पंतप्रधान कार्यालय

आझमगढ येथे पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या पायाभरणी समारंभाला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 14 JUL 2018 10:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14  जुलै 2018

 

उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्री राम नाईक जी, मुख्यमंत्री, यशस्वी, तेजस्वी, परिश्रमी, श्री योगी आदित्यनाथ जी, सदैव हसत राहणे हा ज्यांचा स्वभाव आहे, असे माझे सहकारी उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या जी, औद्योगिक विकास मंत्री श्री सतीश महाना जी, राज्य सरकारमधील मंत्री बंधु दारा सिंह जी, संसदेतील माझे सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे  प्रदेशाध्यक्ष श्री महेंद्र नाथ पांडेय जी, संसदेतील आमच्या सहकारी भगिनी नीलम सोनकर जी, आमदार बंधु श्री अरुण जी आणि मोठ्या संख्येने येथे उपस्थित माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो,  

ऋषी-मुनींची तपोभूमी आणि साहित्‍य विश्वाला अनेक सिद्धहस्त साहित्यिक प्रदान करणाऱ्या आझमगढच्या या भूमीला मी नमन करतो. आज उत्‍तर प्रदेशच्या विकासाचा एक नवा अध्‍याय सुरू झाला आहे. पूर्व भारतात पूर्व उत्तर प्रदेशातील एका मोठ्या क्षेत्रात विकासाची एक नवी गंगा वाहू लागेल. ही गंगा पूर्वांचल द्रुतगती मार्गाच्या रूपात आपणाला भेटणार आहे आणि या प्रकल्पाच्या पायाभरणीची संधी आम्हाला लाभली आहे.

मित्रहो, उत्‍तर प्रदेशाचा अशा प्रकारे विकास व्हावा, वेगाने विकास व्हावा, जे भाग मागासलेले आहेत, तिथे जास्त उर्जेचा वापर करून त्यांनाही इतरांच्या बरोबरीने आणले जावे, या दिशेने काम करण्याचा निर्णय उत्‍तर प्रदेशच्या जनतेचा आहे, आपला आहे. आम्ही केवळ सेवक म्हणून काम करत आहोत. चार वर्षांपूर्वी उत्‍तर प्रदेशाने भारतीय जनता पार्टीला अनेक आशिर्वाद देऊन केंद्र सरकारमध्ये काम करण्याची जबाबदारी सोपवली. मला काशीमधून निवडून दिले आणि गेल्या वर्षी आपण विकासाच्या गतीत दुप्पट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गेल्या एका वर्षात योगी आदित्यनाथजींच्या नेतृत्वाखाली जे काम झाले, ते अभूतपूर्व असे आहे. मोठमोठ्या गुन्हेगारांची काय स्थिती आहे, ते आपणाला ठाऊकच आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने उत्‍तर प्रदेशात विकासाचे उत्तम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हे नियंत्रणात आणून, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवून योगीजींनी मोठ्यात मोठी गुंतवणूक आणण्याचे आणि लहानात लहान उद्योजकासाठी व्यापार सुलभ व्हावा, या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. शेतकरी असो वा युवा, महिला असो वा पिडीत, शोषित, किंवा मग वंचित वर्ग असो, या सर्वांच्या उत्थानाचा संकल्प करून योगीजींचे सरकार आपल्या सेवेत मग्न आहे. गेल्या दहा वर्षांत उत्तर प्रदेशची जी ओळख तयार झाली होती, ती आता बदलू लागली आहे. आता जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठीच खर्च होत आहे. एक-एक पै प्रामाणिकपणे खर्च केली जाते आहे. ही बदललेली कार्य संस्‍कृती उत्‍तर प्रदेशला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.

