सांस्कृतिक मंत्रालय
भारताला मिळाले ३७ वे जागतिक युनेस्को वारसा स्थळ
दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारती जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित
Posted On:
30 JUN 2018 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2018
दक्षिण मुंबईतील १९ व्या शतकातील "व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारतींचा" जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.बहरीन मधील मनामा येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४२ व्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला. जागतिक वारसा समितीच्या शिफारशीनुसार भारताने "मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारतीं" असे नामकरण स्वीकारले आहे.

युनेस्कोच्या परिचालन मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद करण्यात आलेल्या निकष (ii) आणि (iv) अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत " मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारतीं " समाविष्ट करण्यात भारत यशस्वी ठरला आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे मुंबई हे अहमदाबाद नंतरचे दुसरे शहर बनले आहे. गेल्या पाच वर्षांत भारतातील सात स्थानांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. भारतातील एकूण ३७ स्थाने या यादीत असून यापैकी २९ सांस्कृतिक आहेत तर ७ नैसर्गिक आहेत. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारत जगात सहाव्या स्थानावर आहे तर आशिया आणि प्रशांत क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर आहे.
या महत्वपूर्ण घोषणेबद्दल केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मुंबईच्या नागरिकांचे तसेच संपूर्ण देशाचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असून यामुळे पर्यटनाला तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे ते म्हणाले.


१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन शैलीच्या आणि २० व्या शतकातील कलात्मक स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या या इमारती समुद्र किनाऱ्याजवळ असून ओव्हल मैदानाने जोडलेल्या आहेत.

जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या १९ व्या आणि २० व्या शतकातील या इमारतीत ओव्हल मैदानजवळील उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, वॉटसन हॉटेल, आदी वास्तूंचा समावेश आहे.



N. Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1537345)
अभ्यागत कक्ष : 8280