पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सिंद्री येथे दिली भेट, झारखंडमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी

Posted On: 25 MAY 2018 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमध्ये सिंद्री येथे आयोजित कार्यक्रमात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली. यात पुढील उपक्रमांचा समावेश होता :

  • हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन मर्यादितच्या सिंद्री खत प्रकल्पाचे पुनरुज्जीवन
  • GAIL चा रांची शहर वायू वितरण प्रकल्प
  • देवघर येथील एम्स
  • पत्रातू औष्णिक ऊर्जा प्रकल्प

पंतप्रधानांच्या उपस्थितीत जनौषधी केंद्रांसाठीच्या सामंजस्य करारांची देवाणघेवाणही झाली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. झारखंडच्या गतीमान विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या दिवशी पायाभरणी करण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी एकूण 27000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे सांगत या विकास प्रकल्पांमुळे झारखंडमधील युवांना मोठी संधी मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जेव्हा आपण कार्यभार स्वीकारला तेव्हा 18000 गावे विजेपासून वंचित होती, या गावांमधील नागरिकांचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी आणि त्यांना वीज प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने चांगले काम केले आहे. आता त्याच्या पुढचे पाऊल उचलत देशातील प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचावी, याची खातरजमा सरकार करणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

सध्या बंद पडलेले खत प्रकल्प आता लवकरच नव्याने सुरु होतील. पूर्वेकडील भागाला त्याचा सर्वात जास्त लाभ होईल, असेही ते म्हणाले.

झारखंडमध्ये एम्ससारख्या संस्थेच्या स्थापनेमुळे राज्यात उत्तम आरोग्यसेवा व्यवस्था उपलब्ध होईल, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे अत्यंत गरीब व्यक्तीलाही दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकतील, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने हवाई मार्गे होणारा प्रवास सहज आणि परवडण्याजोगा केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

 

 

 

B.Gokhale/M.Pange/D.Rane

 



(Release ID: 1534781) Visitor Counter : 63


Read this release in: English