बंधु आणि भगिनींनो, हा पूर्वांचल एक्‍सप्रेस वे संपूर्ण उत्तर प्रदेश, विशेषत: पूर्व उत्तर प्रदेशच्या आशा-आकांक्षांना खतपाणी घालणारा आहे. पूर्वांचल एक्‍सप्रेस वे वर २३ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे. लखनौपासून गाजीपुर दरम्यानच्या ३४० किलोमीटर अंतराच्या मार्गावर जितकी शहरे, नगरे आणि गावे असतील, त्या सर्वांचे चित्र बदलून जाणार आहे. इतकेच नाही तर हा मार्ग तयार झाल्यानंतर दिल्लीपासून गाजीपूर पर्यंतच्या प्रवासाचा अवधीही कमी होणार आहे. कित्येक तासांची वाहतूक कोंडी, वाया जाणारे पेट्रोल आणि डिझेल, पर्यावरणाची होणारी हानी या सर्व समस्या एक्सप्रेस वे तयार झाल्यानंतर भूतकाळात जमा होणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या क्षेत्रातील नागरिकांच्या वेळेची फार मोठी बचत होणार आहे आणि हे फार महत्वाचे असते. येथील शेतकरी असो, पशुपालक असो, माझे विणकर बंधु असो, मातीची भांडी घडविणारे असो, प्रत्येकाच्या आयुष्याला या एक्‍सप्रेस वे मुळे नवी गती लाभणार आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर पूर्वांचलच्या शेतकरी बंधु भगिनींचे धान्य, फळे, भाज्या, दूध कमीत कमी वेळेत दिल्लीतील बाजारांमध्ये पोहोचेल. एका अर्थाने हा भाग औद्योगिक कॉरीडोअर म्हणून विकसित होईल. या संपूर्ण एक्‍सप्रेस वे च्या अवती-भवती नवे उद्योग विकसित होतील. भविष्यात येथे शिक्षण, प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय संस्था अशा अनेक संस्था विकसित होतील, असे मला निश्चितपणे वाटते. याशिवाय आणखी एका गोष्टीला चालना मिळेल, ती म्हणजे, पर्यटन. या क्षेत्राचे पौराणिकदृष्ट्या जे महत्व आहे, हे स्थान भगवान रामाशी जोडलेले आहे, आमच्या ऋषी-मुनींशी जोडलेले आहे, त्यांचा अधिक प्रचार-प्रसार होऊ शकेल. या माध्यमातून येथील युवकांना आपल्या पारंपरिक कामांबरोबरच रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.

मित्रहो, मला सांगण्यात आले आहे की आगामी काळात या गोरखपूरलाही या एक्‍सप्रेस वे ने जोडले जाणार आहे. याव्यतिरिक्त बुंदेलखंडमध्येही असाच एक्‍सप्रेस वे तयार करण्याचा निर्णय येथील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतला आहे. हे सर्व प्रयत्न उत्तर प्रदेशमध्ये जोडणीला बाबतीत नव्या उंचीवर घेऊन जाणारे आहेत. २१ व्या शतकात विकास साधायचा असेल तर जोडणी ही मूलभूत आवश्यकता असते. संबंधित क्षेत्रातील जोडणीची स्थिती सुधारली की तेथील सर्वच बाबतीतल्या सुधारणेला वेग येतो. जोडणीच्या सुविधा वाढवून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करण्याचे, उद्योग सुलभ करण्याचे आणि देशातील शेतकरी, गरीब, वंचित, शोषित आणि मागास वर्गातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. 

