पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विद्युतीकरण आणि सौभाग्य योजनेच्या  लाभार्थींशी साधला संवाद

Posted On: 19 JUL 2018 9:57PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 19 जुलै 2018

 

ज्या गावांमध्ये अलिकडेच पहिल्यांदा वीज पोहोचली, अशा 18 हजार गावांतल्या बंधू- भगिनींशी मला संवाद साधण्याची संधी आज मिळाली आहे. अनेक दशकं उलटली तरी अंधाराच्या साम्राज्यामध्ये वास्तव्य करणारे माझे हे बंधू कदाचित वेगळा विचार करीत असतील. आपल्या गावामध्ये कधी काळी वीज येईल की नाही. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट असताना आपलेही गाव विजेच्या प्रकाशाने उजळून निघेल की नाही, याविषयी त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाल्या असतील. परंतु आपल्या सर्वांच्या गावांमध्ये वीज आली आहे. आपल्या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठीही खूप आनंदाची गोष्ट आहे.  गावामध्ये वीज आल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप मोठे आणि चांगले परिवर्तन घडत आहे. त्याचा आनंद आपल्या चेह-यावर आलेल्या हास्यातून स्पष्ट दिसून येतो आहे. हे घडणारे परिवर्तन म्हणजे खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. ज्या लोकांचा जन्म प्रकाशात म्हणजे, ज्याठिकाणी वीज आहे, अशा ठिकाणी झाला आहे, ज्यांनी अंधार कधी अनुभवला नाही, ज्यांना अंधारामध्ये कधी रहावे लागले नाही, त्यांना प्रकाशाचे महत्व कसे ठावूक असणार आणि अंधार नाहीसा होणे, ही किती महत्वाची, मोठी गोष्ट आहे, हे त्यांना कसे काय जाणवणार? ज्यांनी कधी अंधारामध्ये आयुष्य कंठलं नाही, त्यांना अंधार संपुष्टात आल्यानंतर मिळत असलेल्या आनंदाविषयी तरी कसं काय ठावूक असणार आहे. प्रकाशाचे महत्वही त्यांना असणार नाही. आपल्या उपनिषदांमध्ये म्हटले आहे की, ‘‘ तमसो मा ज्योतिर्गमय’’ म्हणजे अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.

ज्या लोकांनी आपले जवळपास संपूर्ण आयुष्य अंधःकाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रवास केला, त्या लोकांशी बोलण्याची संधी मला आज मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या अंधारानंतर आत्ता कुठे या गावांमध्ये प्रकाश आला आहे. आपल्या सगळ्यांकडेच दिवसाचे 24 तास असतात. माझ्याकडेही 24 तासांचा वेळ आहे, आपल्याकडेही 24 तास आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्याला या मिळालेल्या 24 तासांतला जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग व्हावा, असे वाटत असते. जास्तीत जास्त वेळेमध्ये काम झाले तर आपला, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा आणि त्याचबरोबर राष्ट्राचाही विकास होणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. परंतु या सर्वांना मिळत असलेल्या 24 तासांपैकी 10 ते 12 तास कायमचे काढून टाकावे लागत असतील तर आपण काय करू शकणार आहे? राहिलेल्या 12,14 तासांमध्ये आपण जितके 24 तास काम करू शकतो, तितकेच काही जण मिळालेल्या कमी तासांमध्ये करू शकणार आहेत का? आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, मोदी जी असा का बरं प्रश्न विचारत आहेत. आणि हे कसं शक्य आहे, असंही तुम्हाला वाटत असेल. एखाद्याजवळ जर एका दिवसाचे 24 तास असतील आणि त्यापैकी 12,14 तासांचाच अवधी त्यांना का बरं मिळतो? देशवासियांनो, कदाचित आपल्याला ही गोष्ट खरी वाटत नसेल, परंतु आपल्या देशातल्या अतिदुर्गम, मागास, अविकसित क्षेत्रामधल्या हजारो गावांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या लक्षावधी कुटुंबांनी गेली अनेक दशके अशीच व्यतीत केली आहेत. या गावांमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज इतक्या वर्षांनीही वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे या गावांमध्ये वास्तव्य करत असलेल्या लोकांचे आयुष्य सूर्योदय आणि सूर्यास्त या मर्यादित कालावधीमध्येच बंदिस्त राहिलेले होते. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे, तोपर्यंत त्यांना काम करता येत होते. सूर्यप्रकाश त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित करीत होता. मग त्यामध्ये मुलांना अभ्यास करायचा असो किंवा महिलांना भोजन बनवण्याचे आणि ते घरातल्या सदस्यांना वाढण्याचे  काम असो. घरामधलं कोणतंही लहान-मोठं काम हे सूर्यप्रकाशामध्येच त्यांना करावे लागत होते. देशाला स्वातंत्र्य मिळून कितीतरी दशकांचा काळ लोटला. परंतु आपल्या देशामध्ये 18000 पेक्षा जास्त गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही हे आमचे सरकार अस्तित्वात आले त्यावेळी आम्हाला समजले.

