ग्रामीण विकास मंत्रालय

राष्ट्रीय ग्रामीण आजिविका मिशनच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जुलैला थेट संवाद साधणार

दीनदयाळ अंत्योदय आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका योजनेच्या समन्वयातून 45 लाख बचत गटांच्या 5 कोटी महिलांचे सक्षमीकरण

Posted On: 11 JUL 2018 2:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11  जुलै  2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जुलैला देशभरातील बचत गटांचे दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजिविका योजनेच्या लाभार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत. सकाळी 9.30 वाजता होणाऱ्या या संवादाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि एनआयसीच्या वेबवरुन केले जाईल या दोन्ही योजनांच्या अंतर्गत, बचत गटांच्या महिलांनी केलेली विविध कामे आणि उपक्रम जाणून घेण्याची संधी पंतप्रधानांना या संवादातून मिळेल.

यासाठी निवडक लाभार्थी महिलांची निवड करण्यात आली असून, त्यात दारुबंदी चळवळ, मका मूल्य साखळी आणि पणन करणाऱ्या बिहारमधल्या महिला, छत्तीसगढमधल्या विटभट्टीतल्या महिला व्यापारी, सखी आणि हळद उत्पादक महिला, सॅनिटरी नॅपकिन्स, सौर ऊर्जा पॅनेल आणि दिवे बनवणाऱ्या, महाराष्ट्रातील पशु सखी महिला, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत महिला, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला यांचा समावेश असेल.

दीनदयाळ अंत्योदय योजना, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची पथदर्शी योजना आहे. या योजनेअंतर्गत, स्वयंबचत गटातल्या 9 कोटी घरातल्या महिलांना शाश्वत आजिविका म्हणजेच रोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले जाते. त्यासाठीची कौशल्येही त्यांना शिकवली जातात.

दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन यांची सांगड घातल्यामुळे महिला सक्षमीकरणाला एक भक्कम संस्थात्मक व्यासपीठ मिळाले आहे. हे मिशन सध्या 21 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशातील 600 जिल्ह्यांमधल्या 4884 विभागात राबवले जाते. आतापर्यंत 45 लाख स्वयंबचत गटांच्या 5 कोटी महिलांना या मिशनअंतर्गत रोजगाराच्या संधी दिल्या गेल्या आहेत.

या मिशन अंतर्गत, सर्व राज्यांमध्ये एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. राज्य ग्रामीण आजिविका मिशन अंतर्गत विविध स्तरांवर महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी 20 हजार व्यावसायिकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याशिवाय, 25 हजार समुदाय आजीविका संसाधन व्यक्ती म्हणजेच, कृषी सखी किंवा पशुसखी याही आहेत, ज्या छोटे शेतकरी किंवा शेतमजुरांना कृषी आणि पशुविषयक समस्यांमध्ये मार्गदर्शन करत असतात.

गेल्या पाच वर्षात, या बचत गटांना 1.64 लाख कोटी रुपयांचे बँक कर्जही मिळाले आहे. ज्यावर अत्यल्प व्याज दर आकारला जातो.  

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1538312) Visitor Counter : 134


Read this release in: English