अर्थ मंत्रालय
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत डिसेंबर 2018 पर्यंत 1 कोटी घरांचे हस्तांतरण : हरदीप सिंग पुरी
मंत्रालयाकडून दर महिन्याला 3-5 लाख घरे मंजूर
Posted On:
25 JUN 2018 11:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2018
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर मंत्रालय डिसेंबर 2018 पर्यंत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 1 कोटींहून अधिक घरांचे हस्तांतरण करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप सिंग पुरी यांनी दिली.
एआयआयबीच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीत ‘शाश्वत विकासाची उद्दिष्टे’ यासंदर्भातील चर्चासत्रात बोलत होते. “रिसर्च ॲण्ड इन्फर्मेशन सिस्टिम फॉर डेव्हलपिंग कंट्रीज” आणि “फोरम इंडियन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन” यांनी संयुक्तरित्या हे चर्चासत्र आयोजित केले होते.
मंत्रालयाने आज 3,18,000 घरे मंजूर केली असून मंजूर घरांची संख्या एकूण 51 लाख झाली आहे, अशी माहिती पुरी यांनी दिली.
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सुरक्षित वाहतूक, पर्यावरणावर कमीत कमी दुष्परिणाम, कचऱ्यापासून ऊर्जा व खत, महिला, मुले आणि वृद्ध व्यक्तींचा विचार यावर भर दिला जात आहे. गुजरातमधील सुरत येथे सीसीटीव्हीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुन्ह्यांचा दर 20 टक्क्यांनी कमी झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी निधीचा तुटवडा नसल्याची ग्वाही पुरी यांनी दिली.
N.Sapre/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1536610)