18000 हजार गावं अजूनही अंधारामध्ये आहेत, हे ऐकून आपल्याला खूप नवल वाटलं असेल. गेल्या 70 वर्षात एकाही सरकारला या गावांमधला अंधःकार दूर करावा, असं वाटलं नाही का? या दुर्गम गावातला अंधःकार दूर करण्यासाठी अशा कोणत्या अडचणी होत्या? कोणत्याही सरकारला हे काम करणं शक्य का नव्हतं ? या गावांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी त्यांच्यासमोर अशा कोणत्या अडचणी होत्या? असे अनेक प्रश्न आमच्या सरकारला पडले होते. मागच्या सरकारने वीज पुरवठा करण्याची आश्वसने अनेकदा दिली होती. परंतु ही वचने त्यांनी कधीच पूर्ण केली नाहीत. या गावांचा अंधार दूर करण्याच्या दिशेने कोणतेही काम केले गेले नाही. 2005 मध्ये म्हणजे जवळपास 13 वर्षांपूर्वी ज्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते आणि मनमोहन सिंह जी पंतप्रधान होते त्यावेळी 2009 पर्यंत देशातल्या प्रत्येक गावामध्ये वीज पोहोचवण्याचे वचन त्यांनी दिले होते.  इतकंच नाही तर त्यावेळच्या काँग्रेस पक्षाध्यक्षांनी त्याही पुढे एक पाऊल जावून प्रत्येक गावांतच नाही तर देशातल्या प्रत्येक घरामध्ये आम्ही 2009 पर्यंत वीज नेणार आहोत, असे सांगितले होते. त्यावेळी आपण जी आश्वासने, वचने दिली, ती पूर्ण केली असती तर खूप चांगलं झालं असतं. आपण जागरूक राहून आणि जनहिताची कामे केली असती तर खूप बरं झालं असतं. त्यावेळच्या सरकारने 2009 मध्ये गावांमध्ये जावून चैकशी केली होती. अहवाल तयार केले होते. नागरी संस्थांशी चर्चा केली होती. 2009 नाही तर किमान 2010 मध्ये हे काम झाले असते किंवा 2011 मध्येही झालं असतं तर दिलेले वचन पूर्ण होवू शकलं असतं. परंतु त्यावेळी दिलेली वचने पूर्ण केलीच गेली नाहीत. विशेष म्हणजे या वचनांना कोणीही गंभीरतेनं घेतही नव्हतं. आणि आज आम्ही ज्यावेळी दिलेली वचन गांभीर्यानं घेवून ती पूर्ण केली की, यांच्या कामामध्ये काही कमतरता तर राहिला नाही ना, याचा शोध घेतला जातो. मला तर हिच खरी लोकशाहीची शक्ती वाटते. आम्ही सातत्याने चांगलं काम करीत आहोत आणि जिथं कुठं काही कमतरता राहिली, अभाव राहिला तर त्याचा शोध घेवून त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जातो. ज्यावेळी आपण सगळे मिळून असे काम करतो, त्यावेळी त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

