पंतप्रधान कार्यालय

बहादुरगढ-मुंडका मेट्रो रेल्वेमार्गाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2018 2:29PM by PIB Mumbai

बहादुरगढ-मुंडका मेट्रो रेल्वेमार्गाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण

 

नवी दिल्ली, 24  जून  2018

 

सर्वप्रथम हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेचे तुम्हा सर्वांचे बहादुरगढ -मुंडका मेट्रो रेल्वेमार्ग सुरु झाल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन.

हरियाणातील बहादुरगढ आज दिल्ली मेट्रोशी जोडले गेले आहे. गुरुग्राम आणि फरिदाबाद नंतर बहादुरगढ हरियाणाचा  तिसरा  सर्वात मोठा परिसर आहे, जो आता दिल्ली मेट्रोशी जोडण्यात आला आहे. या रेल्वेमार्गाच्या लोकार्पणानंतर हरियाणातील मेट्रोचे जाळे 26 किलोमीटर पर्यंत पसरले आहे.

मित्रांनो, दिल्लीतल्या मेट्रोने कशा प्रकारे लोकांचे आयुष्य बदलले आहे , त्याचा साक्षीदार ती प्रत्येक व्यक्ती आहे जिने कधी ना कधी त्यातून प्रवास केला आहे. मी देखील अनेकदा दिल्ली मेट्रोतून प्रवास केला आहे. आजपासून हा अनुभव बहादुरगढ-मुंडका मार्गावरील प्रवाशांना देखील मिळेल.

विशेषतः बहादुरगढ मध्ये वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगांमुळे गेली अनेक वर्षे मेट्रोची प्रतीक्षा केली जात होती. बहादुरगढमध्ये अनेक महाविद्यालये,संस्था आणि विद्यापीठे देखील आहेत. दिल्लीहून अनेक विद्यार्थी दररोज ये-जा करत असतात. आता या भागातील लाखो उद्योजक, विद्यार्थी , विविध व्यवसायातील लोकांना दिल्लीला येणे-जाणे अधिक सुकर होईल.

तसे पाहिले तर बहादुरगडला हरियाणाचे प्रवेशद्वार म्हटले जाते, मात्र ही मेट्रो रेल्वे इथे विकासाचे प्रवेशद्वार बनून आली आहे.

मेट्रोमुळे लोकांची सोय होईल, नवीन वसाहती बनतील, उद्योगांचा विस्तार होईल, आणि रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील. संपर्काचे विकासाशी जे नाते आहे ते या मेट्रो जाळ्याकडे बघून समजेल.

आता दिल्ली-एनसीआर दरम्यान सुमारे 280 किलोमीटर मेट्रोमार्ग कार्यान्वित आहे. ज्या वेगाने याचा विस्तार होत आहे, लवकरच शांघाय, बीजिंग, लंडन आणि न्यूयॉर्क नंतर जगातील पाचवे सर्वात मोठे मेट्रो जाळे म्हणून दिल्लीची ओळख होईल. मित्रांनो, जे स्वप्न दिल्लीत साकार झाले आहे, अटळ निर्धारांचा जो परिणाम आज दिल्ली-एनसीआरची जनता पाहत आहे, तसाच प्रयत्न संपूर्ण देशात केला जात आहे.

मेट्रोशी संबंधित कामांमध्ये एक खूप मोठी त्रुटी ही होती की, प्रत्येक शहरात यापूर्वी आपापल्या पद्धतीने काम केले जात होते.

मेट्रो आणि त्याच्याशी संबंधित बांधकामासाठी कोणतेही धोरण नव्हते, त्यामुळे कुठलेही मानक, कुठलाही दर्जा देखील निश्चित नव्हता. नेत्यांच्या मर्जीनुसार स्थानके आणि विविध विभागांच्या हितानुसार निर्णय होत होते.

आता 2017 मध्ये देशाचे पहिले मेट्रो धोरण बनल्यानंतर या सर्व बाबींकडे लक्ष दिले जात आहे. लोकांना एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकापर्यंत आणि पुन्हा आपले घर किंवा कार्यालयापर्यंत पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून शहरांच्या संपूर्ण वाहतूक प्रणालीचे एकात्मीकरण केले जात आहे.

आता देशात कुठेही मेट्रो सुरु झाली तर ती एका निश्चित मानकानुसार काम करेल. मित्रांनो, २१ व्या शतकातील गरजा लक्षात घेऊन शहरांमध्ये स्मार्ट, सुलभ, किफायतशीर आणि स्वच्छ सार्वजनिक वाहतूक प्रणाली देण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे.

आज देशातील 12 शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. देशातील अन्य शहरांना देखील मेट्रोने जोडण्यासाठी राज्य सरकारांना प्रोत्साहित केले जात आहे. त्याचबरोबर मेट्रोचे डबे देखील देशात तयार करण्याचे काम सुरु आहे.

