पंतप्रधान कार्यालय

राजस्थानमधल्या जयपूर येथे लाभार्थींशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला केलेले मार्गदर्शन

Posted On: 07 JUL 2018 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7  जुलै  2018

 

राजस्थानच्या परंपरेला अनुसरून आणि अनुरूप, आपल्या संस्कृतीला साजसे, कशा प्रकारे स्वागत केले जाते, कसा सत्कार केला जातो आणि आपुलकी कशा प्रकारे दिसून येते, याची अगदी स्पष्ट झलक मी आज अनुभवतो आहे. राजस्थानी भूमीचे सत्यरूप नेमके काय आहे, लोकांचे मत काय?,हेच या विशाल मैदानावर प्रत्येकाला दिसून येत आहे. राजस्थान अगदी सदोदित आमच्यावर स्नेहाचा वर्षाव करीत आला आहे. आपल्या या आशीर्वादाबद्दल मी आपले अगदी मनापासून आभार मानतो आणि या वीरांच्या भूमीला वंदन करतो.

मित्रांनो, राजस्थानमध्ये शक्ती आणि भक्तीचा संगम आहे. महाराणा प्रताप यांचे शौर्य-धाडस, महाराजा सूरजमल यांची वीरता, भामाशाह यांचे समर्पण, पन्नाधायचा त्याग, मीराबाईची भक्ती, हाडीराणीचे बलिदान, अमृता देवी यांचे आत्मोसर्ग अशा सर्व महान लोकांच्या गाथा इथल्या जनजीवनाचा बनला आहे. गगनचुंबी किल्ले, सोनरी-पिवळ्या, रंग-बिरंगी पगड्या, मधूर बोलणं, मधूर गीत आणि चालरितींची मर्यादा ही तर राजस्थानची खरी ओळख आहे. निसर्गाने दिलेल्या आव्हानामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी सामना करीत अन्नधान्याचे उत्पादन असेल किंवा देशाच्या संरक्षणाची परीक्षा असेल, राजस्थान अनेक शतकांपासून या देशाला प्रेरणा देत आला आहे.

बंधू आणि भगिनींनो, गेल्या चार वर्षांपासून राजस्थान दुप्पट वेगाने आणि शक्तीने विकासमार्गावरून पुढे वाटचाल करीत आहे. केंद्र आणि राजस्थानचे सरकार यांनी मिळून आपल्या सर्वांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे, अजूनही हे प्रयत्न सुरूच आहेत. एकवीसशे कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या 13 योजनांचा शिलान्यास करण्याची संधी आज मला मिळाली. उदयपूर, अजमेर, कोटा, धौलपूर, नागौर, अलवर, जोधपूर, झालावाड, चित्तौडगढ, किशनगढ, सुजानगढ, बिकानेर, भीलवाडा, माउंट आबू, बूंदी आणि ब्यावर इथल्या प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे.

हे सर्व प्रकल्प राजस्थानातल्या शहर आणि गावांमध्ये चांगल्या आणि ‘स्मार्ट’ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

वाहतुकीच्या कोंडीपासून मुक्तता असेल किंवा सांडपाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा करणारी व्यवस्था असेल. या सर्व प्रकल्पांमुळे गावांमध्ये, शहरांमध्ये निवास करीत असलेल्या लोकांचे जीवन सुगम बनणार आहे.