बंधु आणि भगिनींनो, जेव्हा आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचे असते आणि विकास साध्य करणे हेच लक्ष्य असते, तेव्हा कामाला आपोआप गती प्राप्त होते. फायली पुढे सरकण्यासाठी कोणाच्याही शिफारशींची गरज भासत नाही. याच कारणांमुळे गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जाळे जवळपास दुप्पटीने वाढले आहे. २०१४ पूर्वी जितक्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, ते आता दुप्पट झाले आहेत. विचार करा, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जितके काम झाले, तितकेच काम केवळ चार वर्षांत भाजपाच्या सरकारने करून दाखविले आहे. आता येथे योगीजींचे सरकार आल्यानंतर काम अधिक गतीने होऊ लागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये केवळ महामार्ग नाही तर जलमार्ग आणि हवाई वाहतुकीसंदर्भातही वेगाने काम सुरू आहे. गंगेमध्ये बनारसपासून हल्दियादरम्यान चालणाऱ्या जहाजांच्या माध्यमातून या संपूर्ण क्षेत्रात औद्योगिक विकास वेगाने होईल. या व्यतिरिक्त हवाई वाहतुकीकडेही लक्ष दिले जात आहे. हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई प्रवास करता यावा, असे स्वप्न मी पाहिले आहे आणि ते साकार करण्याच्या दृष्टीने सरकार उडान योजनेवर उत्साहाने काम करत आहे. या योजनेच्या माध्यमातून लहान शहरेही हवाई मार्गाने जोडली जात आहे. उत्तर प्रदेशमधील १२ विमानतळही या योजनेंतर्गत विकसित केली जात आहेत. या व्यतिरिक्त कुशी नगर आणि जेवरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही वेगाने सुरू आहे. 

बंधु आणि भगिनिंनो, मोदी असो वा योगी, आपण सर्वंच आमचे कुटुंबिय आहात. आपली स्वप्ने हीच आमचीही स्वप्ने आहेत. आम्ही गरीब आणि मध्यम वर्गाच्या आशा-आकांक्षांशी जोडलेले आहोत. त्याचमुळे उडान योजनेतील प्रवासी भाड्याचा विषय जेव्हा चर्चेसाठी समोर आला तेव्हा तासाभराच्या प्रवासासाठी अडीच हजार रूपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागू नये, यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. परिणाम असा झाला की गेल्या वर्षी जितक्या लोकांनी रेल्वेच्या वातानुकुलीत डब्यांमधून प्रवास केला, त्यापेक्षा जास्त लोकांनी हवाई प्रवास केला. मित्रहो, देशाचा हा भाग, आमचा हा पूर्व भारत, आमचा उत्तर प्रदेश नेहमीच विकासाच्या बाबतीत मागासलेला राहावा, अशीच धोरणे यापूर्वीच्या सरकारने आखली. मात्र देशाच्या इतर भागांप्रमाणेच आमचा हा उत्तर प्रदेशही, आमचा हा पूर्व भारतही देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. येथील तरूण आता इतर राज्यांमध्ये जाऊन स्वत:ला सिद्ध करू शकतील. आता त्यांना योग्य संधी मिळाली की ते निश्चितपणे आपल्या संपूर्ण क्षेत्राचा कायापालट करू शकतील.

मित्रहो, जोपर्यंत पूर्वेकडे विकासाचा सूर्य उगवत नाही, तोवर नव भारताचे स्वप्न अपूर्णच राहणार. आणि म्हणूनच गेल्या चार वर्षांमध्ये पूर्वांचल, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, ईशान्येकडील राज्ये या सर्व क्षेत्रांमध्ये रस्ते, रेल्वे विमानतळांशी संबंधित अनेक प्रकल्प स्वीकारण्यात आले. देशाच्या या पूर्वेकडच्या भागाला एका अर्थाने विकासाचा नवा कॉरीडोअर म्हणून विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय एम्स तसेच खताचे बंद पडलेले कारखाने सुरू करण्याचे काम चालू आहे. मित्रहो, ही सर्व कामे या क्षेत्राच्या संतुलित विकासाला चालना देतील. कोणताही भेदभाव न करता 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रासह आम्ही आगेकूच करत आहोत. सर्वांना प्रगती करण्याच्या समान संधी प्राप्त व्हाव्यात, सर्वांचा समतोल विकास व्हावा. गावे हा विकासाचा केंद्रबिंदू व्हावीत, या दृष्टीने आमचे सरकार काम करत आहे. देशातील प्रत्येक मोठ्या पंचायतीला ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एक लाखाहून जास्त पंचायतींना या माध्यमातून जोडण्यात आले आहे. सुमारे तीन लाख एकत्रित सेवा केंद्रे अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटर गाव आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांचे जगणे सुलभ व्हावे, यासाठी फार मोठे काम करत आहेत. याशिवाय गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दीड लाखापेक्षा जास्त सहाय्यकारी केंद्रे निर्माण केली जात आहेत.

