पंतप्रधान कार्यालय

उत्तरप्रदेशातल्या नोएडा इथे सॅमसंग मोबाईल उत्पादन कारखान्याच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 09 JUL 2018 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9  जुलै  2018

 

राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र मून जेई इन जी,  सॅमसंगचे उपाध्यक्ष जे वाय ली,कोरिया आणि भारताचे प्रतिनिधी आणि उपस्थित मान्यवर,

माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मून यांच्यासमवेत नोएडा इथे उभारलेल्या सॅमसंगच्या या कारखान्यात येणे हा माझ्यासाठी अतिशय सुखद अनुभव आहे.मोबाईल उत्पादनाचा नवा कारखाना, भारताबरोबरच उत्तर प्रदेश आणि नोएडा साठी अभिमानाचा विषय आहे.या नव्या कारखान्यासाठी  सॅमसंगच्या संपूर्ण चमूला अनेक शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो.

मित्रहो, भारताला उत्पादनाचे  जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने आजची संधी अतिशय विशेष आहे. 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सॅमसंगचे भारताशी व्यापारी संबंध मजबूत करण्याबरोबरच भारत आणि कोरिया यांच्यातल्या संबंधासाठीही महत्वपूर्ण ठरेल. सॅमसंगचे जागतिक संशोधन आणि विकास केंद्र भारतात आहे आता हा उत्पादन कारखानाही आमचा गौरव वाढवेल.

मित्रहो, व्यापारी समुदायाशी माझी जेव्हा चर्चा होते तेव्हा मी नेहमीच एक गोष्ट सांगतो. घरात किमान एकही कोरियन उत्पादन  दिसत नाही असे मध्यम वर्गीय घर भारतात क्वचितच आढळेल.भारतीय लोकांच्या जीवनात सॅमसंगने निश्चितच आपले विशेष स्थान प्राप्त केले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या स्मार्ट फोन बाजारपेठेत हे फोन आज जगात अग्रणी आहेत. सॅमसंगच्या नेतृत्वाशी माझी जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी त्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले आहे.आज नोएडा मधे झालेले हे आयोजन त्याचेच प्रतिबिंब आहे.आज डिजिटल तंत्रज्ञान, जन सामान्यांचे जीवन सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.आज भारतात सुमारे 40 कोटी स्मार्ट फोन वापरात आहेत,32 कोटी लोक ब्रॉडबॅंड वापरत आहेत,अतिशय कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध आहे,देशातल्या एक लाखाहून अधिक ग्राम पंचायतीपर्यंत फायबर नेटवर्क पोहोचले आहे.या सर्व बाबी म्हणजे देशात होत असलेल्या डिजिटल क्रांतीचे संकेत आहेत.

मित्रहो,स्वस्त मोबाईल फोन,वेगवान इंटरनेट, स्वस्त डाटा यामुळे आज वेगवान आणि पारदर्शी सेवा सुनिश्चित झाली आहे.वीज-पाण्याचे बिल भरायचे असू दे,शाळा, महाविद्यालयासाठी प्रवेश असू दे,भविष्य निर्वाह निधी किंवा निवृत्ती वेतन, जवळपास सर्वच सुविधा ऑनलाईन मिळत आहेत.देशभरातली सुमारे 3 लाख सामाईक सेवा  केंद्रे गावकऱ्यांसाठी काम करत आहेत.तर शहरात मोफत वाय-फाय हॉटस्पॉट, गरीब आणि मध्यम वर्गीय युवकांच्या आकांक्षांना नवे पंख देत आहे.

एवढेच नव्हे तर गव्हर्मेंट ई बाजारपेठेच्या माध्यमातून सरकार आता थेट उत्पादकाकडून वस्तू खरेदी करत आहे.यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांना लाभ तर होतोच त्याचबरोबर सरकारी खरेदीत पारदर्शकताही वाढली आहे.

मित्रहो, आज डिजिटल व्यवहार सातत्याने वाढत आहेत.भीम एप आणि रूपे कार्ड यांच्या सहाय्याने व्यवहार अतिशय सुलभ झाला आहे. जून महिन्यात सुमारे 41 हजार कोटी रुपयांचा व्यवहार भीम एप च्या माध्यमातून झाला आहे.आज भीम आणि रूपे बाबत केवळ देशातच नव्हे तर जगभरात उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्येही या दोन सुविधांचे उद्‌घाटन करण्याची संधी मला मिळाली.आज होत असलेले हे आयोजन भारताच्या नागरिकांच्या सबलीकरणात योगदान तर देईलच त्याच बरोबर मेक इन इंडिया अभियानालाही गती देईल.

मित्रहो, मेक इन इंडिया प्रती आमचा आग्रह म्हणजे केवळ आर्थिक धोरणाचा भागच नव्हे तर कोरिया सारख्या आमच्या मित्र राष्ट्रांबरोबर उत्तम संबंध ठेवण्याचा संकल्पही आहे. सॅमसंग सारख्या विश्वसनीय  नाममुद्रेला नवी संधी देण्याबरोबरच जगभरातल्या प्रत्येक व्यावसायिकाला खुले निमंत्रण आहे,जो नव भारताच्या पारदर्शी व्यापार संस्कृतीचा लाभ घेऊ इच्छित आहे. भारताची वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था आणि वाढता नव मध्यम वर्ग, गुंतवणुकीच्या विपुल संधीचे भांडार आहे. या अभियानाचे आज जगभरात स्वागत होत आहे, सहकार्य मिळत आहे याचा मला आनंद आहे. मोबाईल फोन निर्मितीबाबत बोलायचे झाले तर आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर  पोहोचला आहे.

गेल्या चार वर्षात, मोबाईल निर्मिती कारखान्यांची संख्या 2 वरून 120 झाली आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की यात 50 पेक्षा जास्त तर नोएडातीलच आहेत. यातून 4 लाखापेक्षा जास्त युवकांना थेट रोजगार मिळाला आहे. रोजगार निर्मितीतही सॅमसंगची अग्रणी भूमिका राहिली आहे. संपूर्ण देशात आपण सुमारे 70 हजार लोकांना थेट रोजगार पुरविला आहे ज्यात साधारणपणे 5 हजार लोक नोएडामधेच आहेत. या नव्या कारखान्यामुळे आणखी एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. इथे निर्माण होत असलेला कारखाना, हा कंपनीचा सर्वात मोठा मोबाईल फोन निर्मिती कारखाना असेल अशी माहिती मला देण्यात आली आहे. इथे दर महिन्याला साधारणतः 1 कोटी फोनची निर्मिती  होईल. इथे होणाऱ्या उत्पादनापैकी 30 टक्के निर्यात होणार असून जगभरातल्या  विविध देशात हे फोन जातील. यामुळे जागतिक बाजारपेठेत आपली स्थिती  निश्चितच आणखी मजबूत होणार आहे. म्हणजेच कोरियाचे तंत्रज्ञान आणि भारताचे उत्पादन आणि  सॉफ्टवेअर यांच्या आधारावर आपण जगासाठी सर्वोत्तम उत्पादन तयार करणार आहोत. ही आपल्या दोन्ही देशाची ताकद आहे आणि हाच आमचा सामाईक दृष्टीकोन आहे.

सॅमसंगच्या संपूर्ण चमूचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि अनेक शुभेच्छा देतो.आपण मला इथे आमंत्रित केले, या कार्यक्रमात  सहभागी करून घेतले याबद्दल खूप-खूप धन्यवाद.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1538437) Visitor Counter : 86


Read this release in: English