15 ऑगस्ट, 2015 रोजी लालकिल्ल्याच्या बुरूजावरून मी घोषणा केली होती की, आम्ही एक हजार दिवसांच्या आत देशातल्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या घोषणेनंतर सरकारने कोणत्याही प्रकारे चालढकल न करता, उशीर न करता लक्ष्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने काम करण्यास प्रारंभ केला. यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे भेदभाव केला नाही. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत देशाच्या प्रत्येक भागाचा विचार केला. ज्या कोणत्या गावाला विजेच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे, त्या प्रत्येक गावाला पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत वीज देण्याचे काम आम्ही तातडीने सुरू केले. या योजनेमधून ग्रामीण क्षेत्रामध्ये वीज पुरवठ्याबरोबरच त्या संबंधित सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला. या योजनेमध्ये गावे, वस्त्या-वाड्या यांच्या विद्युतिकरणाबरोबरच वीज वितरण प्रणाली अधिक मजबूत, सक्षमक करण्याचे काम करण्यात आले. त्याचबरोबर शेतकरी वर्गासाठी म्हणजे कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फीडरची व्यवस्था करण्यास प्रारंभ केला. देशातल्या सर्व गावांना आणि त्या गावांच्या परिसरामध्ये असलेल्या वस्त्यांना, लहान-मोठ्या वाड्यांना वीज पुरवण्याच्या योजनेमध्ये सहभागी करून घेता येईल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली. या कामामुळे प्रकाशाचा विस्तार होत गेला.

कोणतेही गाव असो, अथवा वस्ती, वाडी असो. त्याची लोकसंख्या कितीही असो, परंतु वीजेच्या सुविधेपासून कोणीही वंचित राहणार नाही, हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. ज्याठिकाणी  ‘पॉवर ग्रीड’शी एखादे गाव, वस्ती जोडले जाणे शक्य नाही, त्यावेळी त्या गावाला आणि वस्त्यांना ‘ऑफ ग्रीड’ माध्यमातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था केली जात आहे. 28 एप्रिल 2018 या दिवसाची  भारताच्या विकास यात्रेमधला एक ऐतिहासिक दिवस म्हणून स्मरणनोंद केली जाणार आहे. मणिपूरमधल्या लाइसांग या गावाला पॉवर ग्रीडच्या माध्यमातून जोडण्यात आलेले हे शेवटचे गाव होते. हा दिवस प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाचा, गर्वाचा ठरला आहे. या गावामध्ये अखेरीस वीज पोहोचली. विद्युत प्रकाशाने या गावाचा अंधार दूर झाला, याचा मला खूप आनंद आहे. या लाइसांग गावातल्या लोकांशी बोलून या संवादाचा प्रारंभ करावा अशी माझी इच्छा आहे.  सर्वात प्रथम तिथल्या लोकांचे काय मनोगत आहे ते आपण जाणून घेवू या. हे गाव मणिपूरमधल्या सेनापती जिल्‍हयामध्ये आहे.....