मित्रांनो, चार वर्षांपूर्वीची परिस्थिती आपण अद्याप विसरलेली नसणार. वसुंधराजी यांना कोणत्या परिस्थितीमध्ये सरकारचा कार्यभार स्वीकारावा लागला, याविषयी आपल्या सर्वांना सगळं काही माहिती आहेच. मागच्या सरकारने निर्माण केलेल्या परिस्थितीविषयीही आपल्याला माहिती आहे. या गोष्टी तुम्ही कधीच विसरू नका. आता तुमच्या आपोआपच लक्षात येईल की, आमचे सरकार कशा पद्धतीने चांगले काम करीत आहे. मागच्या सरकारच्या काळात राजस्थानमधल्या नेत्यांमध्ये आपल्या नावाची कोनशिला लावण्याची जणू स्पर्धाच सुरू होती, हे आता लोकांच्या लक्षात येईल. बाडमेर येथे आता जो तेलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होत आहे, त्याबद्दल याआधी काय काय झालं हे तर राजस्थानमधल्या प्रत्येक लहान लहान मुलालाही माहीत आहे. आज आता या शुद्धीकरण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. अशाच प्रकारे सध्याचे सरकार काम करत आहे. ज्या ठिकाणी काम अडून राहील, काही समस्या निर्माण होईल, ती अडचण तातडीने सोडवून आम्ही काम करतो. मग ते सरकार केंद्रातले असो अथवा राज्यातले. भारतीय जनता पार्टीची एकच कार्यक्रम पत्रिका आहे आणि तो म्हणजे विकास, विकास आणि विकास. देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन अधिकाधिक सोपं, सरळ, स्वस्थ, सुरक्षित आणि सुगम बनवण्यासाठी आम्ही एका पाठोपाठ एक अनेक योजना हाती घेत आहोत. काम करत, योजनांची अंमलबजावणी करत आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. सरकारच्या या योजनांचा किती लाभ आपल्यापर्यंत पोहोचला याची माहिती घेवून आणि काही अडचण, प्रश्न असतील तर ते जाणून, समजून घेवून त्याचबरोबर कामामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही करत आहोत. काही वेळापूर्वीच मी आपल्यापैकी काही लाभार्थींशी संवाद साधला. त्यांना मला आमच्या सरकारच्या योजनांचा लाभ घेतल्यामुळे स्वतःच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडून आले आहे, त्याविषयी सांगितले. यावेळी फक्त केंद्राच्या योजनांचा लाभ घेणारी मंडळीच नाही तर राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थीही आपला अनुभव सांगत होते. राजश्री योजनेअंतर्गत, ज्या बुद्धिमान, हुशार मुलींना स्कूटी मिळाली आहे, पालनहार योजनेअंतर्गत ज्या मुलांना लाभ झाला आहे, ज्या वयोवृद्ध नागरिकांना तीर्थ योजनेचा लाभ झाला आहे, त्या सर्वांच्या डोळ्यामध्ये एक जी वेगळी चमक दिसली, त्यांच्यामध्ये जो विश्वास दिसला, तो कोणी विसरू शकणार नाही. आणि या कामासाठी मी वसुंधराजी यांचे अभिनंदन करतो.

समाजामध्ये एका असा वर्ग आहे, त्यांच्या कानावर ‘भारतीय जनता पार्टी’ हे नाव पडताच, त्यांची झोप उडते. मोदी किंवा वसुंधरा जी यांचे नाव ऐकताच त्यांना ज्वर चढतो. त्यांना असे विकासाच्या कार्यक्रमांचे जणू वावडे आहे. परंतु या सर्वांचा मोठा लाभ  वेगळाच आहे. लाभार्थींच्याच तोंडून आता राजस्थानच्या जनतेला आमच्या योजनांची माहिती मिळत आहे. या योजना कोणत्या आहेत, त्याचा लाभ आपल्यालाही मिळू शकतो का, मी सुद्धा लाभार्थी बनू शकतो किंवा शकते, असा विचार आता सगळेच करायला लागले आहेत, हे एक चांगलेच झाले.आमची कोणतीही योजना केवळ कागदावरच अडकून राहिलेली नाही. ती जनता जनार्दनापर्यंत पोहोचते. यामुळे सरकारी यंत्रणेवर एकप्रकारे दडपण निर्माण होते. जनता जनार्दनाचे दडपण तयार होते. लोकांमध्ये जागरूकता येते आणि त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, जर एखादा अधिकारी कामामध्ये चालढकल करत असेल,  तर त्यालाही आता धावपळ करीत काम वेगाने करावे लागते. यासाठीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार एखाद्या योजनेची जितकी जाहिरात करते त्यापेक्षाही जास्त लाभार्थींमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे खूप मोठे, चांगले काम होत आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की, लाभार्थींनीच आपल्याला सरकारी योजनांचा लाभ कशा पद्धतीने झाला, हे सगळीकडे, वारंवार सांगावे. त्याचा फायदा ज्या लोकांनी आत्तापर्यंत योजनेचा लाभ घेतला नाही, राहून गेले आहेत अशा गावकरी मंडळींना होवू शकेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या सर्व पात्र मंडळींनी पुढे यावे, अशी सरकारची इच्छा आहे.

