पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान आणि कोरियाच्या अध्यक्षांच्या हस्ते नोएडा येथे मोबाईल उत्पादन कंपनीचे उद्‌घाटन

Posted On: 09 JUL 2018 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9  जुलै  2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जई-एन यांच्या हस्ते आज संयुक्तपणे नोएडा येथे सॅमसंग इंडिया इलेक्ट्रोनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मोठ्या मोबाईल उत्पादन केंद्राचे उद्‌घाटन झाले. 

यावेळी बोलतांना, भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याच्या प्रवासातला हा प्रसंग विशेष महत्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ह्या 5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे,सॅमसंग कंपनीचा भारतातील व्यापार तर वाढेलच, त्याशिवाय, भारत आणि कोरिया दरम्यानचे संबध अधिक दृढ होण्यास त्यामुळे मदत होईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

सर्वसामान्य माणसाचे आयुष्य अधिक सुकर करण्यात आणि अधिक जलद, कार्यक्षम तसेच पारदर्शक पद्धतीने सेवा देण्यात डिजिटल तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतात स्मार्टफोन, ब्रॉडबॅड आणि डेटा जोडणीचा व्यापक विस्तार झाला असून ही एक डिजिटल क्रांतीच आहे, असंही त्यांनी सांगितले. याच संदर्भात त्यांनी सरकारी इ बाजार, म्हणजेच जेम’, डिजिटल व्यवहारात झालेली वाढ, भीम अॅप आणि रूपे कार्डचीही माहिती दिली.

 

मेक इन इंडीया उपक्रम हा केवळ आर्थिक धोरण नाही तर दक्षिण कोरियासारख्या भारताच्या मित्र राष्ट्रांसोबत दृढ संबंध निर्माण करण्यासाठीचे पाउल आहे, असे ते म्हणाले. नव्या भारताच्या पारदर्शक व्यापार धोरणाचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या जगभरातील व्यापार उद्योजकांना भारतात उद्योग सुरु करण्यासाठी खुले आमंत्रण आहे, असेही त्यांनी सांगितले. भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि उदयोन्मुख नव-मध्यमवर्ग यांच्यामुळे भारतात गुंतवणुकीच्या अपार संधी निर्माण झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

मोबाईल फोन्सच्या निर्मितीत भारत आता जगात दुसऱ्या क्रमाकावर पोचला आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षात मोबाईल उत्पादक कंपन्यांची संख्या 2 वरून तब्बल 120 पर्यत पोचली आहे. आणि यामुळे लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

या नव्या मोबाईल उत्पादन कंपनीत, कोरियाचे तंत्रज्ञान, भारताचे उत्पादन आणि सॉफ्टवेअरफत यांचा संगम झाला असून, त्यातून आपल्याला जागतिक दर्जाचे उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही दोन्ही देशांची एकत्रित ताकद आणि दूरदृष्टी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1538222) Visitor Counter : 117


Read this release in: English