माझ्या प्रिय देशवासियांनो, आत्ताच आपण वेगवेगळे अनुभव ऐकले. गावामध्ये वीज आल्यानंतर रोजचे जीवन कसे चांगले, सुकर झाले आहे, याविषयी अनेकांची मनोगते आपण जाणून घेतली. ज्या 18000 गावांमध्ये वीज पोचली नव्हती, त्यापैकी बहुतांश गावे ही अतिदुर्गम क्षेत्रामध्ये आहेत. अतिदूर म्हणजे अगदी बर्फाळ डोंगरावर आहेत, तसेच घनदाट जंगलांमध्ये आहेत किंवा माओवादी, नक्षलवादी यांच्यामुळे ग्रस्त असलेल्या, अशांत क्षेत्रामध्ये आहेत. या गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे आव्हान अतिशय कठीण होते. या गावांमध्ये येण्या-जाण्यासाठी रस्त्यांची चांगली सुविधाही उपलब्ध नाही. आणि या अतिदुर्गम गावांमध्ये अगदी सहजपणाने पोहोचणे खूपच अवघड आहे. काही गावे तर इतक्या दुर्गम स्थानी आहेत की, त्या गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये पोहोचण्यासाठी तीन-चार दिवस पायी जावे लागते. सामानही वेगवेगळ्या माध्यमाने पोहोचवावे लागते. सामान वाहून नेण्यासाठी घोडे, खेचरं यांची मदत घेतली. काही वेळा तर खांद्यावर वाहून नेलं. तर काही ठिकाणी नावेतून सामान पोहोचवण्यात आलं. काही गावांसाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या 35 गावांमध्ये तसेच अरुणाचल प्रदेशातल्या 16 गावांमध्ये हेलिकॉप्टरने सामान पोहोचवण्यात आले. मला तर हे सरकारने केलेल्या कामाचे यश आहे, असं वाटत नाही. तर हे त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचे यश आहे. या कामाशी जोडल्या गेलेल्या, त्या गावांतल्या प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे. या सरकारी कामामध्ये  सहभागी झालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या कर्मचा-याचे, अधिका-याचे हे यश आहे. ज्या लोकांनी हे काम करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम केले, वीजेचे मोठे खांब उभे केले त्या सर्व लहान-मोठ्या श्रमिकांचे हे यश आहे. या कामामध्ये सहभागी झालेले इलेक्ट्रिशियन असतील, तंत्रज्ञ असतील, मजूर असतील, सर्वांचे हे यश आहे. या लोकांनी अथक प्रयत्न केल्यामुळे आज हिंदुस्तानातली सर्व गावे प्रकाशमान होवू शकली आहेत. या सर्व लोकांना संपूर्ण देशवासियांच्या वतीने मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर त्यांना शुभेच्छाही देतो.

आपण ज्यावेळी मुंबईविषयी बोलतो, चर्चा करतो, त्यावेळी तिथल्या  उंच-उंच इमारती कशा विजेच्या लखलखटाने चमकताना दिसतात, शहरातला विजेचा लखलखाट आणि रस्त्यांविषयी बोलत असतो. परंतु मुंबईपासून थोड्याच अंतरावर  एलिफंटा व्दीप आहे. हे बेट पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. एलिफंटा गुहांना युनेस्कोने जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे. या गुहांना देश विदेशातले असंख्य पर्यटक तिथल्‍या लेण्‍या पाहण्‍यासाठी दररोज भेट देतात. मुंबईच्या इतक्या जवळ असलेल्या या पर्यटन केंद्राच्या गावामध्ये इतक्या वर्षात वीज पोहोचलेली नाही, अशी माहिती मला मिळाली, त्यावेळी मला खूप नवल तर वाटलंच आणि मी हैराणही झालो. आणखी एक विशेष म्हणजे ‘एलिफंटा गुहा असलेल्या गावामध्ये वीज पोहोचलेली नाही, याची बातमी कधी एकाही वर्तमानपत्राने दिली नाही की कोणत्याही दूरचित्रवाणी वाहिनीला तिथं वीज नाही, याचे वैषम्य वाटून त्याचे वृत्तांकन केले नाही. कुणालाही या इतक्या महत्वाच्या पर्यटन स्थळाविषयी पर्वा नाही. तिथं वीज असली पाहिजे, असेही कुणाला वाटले नाही, याचेच मला जास्त वाईट वाटते. मुंबईजवळच्या एलिफंटा गुहा असलेल्या गावात आता आम्ही नियमित वीज पुरवठा करण्यासाठी काम केले आहे. सगळीकडे अशा प्रकारे अंधार हटवून प्रकाश पसरवण्याचे काम होत आहे. मात्र हेच काम याआधीही नक्कीच होवू शकले असते. जे झाले नाही. गेली 70 वर्षे आमचे महत्वाचे पर्यटन स्थळ एलिफंटा व्दीपवरचे लोक अंधारामध्ये जीवन कंठत होते. आम्ही समुद्रामध्ये केबल टाकून गुहांपर्यंत वीज पुरवठा केला आहे. आज त्या गावाची अंधारातून कायमची मुक्तता झाली आहे. ज्यावेळी तुम्ही चांगल्या कामाचा निश्चय केला असेल आणि चांगल्या, स्वच्छ हेतूने तुम्ही कार्य करीत असाल, त्याचबरोबर तुमच्या कामाची नीती स्पष्ट असेल तर अगदी अवघड किंवा अशक्य असलेलं काम पूर्ण करण्याचं लक्ष्यही तुम्ही गाठू शकता.