मित्रांनो, गेल्या चार वर्षांमध्ये जितके कार्यक्रम तयार करण्यात आले, त्याचा केंद्रबिंदू आमचा गरीब, शोषित, पीडित, वंचित, दलित, आदिवासी, आमचा शेतकरी बंधू, आमच्या माता- भगिनी आहेत. 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होणार आहेत. 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे आणि सरकार त्यासाठी कार्य करत आहे. या भूमीचे  पुत्र असणारे माझे सहकारी, गजेंद्रसिंह शेखावत, कृषी विभागाला पुढे नेण्यासाठी कार्य करीत आहेत. तीन वर्षांपूर्वी मृदा आरोग्य पत्रिका योजनेचा प्रारंभ राजस्थानमधल्या सूरजगढ इथून करण्याची संधी मला मिळाली होती, त्या राजस्थान भेटीची मला चांगली आठवण आहे. देशामध्ये 14 कोटी ‘मृदा आरोग्य पत्रिका’ वाटण्याचे लक्ष्य निश्चित केले होते, आज मला सांगण्यास आनंद होतो की, आम्ही हे लक्ष्य गाठले आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला, वचन पूर्ण केले. आत्तापर्यंत देशामध्ये 14 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त ‘मृदा आरोग्य पत्रिका’ शेतकरी बांधवांना देण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्ये जवळपास 90 लाख शेतकरी बांधवांना या पत्रिका दिल्या आहेत. या मृदा पत्रिकांच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतीने शेती करणे आता अधिक सोपे झाले आहे. आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. आपल्या लक्षात आले असेल, अनेक वर्षांच्यानंतर देशामध्ये खूप प्रचंड प्रमाणावर, विक्रमी पिक यंदा आले आहे. मित्रांनो, आणखी एक सुखद योगायोग आज जुळून आला आहे. सरकारने पिकांचे किमान समर्थन मूल्य निश्चित करताना आता ते पिक खर्चाच्या दीडपट मूल्य देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. आणि आम्ही आणखी एका वचनाची पूर्ती केली. या निर्णयानंतर माझा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे.  राजस्थानमध्येच ही संधी मिळाली.