गुजरातमधील वडोदरा आणि तामिळनाडूतील चेन्नईमध्ये आधुनिक कारखाने उभारण्यात आले आहेत , मेट्रो प्रकल्पांमध्ये मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने खरेदीचे धोरण बदलले आहे आणि सुमारे 75 टक्के भारतात तयार झालेले भाग वापरणे बंधनकारक केले आहे.

मित्रांनो, मेट्रोची व्यवस्था आपल्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. यापूर्वी अनेक देशांनी मेट्रोसाठी आपली मदत केली , आता भारत जगातील अनेक देशांना मेट्रोचे डबे पुरवण्यासाठी सज्ज होत आहे.

केवळ आंतरराष्ट्रीय संबंधच नव्हे तर सहकारी संघीय व्यवस्था कशी काम करते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आज देशातील ज्या-ज्या राज्यांमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे, ते केंद्र आणि राज्य सरकारांच्या सक्रिय भागीदारीतून सुरु आहे.

मित्रांनो ,

दिल्ली-एनसीआर बाबत बोलायचे तर आज जेवढे मेट्रोचे जाळे विकसित झाले आहे, त्यामुळे दररोज सुमारे 6 लाख गाड्यांची गरज संपली आहे.

मेट्रोने लोकांच्या वेळेची बचत केली आहे, पैसे वाचवले आहेत आणि प्रदूषण देखील कमी केले आहे. मेट्रोबरोबरच दिल्ली -एनसीआर मध्ये संपूर्ण वाहतूक व्यवस्था आधुनिक आणि लोकांच्या गरजेनुरूप बनवण्याचे काम सरकार करत आहे.

दिल्लीला अतिजलद रेल्वेच्या माध्यमातून सोनीपत, अलवर आणि मेरठशी जोडण्यासाठी प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीवर देखील काम सुरु आहे.

याशिवाय दिल्लीच्या चारीबाजूला द्रुतगती मार्ग बनवण्याचे काम देखील जलद गतीने केले जात आहे. ते काम पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न सुरु आहे.

याचा पहिला टप्पा म्हणजेच ईस्टर्न पेरिफेरल द्रुतगती मार्गाचे मी काही दिवसांपूर्वी लोकार्पण केले होते. हरियाणाकडील वेस्टर्न पेरिफेरल द्रुतगती मार्गाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पेरिफेरल द्रुतगती महामार्गाने दिल्लीतून जाणाऱ्या छोट्या-मोठया गाड्यांची संख्या 25 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी  केली आहे.

यामुळे वाहतुकीवर प्रभाव तर पडला आहेच, प्रदूषणाचे एक मोठे कारण देखील कमी झाले आहे. बंधू आणि भगिनींनो, नवीन भारतासाठी नवीन आणि स्मार्ट पायाभूत सुविधांसाठी हे सरकार कटिबद्ध आहे.

गेल्या चार वर्षात रस्ते, रेल्वे , हवाईमार्ग, जलमार्ग आणि विजेशी संबंधित पायाभूत विकासावर सर्वात जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. कारगिलपासून कन्याकुमारी पर्यंत, कच्छ पासून कामाख्यापर्यंत संपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. सर्वात मोठे बोगदे असतील किंवा सर्वात मोठे पूल , एका पाठोपाठ एक सर्व प्रकल्प मुदतीत पूर्ण केले जात आहेत. भारतमाला प्रकल्पाअंतर्गत, देशात ३५ हजार किलोमीटर लांब आधुनिक महामार्गाचे जाळे उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

आगामी काळात एकीकडे शंभरहून अधिक जलमार्ग, बुलेट ट्रेन देशाच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडवतील तर दुसरीकडे छोट्या-छोट्या शहरांमध्ये विकसित होणारे विमानतळ लोकांचे मनोबल आकाशापर्यंत पोहचवण्याचे काम करतील. या आधुनिक पायाभूत सुविधा आपल्या शहरांना २१ व्या शतकातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू बनवण्यात मदत करतील. देशातील विविध भागांमध्ये पायाभूत विकास जितका जास्त मजबूत होईल, संपर्क सुलभ होईल , जितके जास्त  वाहतुकीची विविध साधने परस्परांना साहाय्य करतील, तेवढे लोकांचे आयुष्य सुलभ होईल, व्यापाराच्या नवीन संधी निर्माण होतील, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

मित्रांनो ,

सरकारच्या या प्रयत्नांमध्ये सामान्य माणूस म्हणून तुम्हा सर्वांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक आहे,त्याशिवाय हे शक्य नाही.

या, नवीन भारतासाठी निर्माण होत असलेल्या या पायाभूत सुविधांसाठी एकत्रितपणे अधिक प्रयत्न करुया.

पुन्हा एकदा हरियाणा आणि बहादुरगढच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन. आपल्या नागरिकांनी याचा लाभ उठवावा आणि खासगी वाहनांपासून मुक्ती मिळवावी.

याबरोबरच मी माझे भाषण संपवतो.

खूप-खूप धन्यवाद.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 


(रिलीज़ आईडी: 1538438) आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English