चला आपण आता आणखी इतर काही भागांचा फेरफटका करू या. चला तर सर्वात आधी झारखंडमध्ये जाऊया.....

बंधू आणि भगिनींनो, असं आहे पहा, आधीच्या सरकारने देशाच्या पूर्वेकडील क्षेत्राचा विकास करण्यासाठी फारसे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे पूर्वेकडील भाग विकास आणि वेगवेगळ्या सुविधांपासून वंचित राहिला आहे. ही गोष्ट आपल्याला आता आपल्या लक्षात आली असेलच. देशातल्या 18000पेक्षा जास्त गावांमध्ये आत्तापर्यंत वीज पोहोचली नव्हती. यापैकी आणखी एक आकडा आपल्याला आश्चर्यचकीत करणारा असणार आहे. या 18000 पैकी 14,582 म्हणजे जवळपास 15000 गावे ही पूर्व क्षेत्रातली आहेत. त्यातही या 14582 गावांपैकी 5790 म्हणजे जवळपास 6000गावे ही ईशान्येकडील, पूर्वांचलमधील, पूर्वोत्तर भारतातल्या क्षेत्रातली सर्व गावे होती. आपण आपल्यासमोरच्या टी.व्ही.वर पाहू शकता. आपल्यासमोरच नकाशा ठेवला आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी लाल-लाल चिन्ह दिसत आहे, तो संपूर्ण भाग आत्तापर्यंत अंधारामध्ये होता. आता मला सांगा, जर सगळ्यांचं भलं करण्याचा विचार केला जात होता, तर मग असे हाल, अशी परिस्थिती झाली-राहिली असती का? परंतु लोक कमी आहेत, संसदेमधील जागाही कमी आहेत. त्या सरकारांना जास्त लाभ नाही दिसत. देशाची सेवा राजकीय लाभाशी जोडली गेलेली नसते. देशाची सेवा ही देशवासियांसाठी केली जात असते. मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, भारताच्या विकासाच्या यात्रेमध्ये आता वेग येवू शकणार आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, आमच्या पूर्व क्षेत्रामध्ये वास्तव्य करणा-या इथल्या समाजाचा संतुलित विकासही आता वेगाने होणार आहे.

ज्यावेळी आमचे सरकार बनले त्यावेळी आम्ही पूर्वोत्तर क्षेत्राचा विकास करून हा भाग मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करीत राहिलो आणि त्या दिशेने पुढे जात राहिलो. विकासासाठी सर्वात प्रथम आवश्यक गोष्ट म्हणजे या गावांमध्ये वीज पोहोचणे. मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की, आम्ही केवळ पूर्व भारतामध्येच वीज पोहोचवली नाही, तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक गावामध्ये वीज पोहोचली आहे. गावांमधला अंधार आता दूर झाला आहे. वीज आल्यानंतर नेमकं काय होतं, जीवनामध्ये कसे परिवर्तन घडून येते. हे आपल्यापेक्षा जास्त चांगले कोणाला माहीत असणार? मला देशवासियांकडून अनेक पत्रे येत असतात. लोक आपले अनुभव त्यातून मांडत असतात. अशी पत्रे वाचून मला अनेक गोष्टी शिकता येतात, जाणून घेता येतात.