यावेळी बाजरी, ज्वारी किंवा डाळींचे उत्पादन आपण घेतले तर त्यासाठी तुम्ही जितका खर्च करणार आहे, त्याच्या दीडपट भाव मिळणार आहे. मित्रांनो, मी राजस्थानमधल्या शेतकरी बांधवांना या योजनेची माहिती विशेषत्वाने अगदी विस्ताराने सांगू इच्छितो. एक क्विंटल बाजरी लावण्यासाठी अंदाजे 990 रूपये खर्च होत असेल, तर सरकारने बाजरीची ‘एमएसपी’ वाढवून 1950 रूपये केली आहे. आधी 990 रूपये लागवडीचा  खर्च  मिळत असे, आता 1950 रूपये मिळेल, म्हणजेच पिक खर्चाच्या जवळपास दुप्पट समर्थन मूल्य मिळणार आहे. याचप्रमाणे ज्वारीचा पिक खर्च जवळपास 1620 रूपये आहे, त्याऐवजी आता ज्वारीची ‘एमएसपी’ 2430 रूपये करण्यात आली आहे. मका उत्पादकांना प्रति क्विंटल जवळपास 1130 रूपये खर्च अंदाजे येतो, आता मक्याला 1700 रूपये ‘एमएसपी’ देण्यात येणार आहे. मूग उत्पादनासाठी 4650 रूपये खर्च येतो, आमच्या सरकारने मुगाची एमएसपी वाढवून जवळपास 7000 रूपये केली आहे. याबरोबरच तूरडाळ असेल, उडदडाळ असेल, सोयाबीन असेल, धान असेल या सर्व पिकांचे समर्थन मूल्य पिकाच्या खर्चाच्या दीडपट करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने राज्य सरकारांशी संवाद साधून शेतकरी बांधवांचे उत्पादन योग्य पद्धतीने खरेदी करावे, यासाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था तयार होवू शकेल, अशी सुविधा निर्माण केली आहे. शेतकरी बांधवांनी गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान, आदर केला जाणार आहे. आत्तापर्यंत सरकारने जवळपास साडे अकरा हजार कोटींचे धान्य सरकारने खरेदी केले आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे.

मित्रांनो, बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. शेतकरी बांधवांसाठी गेल्या चार वर्षांत या योजना तयार झाल्या आहेत. वसुंधरा जी यांचे सरकारही पूर्ण क्षमतेने काम करत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई म्हणून आत्तापर्यंत इथल्या शेतकरी बांधवांना अडीच हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. मित्रांनो, गरीबीशी लढा देण्यासाठी या आधी ज्या पद्धतीने काम केले जात होते, त्यापेक्षा  भारतीय जनता पार्टीच्या सरकारने खूप वेगळा मार्ग निवडला आहे. सरकारने गरीबांच्या सशक्तीकरणासाठी आणि विकासासाठी कामामध्ये, योजनेमध्ये त्यांनाच भागीदार बनवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आता त्याचे चांगले परिणाम स्पष्ट दिसून येत आहेत. जगातल्या एक नामवंत संस्थेने अलिकडेच पाहणी करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये सांगितले आहे की, भारतामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास पाच कोटी लोक गरीबीच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडले आहेत. पाच कोटी लोकांना गरीबीतून मुक्तता मिळाली आहे. मित्रांनो, गरीबीतून मुक्ती मार्ग दाखवणारा म्हणून हा देश अग्रेसर ठरला आहे. यामागे कारण आहे, ते म्हणजे आमचा विचार स्वच्छ, स्पष्ट आहे आणि त्यामुळे योग्य प्रकारे विकास होत आहे. देशाच्या सव्वाशे कोटी लोकांचे सहकार्य या सरकारला मिळत आहे. आपल्या सहकार्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत, राजस्थानामध्ये जवळपास 80 लाख शौचालयांची निर्मिती करण्यात आली.

या काळामध्ये देशामध्ये जवळपास 32 कोटी गरीबांचे बँकेमध्ये खाते उघडले गेले. त्यापैकी अडीच कोटींपेक्षा जास्त जन धन खाती राजस्थानमध्ये उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत आणि पहिल्या योजना पूर्ण करून राजस्थानमधल्या जवळपास 6 लाखांपेक्षा  जास्त गरीब लोकांना राहण्यासाठी घर देण्याचे कामही या सरकारने केले आहे. फक्त एक रूपया प्रति महिना आणि 90 पैसे प्रतिदिन इतक्या कमी हप्त्यामध्ये राजस्थानच्या सर्व 70 लाख लोकांना आता सुरक्षा विमा कवच मिळाले आहे.