मित्रहो, गेल्या चार वर्षांत 'प्रधानमंत्री आवास योजना'  आणि जुन्या गृहनिर्माण योजना पूर्ण करून गावातील गरीबांसाठी एक कोटीपेक्षा जास्त घरे बांधण्यात आली आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत, देशातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. बंधु आणि भगिनिंनो, देशात आणि गावात स्वराज्याचे हेच स्वप्न पुज्यनीय महात्मा गांधीजींनी पाहिले होते, बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी पाहिले होते, डॉक्‍टर राम मनोहर लोहिया यांनी पाहिले होते. नव्याने निर्माण होणारी ही व्यवस्था सर्वांसाठी आहे, सर्वांचे भले करण्यासाठी आहे. मात्र दुर्दैवाने समता आणि समानतेच्या बाता मारणाऱ्या काही राजकीय पक्षांनी बाबासाहेब आंबेडकर आणि राममनोहर लोहिया यांच्या नावाचे केवळ राजकारण केले. मित्रहो, मी आझमगढच्या नागरिकांकडून जाणून घेऊ इच्छितो की यापूर्वीच्या सरकारांच्या काळात येथे ज्या प्रकारचा विकास झाला, याची कल्पना आपणास आहे का? त्यांच्या कार्यक्रमांनी आपले खरोखर भले केले आहे का? आझमगढचा आणखी विकास होऊ शकला नसता का? ज्या लोकांवर आझमगढ आणि या क्षेत्रातील नागरिकांनी विश्वास टाकला, त्यांनी तो विश्वास मोडून काढण्याचेच काम केले नाही का? या पक्षांनी जनतेचे आणि गरीबांचे नाही, तर केवळ स्वत:चे आणि आपल्या कुटुंबियांचेच भले केले, हेच सत्य आहे. गरीबांकडे मते मागितली, दलीतांकडे मते मागितली, मागासवर्गियांकडे मते मागितली, त्यांच्या नावे सरकार स्थापन करून फक्त स्वत:च्या तिजोऱ्या भरल्या, इतकेच केले. आजकाल तर आपण पाहत असाल की एरवी एकमेकांचे तोंडही न पाहणारे आज सोबत दिसत आहेत. दिवस असो वा रात्र, जेव्हा भेटतील तेव्हा मोदी, मोदी, मोदी. बंधु आणि भगिनिंनो, आपल्या स्वार्थासाठी हे जे लोक जामीनावर आहेत, सर्व कौटुंबिक पक्ष, कोणताही पक्ष बघा, त्यांचे कुटुंबियच दिसतील. हे सर्व पक्ष एकत्र येऊन आता आपला विकास रोखू पाहत आहेत. आपले सक्षमीकरण रोखू पाहत आहेत. गरीब, शेतकरी, दलीत, मागासवर्गीय सक्षम झाले तर त्यांचे दुकान कायमचे बंद होईल, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे.