गावामध्ये वीज आल्यानंतर तिथल्या जनसामान्यांच्या जीवनामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन आले असेल, याची आपण कल्पना करू शकता. आता या गावातल्या लोकांवर अंधाराची मालकी नाही तर आपली स्वतःची मालकी आहे. आता गावामध्ये सूर्यास्ताच्यावेळी फक्त सूर्याचा अस्त होतो, लोकांच्या दिवसाचा अस्त होत नाही, हे महत्वाचे आहे. शाळेत जाणारी मुलं आता दिवस मावळल्यानंतरही बल्बच्या प्रकाशामध्ये शाळेचा अभ्यास आरामात करू शकतात. गावातल्या महिलांना आता रात्रीचे भोजन बनवण्याचे काम दुपारपासूनच सुरू करण्याची गरज राहिली नाही. अंधार पडण्याच्या आता स्वयंपाक बनवण्याची घाई त्यांच्यामागे आता नाही. अंधाराच्या भयातून मुक्तता आता मिळाली आहे. बाजार, मंडया आता उशीरपर्यंत सुरू राहणार आहेत. इतकंच नाही तर रात्रीच्यावेळी चार्जिंग करण्यासाठी मोबाईल शेजारच्या गावी कुणाकडे तरी ठेवून येण्याची आवश्यकता नाही. आपल्या फोनवरून त्या त्रयस्थ माणसाने काही चुकीचे काम केले तर आपल्याला तुरूंगामध्ये जावे लागेल, अशी भीती जी होती, ती आता कायमची गेली आहे. गावामध्ये वीज नव्हती तर, कोण कोणत्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागत होते, हे तुम्हालाच चांगले माहीत आहे. जम्मू -काश्मीरचे लोकही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कारण या राज्यामध्ये डोंगराळ, अतिउंच भागामध्ये वीज पुरवण्यासाठी लागणारे सगळे सामान हेलिकॉप्टरने पाठवावे लागले होते. त्यामुळे मला वाटतं की, आपल्या या जम्मू-काश्मीरच्या बंधू-भगिनींचा अनुभव, मनोगत आपण सर्वांनी ऐकले पाहिजे.

एक लक्षात घ्या, आज आपल्याबरोबर लाखो लोक जोडले गेले आहेत. त्या सर्वांना माहीत झाले आहे की विकास कार्यांचा आपल्या जीवनावर किती व्यापक परिणाम होत असतो. विकास कामांमुळे किती परिवर्तन घडून येते. आज देशातल्या प्रत्येक गावामध्ये वीज पोहोचली आहे. या इतक्याशा गोष्टीनेही आपल्याला आज किती मोठा आनंद झाला आहे. इतकेच नाही तर, सरकारने आता आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या अंत्योदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी  आमच्या सरकारने या देशातल्या प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. आणि या दिशेने कार्य करण्यासाठी प्रधानमंत्री सहज वीज योजना तयार केली आहे. या योजनेच्या नावाचे लघुरूप म्हणजे ‘सौभाग्य योजना’’ असे आहे. या नवीन योजनेअंतर्गत देशात ज्या ज्या घरांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही, मग ते घर गावामधले असो अथवा शहरामधले, त्या घरासाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमधून चार कोटी गरीब कुटुंबांना वीजेची जोडणी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. सरकार या योजनेची ‘मिशन मोड’वर अंमलबजावणी करीत आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 80, 85, 90 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये वीज पोहोचवण्यात आली आहे. गरीब कुटुंबांना वीजेची जोडणी संपूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांकडून फक्त 500 रूपये घेण्यात येणार आहेत. हे पैसे वीजेच्या जोडणीचे काम झाल्यानंतर  सर्वांना परवडेल अशा दहा हप्त्यांमध्ये येणा-या विजेच्या बिलाबरोबर वसूल करण्यात येणार आहेत. घरांमध्ये वीज पोहोचवण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी जी कालमर्यादा निश्चित केली आहे, त्या वेळेच्या आत काम पूर्ण व्हावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. कमीत कमी वेळेमध्ये लोकांच्या घरामध्ये वीज पोहोचवणे शक्य व्हावे, यासाठी गावांमधून मेळावे भरवण्यात येत आहेत. या मेळाव्यांमध्ये एकाच ठिकाणी नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी कागदोपत्रांची पूर्तता केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विनाविलंब नवीन वीज जोडणीला स्वीकृती देण्यात येत आहे.