मित्रांनो, मुद्रा योजनेअंतर्गत राजस्थानच्या 44 लाखांपेक्षा जास्त उद्योजकांना स्वयंरोजगारासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज देण्यात आले आहे. याशिवाय फक्त एक वर्षामध्ये राजस्थानच्या जवळपास 3 लाख लोकांना सौभाग्य योजने अंतर्गत, मोफत विद्युत जोडणी देण्यात आली आहे. राजस्थानातल्या 33 लाखांपेक्षा जास्त माता -भगिनींना उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेने तर महिलांचे आयुष्यच बदलण्याचे काम केले आहे. बंधू आणि भगिनींनो, अलिकडेच मला या योजनेच्या लाभार्थी माता-भगिनींशीं संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला आणखी एक गोष्ट माहीत झाली. एका भगिनीने सांगितले की, उज्ज्वला योजनेमुळे धुरापासून मुक्ती तर मिळाली आहेच, त्याच बरोबर पाण्याची बचत होत आहे. गॅसवर भोजन बनवले जात असल्यामुळे आता चुलीमुळे व्हायची तशी भांडी काळी होत नाही. आणि आता पूर्वीपेक्षा  कमी पाण्यात भांडी घासली-विसळली जातात. याचा अर्थ राजस्थानच्या मातांसाठी उज्ज्वला योजना दुप्पट फायदा देणारी ठरली आहे.

मित्रांनो, मला चांगलं माहीत आहे की, राजस्थानातल्या लोकांचा खूप सारा वेळ तर पाण्याची गरज भागवण्यासाठी खर्च होतो. वसुंधरा जी यांच्या सरकारने यावर उपाय योजना करण्यासाठी जे प्रयत्न सुरू केले आहेत ते खरोखरीच कौतुकास्पद आहेत. जल स्वावलंबन मोहिमेची माहिती मला देण्यात आली. या माध्यमातून गावे आणि शहरांमध्ये मिळून 4 हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. साडे 12 हजारांपेक्षा जास्त गावांना पेयजल सुविधा देण्यात आली आहे. बंधू -भगिनींनो, आपल्यामध्ये लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्रीजींनी मला सांगितलं की, राजस्थान सरकार आणि आमदारांनी एक मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. पार्वती, काली, सिंध, चंबल यांना जोडणारा एक प्रकल्प तयार करावा आणि तो राष्ट्रीय प्रकल्प असल्याचे जाहीर करण्यात येवून त्याचे काम करावे. या प्रकल्पाची सविस्तर योजना सरकारने तयार केली असून त्याचा अहवाल जलस्त्रोत मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे, या मोठ्या योजनेविषयी तांत्रिक माहिती तपासण्याचे कार्य सध्या सुरू असल्याची माहितीही मला देण्यात आली. ही योजना कार्यान्वित झाली तर राजस्थानमधल्या दोन लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येवू शकणार आहे. इतकेच नाही तर या परियोजनेमुळे जयपूर, अलवर, भरतपूर, सवाई माधवपूर, झालावाड, कोटा, बुंदी, यासारख्या 13 जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या राजस्थानच्या 40 टक्के जनतेला पेयजल उपलब्ध होवू शकणार आहे. बंधू -भगिनींनो, मी आपल्याला आश्वासन देवू इच्छितो की, केंद्र सरकार या प्रकल्पाच्या निर्मितीच्या मागणीचा सकारात्मक विचार करेल. राजस्थानचा विकास व्हावा, इथला शेतकरी बांधवाला पाण्याची सहजतेने उपलब्धता व्हावी, इथल्या लोकांना पेयजल मिळावे, यासाठी या प्रकल्पाविषयी अतिशय संवेदनशील मनाने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

