संसदीय कामकाज मंत्रालय

संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी सरकारकडून सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन

पावसाळी अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सहकार्य करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

Posted On: 17 JUL 2018 4:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,17 जुलै 2018

 

सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना सरकार मोठं महत्त्व देत असल्याचे सांगून राष्ट्राच्या हितासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधायक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते. संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आणि राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर आशयपूर्ण चर्चा व्हावी यासाठी सर्व राजकीय पक्ष सहकार्य करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

या बैठकी दरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे आणि एखादा तिढा निर्माण झाल्यास संसदेच्या दोन्ही सदनात सखोल चर्चेद्वारे तो सोडवला जावा यावर सर्वच पक्षांचे एकमत झाले.

सभागृहाच्या नियमानुसार परवानगी असणाऱ्या कोणत्याही मुद्यावर चर्चेला तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

10 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात फरार आर्थिक गुन्हेगारासंदर्भातल्या अध्यादेशासह सहा अध्यादेशांची जागा घेणारी सहा विधेयकं सदनात मंजूर होणे अपेक्षित आहे. ग्राहक संरक्षण विधेयक 2018, राष्ट्रीय वैद्यक आयोग विधेयक 2017, मुस्लीम महिला (विवाहविषयक हक्क संरक्षण) विधेयक 2017, मोटार वाहन (सुधारणा) विधेयक 2017, भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक 2013 या महत्त्वाचा प्रलंबित विधेयकांवर सदनात चर्चा होऊन ती संमतीसाठी येण्याची शक्यता आहे. याशिवाय नियमन नसलेल्या ठेव योजनांना प्रतिबंध करणारे विधेयक 2018, मानवी हक्क संरक्षण (सुधारणा) विधेयक 2018, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक विकास (सुधारणा) विधेयक 2018 यासह सात नवी महत्त्वाची विधेयकं सदनात मांडली जाण्याची शक्यता आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1538864) Visitor Counter : 142


Read this release in: English