जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

‘वॉटर प्रॉडक्टिव्हीटी मॅपिंग ऑफ मेजर इंडियन क्रॉप’ या नाबार्डच्या पुस्तकाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 14 JUN 2018 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14  जून  2018

 

‘वॉटर प्रॉडक्टिव्हिटी मॅपिंग ऑफ मेजर इंडियन क्रॉप्स’ या नाबार्डने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे केंद्रीय जल संसाधन आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रकाशन झाले.

देशात पाण्याची टंचाई नाही मात्र जल संसाधनांचे नियोजन आणि व्यवस्थापन यात अधिक सुधारणा करायला हवी असे गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. जल संसाधनांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी आपले मंत्रालय कल्पक मार्गावर विचार करत आहे. समुद्राच्या पाण्यातले मीठ आणि खनिज वेगळे करुन त्याच्या सिंचनासाठी आणि इतर कामासाठी उपयोग करण्यासंदर्भातले तुतीकोरीन, पारादीप आणि कांडला असे तीन प्रकल्पांचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली.

लांब कालव्यापेक्षा जलवाहिनीला प्रोत्साहन देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले. जलवाहिन्या आणि ठिबक सिंचन यामुळे जलसंवर्धन नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शेताला पाणी आणि पर ड्रॉप मोअर क्रॉप यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पीक लागवडीपूर्वी मृदा परीक्षणाप्रमाणेच जल परीक्षणाची गरज त्यांनी व्यक्त केली. यामुळे पीक उत्पादकता वाढण्याबरोबरच पाण्याचा अपव्ययही टाळता येईल असे गडकरी म्हणाले.

 

 

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1535518) Visitor Counter : 73


Read this release in: English