मित्रांनो, गरीबाला सशक्त करण्यासाठी सरकारने आरोग्य, पोषण, शिक्षण या क्षेत्रामध्ये आणि विशिष्ट उद्देशाने काम सुरू केले आहे. मागच्या वेळी मी झुंझुनू आलो होतो, त्यावेळी राष्ट्रीय पोषण मोहिमेसारख्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. आता हा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवला जात आहे. याशिवाय महिला आणि बालकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम आणि विशेष तज्ज्ञाच्या देखरेखीखाली बाळंतपण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे नवमातांच्या मृत्यूदरामध्ये लक्षणीय घट झाली आहे. यासाठी राजस्थानच्या माता -भगिनी आणि राजस्थान सरकारचे मी विशेष अभिनंदन करतो. यासाठी सरकारने जे जे प्रयत्न केले, त्याचे चांगले परिणाम आता दिसून येवू लागले आहेत. याचबरोबर ‘बेटी -बचाओ, बेटी-पढाओ’ या मोहिमेमध्ये राजस्थानमध्ये खूप चांगले काम झाले आहे- होत आहे, हे उल्लेखनीय आहे. गरीबांच्या दृष्टीने आजारी पडणे हा खूप चिंतेचा विषय आहे. गरीबांना आजारपण आले तरी चांगले उपचार मिळावेत आणि आजारपणाच्या संकटावर त्यांना मात करता यावी, यासाठी सरकारने अतिशय महत्वाकांक्षी ‘आयुष्यमान भारत’चा संकल्प केला आहे. या योजने अंतर्गत गंभीर आजारपणामध्ये जवळपास 50 कोटी लोकांना दरवर्षी पाच लाखांपर्यंत मोफत औषधोपचार करणे शक्य होणार आहेत. या योजनेचे काम वेगाने सुरू आहे आणि लवकरच तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टीच्या सरकारांनी प्रत्येक योजनेचे लक्ष्य देशाच्या संतुलित विकास करण्याचे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने, सुरक्षितपणे आणि स्वाभिमानाने जगता यावे यासाठी कार्य करण्याचे आहे. सध्या देशामध्ये एक अभूतपूर्व जनआंदोलन चालवण्यात येत आहे. त्याचे नाव ‘राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान’ असे आहे. गावांमध्ये विकासाच्या वेगवेगळ्या मुद्यांचा, घटकांचा विचार यामध्ये करण्यात येत आहे. नव्या जोशाने, स्फूर्तीने काम केले जात आहे. गावांमध्ये सर्वांचे अगदी प्रत्येकाचे बँकेमध्ये खाते असावे, सर्व घरांमध्ये गॅस कनेक्शन असावे, प्रत्येक घरामध्ये वीज असावी, सर्व बालकांचे लसीकरण केले जावे, सर्वांना विम्याचे सुरक्षा कवच मिळावे, प्रत्येक घरामध्ये एलईडी बल्ब असावेत, यासाठी योजना राबवण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत यावर्षी 15 ऑगस्टपर्यंत राजस्थानमध्ये सर्व अडीच हजार गावांना या सर्व योजनांचा संपूर्ण लाभ देण्यात येणार आहे.

मित्रांनो, ‘सबका साथ- सबका विकास’ हा मंत्र घेवून आम्ही वाटचाल करताना देशाच्या प्रत्येक भागामध्ये मग ते एखादे लहानसे गाव असो किंवा शहर सर्व ठिकाणी विजेचा प्रकाश पोहोचला पाहिजे, यासाठी खूप वेगाने काम केले जात आहे. देशातल्या 100 मोठ्या शहरांमध्ये वेगाने स्मार्ट सुविधा- व्यवस्था विकसित केल्या जात आहेत. या निवडक 100 शहरांमध्ये आपल्या राजस्थानच्या जयपूर, उदयपूर, कोटा आणि अजमेर या शहरांचाही समावेश आहे. या शहरातील रस्त्यांना, गल्लींना वाहतूक, वीज- पाणी आणि सांडपाणी यांसह इतर सर्व प्रशासनाशी संबंधित गोष्टी स्मार्ट बनवण्यासाठी केंद्र सरकारने सात हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. राजस्थान सरकार आता या नवीन योजनांवर काम करत आहे.