बंधु आणि भगिनींनो, या सर्व पक्षांचा खोटारडेपणा, तीहेरी तलाक प्रश्नावरच्या त्यांच्या भूमीकेवरून उघड झाला. एकीकडे केंद्र सरकार महिलांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे हे पक्ष मात्र महिलांचे, विशेषत: मुस्लीम भगिनी-लेकींचे आयुष्य अधिकच संकटात टाकण्याचे काम करत आहेत. तीहेरी तलाक प्रथा बंद व्हावी, अशी मागणी लाखो-कोट्यवधी मुस्लीम भगिनी-लेकी दीर्घ काळापासून करत आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षांनी काँग्रेस हा मुस्लीमांचा पक्ष आहे, असे म्हटल्याचे मी एका वर्तमानपत्रात वाचले. गेले दोन दिवस चर्चा सुरू आहे आणि मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. यापूर्वी जेव्हा मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तेव्हा, देशातील नैसर्गीक संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लीमांचा आहे, असे ते म्हणाले होते. हे तेव्हाच सांगून झाले होते, आता कॉंग्रेस पक्षाच्या या मान्यवरांना मी विचारू इच्छितो की कॉंग्रेस हा मुस्लीमांचा पक्ष आहे, असे आपणास वाटते, ठीक आहे. पण मग एक सांगा की हा पक्ष केवळ मुस्लीम पुरूषांचाच आहे की मुस्लीम स्त्रीयांचाही आहे? मुस्लीम महिलांच्या सन्मानासाठी, गौरवासाठी, त्यांच्या हक्कासाठी आपल्याकडे कोणतेही स्थान नाही का? संसदेत कायदे रोखून धरतात, हल्ला करतात, संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. हे कौटुंबिक पक्ष, मोदींना हटविण्यासाठी दिवस रात्र करणारे हे पक्ष. त्या पक्षांना मी सांगू इच्छितो, चार-पाच दिवसात संसदेचे कामकाज सुरू होईल, तोवर तुम्ही त्या तलाक पिडीत महिलांची जरा भेट घ्या, हलालामुले त्रासलेल्या त्या माता-भगिनींना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा आणि मग संसदेत आपले म्हणणे मांडा.

बंधु- भगिनींनो, २१ व्या शतकात असे राजकीय पक्ष, ज्यांची मानसिकता १८ व्या शतकातील आहे, जे मोदी हटाव च्या घोषणा देऊ शकतात, परंतू देशाचे भले करू शकत नाहीत. जेव्हा भाजपा सरकारने संसदेत कायदा करून मुस्लीम बहीणी-लेकींना अधिकार देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्यातही अडथळे आणले. यांना वाटते की तीहेरी तलाक होत राहावे, मुस्लीम बहीणी-लेकींचे आयुष्य नरकाप्रमाणेच व्हावे. पण मी तुम्हाला खात्री देतो की या राजकीय पक्षांना समजावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, त्यांची समजूत घालून आमच्या बहीणी-लेकींना अधिकार देण्याच्या कामी त्यांचीही सोबत मिळवण्याचा प्रयत्न करेन. आमच्या मुस्लीम बहीणी-लेकींना तीहेरी तलाकमुळे सोसाव्या लागणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन. 

बंधु-भगिनींनो, अशा नेत्यांपासून, अशा पक्षांपासून सावध राहणे गरजेचे आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यात मग्न असणारी ही मंडळी इतरांच्या भल्याचा विचार करू शकत नाहीत. देशाच्या भल्याचा विचार करू शकत नाहीत. त्याच वेळी केंद्रातील जे सरकार आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे जे सरकार आहे, त्याच्यासाठी देश हेच कुटुंब आहे, देश हेच सर्वस्व आहे. सव्वाशे कोटी देशवासी आमचे कुटुंबिय आहेत. शेतकरी असो, गरीब असो, वंचित असो, शोषित असो वा मागास असो, सर्वांचे आयुष्य सोपे आणि सुलभ करण्यासाठी आमचे सरकार निरंतर प्रयत्नशील आहे. जनधन योजनेंतर्गत उत्तर प्रदेशात सुमारे पाच कोटी गरीबांची खाती बँकेत उघडली. लाकडाच्या धुरापासून महिलांना मुक्ती मिळावी, यासाठी ८० लाख पेक्षा जास्त महिलांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. दरमहा केवळ एक रूपया आणि ९० पैसे प्रतिदिन हफ्त्याच्या मोबदल्यात एक कोटी साठ लाखाहून जास्त गरीबांना विमा कवच देण्यात आले. आता आयुष्‍मान भारत योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षभरात पाच लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार खात्रीशीरपणे मिळावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेले वचन नुकतेच पूर्ण केले. खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीत भरघोस वाढ करण्यात आली. तांदूळ असो, मका असो, बाजरी, तूर, उडीद, मूग, सूर्यफुल, सोयाबीन, तीळ या सर्वांच्या आधारभूत किंमतीत दोनशे रूपयांपासून अठराशे रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली. अनेक धान्यांसाठी तर उत्पादन खर्चाच्या शंभर टक्के अर्थात दुप्पट मूल्य निश्चित करण्यात आले.

