आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

दक्षिण आफ्रिकेमध्ये डर्बन येथे आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांच्या आठव्या बैठकीला उद्देशून आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांचे संबोधन, क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी भारत सहकार्य करण्यावर ठाम

Posted On: 20 JUL 2018 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  जुलै  2018

 

क्षयरोगाच्या निमूर्लनासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये डर्बन येथे आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांच्या आठव्या बैठकीला ते आज संबोधित करत होते. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी तो वेळीच ओळखून परवडण्याजोगी,दर्जेदार, प्रभावी आणि सुरक्षित औषधे सहजपणे उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता नड्डा यांनी व्यक्त केली. 2025 सालापर्यंत क्षयरोग हद्दपार करण्याप्रती भारत वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा प्रदान करण्याप्रती भारत वचनबद्ध आहे. आरोग्यविषयक यंत्रणांचे सक्षमीकरण, आजार योग्य वेळी ओळखणे आणि त्यावर उपचार करण्यासाठी मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेचा नुकताच शुभारंभ केला. आयुष्मान भारत याचाच अर्थ भारताला दीर्घायुष्य लाभो असा आहे. देशातील सुमारे 100 दशलक्ष कुटुंबांना प्राथमिक आरोग्य सुविधा प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे असे ते म्हणाले.

जननी मृत्यू दराचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवित आहे. परिणामी 1990 सालाच्या तुलनेत 2016 साली या दरात 77 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे नड्डा यांनी नमुद केले. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियानाअंतर्गत गर्भवती स्त्रियांची गर्भधारणा काळात सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी तसेच नियमित तपासणी आणि औषधे प्रदान करण्यासाठी उपक्रम राबविले जातात अशी माहिती त्यांनी दिली. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, परवडणाऱ्याजोग्या दरात औषधे आणि उपचार प्रदान करणारी अमृत योजना अशा विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.

वैद्यकीय क्षेत्रात पारंपरिक आणि पर्यायी उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता नड्डा यांनी व्यक्त केली. भारतातील आयुर्वेद आणि चीनमधील पारंपरिक उपचार पद्धती उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ब्रीक्स राष्ट्रांच्या समुहात तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण आणि संयुक्त उपक्रम विकसित करण्याबरोबरच आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी ज्ञानाची देवाण-घेवाण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याची आवश्यकता आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.   

 

 

 

N.Sapre/M.Pange/P.Malandkar

 

 



(Release ID: 1539473) Visitor Counter : 102


Read this release in: English