मित्रांनो, आज जी कामे सुरू आहेत, ती कामे तर याआधीही होवू शकली असती. परंतु याआधीचे सरकार कोणते विचार डोक्यात ठेवून काम करीत होते, ते आपल्याला चांगले माहीत आहे. या विचारांचा परिणाम म्हणजे काँग्रेसला आजकाल लोक ‘बेलगाडी’ असे म्हणत आहेत. ‘बैलगाडी’ नाही तर ‘बेलगाडी’! शेवटी काँग्रेसचे ‘दिग्गज’ मानले जाणारे जवळपास अनेक नेते आणि काही माजी मंत्री आजकाल बेल म्हणजे जामिनावर आहेत. परंतु ज्या भरवशाने काँग्रेसच्या संस्कृतीला नाकारलं आणि भाजपाला बहुमत दिलं. तोच भरवासा, विश्वास दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे सरकार करीत आहे. आम्ही नवभारताचा संकल्प करून त्या दिशेने पुढे वाटचाल करीत आहोत. 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याआधीच एक वर्ष मार्चमध्येच राजस्थानच्या निर्मितीला 70 वर्ष पूर्ण होणार आहेत. नव भारताची निर्मिती नव राजस्थानशिवाय होणे अशक्य आहे. अशावेळी माझ्या बंधू- भगिनींसाठीही राष्ट्र निर्माण- राजस्थान निर्माणाचा ही सुवर्ण संधी आली आहे, असं मला वाटतं.

मित्रांनो, हे वर्ष देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या परमवीर चक्र विजेता शहीद पीरूसिंह शेखावत यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. आगामी काही दिवसांतच त्यांच्या बलिदानाला 70 वर्ष पूर्ण होणार आहेत. या महान हुतात्म्याला मी शतशः वंदन करतो. आमचे राष्ट्र अशाच अनेक हुतात्म्यांचे शौर्य, राष्ट्रभक्ती, वीरता यांच्या आधारामुळे संपूर्ण दुनियेसमोर ताठ मानेने उभे आहे. परंतु दुर्दैवाने आमच्या राजकीय विरोधकांना याचे महत्व नाही. सरकारवर टीका करणे ठीक आहे, परंतु त्यांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे पाप केले आहे. असे याआधी कधी घडले नाही. राजस्थानची जनता, देशातली जनता असे राजकारण करणाऱ्या लोकांना कधीच माफ करणार नाही. मित्रांनो, ज्यांना कुटुंबाचे, वंशवादाचे राजकारण करायचे आहे, त्यांनी ते करावे. परंतु देशाचे संरक्षण करणे आणि देशाला स्वाभिमानाच्या शिखरावर नेण्याचा निर्णय आमचा अतूट आहे. त्यामध्ये बदल होणार नाही. आमचे विचार स्वच्छ, स्पष्ट आहेत. याच कारणामुळे ‘वन रँक वन पेंशन’ हा प्रदीर्घ काळ रखडलेला प्रश्न आमच्या सरकारने मार्गी लावला. बंधू भगिनींनो, देश आज एका नवीन आणि महत्वपूर्ण वळणावर उभा आहे. एका नवीन दिशेने आपण निघालो आहोत. आत्तापर्यंत काही खूप अवघड, कठीण असलेली लक्ष्य साध्य झाली आहेत. आणि आणखी काही निश्चित केलेली उद्दिष्टे गाठायची आहेत, त्या दिशेने पुढे वाटचाल सुरू आहे. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे निश्चित केलेला प्रत्येक संकल्प सिद्धीस नेण्यामध्ये सरकारला नक्कीच यश मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.  आज ज्या ज्या योजनांच्या कामाला प्रारंभ झाला आहे, त्यासाठी राजस्थानच्या लोकांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देवून मी आपलं भाषण समाप्त करतो.

माझ्याबरोबर आपण सर्वांनी म्हणावं,

भारत माता की जय !

भारत माता की जय !

खूप खूप धन्यवाद !!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1538192) Visitor Counter : 82


Read this release in: English