याशिवाय अतिदुर्गम आणि डोंगराळ, दुर्गम क्षेत्रांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबांना सौर ऊर्जेवर आधारित नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. वीजेमुळे फक्त प्रकाशाची कमतरता भरून काढली जाते असे नाही. तर वीजेमुळे लोकांमध्ये आत्मविश्वासाची भर पडते, असे मला नेहमीच वाटत असते. गरीबीच्या विरोधात लढा देण्याचे एक चांगले साधन म्हणूनही ही ऊर्जा कामी येते असे मला मनापासून वाटते. गावांगावांमध्ये पोहोचलेले हे प्रकाशाचे किरण काही फक्त सूर्यास्तानंतर पसरलेला अंधःकार मिटवून टाकण्याचेच काम करतात असे नाही. हेच प्रकाश किरण गाव आणि गावांतील लोकांच्या जीवनात यशस्वीतेचा प्रकाश निर्माण करीत आहे. आणि त्याचे प्रमाण म्हणजे आपण व्यक्त करीत असलेले मनोगत आहे. आपण साधत असलेला हा संवाद आहे. गावामध्ये वीज आल्यानंतर आपल्याला कोणता अनुभव आला. गावांच्या दैनंदिन जीवनात कसे परिवर्तन घडून आले, याचे अनुभव आत्ताच आपण सांगितले. आम्हालाही हे अनुभव ऐकायला मिळाले. संपूर्ण देशाने आपले मनोगत आत्ता जाणून घेतले आहेत. वास्तविक आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आणखी काही गावांतील मंडळीही खूप उत्सूक होते. परंतु सगळ्यांचे ऐकणे वेळेअभावी  अवघड आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशनही सुरू आहे. त्यामुळे मला सभागृहामध्ये जायचे आहे. तरीही काही गावांना, नमस्ते करण्याची इच्छा माझी आहे. बस्तरला नमस्कार, अलीराजपूरला नमस्ते, सीहोरला नमस्ते. नवपाडा गावाला नमस्कार, सीतापूरला नमस्ते. आपण सगळेजण कधी ना कधी टी.व्ही. पाहत असणार. तसेच वर्तमानपत्र वाचत असणार, आमच्या विरोधकांचे भाषण ऐकत असणार. विरोधीपक्षाच्या पुढे-पुढे करणारे, त्यांच्यापुढे गोंडा घोळणारे लोक तुम्हाला माहीत आहेच. हे लोक  किती घरांमध्ये अद्याप वीज नाही, अमूक भागामध्ये अमूक इतक्या घरांमध्ये वीज नाही, तितक्या घरांमध्ये वीजेअभावी अंधार आहे. असे विरोधक म्हणत असतात, सांगतही असतात. परंतु यासाठी आमच्या सरकारला दोषी धरता येणार नाही. आणि वीज नाही, असे सांगणे म्हणजे आमच्या सरकारने या गावांमध्ये वीज दिली नाही, असा अर्थ त्याचा होत नाही. ही काही आमच्या सरकारवर टीका होतेय, असं मी अजिबात मानत नाही. विशेष म्हणजे, गेल्या 70 वर्षांमध्ये जास्तीत जास्त काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षावर ही टीका आहे. काँग्रेसला आता कशावरही टीका करण्याचे आणि तेवढेच काम आता काँग्रेसकडे राहिले आहे. मागच्या सरकारने खूप प्रचंड कामे रखडवली आहेत, आम्ही ही सर्व कामे, प्रकल्प पूर्ण करण्याचा, विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहोत.