मित्रहो, आमचे सरकार देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या आवश्यकता लक्षात घेऊन योजना आखत आहे, निर्णय घेत आहे. असे निर्णय दीर्घ काळ प्रतिक्षित होते. आधीची सरकारे अशा निर्णयांच्या फायली इकडून तिकडे फिरवत राहिली. भारतीय जनता पार्टीच्या नेत्रुत्वाखालील सरकार हे निर्णय घेण्याचे काम करते आहे. आपल्या प्रत्येक गरजेप्रति हे सरकार संवेदनशील आहे. या क्षेत्रातील बनारसी साड्यांच्या उद्योगाशी संबंधित विणकर बंधु भगिनींना स्मरत असेल की या पूर्वीच्या सरकारने त्यांच्या गरजा कधीही लक्षात घेतल्या नाहीत. आताच्या सरकारने मात्र त्यांना आधुनिक यंत्रे, कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यापासून बाजारपेठा मिळवून देण्यापर्यंत प्रयत्न करीत आहे. बनारसमध्ये गेल्या वर्षीच व्यापार सुविधा केंद्र सुरू झाले आहे. हे केंद्र आपण सर्व विणकर आणि शिल्पकारांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आले आहे. याच्या माध्यमातून हस्तशिल्पकार आणि हातावर विणलेल्या गालीच्यांना प्रोत्साहन मिळते आहे. योगी सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीही नवे धोरण आखले आहे. येथे जे उत्पादन घेतले जाईल त्याचा प्रचार-प्रसार आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘एक जिल्हा - एक उत्पादन’ योजनेवर काम सुरू आहे.

बंधु आणि भगिनिंनो, येथील काळ्या मातीची कला खरोखर अनोखी आहे. योगी जी आणि त्यांच्या चमुने माती कला मंडळ स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. यातून लाखो रोजगार निर्माण होतील आणि कला कलाही जीवंत राहील.

मित्रहो, जेव्हा जनहीत आणि राष्ट्रहीताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, जेव्हा गरीबांची काळजी घेत, त्यांचे आयुष्य सरळ आणि सोपे करण्याच्या उद्देशाने काम केले जाते, तेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. तसे नसते तर योजना कागदांवरच राहिल्या असत्या आणि पायाभरणीचे कार्यक्रम भाषणांवरच आटोपले असते. आपण हे जाणताच, असे होताना आपण अनुभवले आहे. उत्तर प्रदेश आणि आपला देशही आता त्या कार्य संस्‍कृतीला मागे टाकून पुढे झेपावला आहे.

या आधुनिक एक्सप्रेसवेचे काम सुरू झाल्याबद्दल पूर्वांचलमधील, उत्तर प्रदेशातील आपणा सर्व बंधु भगिनींचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि अनेक शुभेच्छा देतो. आपण सर्व इतक्या उकाड्यातही, इतक्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिलात. हा जनसागर हे खऱ्या प्रेमाचे प्रतिक आहे. आपण आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात, मी मनापासून आपला आभारी आहे.

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor



(Release ID: 1538829) Visitor Counter : 100


Read this release in: English