या आर्थिक विकासात आणि राष्ट्रीय विकासाच्या यात्रेमध्ये भारत हा आपला विश्वासू साथीदार ठरला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. रवांडाच्या विकास यात्रेतील आमचे योगदान यापुढेही कायम राहील. आम्ही प्रशिक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रकल्प सहाय्य अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहोत. वित्त, व्यवस्थापन, ग्राम विकास आणि आयसीटीसारख्या क्षेत्रांमध्ये आम्ही रवांडासाठी अग्रगण्य भारतीय संस्थांमध्ये प्रशिक्षण प्रदान करतो. क्षमता वृद्धीसाठीचे हे योगदान आम्ही आणखी वाढवू इच्छितो. आजच आम्ही लाईन्स ऑफ क्रेडिट आणि प्रशिक्षण या विषयी 200 दशलक्ष डॉलर्सचे करार केले आहेत. आज आम्ही चर्मोद्योग तसेच दुग्ध व्यवसाय विषयक संशोधनासह विविध क्षेत्रात दोन्ही देशांमधिल सहकार्य वाढविण्यासाठी चर्चा केली. या संदर्भात राष्ट्रपतींसोबत रवेरु या आदर्श गावाला मी उद्या भेट देणार आहे, या भेटीबाबत मी फारच उत्सुक आहे. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आमची बहुसंख्य जनता या गावांमध्येच वसली आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवन अधिक सुधारण्यासाठी मी रवांडामधील अनुभव आणि राष्ट्रपतींनी सुरु केलेले उपक्रम यांच्या माध्यमातून माहिती मिळवू इच्छितो. भारत आणि रवांडामधील व्यापक विकासात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उत्पादन क्षेत्र, आतिथ्यशीलता आणि पर्यटनासह अनेक क्षेत्रे आम्ही प्रस्तावित केली आहेत. आम्ही आमच्या व्यापार तसेच गुंतवणुक संबंधांना अधिक दृढ करु इच्छितो आणि म्हणूनच राष्ट्रपती कगामे आणि मी उद्या दोन्ही देशांमधील उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या मान्यवरांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्या सूचना विचारात घेणार आहोत.

मित्रहो,

आम्ही लवकरच रवांडामध्ये उच्चायोग सुरु करत आहोत, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये अधिक घनिष्ठ संवाद शक्य होईल तसेच उच्चायोग, पारपत्र तसेच व्हिसासह इतर अनेक सुविधा उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील परस्पर संबंध नव्या उंचीवर पोहोचतील अशी आम्हाला आशा वाटते.

मी पुन्हा एकदा राष्ट्रपतींचे आभार मानतो आणि सव्वाशे कोटी भारतीयांतर्फे रवांडाच्या नागरिकांना शुभेच्छा देतो.

धन्यवाद !

 

 

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar


(Release ID: 1539802) Visitor Counter : 93
Read this release in: English