देशातल्या चार कोटी कुटुंबामध्ये वीज नाही, याचा अर्थ असा नाही की, या सर्व लोकांच्या घरांमध्ये आधी वीज होती, आपल्या गावांमध्ये आधी वीज होती आणि मोदी सरकारने येवून त्या घरांचे वीज जोडणी तोडून टाकली. वीजेचे खांब उखडून नेले, वीजेच्या तारा नेल्या, असं तर काही घडलेले नाही. याआधी इथं काहीही नव्हतं. आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि म्हणूनच ते लोक मोठ्या उत्साहाने आमच्या विरोधात काम करीत आहेत. आमचे  काम पाहून त्याला नावं ठेवण्याचे काम विरोधक चांगल्याप्रकारे करीत आहेत. अमूक एका कुटुंबामध्ये अजून वीज जोडणी केली गेली नाही, तमक्याच्या घरामध्ये का बरं अजून तुम्ही वीज पोहोचवली नाही, अमूक ठिकाणी वीजेचा खांब अद्याप उभा केला नाही. अशा गोष्टींची चर्चा विरोधक करीत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी हे काम कधीच केले नाही. आता आम्ही काम करण्याचा, प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. आपल्या सहकार्याने हे काम होत आहे. त्याचबरोबर अनेक लहान-मोठ्या लोकांच्या परिश्रमामुळे हे काम होत आहे. अशावेळी आम्ही लोकांना निराश करण्याचे काम कधीच करणार नाही. विरोधकांना जर मोदीला नावं ठेवायची असतील, शिव्या द्यायच्या असतील तर त्या देत राहो. परंतु जे लोक विकास कार्यामध्ये सहभागी होवून परिश्रम करतात, कामामध्ये लहान-मोठ्या प्रमाणावर, शक्य तितका हातभार लावतात आणि आपल्या गावातला अंधार संपवून प्रकाश यावा, यासाठी कष्ट करतात. त्यांचा सन्मान, आदर करण्याचे काम आम्ही करतो. त्यांचा आपण गौरव केला पाहिजे, त्यांच्या परिश्रमाला, धैर्याला दाद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असे मला मनापासून वाटते. अशाच पद्धतीने आपण सर्वांनी मिळून गावाच्या विकासकार्याला प्रत्येकाने हातभार लावला तर देशामध्ये ज्या एकामागून एक समस्या निर्माण होतात, त्या तातडीने एकत्रितपणाने सोडवणे शक्य होणार आहे. अशा एकजुटीने आपल्या गावाला, आपल्या परिवाराला, आपल्या देशाला समस्यांतून मुक्त करता येणार आहे. आता कोणतंही काम हे सगळ्यांचं असतं. ते काम करताना येत असलेल्या समस्या मोजत बसून काही उपयोग होणार नाही. समस्यांची मोजदाद करत बसण्याचं कामच आपलं नाही. तर समस्यांपासून मुक्ती कशी मिळेल, याचा विचार करून त्यासाठी योग्य मार्ग शोधणे हे आपलं काम आहे.

परमात्मा आपल्या सर्वांना शक्ती देईल, असा माझा विश्वास आहे. आमचा हेतू चांगला आहे. आपल्या सर्वांविषयी माझ्या मनात खूप प्रेमाची भावना आहे, त्यामुळे आपल्यासाठी कितीही कार्य केले तरी ते मला कमीच वाटणार आहे. आपल्या भल्यासाठी विकासकामे सातत्याने करण्यात येणार आहेत. आता कार्यक्रमाच्या अखेरीस मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. चला तर मग, आपण एक ध्वनिचित्रफीत पाहू या. त्यानंतर मी आपली ही चर्चा इथं समाप्त करणार आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1539662) Visitor Counter : 142


Read this release in: English