रेल्वे मंत्रालय
रेल्वे स्थानक परिसराच्या सौंदर्यीकरण स्पर्धेचे पुरस्कार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते वितरित, विदर्भातील बल्लारशाह आणि चंद्रपूर स्थानकांना प्रथम पुरस्कार
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2018 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2018
रेल्वे मंत्रालयाने आयोजित केलेल्या रेल्वे स्थानक परिसराच्या सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातील बल्लारशाह आणि चंद्रपूर या रेल्वे स्थानकांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यांच्यासह सर्व पुरस्कार विजेत्या रेल्वे स्थानकांच्या प्रतिनिधींचा आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. दुसरा क्रमांक मधुबनी आणि मधुराई स्थानक तर तिसरा क्रमांक गांधीधाम आणि सिकंदराबाद स्थानक यांना विभागून मिळालेला आहे.
रेल्वे मंत्रालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 62 रेल्वे स्थानकांनी सहभाग घेतला होता. यासाठी स्थानक परिसरात भित्तीचित्रे, पेंटिंग आणि ग्राफिटी करण्यात आली. या सौंदर्यीकरणात स्थानिक कलाकार, खाजगी संस्था आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या सर्व कलाकारांचा पियुष गोयल यांच्या हस्ते रोख पुरस्कार आणि प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
बल्लारशाह आणि चंद्रपूर स्थानकांना 10 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला तर दुसऱ्या क्रमांकासाठी 5 लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार निवड समितीने या सौंदर्यीकरणासाठी वापरलेले रंग, संस्कृती आणि संकल्पना,स्थानिक कलांचे प्रदर्शन आणि कलेचा दर्जा या निकषांवर हे पुरस्कार देण्यासाठी शिफारस केली होती.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1538544)
आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English